Categories
निषेध

अंनिसच्या रिंगणनाट्याचे दिल्लीत सादरीकरण

मार्च - २०१५

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा निषेध हा धरणे, आंदोलने, मोर्चे, उपवास या माध्यमातून डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचा व्यक्त करण्याबरोबर सांस्कृतिक वेदना अभिव्यक्तीचा मार्ग म्हणून अंनिसने महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच या व्यासपीठाची अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती केली! ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे महाराष्ट्र अंनिसच्या इस्लामपूर शाखेने बसवलेले राजा शिरगुप्पे, एकनाथ पाटील, संजय बनसोडे लिखित, विजय पोवार, योगेश कुदळे दिग्दर्शित रिंगणनाटय. सॉक्रेटिस पासून ते दाभोलकरांपर्यंतची तुकारामाच्या मार्गाने जाणारी धर्मचिकित्सेची विज्ञानवादी परंपरा व त्यावर धर्मांधांनी केलेले हल्ले यांचे प्रत्ययकारी सादरीकरण या नाटकाद्वारे पाहावयास मिळते. या नाटकाने महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, मुंबई इ. ठिकाणी मिळून 40 प्रयोगांतुन, तर बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनात झालेल्या प्रयोगातून डॉक्टरांच्या हत्येचा निषेध तीव्र निषेध व जनजागृती करण्याचे काम केले आहे. या नाटकात काम करणारे सर्व कलाकार हे अंनिसचे कार्यकर्ते असल्यामुळे नेमके विचार पोहचवण्याचे काम उत्तमरीत्या करू शकत आहेत. डॉक्टरांच्या खुनास 20 फेबु्रवारी 2015 ला 18 महिने पूर्ण होतात व मागील 9 महिन्यांपासून ही केस सी.बी.आय. कडे सोपवण्यात आली आहे तरी तपासात कुठलीही गती पाहावयास मिळत नाही. शासन जरी डॉ.दाभोलकरांचे मारेकरी पकडू शकले नसले तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम दुप्पट जोमाने चालू ठेवून अंनिस मारेकर्‍यांना चोख उत्तर देत आहे. यामुळे आपला निषेध केंद्र शासनापर्यंत व सर्व भारतातील जनतेपर्यंत अधिक तीव्रतेने पोहचवण्यासाठी रिंगणनाटकाचे प्रयोग दिल्लीमध्ये करण्याचे ठरले.

दिल्लीमधे रिंगणनाटय करायचे तर हिंदीमध्ये करणे आवश्यक होते. त्यासाठी मराठी नाटकाचा अनुवाद हिंदीमध्ये डॉ. सुनिलकुमार लवटे व डॉ. गवळी यांच्या मदतीने करण्यात आला व पुन्हा हिंदीतुन नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. दिल्लीमध्ये निषेध करण्यासाठी इस्लामपूर गट मोठया जोमाने तयार झाला. दिनांक 13 फेब्रुवारीला इस्लामपूर मधून अवधूत कांबळे, मी, अजय काळे, सागर सुर्यवंशी, अजय भालकर, सुनिल जाधव व अरूण भोसले हे कार्यकर्ते कलाकार दिल्लीसाठी रवाना झालो. पुण्यातुन राजु इनामदार आमच्यामधे सहभागी झाले. युवा सुपरफास्ट एक्सप्रेसने आम्ही सर्व 14 फेबु्रवारीला दिल्लीमध्ये पोहचलो. या दिवशी ’चयन’ या संस्थेतर्फे व्हलेंटाइन डे चे औचित्य साधुन आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहासंबधी काम करणार्‍या सर्वांना एकत्र करून ‘साहस-2015’ ही कार्यशाळा वाय.एम.सी.ए हॉस्टेल मध्ये आयोजित करण्यात आली होती. आम्ही सर्व या कार्यशाळेमध्ये सहभागी झालो. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे सुद्धा यासाठी विशेष निमंत्रित होते व त्यांनी एका सत्रामध्ये मार्गदर्शन करत असताना ‘अंनिस’च्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. संध्याकाळी कार्यशाळेचा समारोप मोर्चाने झाला. या मोर्चाचा समारोप जंतर मंतर या ठिकाणी झाला. यावेळी तेथे आम्ही चळवळीची गाणी गायली. जंतर मंतरवर आम्हाला आमच्यासारखेच आणखी दहा पंधरा गट पाहावयास मिळाले. त्यातील मर्द व उलटा चोर कोतवाल को दाटे ही पथनाटये अतिशय भावली.

