अंधश्रद्धा निर्मूलनाच्यासाठी सातत्याने पंचवीस वर्षेसंघटीतपणे लढणारी, कृतीशील असणारी आणि याच कार्यात निर्घृणपणे खून होऊन नेता गमावणारी, तरीही त्याच तडफेने उभी असलेली म.अं.नि.स.ही एकमेव चळवळ आहे. शोषणमुक्त, निर्भय आणि नीतीमान समाजाच्या निर्मितीचं ध्येय उराशी बाळगत 35 जिल्ह्यांतील 250 शाखांमधून हे काम सुरू आहे. कोणत्याही शासकीय वा परदेशी अनुदानाशिवाय चालणारे हे जात धर्म निरपेक्ष मजबूत संघटन आहे. अंधश्रद्धा निर्मूलन ते मानवतावाद हा प्रवास संघटनेची वैचारिक आणि कृतिशिलता या दोन्ही पातळीवरची समृद्धी दर्शवितो. संघटनेची हीच वैचारिकता ज्या कृतीतून संघटनेने गेली 25 वर्षं सिद्ध केली, त्या कृतीचा म्हणजेच विविध उपक्रम, कार्यक्रम, चळवळी, आंदोलने, संघर्ष याचा थोडक्यात आढावा आपणापुढे सादर करीत आहे.
9 ऑगस्ट 1989 हा महाराष्ट्र अंनिसचा स्थापना दिवस आहे. शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अंनिसची स्थापना झाली. बोटावर मोजता येतील एवढ्याच शाखांनी सुरू झालेलं हे संघटन आता महाराष्ट्रभर विस्तारलं आहे. या कार्यातून संघटनेने आपली कार्याची चतु:सूत्री तयार केली. ती पुढीलप्रमाणे-
1) शोषण करणार्या, दिशाभूल करणार्या अंधश्रद्धांना विरोध.
2) समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार.
3) धर्माची विधायक व कृतिशील चिकित्सा
4) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ची नाळ जोडून घेणे.
या चारही सुत्रांनुसार संघटनेने सातत्याने कृती केलेली आहे. या लेखात अशा विभागणीत मी संघटनेने केलेले कार्य विषद करतोय, म्हणून ते कालानुक्रमाने नसेल हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे.
शोषण करणार्या, दिशाभूल करणार्या अंधश्रद्धांना विरोध

महाराष्ट्र अंनिसच्या कार्याला सुरवात झाली ती पुण्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून. या जाहीरनाम्यानुसार तीन प्रकारचे कार्य अभिप्रेत होते. पहिली बाब म्हणजे शिक्षणक्षेत्राद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन. 1991 साली या विषयाची पहिली परिषद सातार्यात झाली. दुसरी बाब म्हणजे “अंधरूढीच्या बेड्या तोडा” अशा दोन परिषदा सातार्यातच झाल्या. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ याबाबतची परिषद सोलापूर येथे 1999 साली झाली.
1995 साली पहिली चमत्कार विरोधी यात्रा यशस्वीरित्या काढली गेली. या यात्रेचे घोषवाक्य होते, “चमत्कार घडवा, यात्रा अडवा व पाच लाख रूपये मिळवा.” आज चमत्कार सिद्ध करणार्याला हे आव्हान 21 लाख रूपयांचं झालं आहे. अंनिसचा हा चमत्कार विरोधी रथ महाराष्ट्रातील कोणीही बुवा-बाबा अडविण्यास व आव्हान स्वीकारण्यास पुढं आला नाही. समितीने चमत्कारी बाबांना रोखण्याचं हे पहिलं कृतीशील पाऊल यशस्वी केलं. कारण अनुभव असा आहे की, भविष्यात म्हणजे पुढच्या 15 वर्षांत चमत्कार करणार्या बाबांचा उदय जवळ जवळ झालेला नाही. चमत्कार करून फसविणार्या बाबांच्या कृतींना यामुळं चांगलाच लगाम बसलाय.
कोकणातून ‘शोध भुताचा, बोध मनाचा’ ही प्रबोधन मोहीम घेतली. कोकणात भुताबाबतची अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. या मोहिमेसाठी 3 जथे तयार करून कोकणातील तीन जिल्ह्यांत ही यात्रा राबविली गेली.
