Categories
आव्हान ज्योतिष

अंनिसच्या आव्हानापासून ज्योतिषांनी काढला पळ

जून - २०१९

लोकसभा निवडणूक 2019’ च्या निकालाचे अचूक भविष्य वर्तवण्याचे व एकवीस लाख रुपये जिंकण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांसाठी केलेल्या जाहीर आव्हानाची फलश्रुती

महाराष्ट्रात आणि देशात होणार्‍या विचित्र स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात, असा संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक करणार्‍या अशा वृत्तीविरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्योतिषांना 2019 च्या निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याचे आव्हान राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांनी दि. 8 एप्रिल 2018 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले होते. यावेळी पंचवीस प्रश्नांची प्रश्नावली सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या आव्हानप्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहीत अधिकृत प्रश्नावली आणि रुपये 1,000 (रुपये एक हजार) प्रवेशशुल्काचा धनाकर्ष (डी. डी.) दि. 20 मे 2019 पर्यंत रजिस्टर्ड पोस्टाने समितीकडे पाठवणे आवश्यक होते. हे आव्हान समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन करण्यात आले होते.

स्वत:ला नामवंत समजणारे पंचांगकर्ते, ज्योतिषी; तसेच पुणे व मायणी येथील अंनिसचे आव्हान आम्ही स्वीकारतो, असे प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करणार्‍या ज्योतिषांसहीत जवळपास पंचवीस ज्योतिषांना, प्रवेशिका व प्रश्नावली रजिस्टर्ड पोस्टाने पाठवण्यात आलेली होती. प्रवेशिका संबंधितांना मिळालेल्याची पोच देखील समितीला प्राप्त झाली. एवढी पारदर्शिकता ठेवूनसुद्धा दि. 20 मे 2019 अखेर एकाही ज्योतिषाने उत्तरासहित अधिकृत प्रवेशिका पाठवलेली नाही, हे वास्तव आहे. केवळ आव्हान स्वीकारल्याची जाहिरातबाजी करून स्टंट निर्माण करण्याचा उद्योग काही ज्योतिष मंडळी प्रसारमाध्यमांद्वारे जाणीवपूर्वक करत आहेत. त्यांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये. कारण हे वास्तवतेला धरून नाही. निवडणुकीच्या काळामध्ये ज्योतिषी, अमूक एक उमेदवार निवडून येईल, एवढंच भाकीत करतात. काही वेळा हे भाकीत खरं ठरलं, तर याच्या जोरावर समाजामध्ये तज्ज्ञ ज्योतिषी म्हणून स्वत:ला मिरवत जनतेची फसवणूक आणि लुबाडणूक करत राहतात. असं होऊ नये आणि ज्योतिष हे शास्त्र नाही, ही एक कला आहे, हे समाजमनावर बिंबविण्याचा हेतू नजरेसमोर ठेवून ही आव्हान प्रक्रिया राबवण्यात आलेली होती.

प्रकाश घाटपांडे

ज्योतिष विश्लेषक

डॉ. नितीन शिंदे

राज्य कार्यवाह

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती