Categories
चळवळ

अंनिसची विस्तारीत राज्य कार्यकारिणी बैठक माळीनगर येथे उत्साहात संपन्न

जुलै - २०१४

संघटनेची विस्तारीत राज्य कार्यकारिणीची बैठक दि. 6 ते 8 जून 2014 दरम्यान माळी नगर (जि. सोलापूर) येथे संपन्न झाली. बैठकीचे उद्घाटन सासवड माळी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. कृष्णकांत कुदळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मा. राजेंद्र गिरमे, मा. सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक मा. अतुल पेठे उपस्थित होते. प्रास्ताविक अंनिसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कॉ. रविंद्र मोकाशी यांनी केले; अध्यक्षस्थानी समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते; तर स्वागत सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर काशिद यांनी केले.

बैठकीत झालेली चर्चा व घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे

संघटना बांधणी :- अ) अकोला येथील महादेवराव भुईभार यांची विदर्भातील प्रतिनिधीत्वासाठी राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ब) जुलै महिन्यातील रविवारी (दि.6,13, 20 व 27) जिल्हानिहाय बैठका घ्याव्यात. त्यात महसुल विभागनिहाय राज्य सरचिटणीस उपस्थित राहतील. जिल्हा कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांनी त्वरीत याचे नियोजन करावे.

बुवाबाजी संघर्ष :- अ) जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 65 गुन्हे दाखल झाल्याची माहिती कृष्णा चांदगुडे यांनी दिली असून नासिक जिल्ह्यात सर्वाधिक 7 गुन्हे दाखल झाले आहेत. ब) कायदा पोहोचविण्यासाठी व तक्रारी दाखल करून घेण्याबाबत मदत, मार्गदर्शनासाठी एक हेल्पलाईन संपर्क नंबर संघटनेने सुरु करावा असे ठरले. क) कायदा अंमलबजावणी, मदत व मार्गदर्शनासाठी राज्यस्तरावर वकील व तज्ञ व्यक्तींचा एक कार्यगट स्थापन करावा असे ठरले. ड) नाशिक येथे 2015 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याबाबत ‘जनसुनवाई’ घेण्यात यावी. इ) या काळात ऑगस्ट-2015 दरम्यान वार्तापत्र विभागाने कुंभमेळ्यावर विशेषांक काढावा. ई) देशातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या फलज्योतिषांची आव्हान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. कोणीही हे आव्हान स्विकारले नाही.

विविध उपक्रम : – अ) सर्प विज्ञान प्रबोधन सप्ताह, विसर्जित मूर्ती व निर्माल्य दान मोहिम, फटाकेमुक्त दिवाळी अभियान, व्यसनविरोधी निर्धार सप्ताह, संविधान बांधिलकी महोत्सव, राष्ट्रीय विज्ञान दिन, पर्यावरणपुरक होळी, स्त्री शक्ती जागर-नवरात्री निमित्ताने, 1 नोव्हेंबर-शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जन्मदिवस-युवा संकल्प दिन, महात्मा ज्योतीराव फुले स्मृती दिन ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 11 ते 14 एप्रिल अभिवादन सप्ताह, 20 ऑगस्ट- डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती दिन, बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबीर आदी 12 उपक्रम मध्यवर्तीतर्फे ठरविण्यात आले आहेत. यातील किमान 3 उपक्रम महाराष्ट्र पातळीवर राबवले जातील असे ठरले.

वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प :- अ) वैजाप्र शिक्षक शिबिरे पुढील जिल्ह्यात घेण्याबाबत कार्यकर्त्यांनी संमती दिली आहे- नागपूर, अमरावती, नांदेड, सोलापूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, लातूर, सातारा, नाशिक, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात 1 प्राथमिकचे व 1 माध्यमिकचे शिबिर होईल. सदर शिबिरांचा विषय तपशील- मन, मनाचे आजार, वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कार व विज्ञान, स्त्रीया व अंधश्रद्धा, सर्प-समज गैरसमज आदि विषय घ्यावेत.

युवा सहभाग : – अ) संघटनेत युवांना संधी व अवकाश उपलब्ध करुन द्यावा. ब) सातारा युवा सहभाग बैठकीचा अहवाल युवा विभागाचे राज्य कार्यवाह कृष्णांत कोरे यांनी मांडला, अशा बैठका विभागस्तरावर घेण्यात याव्यात. त्याची विभागनिहाय संपर्काची जबाबदारी निश्चित करण्यात आली. क) राज्य पातळीवर वर्षातून दोन वेळा युवा प्रशिक्षण शिबिरे घेण्यात यावीत.