‘भानामती विरोधी धडक मोहीम’ मराठवाड्यात राबविली. तेथे अतिशय मोठ्या प्रमाणावर भानामतीचे प्रकार घडत. भुंकणारी भानामती हे या भागातील भानामतीचे विशेष वैशिष्ट्य. या मोहिमेसाठी 8 जथे 80 गावातून फिरले. भानामती विरोधात सगळ्यात मोठं प्रबोधन या मोहिमेतून घडलं.
‘युवा एल्गार मोहीम’ या मोहिमेत जवळपास 25000 संकल्पपत्रे महाराष्ट्रातील तरूणांकडून भरून घेण्यात आली. व्यसन करणार नाही, किमान एक चांगला ग्रंथ विकत घेऊन वाचेन अशा प्रकारच्या 10 संकल्पांपैकी कोणतेही 4 संकल्प आचरणात आणावयाचे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले.
‘डाकीण प्रथा विरोध प्रबोधन मोहीम’
आदिवासीबहुल नंदूरबार जिल्ह्यातून संघटनेने वर्ष 2002 ते 2007 अशी पाच वर्षेसातत्याने ही मोहीम राबवली. या अंतर्गत डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन परिषद, महिला मेळावे, प्रशिक्षण शिबीरे, आक्काराणी ते यालामोगी संवाद यात्रा, पोलिस पाटलांची संकल्प परिषद, बुवाबाबांचा भांडाफोड, पोलीस ठाण्यातील तक्रारींचा पाठपुरावा, गावकर्यांशी संवाद, प्रचार-प्रबोधन साहित्याचे प्रकाशन अशा विविध स्तरांवर काम करून ही मोहीम राबवली. आज नंदूरबार जिल्ह्यात त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
अशा तर्हेने विविध परिषदा, बुवाबाजीची भांडाफोड प्रकरणे, मोहीमा, चमत्कार सत्यशोध यात्रा या सगळ्या कृतीशीलतेमुळे अंनिसला समाजात मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे जटा निर्मूलन, भ्रामक वास्तूशास्त्र, फलज्योतिष सत्यशोधन परिषद(खान्देशस्तरीय) धुळे. असे अनेक उपक्रम घेण्यात आले. ज्यातून शोषण व दिशाभूल करणार्या अंधश्रद्धांचा कृतीशील विरोध करण्यात आला.
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे
वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकी विचारपद्धतीचे एक मूलभूत सूत्र आहे. भारताच्या संविधानात कर्तव्य म्हणून सांगितलेले, शिक्षणाच्या गाभाघटकात सांगितलेले, मूल्यशिक्षणात स्वीकारलेले हे मूल्य मअंनिसने आपले प्रमुख विचारसूत्र म्हणून अंगीकारले आहे. त्याच्या प्रचारासाठी विविध उपक्रम संघटना गेली अनेक वर्षेराबवित आहे.
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प :- या प्रकल्पद्वारे महाराष्ट्रभर आजअखेर 25000 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. लाखभर विद्यार्थी या प्रकल्पांतर्गत होणार्या विविध परिक्षांना बसून उत्तीर्ण झाले. शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा निकटचा संबंध आहे. याचं महत्व जाणून गेली 25 वर्षं हा प्रकल्प सुरू आहे. स्वयंअध्ययन परिक्षाही याद्वारे घेण्यात येतात. मुलांना घरीच प्रश्नसंच देण्यात येतो. त्यांनी शिक्षक, आई-वडील, मित्र यांच्याशी चर्चा करून, संदर्भग्रंथांचा अभ्यास करून तो सोडवून शाळेत जमा करायचा, शाळेतील शिक्षक ही प्रश्नोत्तरे तपासून निकाल तयार करतात व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र मिळते. या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विज्ञानबोध वाहिनी – विविध चमत्कार सादरीकरणाची प्रात्यक्षिके, खगोलाची माहिती देणारे पोस्टर्स प्रदर्शन, मुलांमुलींना लैंगिकता प्रशिक्षणासाठी फिल्म प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे अशी विविध उपक्रमांची रेलचेल असलेली ‘विज्ञानजत्रा’ महाराष्ट्रभर फिरली. शाळांशाळांमधून या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. प्रा.प.रा.आर्डेलिखीत ‘हसत खेळत विज्ञान’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाने या उपक्रमाची सुरवात झाली आणि संघटनेने त्याचा वरील विस्तार केला.
