आज अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कुठल्या टप्प्यावर आहे? त्याचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला? त्याला कोणता वारसा लाभला आहे? त्याच्या कामाचा आधार काय? त्याचे व्यापक समाज परिवर्तनाशी नाते कसे आहे? त्याच्यापुढील वर्तमान काळातील प्रश्न कोणते? आणि त्याच्या समोरील किमान पुढील दशकातील आव्हाने कोणती? या आणि यासारखे बरेच प्रश्न चळवळीतील कार्यकर्त्यांना पडत असतात. तसेच आपल्या समविचारी, हितचिंतक व विरोधकांकडूनही विचारले जात असतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे परिप्रेक्ष्य काय आहे? आणि त्याबद्दल आपण कसा विचार करू शकतो? याविषयी आपल्याला विचारप्रवृत्त करू इच्छिणारे काही मुद्दे प्रस्तुत लेखात मांडायचा प्रयत्न आहे. अर्थात त्याचा विस्तार पुढील वर्षातील लिखाणात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. वाचकांकडून त्यावरील प्रतिक्रिया, सूचना व आक्षेपांचे स्वागत राहील. महाराष्ट्र अं.नि.स. आपल्या संघटीत कार्याचा रौप्य महोत्सव 2014-15 वर्षात साजरा करणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा ध्येयवाद (मिशन स्टेटमेंट)स्पष्ट करण्यासाठी सदर चिंतन उपयोगाचे व दिशादर्शक ठरावे अशी अपेक्षा आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वाटचालीचा अन्वयार्थ- प्रवास, वारसा आणि अधिष्ठान : भाग-1
आपला देव-धर्म-श्रद्धेपासून व्यापक मानवी विवेकापर्यंतचा प्रवास सध्या सुरु आहे. देवाच्या नावाने आणि धर्माच्या व्यवस्थेने चालविलेल्या शोषणापासून श्रद्धा-अंधश्रद्धा सापेक्षतेचा गोंधळ, मृत्युच्या भयापोटी स्वर्ग-नरक-आत्मा-पुनर्जन्म आदि संकल्पनांचे आकर्षण व गूढता, जाती व्यवस्थेची चौकट व उतरंड, पाप-पुण्य संकल्पनांचा धाक, पाप क्षालनासाठी व मुक्तीसाठी (अपराध भावना आदी….) विविध उपासना पद्धती (कर्मकांड, यज्ञयाग, पुजा विधी……) या व यासारख्या अनेक बाबींपासून माणसाला परावृत्त करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. अशा अंधश्रद्धांमुळे होणारे नुकसान व भविष्याबद्दलची अनिश्चितता घालविण्यासाठीची समज विकसित होणे आवश्यक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैचारिक प्रवास हा मानवी शोषण मुक्तीचा प्रवास आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, शास्त्रीय विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद अशा क्रमाने सुरू असलेला वैचारिक प्रवास विवेकाधिष्ठित समाज निर्मितीमुळे त्याची फलश्रृती प्रामाण्य नाकारणार्या आणि सर्व प्रकारच्या शोषणाला विरोध करणार्या मानवी समाजात व्हावी असे अभिप्रेत आहे. तोच शोषणमुक्त समाज निर्मितीसाठीचा सामाजिक प्रवास राहणार आहे. त्यासाठी आधुनिक समाज व्यवस्थेत राज्यकर्त्यांची भूमिका निर्णायक असू शकते. कल्याणकारी राज्यांची संकल्पना राबविण्याचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी त्यासाठी किती तयार आहेत. यावर त्याची यशस्वीता अवलंबून आहे. त्यातूनच अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा राजकीय प्रवास सुरु होऊ शकेल असे वाटते. त्यामध्ये राज्यकर्त्यांना आपल्या लोकानुनयी व सवंग राजकारणासाठी उपयोगात आणले जाणारे जातीय व वर्गीय अस्मितांचे भागभांडवल स्पष्टपणे नाकारण्याची गरज आहे. अर्थात यामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक व माध्यम क्षेत्राची भूमिका देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी घेणारी ठरु शकते. सध्या सांस्कृतिक क्षेत्रांची इतिहासामध्ये रमण्याची आणि वास्तवाकडे डोळेझाक करण्याची वृत्ती अडचणीची ठरणारी आहे. ऐतिहासिक पुनरावलोकन आणि गतीमान मानवी जीवनातील बदलत्या ताणाबाण्यांचा संदर्भ समर्थपणे, सांस्कृतिक क्षेत्रांनी अंगीकृत करायला पाहिजे आहे. माहिती आणि मनोरंजनाच्या पलीकडे भूमिका घेण्याची जबाबदारी माध्यमांना पेलावी लागणार आहे आणि त्या दिशेने काहीसा प्रवास माध्यमांचा सुरु देखील झाला आहे असे वाटते. शिक्षणातून शास्त्रीय विचारांचा परिचय, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार आणि संवैधानिक नागरिकत्वाच्या जबाबदारीचे भान निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल व विस्तार करण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवते. त्यातून संवेदनशील, कर्तव्यपरायण, प्रगल्भ समाज मन विकसित व्हायला मदत होणार आहे.
आपल्याला लाभलेला संतांचा वारसा, आपली श्रद्धा दैववाद सोडून मानवतावादाकडे बघायला लावणारा आहे. तर समाजसुधारकांचा वारसा प्रस्थापित शोषणयुक्त धर्माला मानवतावादी, शोषणमुक्त धर्माचा पर्याय देणारा राहिला आहे. आधुनिक समाजसुधारकांमधील एक प्रवाह तर धर्माची कालबाह्य झालेली चौकट टाकून प्रागतिक विचारांची बैठक सांगणारे संविधानाचे अधिष्ठान स्विकारा असा आग्रह धरणारा आहे. त्यामुळे शोषणमुक्त धर्मांचा स्विकार व कालसुसंगत जगण्याचा आधार निर्माण करण्याची जबाबदारी भविष्यात पार पाडावी लागणार आहे. भारतीय संविधानाचे अधिष्ठान अशाच आधुनिक जीवन मूल्यांचा उद्घोष करताना नागरिकत्वाच्या अधिकार व कर्तव्यांची जबाबदारी निर्माण करणारे आहे. माणूस बदलतो या प्रक्रियेवर विश्वास ठेवून त्याला बदलासाठीचे प्रामाणिक प्रयत्न सातत्याने, चिकाटीने, निराश न होता, संघटीतरित्या करण्याची आवश्यकता असते. ‘संवादातून परिवर्तनाकडे’ हे ब्रीद वाक्य आपण संघटना म्हणून अंगी बाणविण्याची आवश्यकता आहे. हेटाळणीपासून सुरु झालेली अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा प्रवास बदनामी संघर्षातून मान्यता, प्रतिष्ठा आणि वाढत्या मागणी पर्यंत येऊन ठेपला आहे. त्याला साध्य, साधन शुचितेच्या परिमाणाची जोड आवश्यक आहे. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ याचा समाजमनावरील प्रभावाच्या अनुभूतीतून जाण्यासाठी व्यक्तिजीवनात व संघटनेत सर्वांनी समाज परिवर्तनाप्रती कटिबद्ध होण्याची गरज आहे.
– अविनाश पाटील