महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. 9 ऑगस्ट 1989 रोजी स्वतंत्रपणे संघटना म्हणून काम करण्याबाबत घेतलेला निर्णय प्रत्यक्षात आणून आपण महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या वाटचालीत पाव शतकाचा टप्पा गाठत आहोत. संत-समाजसुधारकांचा कालसुसंगत, आधुनिक विचारांचा वारसा चालवितानाच भारतीय संविधानाला अभिप्रेत शोषणमुक्त, समताधिष्ठीत, आधुनिक जीवनप्रणालीसाठी आवश्यक मूल्यआशय प्रत्यक्षात आणण्याचा महाराष्ट्र अंनिसचा प्रयत्न आहे. त्यामध्ये विवेकाधिष्ठीत, मानवतावादी जीवनसरणी अंगिकारण्याचा आग्रह आहे. अशा पद्धतीने जनमानसाशी जोडलेल्या एका अत्यंत संवेदनशिल विषयाच्या क्षेत्रात देव-धर्माच्या नावाने चालणार्या शोषण, फसवणूक, दिशाभूल केल्या जाणार्या क्षेत्रात, बुवाबाजीचा भांडाफोड व चमत्कारांना आव्हान देण्याच्या पवित्र्यात असलेले काम एकूणच मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रातील अविवेकाच्या विरोधात आणि मानव उत्थानाच्या बाजूने आज उभे आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलीदानाने तावून सुलाखून सुरु असलेली महाराष्ट्र अंनिस ही संघटना हे केवळ महाराष्ट्रातील, भारतातीलच नव्हे तर जगभरात दखलपात्र काम झालेले आहे. अशा सामुहिक नेतृत्त्व प्रक्रियेतून पुढे जाणार्या कामाची रौप्य पूर्ती होत असताना एका बाजूला अभिमानाची भावना आहेच, पण डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखे कल्पक नेतृत्त्व व मार्गदर्शक गमावल्याचे अतीव दू:ख देखील मनात कायम आहे. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस रौप्य व पूर्ती प्रारंभ दिन संघटनेच्या प्रत्येक शाखेवर स्वंत्रपणे येत्या 9 ऑगस्ट 2014 रोजी आयोजित करावयाचे नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अंनिस रौप्य वर्ष पूर्ती प्रारंभ दिनी म्हणजे शनिवार, दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी समितीच्या प्रत्येक शाखेवर स्थानिक संयोजनाच्या सोईनुसार किमान 3 तासांचा कार्यकर्ते कुटुंबिय संकल्प मेळावा घेण्यात येणार आहे. (शक्यतो सायंकाळी 5 ते 8 वेळात) त्यामध्ये महाराष्ट्र अंनिसच्या 25 वर्षातील दमदार वाटचालीबद्दल माहिती देणार्या पुस्तिकेचे प्रकाशन, दृकश्राव्य माध्यमातून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांची वक्तव्ये आणि समितीच्या कामाचे सादरीकरण केले जाईल. रौप्य वर्ष पूर्ती वर्षात किमान 25,000 नवीन सभासद नोंदविण्याच्या संकल्पाची कार्यवाही सभासद नोंदणी मोहीमेने सुरु करण्यात येईल. कार्यकर्ते व कुटुंब सदस्यांचे प्रातिनिधीक मनोगते आणि निमंत्रित वक्त्यांचे भाषण महाराष्ट्र अंनिस कार्य आढाव्याच्या अनुषंगाने होईल. शेवटी समितीचे ‘ध्येय विधान’ (मिशन स्टेटमेंट) सामुहिक संकल्प म्हणून वाचण्यात येणार आहे. जेणेकरुन समितीच्या प्रत्येक शाखेतून सहभागी कार्यकर्ते-पदाधिकारी-हितचिंतक-समविचारी-दाते आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या सहभागाने भविष्यातील वाटचालीसाठी एकमेकाला आधार, समर्थन देत असतानाच उभारीचे बळ देतील.
समितीचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या सातारा येथे नियोजित रौप्य वर्ष पूर्ती प्रारंभ दिन कार्यक्रमासोबत ‘महाराष्ट्र अंनिस लोक रंगमंच आयोजित रिंगण नाट्य’ प्रयोगांची रंगीत तालीम व जाहीर सादरीकरण दि. 9 व 10 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात येणार आहे.
– अविनाश पाटील