नभांगण – पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेने भेट दिलेल्या फिरत्या नभांगणाद्वारे आकाशदर्शनाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर विविध शाळांमधून राबविला गेला. प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला इस्लामपूर येथील प्रा.डॉ.नितीन शिंदे, संजय बनसोडे प्रशिक्षित केलेले कार्यकर्तेमहाराष्ट्रभर फिरले. भास्कर सदाकळे(सांगली), संजय कांबळे(डोंबिवली), हेमंत धानोरकर (बीड), विवेक सांबरे(पुणे) या तरूण कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली, आणि हा उपक्रम यशस्वी झाला.
राज्यव्यापी खगोलयात्रा – संजय बनसोडे आणि नितीन शिंदे यांनी एल.सी.डी.प्रोजेक्टद्वारा खगोल विज्ञान व ज्योतिषाची चिकित्सा असा कार्यक्रम राबविला. ही खगोलयात्रा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेली.
फलज्योतिषांना वेळोवेळी आव्हान देण्यात आले. आजपर्यंत हे आव्हान कोणी स्वीकारले नाही. ज्यांनी स्वीकारले त्यांनी तपासणीस नकार दिला किंवा पळवाट काढली.
धर्माची विधायक व कृतीशील, कठोर चिकित्सा
प्रत्येक चिकित्सेची सुरवात ही धर्मचिकित्सेपासून होते असे एक वाक्य माझ्या वाचनात आले. आजअखेरपर्यंत जगातील सर्व सुधारणांची सुरवात धर्मचिकित्सेतून झाली आहे. म.अं.नि.स.ने देखील या धर्मचिकित्सेला अत्यंत महत्वाचे मानले आहे आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष काही कृतीकार्यक्रम राबविले आहेत.
महिला अंधश्रद्धा निर्मूलन जाहिरनामा परिषद, सोलापूर प्रत्येक धर्माने स्त्रीला दुय्यम स्थान दिले आहे. सर्व कर्मकांडे, व्रते, उपवास स्त्रियांच्या वाटेला येतात. अनिष्ट रूढी परंपरांच्या बेड्या महिला गजरे समजून मिरवतात. तेव्हा स्वाभाविकपणे त्या अंधश्रद्धांच्या वाहक होतात. यावर प्रबोधनासाठी सोलापूरला ‘महिला अंधश्रद्धा निर्मूलन जाहीरनामा परिषद’ घेण्यात आली, त्यानंतर या परिषदेतील विचार महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रव्यापी महिला अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन यात्रा काढण्यात आली. त्यात वंदनाताई शिंदे, निशाताई भोसले, शालिनीताई ओक यांच्यासह अनेक महिलांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
शनिशिंगणापूर सत्याग्रह – शनिच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून शनिशिंगणापूर येथे सत्याग्रह करण्याचे ठरले. हा सत्याग्रह नगरमध्ये सभा घेऊन नंतर नेते व कार्यकर्त्यांना अटक होऊन संपन्न झाला. या सत्याग्रहाने महाराष्ट्रात हलचल निर्माण केली. बाबा आढाव, डॉ.श्रीराम लागू, पुष्पाताई भावे, एन.डी.पाटील, व्यंकटअण्णा रणधीर अशा दिग्गजांचा या सत्याग्रहात समावेश होता. अत्यंत शिस्तीत संपन्न झालेल्या या सत्याग्रहाने कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती निर्माण केली.
धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय शैक्षणिक सनद परिषद, बारामती
मराठा समाजातून आलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्या असलेल्या, महिलेने आरक्षणविरोधी भूमिका घेत, महाराष्ट्रभर हलचल निर्माण केली. जिल्ह्या जिल्ह्यात सभा घेत, इतिहासाचे अर्धवट संदर्भ देत आरक्षणाबद्दल समाजात साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय शैक्षणिक सनद परिषद(राज्यस्तरीय) बारामती येथे घेण्यात आली. संघटना ठामपणे या मूल्यांच्या बाजूने उभी आहे, असा संदेश संघटनेने या परिषदेतून दिला.
