जालना जिल्ह्यातील नेर शेवगाजवळील एक छोटेसे गाव. या गावात एका कुटुंब भानामतीच्या घटनाने हैराण झाले होते. नेरचे अंनिस कार्यकर्ते बाळासाहेब गायके यांचा मला फोन आला. त्यांनी माहिती देऊन भगवान भानुसे यांचा संपर्क करून दिला. त्यांनी विक्रम राठोड यांचा अर्ज लिहून घेऊन संपर्क करून दिला व झालेली घटना कथन केली. जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा केली. काही कारणाने लगेच जाता आले नाही. आम्ही दि. 26 एप्रिल रोजी जाण्याचे ठरवले. त्या प्रमाणे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड, प्रधान सचिव ज्ञानेश्वर गिराम, मी स्वतः बुवाबाजी संघर्ष समिती सचिव शंकर बोर्डे, जालना तालुका कार्याध्यक्ष संजय हेरकर, सर्पमित्र साबळे असे पाच जण सायंकाळी पाच वाजता सारवाडी येथे पोचलो. जाताना विरेगाव येथे दत्ता जाधव व पप्पू जाधव यांची भेट झाली. चहापानादरम्यान बरीच माहिती मिळवली.
सारवाडी येथे गेल्यावर भराभरा लोक गोळा झाले. भानामती घडलेल्या स्थळाची पाहणी केली. अनेकजण उत्साहाने सांगत होते. बरेच चेहरे भयभीत सुद्धा होते. बाहेर ईश्वर जाधव यांचे कुंपण तीन-चार ठिकाणी पेटलेले होते. ज्वारीचा चारा थोडा बाजुला असूनही पेटला होता. नंतर उत्तम राठोड, सुभाष पवार यांच्या घरांची पाहणी केली. एके ठिकाणी कूड जळाला होता. तो बाहेरून पेटवलेला दिसत होता. एके ठिकाणी गादी व वापरात नसलेले कपडे पेटलेले दाखवले. एके ठिकाणी पाण्याची मोटार असलेल्या ठिकाणी आग लागलेली होती.
नंतर ज्यांनी तक्रार लिहून दिली, त्या विक्रम राठोड यांच्या घराची पाहणी केली सगळ्यात जास्त घटना इथेच घडल्या. एका अडगळीच्या खोलीतील सरपण, दुसर्या एका खोलीतील अडकवलेला लहान मुलाचा पाळणा, प्लास्टिकच्या गोणीतील ज्वारी, कपडे हे साहित्य जळालेले होते. घरातील सदस्य दडपणाखाली होते. घरात भरपूर सदस्य आहेत. पती-पत्नी, आई, सहावीत शिकत असलेला एक मुलगा, एक तीन वर्षांपूर्वी आठवीनंतर शाळा सोडलेली सोनू आणि दोन विवाहित मुली; एक कायम इथेच राहते. दुसरी नवर्याच्या घरी बेशुद्ध पडते म्हणून तीपण इथेच, अजून दोन विवाहित मुली पुण्याला राहतात. कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती; पण सध्या उन्हाळा असल्याने काहीच काम नाही. सर्व सदस्य सध्या घरीच असतात.
आत्माराम राठोड यांच्या घरातील गव्हाची, ज्वारीची गोणी व कांद्याचे बियाणे देखील जळालेले दाखवले. सर्व पाहणी करताना एक लक्षात आले. जाळणार्याने जीवितहानी होणार नाही. याची पुरेपूर काळजी घेतली होती. एका मुलीची ओढणी सुद्धा पेटली होती, ती तिच्या आईने विझवली. आग लागल्याचे समजल्यावर घरातील दोन मुली बेशुद्ध पडतात आणि विशेष म्हणजे या सर्व घटना जरी वेगवेगळ्या असल्या, तरी एकाच कँपस्मध्ये घडल्यासारख्या आहेत. हे सर्व लिहिण्याचे कारण सूज्ञ वाचक समजू शकतील.
हे सर्व पाहिल्यानंतर व वेगवेगळ्या मुलाखतीतून हा प्रकार करणारी व्यक्ती कोण, हे लक्षात आलं. आम्ही सर्वांची तिथेच बैठक घेतली. हे करण्यामागे कुणाचा तरी हात असतो, त्याशिवाय असे घडत नाही. त्यासाठी कापूर खाणे, पाण्याने नारळ पेटवणे व नारळातून विविध वस्तू काढणे हे प्रयोग त्यांच्यासमोर सादर करून गावकर्यांना न घाबरण्याचे आवाहन केले. शेजार्या-पाजार्यांवर शंका न घेण्याचा व बुवा-बाबाकडे न जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान मौजपुरी पोलिस स्टेशनला गायकवाड सरांनी फोन करून पी.आय.साहेबांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे सांगितले. त्यांऩीही मदत करण्याचे मान्य केले. आम्ही खरेतर त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन समज देणे आवश्यक होते; पण वेळेअभावी तसे करता आले नाही. आम्हाला खात्री आहे की, असे पुन्हा होणार नाही.
गेल्या काही दिवसात एकही फोन आला नाही म्हणजे सारवाडीची भानामती बंद झाली आहे. त्यामुळे अंनिस समिती, जिल्हा जालना समाधानी आहे. लोकांचे अज्ञान दूर करणे खरेच मोठे दिव्य आहे.