अंगातील भूत उतरविण्यासाठी नेलेल्या तरूणाला मांत्रिक बाबाने झाडाला उलटे टांगून जबर मारहाण केली. या अमानुष मारहाणीत हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
हा बाबा गोंदियामध्ये भूत उतरविणारा म्हणून प्रसिद्ध आहे. झपाटलेल्या भूतापासून आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्याच्या कुटुंबियाने राधेश्याम बिसेन या तरूणाला बाबाकडे नेले. या बाबाला राधेश्याममध्ये झपाटलेले भूत दिसले ते भूत उतरविण्यासाठी या बाबाने त्याला झाडावर उलटे टांगले आणि मारमार मारले. भुताला नको पण मला वाचवा असे राधेश्याम टाहो फोडून सांगत होता. मात्र बाबावर अचाट विश्वास असल्याने राधेश्यामला होणार्या मारहाणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. राधेश्यामला खूप त्रास होऊ लागला. मारून मारून थकल्यानंतर या बाबाने त्याला सोडले. राधेश्यामला रूग्णालयात दाखल केले असता त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरांनी सांगितले.
भुताच्या नादात आपल्या मुलाला मरणयातना भोगायला लावल्याने राधेश्यामच्या कुटुंबियांना पश्चात्ताप झाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हा भोंदू बाबा असून त्याच्यावर मध्यप्रदेशात अत्याचार, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. बाबाचे हे सत्यरूप ऐकून गोंदियात बाबाविरूद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मात्र अद्याप या बाबाला अटक झाली नाही.
महाराष्ट्र शासनाने ‘जादूटोणा विरोधी कायदा पारीत करावा(अध्यादेश काढून) कारण तोपर्यंत होणार्या जीवित व वित्त हानीला(अघोरी अंधश्रद्धेने) सरकार जबाबदार राहील हे महाराष्ट्र अं.नि.स.स्पष्ट करू इच्छिते.
– पी.एम. जाधव, चंद्रपूर