विविध उपक्रम – ‘विसर्जित गणपती व निर्माल्य दान करा’ मोहिमेने आता जनचळवळीचे रूप घेतले आहे, नगरपालिका प्रशासन यासाठी सक्रीय झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. सण आणि उत्सव हे धर्माचे कृतीशील रूप आहे. त्यात कालसुसंगत व पर्यावरणपूरक पर्याय देण्याचं काम संघटनेनं केलं. या संबंधाने एक जनहित याचिका संघटनेने मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. न्यायालयाने संघटनेची भूमिका मान्य करत शासनाला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली.
पर्यावरणपूरक होळीचा उपक्रमही आता सर्वत्र केला जातो. लाकूडफाटा, गोवर्या जाळून, शिवीगाळ करून केल्या जाणार्या होळीला, पर्यावरणपूरक होळीचा पर्याय अधिक प्रभावी ठरत आहे. या होळीत स्त्रीशक्तीचा जयजयकार करणार्या घोषणा होतात. विवेकी समाजाच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल यानिमित्ताने पडते. कोल्हापूर शाखेतून हा उपक्रम सुरू झाला.
‘फटाकेमुक्त दिवाळी अभियान’ हा आता समाजाने स्वीकारलेला उपक्रम झालाय. ज्याला विकत घेऊन, घरी आणून आपण स्वत:च जाळतो, अशी एकमेव वस्तू आयुष्यात दरवर्षी आपणखरेदी करतो ते म्हणजे फटाके, फटाकेमुक्त दिवाळी अभियान आता महाराष्ट्रातील शाळांशाळांमध्ये पोहोचले आहे. लाखो प्रचारपत्रके हजारो शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच कार्यकर्ते नेऊन पोहोचवितात. प्रत्यक्ष मुलांशी संवाद साधतात. पोस्टर्स, प्रात्यक्षिक, फिल्मद्वारे फटाक्यांच्या दुष्परिणामांची माहिती दिली जाते. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येतोय. फटाक्यांच्या स्टॉलजवळ पुस्तकांचा स्टॉल लावून विधायक पर्याय देण्याचा उपक्रम गेली तीन वर्षे शहादा (जि.नंदूरबार) शाखा राबवित आहे. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
चमत्कार न करताच, आत्मा-परमात्मा, मोक्ष, दैव, प्रारब्ध, संचित यावर भुरळ पाडणारे प्रवचन करून लोकांच्या प्रामाणिक धार्मिक भावनेचा गैरवापर करणारे आध्यात्मिक बुवा-बापू-माँचे प्रस्थ देशात सर्वत्र वाढताना दिसत आहे. वरून किर्तन पण आतून तमाशा अशी ही तथाकथित ढोंगबाजी सर्वत्र पसरली आहे. ही ढोंगबाजी आसारामबापूंच्या रूपाने देशात उघड झाली आहे. या विरोधातही संघटनेने सातत्याने प्रबोधन केले आहे.
व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ची नाळ जोडून घेणे.
केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करून समताधिष्ठित निर्भय व नीतीमान समाजाची निर्मिती होणार नाही याची पक्की जाणीव संघटनेला आहे. त्यामुळे समाजाची उभारणी(जी संविधानाला अभिप्रेत आहे) करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना परिश्रम घेत आहेत. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र, विषय आणि प्राधान्यक्रम वेगळे आहेत. अंनिस चळवळ या सर्वांना आपले भाऊबंद समजते. या चळवळींना शक्य ती मदत साथ द्यावी, असे हे चौथे सूत्र आहे. पण या विषयांवर म.अं.नि.स.ने स्वत: थेट भूमिकाही अनेकदा घेतली आहे व प्रत्यक्ष कृतीदेखील केलेली आहे, त्याचा थोडक्यात आढावा वाचकांना सांगणे आवश्यक वाटते.
जातीअंताची लढाई – स्त्री आणि पुरूष याच दोन जाती, आणि मानवता हाच खरा धर्म. अशी संघटनेची भूमिका आहे. ही भूमिका प्रत्यक्ष जगणारा समाज निर्माण होणं हे प्रत्येक परिवर्तनवादी कार्यकर्त्याचं स्वप्न असतं. यासाठी संघटना सध्या तीन पातळ्यांवर कृतीशील आहे.
1) आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केंद्र – महाराष्ट्र अंनिस व विवेकवाहिनीच्या वतीने लातूर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह स्वागत परिषद झाली. ही राज्यस्तरीय परिषद अत्यंत यशस्वीपणे पार पडली. केवळ परिषद घेऊन न थांबता संघटनेच्या लातूर व कोल्हापूर या केंद्रांनी प्रत्यक्ष असे विवाह घडवून आणण्यात पुढाकार घेतला. एकट्या लातूर शाखेने आजपर्यंत 160 विवाह लावले आहेत. यात आंतरजातीय, आंतरधर्मीय, विधवा, विधूर, घटस्फोटित, परित्यक्ता अशा सर्वच प्रकारच्या विवाहांचा समावेश आहे. संघटनेचे राज्य प्रधान माधव बावगे व दिलीप आरळीकर त्यांच्या सर्व सहकार्यांसह हे घडवून आणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताच्या लढाईत आंतरजातीय लग्न हा प्रमुख कृतीकार्यक्रम सांगितलाय, संघटना हे कार्य समर्थपणे पार पाडीत आहे.
त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात ऑनर किलींगच्या तीन घटना घडल्यात, आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा प्रश्नचिन्हांकित झालं. सोनई, खर्डा आणि आता जवखेडा. खर्डा येथील नितीन आगेच्या निर्घृण खुनानंतर संघटनेने नगरमध्ये जातीय अत्याचारविरोधी कृतीपरिषद घेतली. आताही संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे व ज्येष्ठ कामगार नेते कॉ.बाबा आरगडे प्रत्यक्ष जवखेडा येथे जाऊन आले आणि नगर जिल्ह्यातील जातीय अत्याचाराचे प्रमाण पाहता सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी नगर जिल्ह्यात पुढील काही वर्षेकृती करण्याची योजना संघटना आखीत आहे.
जोडीदाराची विवेकी निवड – प्रेम आणि आकर्षण यातील फरक न कळल्याने जोडीदार निवडीत फसगत होऊ शकते, किंवा पारंपारिक पद्धतीने लादलेला जोडीदार आयुष्याचा जीवनसाथी बनण्यास असमर्थ ठरला की, अनेक कौटुंबिक ताणतणाव निर्माण होतात. यातून मार्ग एकच, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हे अभियान संघटनेने महाराष्ट्रभर राबविले. महाविद्यालयात जाऊन व्याख्यान देऊन, पोस्टर्स बनवून व सविस्तर मांडणीचे पुस्तक छापून संघटनेने हा विषय महाराष्ट्रात पोहोचविला. जोडीदार निवडीचे जातधर्मनिरपेक्ष निकष युवकांना सांगितले. योग, कुंडली व गुण जुळविण्यापेक्षा विचार आणि दृष्टिकोन जुळणे महत्वाचे असते, असा संदेश यातून देण्यात येतो.
जातपंचायतीला मूठमाती अभियान – जातीसंस्थेचे ‘जातपंचायत’ हे अग्रदल आहे. यास हादरे दिल्याशिवाय जातीयतेची घट्ट वीण सैल होणार नाही असे डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणायचे. जातपंचायतीला मूठमाती अभियान पहिली परिषद नाशिक येथे झाली. तेथून हा विषय महाराष्ट्रभर पोहोचला. त्यानंतर लातूर, मुंबई, जळगाव येथेही या परिषदा यशस्वी झाल्या. जातपंचायतीच्या हुकुमशाहीच्या अनेक विदारक सत्य घटना यातून पुढे आल्या. महाराष्टभरातूनच नव्हे तर परराज्यातूनही जातपंचायतीच्या शोषणाच्या तक्रारी येऊ लागल्या. यानिमित्ताने एक नवा विषय संघटनेने अजेंड्यावर घेतला. नाशिकचे धडाडीचे युवा कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे या सर्व अभियानाचा पाठपुरावा करीत आहेत.
