Categories
विशेष

अपराजिता रमा

मे - २०१२

मंगळूरजवळच्या गंगामूळ या डोंगरावर आश्रम बांधून एखाद्या ऋषीसारख्या राहणार्‍या अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई या दाम्पत्यांच्या घरी दिनांक 23 एप्रिल 1858 रोजी रमाबाई जन्माला आल्या. अनंत शास्त्री यांनी गंगामूळ येथे टुमदार वसाहत उभारली होती.  तिथे विद्यार्थी येऊन राहत व संस्कृत भाषा आणि न्याय व व्याकरण ही शास्त्रे शिकून परत आपल्या गावी जात.  अनंत शास्त्री हे  त्यांच्या पत्नीस संस्कृत शिकवीत म्हणून शास्त्री यांच्यावर  त्यांच्याच ब्राह्मण जातीवाद्यांनी बहिष्कार टाकला होता.  अनंत शास्त्री स्त्रियांना संस्कृत शिकवले पाहिजे या मताचे होते. त्यांनी आपल्या पत्नी व मुलीस संस्कृत शिकवून आपल्या मताची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली होती.

            साधारण 10 वर्षे गंगामूळ येथे राहिल्यानंतर ब्राह्मण जातीच्या बहिष्कारामुळे अनंत शास्त्रींनी गंगामूळ सोडून ते माळहेरंजी या गावी काही दिवस राहिले.  रमाबाईच्या जन्मानंतर ब्राह्मण लोकांच्या त्रासामुळे ते मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघाले.  या तीर्थयात्रेच्या 15-16 वर्षाच्या कालखंडात रमाबाई यांना आई-वडिलांकडून विशेषत: आईकडून संस्कृत, व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले.  रमाबाईंनी संस्कृतमध्ये तर प्राविण्य मिळविले होतेच पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नडी भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. इ.स. 1877 मध्ये मद्रास प्रांतात दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळात रमाबाईचे आईवडील व मोठी बहिण यांना मृत्यु आला तरी रमाबाई व त्यांचा मोठा भाऊ श्रीनिवास यांनी तीर्थयात्रेचे व्रत पुढे चालूच ठेवले त्यांनी 4 ते 5 हजार मैलांचा प्रवास त्यांनी पायी केला.  प्रवासात दोघे पुराण सांगत व संस्कृतमध्ये व्याख्याने देत पण त्यांच्या या उपक्रमाचे कोणीच कौतुक केले नाही.  इ.स. 1878 मध्ये ते कलकत्ता शहरात आले तिथे मात्र ब्राह्मो समाजाच्या पुढार्‍यांनी व कलकत्ता विश्वविद्यालयातील पंडितांनी त्यांच्या विद्येचा आदर केला त्या दोघांना कलकत्ता विश्वविद्यालयात बोलावून त्यांचा सन्मान केला व रमाबाई यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ अशी उपाधी दिली.  ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणार्‍या रमाबाई ह्या एकमेव महिला होत. 

            बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षी स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.  कलकत्ता येथे त्यांचा केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठले तत्पूर्वीही त्या हिंदूधर्माविषयी साशंक झाल्याच होत्या.  रमाबाईचा अशा रितीने सर्वत्र सत्कार होत असतांना त्यांचा मोठा भाऊ श्रीनिवास यांचा इ.स. 1880 मध्ये मृत्यु झाला व रमाबाईचा एकुलता एक आधारही तुटला त्या एकाकी झाल्या परंतु कलकत्यातील बिपिन बिहारीदास मेघावी या शूद्र जातीच्या सुशिक्षित, सुसंस्कृत, पुरोगामी विचारांच्या वकिलाने मागणी घातल्यानंतर त्यांच्याशी रमाबाईंनी इ.स. 1880 मध्ये विवाह केला.  या आंतरजातीय व आंतरप्रांतीय विवाहाने त्या काळात लोकमत फारच क्षुब्ध झाले.  पंडिता रमाबाईंना विवाह सौख्य फार काळ लाभले नाही.  विवाहानंतर अवघ्या 29 महिन्यात बिपिन बाबु कॉलर्‍याने 4 फेब्रुवारी 1882 मध्ये मृत्यु पावले.  पंडिता रमाबाईंवर आभाळच कोसळले.  तेवढ्या कालावधीत त्यांना एक मुलगी झाली होती.  त्या मुलीचे नांव मनोरमा ठेवले होते.पतीच्या निधनामुळे त्यांनी पारंपारिक रूढीप्रमाणे विधवेचे भयाण आयुष्य जगायला नकार दिला. त्याऐवजी त्यांनी पुढील आयुष्यासाठी एक महत्वाचे व्रत स्वीकारले, “जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक बिंदूमात्र आहे तोपर्यंत आपल्या जातीचे अर्थात स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामात मी पराङ्मुख होणार नाही. आजपासून स्त्री जातीची सुधारणा करावयाची आहे हे व्रत मी धारण केले आहे.”  पती निधनानंतर कलकत्त्यात राहणे पंडिता रमाबाईंना अशक्य होते म्हणून त्या 31 मे 1882 रोजी मुलगी मनोरमा  हीस घेऊन पुण्यास आल्या. पुण्यात आल्यानंतर इंग्रजीचा अभ्यास करायचा असे पंडिता रमाबाईंनी ठरविले होते.  त्यावेळी पुण्यात बायकांची एक सभा भरत असे. केरु नाना छत्रे या सभेतील बायकांना काहीतरी शिकवीत असत.  मुंबईतही प्रार्थना समाजाच्या वतीने अशी सभा भरत असे.  पुण्यातील या भगिनी मंडळातील प्रत्येकीच्या घरी दर आठवड्याला पंडिता रमाबाईचे पुराण व्हावे असे ठरले.  त्याप्रमाणे पहिले पुराण  रानडे यांच्या घरी झाले.  त्या पुराणात रमाबाईंनी आपल्या बुद्धिमत्तेने विद्वत्तेने व वक्तृत्वाने सार्‍यांना चकीत केले.  पुण्यातील विद्वानही त्यांचे कौतुक करु लागले.

            बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरिती व दुष्ट रुढी यातून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपुर, बार्शी इत्यादी ठिकाणी  भारताची  पहिलीच स्त्री  मुक्ती संघटना ‘आर्य महिला समाजा’ची 30 नोव्हेंबर 1882 रोजी स्थापना केली.  ‘स्त्री धर्म नीति’  हे पुस्तक इ.स. 1882 मध्ये लिहून प्रकाशित केले.

            शिक्षणाच्या संदर्भातील चौकशी करण्यास आलेल्या हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी ज्याप्रमाणे साक्ष दिली त्याप्रमाणे या हंटर कमिशनसमोर पंडिता रमाबाईंनीही स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही मागण्या केलेल्या आहेत.  5 सप्टेंबर 1882 रोजी हंटर कमिशनपुढे पंडिता रमाबाईंची साक्ष झाली.  त्यात त्यांनी पुरुष, स्त्री शिक्षणाविरुद्ध असल्यामुळे स्त्रियांना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिकाच असाव्यात, शिक्षिका नीतिमान असाव्यात त्यांना पुरुषापेक्षा जास्त पगार असावा त्यांच्यासाठी सुसज्ज वसतिगृहे असावीत अशा मागण्या केल्या.  स्त्रीला शिक्षण देणे हा गुन्हा मानला जात होता.  त्या काळात पंडिता रमाबाईंनी स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण दिले पाहिजे अशी सूचना केलेली आहे.  यानंतर लवकरच आनंदीबाई जोशी यांना वैद्यकीय शिक्षण दिले गेले.  त्यांना वैद्यकीची पहिली पदवी मिळाली याचे बरेच श्रेय पंडिता रमाबाई यांचेकडे जाते.  हंटर कमिशनपुढे दिलेली साक्ष इतकी परिणामकारक झाली की हंटर साहेबाने त्यांचे इंग्रजी भाषांतर करवून घेतले आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर पंडिता रमाबाई संबंधी एक व्याख्यान दिले त्यामुळे परदेशातही पंडिता रमाबाईची कीर्ती पोहचली.  या घटनेने इंग्रजी शिक्षणाविषयी रमाबाईंना अधिक निकड वाटू लागली. भारतात राहून हे शिक्षण होणार नाही असे त्यांना वाटले व त्यासाठी त्यांनी इंग्लंडला जायचे ठरविले. पंडिता रमाबाईंच्या स्त्रियांच्या सुधारणे विषयीच्या कल्पना त्यावेळच्या  शिकलेल्या ब्राह्मण  समाजाला पटण्यासारख्या नव्हत्या. विधवांच्या आश्रमासाठी  आर्थिक किंवा अन्य प्रकारची मदत करायला कोणीही  पुढे आले नाही. 

