“विचार जेव्हा जनतेच्या मनाची पकड घेतात तेव्हा ते एक भौतिक शक्ती बनतात.” असे मार्क्स यांनी विचारांचे सामर्थ्य विषद केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी गेली चार दशके जो विवेकवादाचा, अंधश्रद्धा विरोधाचा विचार महाराष्ट्रात रूजवला, आणि त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुका, जिल्ह्यात, गावागावात चढत्या श्रेणीत वाढत गेला. त्यातून वर म्हटल्याप्रमाणे जी एक शक्ती उभी राहिली. त्या शक्तीचे दाभोलकर प्रतीक बनले होते. आणि त्यामुळेच ते त्यांच्या सनातनी, धर्मांध विरोधकांना धोकेदायक वाटू लागले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा त्यांनी 14 वर्षे चिकाटीने लावून धरला. महाराष्ट्र सरकारला मग ते युतीचे असो अथवा आघाडीचे असो, “आम्ही हा कायदा मंजूर करणार नाही” असे म्हणायचे धाडस झाले नाही. भाजप-सेना युती ह्या कायद्याच्या विरोधात होती. तरी त्यांनाही असे म्हणायची हिम्मत झाली नाही. कारण ह्या कायद्याच्या बाजूने जनतेची अफाट अशी अव्यक्त शक्ती उभी होती. त्यामुळेच हा कायदा करणार नाही असे ते म्हणू शकत नव्हते. दाभोलकरांची हीच शक्ती होती. आणि ती त्यांनीच त्यांच्या अथक परिश्रमातून उभी केली.
एक सच्चा समाजवादी ज्याचे हितसंबंध जनतेच्या हितसंबंधांपेक्षा वेगळे नसतात. जनतेचे भले तेच आपले भले, ही भावना ज्याच्या हृदयात ओत-प्रोत भरलेली असते तोच माणूस हे करू शकतो. संतांच्या वृत्तीत दिसून येणारी सर्वसंगपरित्यागाची, सर्व भौतिक हितसंबंधांपलिकडे जाणारी वृत्ती हेच दाभोलकरांचे सामर्थ्य होते. अशा माणसाला कोणी हरवू शकत नाही, हितसंबंधात अडकवून त्याच्याकडून त्याच्या विचारांविरोधी गोष्टी घडवून आणू शकत नाही. हा माणूस कसल्याच प्रलोभनांना बळी पडू शकत नाही. कुठल्या सत्तेला शरण जाऊ शकत नाही, या माणसाला कोणी जिंकू शकत नाही, ते फक्त त्याला निर्बुद्धपणे ठार मारू शकतात आणि ते ही पाठीमागून वार करून. समोर येऊन अशा माणसाच्या डोळ्यात डोळा घालण्याची हिम्मत त्याच्या शत्रूंना नसते.
महात्मा गांधीजींना नथुराम गोडसेने समोर येऊन गोळ्या घातल्या कारण गांधींजींच्या मागे नेहमीच लोकांची गर्दी असे, गांधीजी भरभर चालत, त्यामुळे त्यांच्या पुढे कोणीच नसे, नाहीतर गोडसेने आत्ताच्या मारेकर्यांनी केलं तसेच केले असते. हे लोक मुळात भेकड असतात. त्यांचा त्यांच्या वैचारिक सामर्थ्यावर विश्वास नसतो, खरे तर त्यांच्याकडे वैचारिक सामर्थ्य नसतेच. तर असतात भौतिक हितसंबंध. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामुळे आपले धर्माच्या नावाने आणि आधाराने चाललेले धंदे बंद पडतील, लुटारूपणा करता येणार नाही, गोरगरीब जनतेला फसवण्यात अडचणी येतील आणि लाखो-करोडोंचे नुकसान होईल; त्यांना माहिती आहे की, अंधश्रद्धा विरहित धर्म काहीच उपयोगाचा नसतो. त्यामुळे संतांचा छळ झाला आणि तुकारामांना सदेह वैकुंठाला पाठवण्यात आले, त्याची कारणे हीच आहेत. विवेकावर आधारलेला धर्म नको, बुद्धीप्रामाण्य नको, लोकांना कर्मकांडी बनवून गंड्या-दोर्यांचा धर्म पाहिजे, असा धर्मच पृथ्वीतलावर धर्ममार्तंडांसाठी स्वर्ग निर्माण करू शकतो. मार्क्सने चर्चच्या बुवाबाजी बद्दल म्हटले आहे, “तुम्ही बायबलमधील सर्व सत्यांना विरोध केला तरी चालेल, पण ख्रिश्चन माणसाने आपल्या कमाईतील अमूक हिस्सा चर्चला देता कामा नये असे म्हटले तर तुम्ही लगेच धर्मद्रोही ठराल.” हेच आहे दाभोलकरांना विरोध करायचे मर्म, त्यांच्या हत्येमागील मानसिकता.