आरोग्य – आरोग्य आणि अंधश्रद्धांचा निकटचा संबंध आहे. आणि त्यातील मानसिक आजाराचे क्षेत्र म्हणजे बुवा-बाबा-मांत्रिक-मौलवी यांच्यासाठी सुपीक जमिनच ठरले. जेथे अंधश्रद्धेचे पीक जोमदारपणे वाढते. याबाबतही संघटनेने ठोस कृतीकार्यक्रम राबविले आहेत.
मानसमित्र अभियान – मानसिक आजारांबाबत समाजात जागृती करणे, मानसिक रूग्णांना भावनिक प्रथमोपचार करणे, समुपदेशन करणे अशा जबाबदारी घेणार्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षणे घेण्यात आली. आज महाराष्ट्रभर अंनिसचे कार्यकर्ते हे कार्य करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे मानसमित्र अभियानाची एक राज्यस्तरीय परिषद घेण्यात आली. ज्येष्ठ रंगकर्मी व मानसोपचार तज्ञ मोहन आगाशे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले व संघटनेचे साथी मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी(जळगाव), डॉ.प्रदीप पाटकर(पनवेल) व डॉ.हमीद दाभोलकर(सातारा) यांनी यात मार्गदर्शन केले. डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी यात मानसिक आजार, उपचार व संघटनेचा कृतीकार्यक्रम अशी भूमिका मांडली होती. तेथील दर्ग्यावर होणार्या अघोरी उपचारांबाबतही संघटनेने आव्हानाची भूमिका घेतली.
आज चाळीसगाव शाखेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे व डॉ.प्रदीप जोशींच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे प्रत्यक्ष मोफत उपचार केंद्र सुरू झाले आहे. दर महिन्याच्या 1 ल्या रविवारी याठिकाणी तपासणी व उपचार केले जातात. संघटनेसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
फसव्या उपचार पद्धतींना विरोध – रेकी, चुंबकचिकित्सा यासारख्या अन्य अनेक फसव्या उपचारपद्धती आज समाजात आढळून येतात. विज्ञानाचा मुलामा देऊन रूग्णांची फसवणूक केली जाते. त्याविरोधात महाराष्ट्रभर अनेक भांडाफोड कार्यक्रम संघटनेने केलेले आहेत.
व्यसनास विरोध – अंधश्रद्धा आणि व्यसन यात एक साम्य आहे. दोन्ही माणसाचा विवेक नाहीसा करतात. मागील शासनाच्या धान्यापासून दारू निर्मितीच्या निर्णयाविरोधात संघटनेने महाराष्ट्रभर आंदोलन केले. या क्षेत्रात काम करणार्या संघटनांचा एकत्रित फोरम करून कृतीकार्यक्रमाची आखणी केली.
दरवर्षी संघटना 31 डिसेंबर हा दिवस व्यसनविरोधी दिन म्हणून पाळते. “हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर-खाणार नाही गुटखा, पिणार नाही बियर” अशा घोषणा दिल्या जातात ‘द’ दारूचा नव्हे, ‘द’ दुधाचा असे उपक्रम घेऊन अनेक शाखा ‘दूध वाटपाचा कार्यक्रम घेतात.
शेतकरी आत्महत्या – मराठवाडा, खान्देश, विदर्भ या भागातील अनेक शेतकर्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या. अशा अनेक ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाची टीम जाऊन आली. या अघातातून बाहेर पडण्यासाठी, कुटुंबियांना मानसिक आधार देण्यासाठी डॉ.प्रदीप पाटकर यांची मदत घेऊन कार्यकर्तेथेट शेतकर्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले. त्यांना आर्थिक मदतही केली.
विवेकजागराचा वादसंवाद – 1994 ते 2003 या काळात म्हणजे पहिल्या दशकाच्या मध्यावधीनंतर ते दुसर्या दशकाच्या सुरवातीच्या काळापर्यंत डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी डॉ.श्रीराम लागूंना बरोबर घेऊन ‘विवेकजागराचा वाद संवाद केला. डॉ.लागूंची ‘देवाला रिटायर करा’ ही भूमिका महाराष्ट्रात गाजली होती. देव कल्पना हेच अंधश्रद्धेचे मूळ आहे, म्हणून देव नाकारला तरच अंधश्रद्धा निर्मूलन शक्य आहे ही डॉ.लागूंची भूमिका, दाभोलकर या भूमिकेचा प्रतिवाद करीत व अंनिसची वेगळी भूमिका या वाद-संवादात मांडत. अंनिस देव धर्माबाबत तटस्थ आहे. देव-धर्म मानून उन्नत नैतिक जीवन जगतात त्यांच्याशी अंनिसचे भांडण नाही, पण देव-धर्म यांचा वापर घटनेशी विसंगत असेल व त्यामुळे एकात्मता, कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक नितिमत्ता व लोकशाहीचा मूलभूत अधिकार यांचा संकोच होत असेल तर त्यास विरोध करायलाच हवा, अशी भूमिका डॉ.दाभोलकर मांडीत.
हा वैचारिक चर्चेचा फड चांगलाच रंगत असे. महाराष्ट्रभर या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. या वाद-संवादाच्या वेळी विविध ठिकाणी डॉक्टर द्वयींना धमक्या मिळाल्या. सभा उधळण्याचे प्रयत्न झाले, शारीरिक हल्ल्यांचाही प्रयत्न झाला, पण अशा परिस्थितीतही विवेकजागराची चळवळ निर्धाराने चालू राहिली.
जादूटोणा विरोधी कायद्याची लढाई
महाराष्ट्र अंनिसची अघोरी अंधश्रद्धांना चाप बसविण्यासाठीची लढाई सुरवातीपासूनच सुरू होती. पण ढोंगी बुवा-बाबांवर कायदेशीर कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या अडचणींवर मात करण्यासाठी हवा होता नवा कायदा. या कायद्याचे प्रारूप प्रख्यात कायदेपंडीत चंद्रशेखर धर्माधिकारी व माजी पोलीस महासंचालक भास्करराव मिसर यांनी तयार केले. 2005 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेत मांडलं. तेथून सुरू झालेला हा कायद्याचा वनवास. हा कायदा धर्मविरोधी आहे, तुम्हाला सत्यनारायण घालता येणार नाही, वारकरी तुरूंगात जातील अशा प्रकारचा बिनबुडाचा विषारी प्रचार धर्मांधांनी सुरू केला, त्यांचे संरक्षक, विरोधी आमदार या कायद्यावर आक्षेप घेऊ लागले. सत्ताधारी राज्यकर्तेहा कायदा करू अशी आश्वासने देत अंनिसला झुलवत राहिले. विधानसभेत कायदा मंजूर झालाच तर विधानपरिषदेत त्याला खोडा घालण्यात आला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कायदा करूच अशी आश्वासने दिली पण कृती शून्य. जादूटोणाविरोधी कायद्यासाठी सनदशीर मार्गाने संघटनेने अनेक प्रकारची आंदोलने केली. अर्ज-विनंत्या-निवेदन-पत्रे हजारोंनी धाडली, स्वत:चे तोंड काळे करा, स्वत:च्याच थोबाडीत मारा आंदोलन, मुख्यमंत्र्यांना स्वरक्ताने पत्र, जेल भरो, असे सर्व केले. पण यश आले नाही. महाराष्ट्र अंनिसने निकराची झुंज अहिंसक पद्धतीने चालू ठेवली होती. मूळ कायद्यातील 25 कलमांपैकी 12 कलमांचे प्रारूप संघटनेने स्वीकारले. दाभोलकरांनी कायद्याची लढाई एकहाती लढविली. 18 वर्षांची ही अखंड लढाई. अखेर 2013 च्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर होण्याची शक्यता दिसू लागली. विरोधक खवळले व धर्मांध शक्तींनी दाभोलकरांचा खून केला. ह्या खुनाची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली, सरकार हादरले व मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा वटहुकूम काढला. नंतर हिवाळी अधिवेशनात बहुमताने हा कायदा मंजूर झाला. तोही सहजासहजी झाला नाही. तेथेही मोठा पाठपुरावा संघटनेला करावा लागला. अंधश्रद्धांना लगाम घालणारा हा देशातील नव्हे तर जगातील पहिला कायदा ठरला आहे.