            ‘स्त्री धर्मनीती’ या पुस्तकांच्या विक्रीतून पंडिता रमाबाईंनी आपल्या व कन्येच्या प्रवासखर्चाची तरतूद केली.  इंग्लंडला गेल्यावर तेथे परित्यक्ता स्त्रियांसाठी होत असलेले काम पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले.  या सेवेचे मूळ त्यांना ख्रिस्तांच्या व्यक्तिमत्त्वात सापडले आणि ख्रिस्ती धर्माकडे त्यांचे मन आकृष्ट झाले परिणामत: 29 सप्टेंबर 1883 रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी व त्यांच्या मुलीने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.  स्वत:च्या धर्मांतर करण्याच्या मन:स्थितीबद्दल पंडिता रमाबाई स्वत:च म्हणतात, “आता माझी श्रद्धा पूर्वीच्या धर्मावरुन उडाली होती.  काही अधिक चांगले मिळावे याकरिता माझे मन भुकेले होते.  धर्मग्रंथाचा अभ्यास करतांना त्यांचे खरे भोंगळ स्वरुप माझ्या मनासमोर प्रकट झाले.  माझे डोळे हळूहळू उघडू लागले.  स्त्री नात्याने मला माझी आशाहीन स्थिती दिसू लागली आणि हे अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले की, धार्मिक सांत्वन, समाधान प्राप्त होण्यासाठी मजसाठी कुठेही जागा नाही.  स्त्री व शूद्र यांना मोक्षाचा अधिकार नाही.  स्त्रीने पतीची व शूद्राने ब्राह्मणाची सेवा करावी म्हणजे या सेवेचे फळ म्हणून पुढील जन्मी त्यास ब्राह्मण पुरुषाचा जन्म मिळेल.  तेव्हाच तो मुमूक्षू होण्यास पात्र होणार”  यावरुन आपल्या लक्षात येईल की, हिंदू धर्म ग्रंथाकडून त्यांची झालेली निराशा दिसून येते.

            डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी लिहिलेल्या, ‘महात्मा जोतीबा फुले आणि स्त्री – मुक्तीचा विचार’ या पुस्तकांत म्हणतात, मया अनुभवामुळे वैतागून पंडिता रमाबाई इंग्लडला निघून गेल्या. आयुष्यभर हिंदु समाजाकडून भोगावा लागला त्रास आणि त्यातून  निर्माण झालेला संताप त्यांच्या मनामध्ये या काळात उफाळून आला असेल अशा मन:स्थितीत पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्विकारला यामुळे सगळीकडे टीकेचे वादळ उठले, लोकमान्य टिळकांसारख्या पारंपारिक ब्राह्मण पुढार्‍यांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला केला.  सुधारक ब्राह्मण पुढारी मूग गिळून गप्प बसले……. ‘पंडिता रमाबाईंच्या क्रांतिकारक कार्याविषयी महात्मा जोतीबा फुले मात्र गप्प राहिले नाहीत त्यांनी रमार्बांना स्त्री – शिक्षणाविषयीचे श्रेय दिले आणि त्यांच्यावर टीका करणार्‍या ब्राह्मणांवर वैचारीक हल्ला केला.’

            पंडिता रमाबाईच्या धर्मांतराबद्दल ताराबाई साठे म्हणतात, “हिंदूंच्या भागवताचे अकरा हजार श्लोक आठव्या वर्षी मुखोद्गत करणारी, अमरकोश, गीता याशिवाय पाणिनीच्या अष्टाध्यातील चार हजार सूत्रे व त्यावरील भट्टोजी दीक्षितांची संस्कृत वाक्यवृत्ती मुखोद्गत करणारी वेद, स्मृती, श्रुती वाचलेली सर्व तीर्थांची संपूर्ण यात्रा पायी करुन सप्तपुर्‍या व चारी धामे हिंडलेली ही पंचवीस वर्षाची तडफदार विदुषी ख्रिस्ती का झाली ? तिला हिंदू धर्म माहीत नव्हता असे कोण म्हणेल?” (पहा ‘अपराजिता रमा’, ताराबाई साठे, पृ.क्र.12)