15 फेब्रुवारी ला दहा वाजता संजय बनसोडे, विजय नांगरे, जगन्नाथ नांगरे व योगेश कुदळे पण मुंबईहून आले. आता आम्ही सर्वजण होतो. संध्याकाळी अतुल सरांनी व डॉ. सुनिल लवटे यांनी आमची हिंदी नाटकाची तालीम पाहिली. त्यात आवश्यक बदल सुचविले-करून घेतले व दुसर्‍या दिवशीच्या अतिशय गतिमान व महत्वाच्या दिनक्रमाबददल माहिती दिली. कारण आम्हाला या दिवशी एकूण सहा प्रयोग वेगवेगळया ठिकाणी करावयाचे होते. सर्व कामांचे व्यवस्थित नियोजन केले. अतुल सरांचा व्यवस्थापनाचा भाग माझ्यासारख्या नविन कार्यकर्त्यांना खूप काही शिकवून जाणारा होता.

16 फेब्रुवारी सकाळी सहा वाजताच अतुल सरांच्या ‘चाय-चाय’ या आवाजाने आम्ही सर्व लाजून उठलो. 9 वा आम्ही आमच्या पहिल्या कार्यक्रमस्थळी खालसा कॉलेजमध्ये पोहचलो. तेथे उत्साही तरूण-तरूणींचा गट आमची वाटच पाहत होता. त्यांनी दहाच मिनिटांमध्ये सर्व कॉलेजला मैदानावर जमा केले व रिंगणनाटय पाहण्याचे आवाहन केले. रिंगण नाटकाची पत्रके त्यांनी संपूर्ण कॉलेजवर चिटकविली होती. नाटकास सुरवात करण्याआधी आम्हाला कॉम्रेड गोविंदराव पानसरेंवर गोळीबार झाल्याची बातमी समजली त्यामुळे आम्ही नाटकाची सुरवात त्याच्या निषेधानेच केली व पुढील प्रत्येक प्रयोगाची सुरवात आम्ही या निषेधाने करू लागलो. नाटकानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले बहुतेक प्रश्न अंनिसच्या कामाबददल होते. तेथील तरूणांना अंनिसमध्ये सहभागी होण्याची खूप इच्छा दिसून येत होती. अविनाश पाटील व डॉ. हमीद दाभोलकर यांनी या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली व पुढील सर्व ठिकाणी हा क्रम सुरूच होता. दुसरा प्रयोग किरोडीमल कॉलेजमध्ये झाला. या कार्यक्रमासाठी 400 विद्यार्थी उपस्थित होते. तिसरा कार्यक्रम युनिर्व्हसिटी प्लाझामधे एस.एफ.आय. च्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. परंतु येथील प्रयोगास परवानगी नाकारल्यामुळे आम्ही हा प्रयोग गेटवरच करण्याचे ठरवले. रिंगणनाट्यास सुरवात केली त्यावेळी समोर फक्त 5 जण होते कार्यक्रम संपला त्या वेळी 500 चा जमाव स्तब्ध उभा होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण टी.व्ही. नाइन या चॅनेलवर करण्यात आले. चौथा प्रयोग दिल्ली युनिर्व्हसिटी स्कूल ऑफ सोशॉलॉजी मध्ये झाला. यावेळी मी मराठी चॅनेलने कार्यक्रमाचे रेकॉर्डींग केले. पाचवा प्रयोग तळपाले रेसिडेंन्शियल एरीया मध्ये नाटकप्रेमी नील यांनी आयोजीत केला होता. येथे प्रेक्षक संख्या खुप कमी होती. परंतु सर्व नाटकातील अतिशय जाणकार मंडळी होती. या ठिकाणी मोठया प्रमाणात प्रश्न उत्तरे झाली. या दिवशीचा शेवटचा व महत्वाचा प्रयोग जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठात होता. जे संपूर्ण भारतातील युवकांच्या क्रांतीचे खूप मोठे केंद्र म्हणून गणले जाते. डाव्या विचारांची अनेक तरूण या विद्यापीठामध्ये घडतात. या ठिकाणी प्रयोग 10.30 ला असूनसुद्धा 400 ते 500 तरूण तरूणी उत्साहाने उपस्थित होते. दिवसाच्या शेवटी इतका प्रवास व प्रयोग होवूनसुद्धा कोणाच्याही चेहर्‍यावर थकवा जाणवत नव्हता. रात्री दोन वाजता आम्ही सर्व राजघाट समोरील गांधी दर्शनला परत आलो. तेथे अतुल पेठे सरांच्या संपर्कामुळे आमची निशुल्क राहण्याची व्यवस्था गांधी स्मृती एवं दर्शन समितीच्या मनिमालाजी यांनी केली होती. या दिवसभरात आम्ही 6 ठिकाणी प्रयोग केले. या दिवशी झोळीमध्ये 13,500/- रू जमा झाले.