कायदा करून संघटना थांबली नाही, तर जादूटोणा विरोधी कायद्याची संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातून काढण्यात आली, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. नव्या कायद्यांतर्गत आजपर्यंत 85 घटले दाखल करण्यात आले आहेत. अंनिसची या पंचवीस वर्षांच्या अखेरच्या काळातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
अंनिसची संवादमाध्यमे
* वार्तापत्र – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र. चळवळीचे रिपोर्टिंग, विरोधकांना सडेतोड उत्तर व वैचारिक साहित्याचा प्रसार यासाठी वार्तापत्र आवश्यक होतं. सांगलीहून प्रकाशित होणार्या या मासिकाचे संपादकपद डॉ.प्रदीप पाटील यांनी समर्थपणे सांभाळले. सध्या प्रा.प.रा.आर्डे हे पद सांभाळत आहेत. 12,000 च्या आसपास वर्गणीदार असलेले. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं हे वैचारिक मासिक आहे.
* वेबसाईट – antisuperstition.org या नावाने संघटनेची वेबसाईट कार्यरत आहे. संघटनेसंबंधी सर्व तपशील या साईटवर उपलब्ध आहेत. सध्या या साईटच्या आधुनिकीकरणासंबंधी नियोजन सुरू आहे.
* Thought & Action- संघटनेचे ज्येष्ठ साथी प्रभाकर नानावटी Thought & Action हे इंग्रजी वेब त्रैमासिक चालवितात. इंग्रजी वाचकांसाठी हे त्रैमासिक उपयुक्त आहे.
पुरस्कार – संघटनेच्या वतीने दोन प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार व भटक्या-विमुक्तांसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांसाठी पुरस्कार. डी.डी.बंदिष्टे (इंदूर), भुरासिंग(पंजाब), संध्या नरे-पवार अशा अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी भटक्या विमुक्तांसाठी काम करणार्या कार्यकर्त्याचा पुरस्कार पल्लवी रेणके यांना देण्यात आला.
विवेकवाहिनी – 2002 साली लातूरला शैक्षणिक जाणिवा कृती परिषद झाली. तेव्हाच्या विचार मंथनातून शिक्षण क्षेत्रात विवेकी विचारांचा प्रसार व्हावा अशी कल्पना दाभोलकरांना सुचली. पुढच्याच वर्षी 30-35 कॉलेजात दाभोलकरांची भाषणे झाली. पुढे सलग 2-3 वर्षेनेटाने प्रयत्न केल्यामुळे अंदाजे 50 कॉलेजात विवेकवाहिनी कार्यरत झाली आहे. व्यसनापासून दूर राहणे, चांगली पुस्तके वाचणे, नियमित व्यायाम करणे असे चांगले विचार विवेकवाहिनीद्वारे मांडले गेले. या कामात डॉ.नरेंद्र दाभोलकरांसोबत त्यांचे पुत्र डॉ.हमीद दाभोलकर यांनीही मोलाचे सहकार्य केले. तरूणांमध्ये उत्साह आहे. प्राचार्य व व्यवस्थापन यांचा पाठींबा आहे, पण प्राध्यापकांमध्ये कृतीशील जाणिवांचा अभाव दिसतो. थोडे अधिक श्रम करण्याची गरज आहे. गोपाळ नेवे यांनी संपर्क व समन्वयाचे काम यात केले.
संघटनेच्या कार्यात मी 23 वर्षे सक्रीय आहे. पण जेव्हा संघटनेच्या कार्याचा थोडक्यात अहवाल लिहायला बसलो, तेव्हा मलाच त्याचे आश्चर्य वाटले. एवढे काम झाले! तेही कोणत्याही सरकारी, बिगरसरकारी अनुदानाशिवाय!! कोणत्याही भौतिक लाभाशिवाय काम करणारी असंख्य कार्यकर्त्यांची भक्कम फळी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी उभी केली आणि म्हणूनच डॉक्टरांच्या निर्घृण खुनानंतरही संघटना कमजोर न पडता त्याच तडफेने कृतीशील आहे. किंबहुना पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कार्यरत आहे. विचारांच्या प्रेरणेला आता डॉक्टरांच्या बलिदानाची प्रेरणा जोडली गेल्याने न थकता कार्य सुरू आहे. एका दाभोलकरांच्या खुनाने असंख्य दाभोलकरांना जन्म दिलाय. आता थकणे नाही, थांबणे नाही. फुले, शाहू, आंबेडकर – आम्ही सारे दाभोलकर!
-विनायक सावळे
संपर्क: 9403259226