            पंडिता रमाबाई हिंदू धर्माबद्दल म्हणतात, “ख्रिस्ती लोकांना जातीबाहेरचे लेखून हिंदू लोक त्यांच्याशी क्रूरतेने वागतात पण तेच ख्रिस्ती लोक समाजाने उपहासिलेल्या दुर्भागी स्त्रियांशी प्रीतीने व दयेने वागतात.  माझ्या स्वत:च्या देशामध्ये स्त्री जातीसाठी हिंदू लोकांनी त्या प्रकारचे काही कार्य केल्याचे ऐकलेही नव्हते.  हिंदू धर्मग्रंथात आपल्या स्त्रियांच्या बाबतीत कोणताही दयेचा व्यवहार करीत नाही.  हिंदूंचे नियम शास्त्र तर अशी आज्ञा करते की, या पतित स्त्रियांना शहराबाहेर कुत्र्यांनी खाऊन टाकावे अशी योजना राजाने करावी”.

            इंग्लंड मध्ये असतांना पंडिता रमाबाई भारतात येऊ इच्छिणार्‍या मिशनरी स्त्रियांना मराठी शिकवीत त्याबदली त्याची इंग्रजी शिक्षणाची व राहण्या जेवण्याची सोय करण्यात आली होती एका वर्षानंतर चेल्टन हॅम येथील स्त्रियांच्या कॉलेजात त्यांना संस्कृत अध्यापनाचे काम मिळाले.

            जानेवारी 1885 मध्ये अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील स्त्रियांच्या वैद्यकीय कॉलेजच्या प्राचार्य डॉ. बॉडले यांनी पंडिता रमाबाईंना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले.  आनंदीबाई जोशी यांच्या 6 मार्च 1886 रोजी होणार्‍या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून पंडिता रमाबाई फेब्रुवारी इ.स.1886 मध्ये अमेरिकेस गेल्या.  भारतातील बालविधवांना उपयुक्त होणारी मबालोद्यान शिक्षणपद्धतीफ त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली.  अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बाल विधवांच्या प्रश्नांचा उहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ (1887-88) हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले इ.स.1889 मध्ये ‘युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले.  भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ व इतरही काही संस्था निर्माण केल्या.

            अमेरिकेहून 1 फेब्रुवारी 1889 रोजी परत आल्यानंतर 11 मार्च 1889 मध्ये मुंबईला विधवांकरीता ‘शारदा सदन’ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली.  आपल्या देशातील स्त्रियांचे प्रश्न अमेरिका आणि इंग्लंड यासारख्या देशांमध्ये मांडून शिक्षण प्रसारासाठी त्यांनी अमेरिकेतून मदत मिळवली.  हे सदन सुरुवातीला मुख्यत: बालविधवांच्या कल्याणासाठीचे काम करीत होते.  विधवा म्हणून त्या हतबल होऊ नये, विफल राहू नयेत याची दक्षता या सदनामार्फत पंडिता रमाबाई घेत असत.  या आश्रमात आलेली दुसर्‍या क्रमांकाची बालविधवा आनंदीबाई उर्फ गं.भा. गोदूबाई होती.  या आनंदीबाईंना आयुष्याची योग्य दिशा पंडिता रमाबाईंनीच दाखवली. याच आनंदीबाईशी नंतर थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांनी विवाह केला होता.  कर्वे यांच्या बरोबरच  आनंदीबाईंनीही पुढे समाजसेवा केली.  मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी या सदनात पंडिता रमाबाई त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देत त्यात शिवणकाम, लोकरकाम, चित्रकला, चिनीमातीच्या भांड्यांवर नक्षी काढणे, फोटो घेणे, लाकडावर नक्षी काढणे अशी सर्व कामे शिकवत.  या सदनाच्या संदर्भात धोंडो केशव कर्वे म्हणतात, यात त्यांच्या पत्नीचा संदर्भ आहे – “या शाळेतून ती आपल्या बरोबर तीव्र ज्ञानलालसा बरोबर घेवून बाहेर पडली येथेच तिचे मन सुसंस्कृत व अंत:करण विशाल बनले.  तिला आता असे वाटू लागले आहे की, आपल्या अधिक दैवहीन भगिनीची उन्नती करता येईल इतकी आपली प्रगती झाली आहे.  या शारदा सदनामुळेच मला उत्तम पत्नी मिळाली” याच्या उलट बाळगंगाधर टिळक आरोप करतात की, ‘पंडिता रमाबाई ह्या शारदा सदनातील मुलींना ख्रिस्ती बनवतात’ वास्तविकता ही होती की शारदा सदनातील प्रत्येक मुलीला धर्माचे स्वातंत्र्य दिलेले होते.