17 फेब्रुवारी सकाळी थोडा वेळ असल्यामुळे आम्ही समोरील राजघाटचे दर्शन घेवून आलो. आजचा पहिला व दिल्लीमधील सातवा कार्यक्रम गार्गी या महिला महाविद्यालयात होता. या ठिकाणी मुलींचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. आठवा कार्यक्रम भारतीय महिला पत्रकार संघात सर्व पत्रकारांसमोर झाला व तेथे पत्रकार परिषदही झाली. यावेळी पत्रकारांनी काही कलाकारानांसुद्धा प्रश्ने विचारले. नववा प्रयोग प्रगती मैदानावर सुरू असलेल्या विश्व पुस्तक मेळ्यामध्ये राजकमल प्रकाशनाच्या पुस्तक परिचय (डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेले डॉ. दाभोलकरांचे तिमीरातुनी तेजाकडे) या कार्यक्रमात डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी नियोजित केला होता. या ठिकाणी देशातील अनेक राज्यांतून व परदेशातुन आलेल्या अनेक लोकांनी प्रयोग पाहीला. दहावा प्रयोग डाव्या विचारांची पंढरी समजली जात असलेल्या सफदर स्टुडीओमध्ये मलयश्री हाश्मी यांनी आयोजित केला होता. दिल्लीमधील नाटकांचे सर्व नियोतन त्यांनी व अतुल पेठे या दोघांनीच केले होते. या ठिकाणी प्रयोग होणे आमच्यासाठी खुप महत्वाचे होते. समोर सर्व विचारवंत होते. नाटकातील जाणकार मंडळी होती. नाटकाच्या प्रयोगानंतर आम्हाला सफदर हाश्मी व स्टुडीओबददल माहीती देण्यात आली.

18 फेब्रूवारीचा पहिला व दिल्लीमधील अकरावा प्रयोग ज्या ठिकाणी महात्मा गांधींचा खुन झाला त्याच ठिकाणी जी.एस.डी.एस. च्या मनिमालाजींनी आयोजित केला होता. आम्ही सुद्धा तोच संदेश पूढे घेवून जात होतो, त्यामुळे आम्हाला अभिमान वाटत होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ज.द.यु. चे नेते शरद यादव उपस्थित होते व त्यांनी संसदेमध्ये शासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात 25,000/- रू देणगी मिळाली. दिल्लीमधील बारावा व शेवटचा कार्यक्रम सेंट मेरी स्कुल मध्ये झाला. या ठिकाणी शालेय विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यात वैज्ञानिक द़ृष्टिकोन रूजावा म्हणून संजय बनसोडे यांनी चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण केले. दिल्लीमधील बारा प्रयोगानंतर परतीचा प्रवास राजधानी एक्सप्रेस मधुन करत असतानाच आम्ही रेल्वेत 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती पोवाडे व गीत गावून साजरी केली हा एक वेगळा अनुभव होता.

सर्व प्रयोगादरम्यान विशेष म्हणजे रिंगणनाटयाची जी पत्रके काढली होती, ती वाटण्याचे काम स्वत: रोहिणी पेठे अगदी आनंदाने करत व नाटकासाठीचे प्रेक्षक जमवित. आमच्या जेवणाची सर्व व्यवस्था अविनाशभाई व हमीद दाभोलकर हे पाहत तर सर्व नियोजन हे अतूलसर करत. दिल्लीमधील सर्वच प्रयोग अतिशय महत्वाचे होते पण सफदर स्टुडीओ, विश्व पुस्तक मेला व गांधी स्मृती मधील प्रयोग विशेष संस्मरणीय झाले. या सर्व प्रयोगांची दखल सर्व मराठी प्रसारमाध्यमांनी मोठया प्रमाणात घेतली. प्रत्येक नाटकातून आम्ही एकच विचार सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तो म्हणजे माणसे कितीही मारली तरी विचार मरणार नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनानंतर आम्ही नाटकाचे नाव ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ असे केले आहे. यातून आम्ही सर्व धर्मांधांना संदेश देत आहोत की, आम्ही पुरोगामी विचार मरू देणार नाही.

सुयश तोष्णीवाल, इस्लामपूर