दाभोलकरांची लढाई देवा-धर्माविरूद्ध नव्हती. तर ती त्या नावावर गोरगरीब जनतेचे शोषण करून, त्यांना विकासापासून, आधुनिक विचारांपासून वंचित ठेवणार्या ठेकेदारांविरूद्ध होती. आणि ही लढाई आजची नाही. मानवी समाजात शोेषणाचा उदय झाल्यापासून सुरू झालेली ही लढाई आहे. तिला प्रदीर्घ अशा संघर्षाचा इतिहास आहे. जगाच्या पाठीवर सर्व समाजात वेगवेगळ्या स्वरूपात-रूपात ती सुरूच आहे. प्रत्येक काळात मानवी समाजाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर तिने दाभोलकरांसारखे क्रांतिकारक जन्माला घातले आहेत. आपल्या प्राणांशी खेळून त्यांनी नेहमीच समाजाच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या केल्या आहेत. समजाला प्रगतीच्या पुढील टप्प्यावर घेऊन जाणारे पुरोगामी क्रांतिकारक आणि समाजाला जैसे थे ठेवून आपल्या पोटाची सोय पाहणारे, शोषण करणारे भोंदू ह्यांच्यातील मूल्य-संघर्षाची ही लढाई आहे. फक्त काळ बदलतो, तपशील बदलतात, व्यक्तींची नावे बदलतात पण मूल्य संघर्षाचा आशय तोच राहतो. डॉ.नरेंद्र दाभोलकर हे आजच्या काळातील नाव असे आहे. हे नाव मरणार नाही. कारण या नावाने जे कर्तृत्व करून ठेवले आहे, त्याची पदोपदी जनतेला आठवण येत राहील. उत्तरोत्तर त्यांच्या कार्याचे महत्व वाढत जाईल, आज अंधश्रद्धा निर्मूलनाशी काही संबंध नसलेला, कुठल्याही बाजूला नसलेल्या सर्वसामान्य माणूस त्यांच्या हत्येबद्दल हळहळ व्यक्त करतो. कारण दाभोलकर करीत असलेले काम त्याला मनोमन कुठेतरी पटते आहे. भावते आहे. सरकारने लगेच वटहुकूम काढला ती ह्याच लोकभावनेची दखल आहे.
महात्मा गांधींना ठार मारले गेले कारण ते हिंदू धर्माचा नवा अर्थ सांगू पाहत होते, जो हिंदू धर्मांधांच्या पचनी पडणे शक्य नव्हते व त्यांच्या धर्मांध ब्राम्हण्यवादी राजकारणाला मारक होता. तो सर्वसामान्यांना पटत जाणारा होता. “वैष्णव जन तो तेणे कहिए जो पर पिडाई जाने रे” असा होता. दुसर्याचे दु:ख जाणणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर ह्या विचारांचे तर होतेच. पण त्यापुढे जाऊन तर्कशुद्ध अशा समाजवादी विचारांचे पाईक होते. जो विचार केवळ अंधश्रद्धा निर्मूलन करून थांबणारा नव्हता. तर माणसांचे माणसांकडून होणारे शोषण नष्ट होईपर्यंत कार्यरत होणारा होता.
जन्म हे मृत्यूचे कारण आहे, जन्माला येणारा मरणारच हे सार्वत्रिक सर्वकालीन सत्य आहे. दाभोलकरांना मारून विजयी भावनेने छाती पिटून घेणारे त्यांचे विरोधक अजरामर नाहीत. ते छी: थू होऊन मरतीलच. पण दाभोलकरांचा अकाली, अनैसर्गिक मृत्यू जनतेचा प्रचंड नुकसान करणारा आहे. कारण ते अक्षय उर्जेचा स्त्रोत होते. आणि कार्यकर्त्यांना ही ऊर्जा प्रदान करीत होते. त्यांची कार्यक्षमता अफाट होती. ह्या उर्जेची आणि कार्यक्षमतेची नक्कीच हानी झाली आहे. आणि ती भरून निघणे आजमितीला तरी शक्य नाही. पण त्यांनी अंध:कार भेदणारी जी प्रकाशाची दिवटी हाती घेतली होती. ती त्यांच्या सारखीच प्राणांची बाजी लावून ध्येय-पूर्ती पर्यंत घेऊन जाणे हेच त्यांना क्रांतीकारी अभिवादन ठरेल.
–सुभाष थोरात