            स्त्रियांना जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये सहभागी होता आले पाहिजे हा पंडिता रमाबाईचा आग्रह  होता.  एका वर्गाला गुलाम बनवणारी  गुलामगिरीलाच उदात्त स्वरुप देण्यात पटाईत असलेल्या पुरुषांनी स्त्रीला जन्मल्यापासून ते मरेपर्यंत घरातच कोंडून ठेवले त्यामुळे स्त्रियांना सार्वजनिक जीवनात सहभागी होता येत नव्हते म्हणून पंडिता रमाबाईंनी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’मध्ये स्त्रियांनाही प्रवेश मिळाला पाहिजे.  इ.स. 1889 मध्ये अशी प्रथम मागणी केली होती.  इंग्रजांकडून आपल्याला स्वातंत्र्य मागणार्‍या पण स्वत:च्या घरातील स्त्रियांना मात्र पारतंत्र्यात ठेवणार्‍या पुरुष मंडळींना त्यांनी रोखठोक प्रश्न केला होता की, “पुरुष इंग्रज सरकारजवळ स्वातंत्र्य मागतात, त्यासाठी या मंडपातील वक्ते स्वातंत्र्य हिरावून घेवून नये म्हणून टाहो फोडतात मग तोच न्याय स्त्रियांनाही तुम्ही का देत नाही?”

            नोव्हेंबर 1890 मध्ये ‘शारदा सदन’मुंबईहून पुण्यात आणण्यात आले.  ‘शारदा सदन’मध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वातंत्र्य दिले होते.  तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र पुण्याच्या जवळ केडगाव येथे न्यावे लागले.  24 सप्टेबर 1898 रोजी केडगावच्या ‘मुक्तिसदना’चे उद्घाटन करण्यात आले.  इ.स. 1897 मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. 1900 मध्ये गुजरात मध्ये भयंकर दुष्काळ पडला.  लोक अन्नावाचून मरू लागले.  पंडिता रमाबाई अशा दुष्काळपिडीतांच्या सहाय्यासाठी धावल्या.  सुमारे 3000 अनाथ व अपंग मुले, मुली व स्त्रिया त्यांच्या भोवती गोळा झाल्या.  एवढ्या लोकांच्या अन्नपाण्याचाच नव्हे तर पालनपोषणाचा व शिक्षणाचाही प्रश्न होता.  पंडिता रमाबाईंनी  हे काम अंगावर घेतले आणि यशस्वीपणे पार पाडले.

            महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा पंडिता रमाबाई यांनी केडगावच्या मुक्ती सदनामार्फत केलेले काम खूपच महत्वाचे आहे.  दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरुन पंडिता रमाबाईंनी दुष्काळग्रस्त अभागी स्त्रियांना केडगावात जमा केले.  स्त्रियांच्या मदतीनेच तिथे घेतलेल्या जमिनीमध्ये विहिरी खोदल्या. इथेच दगड घडणे, चुना मळणे, भिंती बांधणे, सुतारकाम करणे, लोखंडी कामात घण मारणे, विहिरीतील खडक फोडण्यासाठी सुरुंग लावणे, तो पेटवून चपळाईने बाहेर पडणे ही सगळी कामे त्यांनी स्त्रियांकडून करवून घेतली.  स्त्रियांना बलहीन दुबळी म्हणणार्‍यांच्या तोंडावर पंडिता रमाबाईंनी जणू सनसनीत चपराक मारली होती.  विहिर खोदून भरपूर पाणी लागले आणि या पाण्यावर त्यांनी शेतीही उत्तम पिकवली.  आश्रमात राहणार्‍या स्त्रियांना संपूर्णत: स्वावलंबी बनवण्यासाठी तिथे हातमाग निर्माण केले.  तिथल्या स्त्रिया स्वत: विणलेली वस्त्रे नेसत, पासोड्या, सतरंज्यासारखे कपडेही त्या विणत.  श्रमदानातून अनेक इमारतीही त्यांनी उभ्या केल्या याच ‘मुक्ती सदना’तर्फे अंध-अपंगांसाठी, वृद्धांसाठी पंडिता रमाबाईंनी ‘प्रीती सदन’स्थापन केले होते.  अंधांना कळणारी ब्रेल लिपी स्वत: शिकून पंडिता रमाबाईंनी त्यांना वाचण्यास शिकवले होते.  याबरोबरच त्यांना दोर्‍या वळणे, टोपल्या विणणे यासारखी कामेही शिकवली होती.  केडगावच्या या आश्रमामध्ये समाजाने दुर्लक्षित केलेल्या पतिता म्हणून फेकून दिलेल्या मुली पंडिता रमाबाईंनी जमा केल्या त्या मुलींना शिकवले, सुसंस्कृत, स्वावलंबी बनवले.  आश्रमात आलेल्या अनाथ मुलींना रोज आंघोळ  करावयाची असते हे सुद्धा कळत नव्हते.  आंघोळीपासून सर्व गोष्टी पंडिता रमाबाईंनी शिकवल्या.  या मुलींच्या डोक्याला तेल लावण्याचे काम स्वत: पंडिता रमाबाई करीत असत.  या कार्याबद्दल तत्कालीन इंग्रज सरकारने पंडिता रमाबाई यांना ‘कैसर-ए-हिंद’ ही पदवी इ.स. 1919 मध्ये दिली होती.

