Categories
भानामती

अज्ञान, अंधश्रध्दा असेल ज्यांचे घरी, भूत, भानामती, करणी हमखास तेथे वास करी

जून - २०१९

शनिवारी, दि. 25 मे 2019 दुपारी 1:45 वा. महा. अंनिस लातूरचे जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले यांचा मला फोन आला. आज भानामतीची केस हाताळण्यासाठी जायचे आहे. तोपर्यंत पिडीत मुलीच्या घरून सुधीरला 25- 30 फोन तातडीने येण्यासाठी आले होते. सर्व कामे आटोपून सुधीर भोसले, त्यांच्या पत्नी अनिता भोसले व मी (बाबा हलकुडे) त्या गावात पोहोचलो. घर चांगले; पण टुमदार स्लॅबचे होते. आम्हाला वाटले आर्थिक स्थिती बर्‍यापैकी असावी; पण भ्रमाचा भोपळा फुटायला वेळ लागला नाही. मुलीचे आई-वडील मजुरी करून संसाराचे रहाटगाडगे चालवणारे, घराला वंशाचा दिवा असावा म्हणून सहा मुली व दोन मुलं झाली. चार मुलींची लग्ने झालेली. घरात अठरा विश्वे दारिद्य्र दिमाखात मिरवत असताना मुलींची लग्ने झालेली. आम्हाला खरंच वडिलांचे भारी कौतुक वाटत होते. भानामती झालेली मुलगी अंदाजे सतरा वर्षांची असावी. दिसायला नाकी-डोळी नीटस; पण गोधडीवर गंभीर होऊन बसलेली होती. आम्ही तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला; पण खूपच त्रोटक बोलत होती. चर्चेतून जी माहिती समोर आली ती थक्क करणारी होती. वडील खूप मेहनती; पण अंधश्रध्देचा जबरदस्त पगडा असणारे. कोणतीही घटना घडली की, त्याचा संबंध थेट करणी-भानामतीशी लावत होते. खूप वर्षांपूर्वी घरातील एका महिलेचे प्रेत ठेवले होते, त्या दिवसापासून दार लावलेले होते. कोणीही दार काढायचे नाही, हा वडिलांचा आदेश. कारण आतून घुंगराचा आवाज येतोय, महिलांचा पदर ओढला जातोय; पण आम्ही त्यादिवशी अथक प्रयत्नातून कशीबशी परवानगी मिळवून दार उघडलेच. भीती कमी झाली. 20 मे 2019 रोजी रात्री सुलोचनाचे (नाव बदललेले आहे.) डोके दुखायला लागले, ओरडणे, किंचाळणे सुरू झाले, दगडाने इतरांना मारणे, जेवण अतिशय कमी करणे अशी भानामती सुरू झाली. शेजारी-पाजारी जाणत्याकडे जाण्याचा हुकमी सल्ला देऊ लागले. जाणत्याकडे जाऊन गंडेदोरे, तावीज-उतारा, लिंबे दिली यात ऐपत नसताना चार दिवसात दिवसात पंधरा-वीस हजार रुपये घालवले. पश्चात्तापाऐवजी अडचणीतून कर्तव्य पार पाडल्याची भावना दिसून येत होती. आई-वडिलांची मुलाखत घेऊन मुलीला घेऊन दुसर्‍या दिवशी लातूरला येण्याची विनंती केली. गावात आणखी तिघांना भानामती होत होती. आम्ही त्यांना बोलवण्यास सांगितले दुसर्‍या मुलीचे नावही सुलोचनाच. 28 एप्रिल 2019 रोजी लग्न झालेले. मुलीच्या आई-वडिलांच्या चेहर्‍यावर एक जबाबदारी पूर्ण पाडल्याचा आनंद असतो. तोवर 4 मे 2019 रोजी भानामती-करणी झाली म्हणून सासरे सुनेस माहेरी आणून सोडतात, तेव्हा आभाळ कोसळते. पुढे काय करावे, ते सुचत नाही. मग लोक जे सांगतील ते ऐकण्याशिवाय पर्याय उरत नाही; मग जाणता शोषण करतो. मुलीच्या वडिलांकडून माहिती घेतल्यावर दोन्ही पीडित मुलींच्या मुलाखतीच्या दृष्टीने ठिकाण सुरक्षित नसल्याने त्यांना लातूरला येण्यास सांगितले.

शनिवार 25 मे 2019 रोजी दोन्ही सुलोचना व त्यांचे आई-वडील सायंकाळी सुधीरच्या घरी आले, तर आमच्यातही सुधीर भोसलेची मावस भावजय साथी शिक्षिका जयश्री पाटील सामील झाल्या होत्या. दुसरी सुलोचना पहिल्यांदाच भेटत होती. तिने आमचे हसून स्वागत केले, पाहता क्षणी हुशार, तल्लख दिसून आली. आम्ही पहिल्या सुलोचनाला चर्चेसाठी बोलावले. तिच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातून डोके दुखणे, हातपाय गळणे आणि इथे न सांगता येणारा प्रश्न. तिचे समुपदेशन केले, तिला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरला तर वडिलांना मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्यास सांगितले. एवढ्यात दुसर्‍या सुलोचनाची दातखीळ बसलीय, असे तिची आई घाबरून आम्हाला सांगू लागली. सुधीरला दातखीळ काढण्यास पाठवले आणि सुधीरने तिच्या नाकास रूमाल लावला दातखीळ गायब. हे त्या सार्‍यांना नवलाचे होते. ते फारच चकित झाले होते. सुलोचनाचे वडील म्हणाले, माझ्या मुलीचे लग्न झाल्यावर तिच्या सासर्‍याने सहाव्या दिवशी भानामती होते म्हणून घरी आणून सोडले. आभाळ फाटल्यागत झाले. पंधरा-वीस दिवसांत पाच-सहा जाणते झाले. यात गाणगापूर झाले; पण गुण आला नाही. शेवटी ते अत्यंत आर्जवीने म्हणाले, ‘मला हे पटत नाही; पण जेव्हा वाट्याला येते, तेव्हा फक्त मुलगी यातून सुटली पाहिजे. एवढंच बापाला कळत असते.’ त्यांचे बोलणे काळजाला घर करत होते. आम्ही त्यांना एवढंच अश्वासन दिले की, ‘भाऊ, तुमच्या मुलीची भानामती नक्की बंद करू, तुम्ही काळजी करू नका.’ नंतर तिच्या आईशी बोललो आणि सुलोचनाला चर्चेसाठी पाठवा, तर सुलोचनाला दोघांनी अक्षरश: उचलून आणले होते. तिची दातखीळ बसली होती. मान सुटलेली होती. अर्थातच मीही तिच्या नाकाला रुमाल लावला आणि काही क्षणातच सारे बंद झाले. नंतर आम्ही विश्वासात घेऊन तिच्याशी चर्चा करू लागलो. ती आमच्याशी खूप वर्षांची ओळख असल्यासारखी बोलत होती. सासरी डोके दुखणे, ओरडणे-चिरकणे, अशी भानामती होत होती. समुपदेशनाने बरीच भानामती कमी झाली होती. चर्चा करून हसतच आम्ही बाहेर आलो, तेव्हा भानामती बंद झाल्याने सारे खूष व आनंदी होते. दोघींच्या नातेवाईकांना घ्यावयाची काळजी व उपाय सांगितले.