महिला सहभाग विभाग : – संघटनेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज सर्वांनी व्यक्त केली. संघटनेच्या रौप्य वर्ष पूर्ती निमित्ताने महिला सहभागाचे कार्यक्रम घेण्यात यावेत.

सांस्कृतिक विभाग :- सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांनी ‘महाराष्ट्र अंनिस लोक रंगमंच’ ची संकल्पना समजावून दिली. त्यात अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने ‘रिंगणनाट्य’ चा प्रयोग सलग सादरीकरण 20 ऑगस्टला पुण्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात 2 कार्यशाळा (इस्लामपूर व कोल्हापूर) संपन्न झाल्या असून जळगाव व लातूर येथे घेण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रात पथनाट्याचे 10 गट तयार होतील. हे पुढील वर्षभर रिंगणनाट्याचे प्रयोग आपापल्या ठिकाणी करतील. याचे समन्वय संजय बनसोडे व प्रा. योगेश कुदळे यांनी करावा असे ठरले.

प्रकाशन वितरण विभाग :- अ) राज्य कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्र नाथ मुंडे यांनी प्रकाशन विभागाचा आढावा घेतला. प्रकाशन विभागाचे व्यावसायिक पातळीवर व्यवस्थापन उभे करावे असे ठरले. ब) जातपंचायत विरोधी लढा, दाखल गुन्हे, कायद्याची गोष्ट, कायदा मार्गदर्शिका, डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे चरित्र आदि पुस्तके लवकर प्रकाशित करावीत. क) वार्तापत्र विभागाच्या रौप्यवर्ष पूर्ती निमित्ताने त्यातील निवडक लेखांचे संपादित पुस्तक काढावे असे ठरले.

मानसमित्र प्रक़ल्प :- अ) मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना केलेल्या मदतीची माहिती माधव बावगे यांनी सांगितली. ब) कार्यकर्त्यांनी प्रबोधनाच्या पातळीवर काऊन्सलिंग करावे. क) चाळीसगाव येथील मानसिक आजार उपचार केंद्रातील कार्याची माहिती देण्यात आली. डॉ. प्रदीप जोशी व चाळीसगाव शाखेतील कार्यकर्त्यांच्या या सातत्यशिल प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. त्यावर आधारीत माहितीपट करण्याचे ठरले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार कृती महोत्सव :- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संबंधित सर्व संस्थांनी एकत्रितपणे 20 ऑगस्ट ते 1 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून करावा असा निर्णय घेण्यात आला.

जातपंचायतीला मूठमाती अभियान :- जातपंचायतीच्या आघाडीवर सध्या होत असलेल्या कामाचा तपशिल कृष्णा चांदगुडे (नाशिक) यांनी सांगितला. हा विषय हळूवारपणे पण नेटाने पुढे न्याया असा निर्णय घेण्यात आला. कृष्णा चांदगुडेंनी हा विषय निर्भयपणे लावून धरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या तपासाबाबत :- न्यायालयाच्या निर्णयामुळे खूनाचा तपास आता सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. तपास यंत्रणा बदलली तरीही दरमहा 20 तारखेला शाखांनी काहीतरी कृती करून सातत्याने आपली वेदना, संताप व्यक्त करावा व शासनावर आपला दबाव कायम ठेवावा असा निर्णय घेण्यात आला. सी.बी.आय. कडे व संबंधित केंद्रीय पातळीवरील तपासाबद्दल पाठपुरावा करावा.

डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र, सातारा :- या केंद्रात वर्षातून 6 प्रशिक्षणे होतील, त्यातील 4 अंनिसच्या विषयांशी संबंधित व 2 क्षमता विकासाची, यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्वनोंदणी करावी. त्याचे लवकर नियोजन करावे असे ठरले.

रौप्यवर्ष पूर्ती कार्यक्रम:- या 9 ऑगस्ट रोजी संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबाबत शाखांनी कृती करावी. त्याच्या सूचना स्वतंत्रपणे कळवण्याचे ठरले. मात्र राज्य पातळीवर कोणत्याही स्वरुपाचा कार्यक्रम घेवू नये असे ठरले. रौप्यवर्षपूर्तीचे अधिवेशन वर्ष अखेरीस घेण्यात येईल असा निर्णय झाला.

बैठकीस एकूण 21 जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माळीनगर शाखेने बैठक़ीचे अत्यंत चोख व सुंदर व्यवस्थापन केले त्याबद्दल शेवटी सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

सुशिला मुंडे, राज्य प्रधान सचिव