            शेवटच्या काळात त्यांची एकुलती एक मुलगी मनोरमा ही 24 जुलै 1921 रोजी मिरज येथे मृत्यु पावली.  वैयक्तिक दु:खाची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही.  त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासीयांनाही खादी वापरण्यास लावले.  पंडिता रमाबाईंनी मात्र दागदागिन्याला महत्त्व न देता विद्येला महत्त्व दिलेले आहे.  जमीन, पैसा, जडजवाहिर या संपत्तीपेक्षा विद्या हीच खूप मोठी संपत्ती आणि तोच अक्षय दागिना आहे असे पंडिता रमाबाईंना वाटे.  विवाह संबंधात पंडिता रमाबाई परस्पर संमतीला व प्रेमाला महत्त्व देतात. त्या म्हणतात, “अशा ठिकाणी आपल्या पसंतीने परीक्षा करुन उपयुक्त असा संबंध करण्यास स्त्री-पुरुषास समान स्वाधीनता असावी हेच योग्य. हा संबंध करणे तो लोकांच्या पसंतीने धनलोभाने अथवा कोणत्याही प्रकारच्या लोभाने भुलून करु नये.”     

            पंडिता रमाबाई यांना मराठी, कन्नडी, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी संस्कृत याचबरोबर तुळू आणि हिब्रू ह्या भाषाही अवगत होत्या.  त्यामुळे मूळ हिब्रू व ग्रीक बायबलावरुन बायबलचे मराठी भाषांतर केले या व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेली पुस्तके ती याप्रमाणे इबरी (भाषेचे) व्याकरण (1908), नवाकरार (1912), प्रभू येशू चरित्र (1913), भविष्य कथा (1917), अ टेस्टिमची, मुक्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फेमिन – एक्स्पिरिअन्स इन इंडिया इत्यादी.

            प्र.के. अत्रे यांनी लिहिलेल्या ‘मराठी माणसे, मराठी मने’, पृ.क्र. 43 या पुस्तकांत  पंडिता रमाबाईंच्या संदर्भात म्हणतात, “ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून त्यांनी हिंदी ख्रिस्ती समाजाची फार मोठी सेवा केली यात संशय नाही, पण ज्या हिंदू समाजात त्यांना मूळ जन्म झाला होता त्या समाजाला त्यांच्या थोर बुध्दीच्या ज्ञानाचा आणि कर्तृतत्वाचा मुळीच फायदा मिळू शकला नाही असे मात्र खेदाने म्हणावे लागते. धर्मांतर न करता पंडिता रमाबाई यांनी  विद्यादानाचे आणि समाजसुधारणेचे कार्य  जर आपल्या समाजात केले असते तर विष्णुशास्त्री चिपळूणकर, राणडे, टिळक, आगरकर,  आणि धोंडोपंत कर्वे यांच्या तेजस्वी मालिकेत पंडिता रमाबाईंचे नाव महाराष्ट्राला नि:संशय घालावे लागले असते.”

            यावरून प्र.के.अत्रे हे विसरले, डॉ. आनंदीबाई जोशी ह्या पंडिता रमाबाईच्या प्रयत्नाने डॉक्टर झाल्या होत्या. तसेच भारतातील बर्‍याच ब्राह्मण स्त्रीच्या प्रगतीमध्ये ख्रिस्ती  लोकांचा मोठा वाटा आहे हे नाकारता येणार नाही. प्र.के. अत्रे  ज्यांना समाजसुधारक म्हणतात त्यातील काही फक्त बोलके सुधारक होते कर्ते सुधारक नव्हे. त्यातील लोकमान्य टिळक विष्णूशास्त्री  चिपळूणकर, शि.म.परांजपे इत्यादीनी सत्यशोधक समाजालाविरोध केल्यामुळे इ.स. 1895 पासून सत्यशोधक समाजाची अधिवेशने बंद केली गेलीत. तर इ.स. 1882 मध्ये संमती वयाचा कायदा पास झाला.  त्यावेळी मुलींचे लग्नाच्या वेळेचे वय बारा असावे अशी कायद्यात तरतूद केली पण या कायद्याला टिळकांनी कडाडून विरोध  केला. सन 1895 मध्ये लो. टिळक यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला 10 वर्षे पूर्ण झालीत म्हणून आनंद व्यक्त करणारा त्यांच्या केसरीत  जो वृत्तांत लिहिलेला आहे तो टिळक यांच्या स्त्री विषयक भूमिकेचा अहवाल देणारा आहे, कारण त्या वृत्तामध्ये  त्यांनी 10 वर्षे वयाची मुलगी कशी गुबगुबीत सुंदर व लावण्यायुक्त दिसते व विवाहयोग्य झालेली असते,  शय्यासोबत करिता योग्य असते असे प्रतिपादन केलेले आहे. तसेच जानेवारी 1920 मध्ये पुणे म्युनिसिपाल्टीने मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यासंबंधी ठराव आणला त्याला लो. टिळकांनी विरोध केला यावरून स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी टिळकांची अशी विरोधी वृत्ती होती.  अलिकडच्या विचारवंतांनी लोकमान्य टिळकांना सामाजिक सुधारक म्हणूनही गौरविण्याचे चालू केले आहे. त्यांनी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या आहेत ते मात्र कोणी सांगत नाही. टिळक मृत्यूपर्यंत स्त्रियांच्या सुधारणा विरूध्द होते.  न्या. महादेव गोविंद रानडे हे विधवाविवाह व प्रौढ कुमारिका विवाह यांच्या बाजूचे सुधारक होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले म. फुले त्यांना म्हणाले,  ‘झाले ते वाईटच झाले, पण आता तुम्हाला एक संधी आहे. तुम्ही पुनर्विवाह करताना विधवेशी अथवा प्रौढ कुमारिकेशी करा,’ विचार म्हणून न्या. रानडे यांना हे मत मान्यच होते, परंतु ते आमलात आणले असते, तर घरच्यांच्या आणि समाजाच्या रोषाचे बळी व्हावे लागले असते. यामुळे त्यांनी  प्रत्यक्षात विवाह परंपरेप्रमाणे लहान मुलीशीच केला तेव्हापासून महाराष्ट्रात ‘कर्ते सुधारक’आणि ‘बोलके सुधारक’ हे शब्द अस्तित्वात आले.

            स्त्रियांच्या उध्दाराकरीता  पंडिता रमाबाई आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्पित जीवनाचे एक अंग होते.  अशा तेजस्विनीचे दिनांक 5 एप्रिल 1922 रोजी निधन झाले.  अशा अनाथाच्या मातेला कोटी – कोटी प्रणाम!

गौतम निकम

संदर्भ –
1) अपराजिता रमा – ताराबाई साठे, पुणे, 1975.  2) जोतीबाफुले आणि स्त्री – मुक्तीचा विचार – डॉ. गेल ऑम्व्हेट. 3) Pandita Ramabai – Dyre, Helen 1900. 4) भारतीय संस्कृति कोश – खंड 7, पृ. 723 ते 725, संपादक –  पं.महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे – 2.  5) मराठी विश्वकोश – खंड – 14, पृ. 478 ते 479, संपादक – तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्र राज्य, मराठी विश्वकोश  निर्मिती  मंडळ, मुंबई. 6) महाराष्ट्राची तेजस्वीनी पंडिता रमाबाई – दे.ना.टिळक, नासिक 1960. 7) समाज सुधारकांची तुतारी – डॉ. अनंत राऊत, कैलास पब्लिकेशन औरंगाबाद 2006