Categories
इतर

शुक्राचं चांदणं? शनिची अवकृपा?

मे - २०१२

            ‘शुक्राचं चांदणं लेऊन 3 एप्रिलची सायंकाळ येईल. पश्चिम क्षितिजावर शुक्राचं दर्शन घडेलच. आठवड्यानंतर 15 एप्रिल शनिमहाराज गाजवतील. रात्रभर शनिदर्शन होईल.’ अशा आशयाची बातमी दै.सकाळच्या पहिल्या पानावर होती. बातमी फारशी अतिरंजीत नाही. परंतु त्यातून व्यक्त होणारा आशय चुकीचा संदेश देण्याची शक्यता आहे.

            सध्या शुक्र दिवस मावळल्यानंतर पश्चिम क्षितिजावर अत्यंत तेजस्वी चांदणीच्या रूपात आपलं लक्ष वेधून घेत आहे. गेले 3 महिने तो दिसत आहे. त्यामुळे फक्त 3 एप्रिललाच तो दिसणार असा कोणताही प्रकार नाही. आणि शुक्राचं चांदणं पडण्याचा प्रश्न नाही. कारण शुक्र जरी तेजस्वी असला तरी त्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसण्याची अजिबात शक्यता नाही कारण शुक्राचा आकार चंद्राच्या मानाने अतिशय कमी आहे. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर चांदणं पडलं असा वाक्प्रचार आपण वापरतो. तसा प्रकार शुक्राच्या बाबतीत घडणार नाही अथवा घडतही नाही.

            सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी असलेला हा ग्रह सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 225 दिवस लावतो. स्वत:भोवती मात्र 244 दिवसात एक चक्कर मारतो. याचाच अर्थ शुक्रावर वर्षापेक्षा दिवस मोठा असतो. पृथ्वीवासीयांना हा प्रकार विचित्र वाटण्याची शक्यता आहे. कारण असा अनुभव आपण कधीही घेतलेला नाही. शुक्रावर जीवसृष्टी असती तर तिच्यादृष्टीने पृथ्वीवरील दिवस-वर्ष हा प्रकार विचित्र वाटला असता.

            सूर्याला जवळ असल्यामुळे शुक्रावरील तापमान 450 अंश सेल्सियस असते. सूर्यादयापूर्वी पूर्व किंवा सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितीजावर जास्तीत जास्त दोन तास हा ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतो. क्षितीजापासून जास्तीत जास्त 47 अंशापर्यंत हा दिसतो. चंद्राप्रमाणे याच्याही कला दुर्बिणीतून पाहाता येतात. शुक्रावरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 98 टक्के तर नायट्रोजन, अरगॉन, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी वायूंचे प्रमाण दोन टक्के असते. शुक्रावरील ढग हे सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे बनलेले असतात त्यामुळे या ग्रहावर सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा पाऊस पडतो.

            “शुक्र तारा मंद वारा….” हे गाणं गुणगुणायला ठीक आहे. पण शुक्र हा तारा नसून ग्रह आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आकाशात दिसायला आणि ओळखायला सर्वात उत्तम ग्रह. सर्वात तेजस्वी चांदणीच्या रूपात शुक्र ग्रह दिसतो. बुध आणि शुक्र हे पृथ्वीच्यादृष्टीने आतले ग्रह आहेत म्हणून त्यांना अंर्तग्रह म्हणतात. या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत. या दोन ग्रूूवर प्रचंड तापमान असल्यामुळे जीवसृष्टी तग धरू शकत नाही.

            सध्या दिवस मावळ्यानंतर पूर्वेच्या बाजूला कन्या  राशीत आणखी एक तेजस्वी चांदणी शनीच्या रूपात आपलं लक्ष वेधून घेते. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आकाशातील सर्व चांदण्या व ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात. त्यामुळे जसजशी रात्र होईल तसतसं दिवस मावळल्यानंतर पूर्वेकडे दिसणारा शनी, नंतर डोक्यावर येईल व सूर्योदयाच्या वेळेत पश्चिम क्षितीजावर दिसेल.

            बदनामीने झालेला, उघड्या डोळ्यांनी रात्रभर दिसणारा पण बहुतेकांनी कधीही न पाहिलेला हा ग्रह. पंचांगकर्त्याच्या भीतीपोटी सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरवतो आणि कर्मकांडांना प्रवृत्त करतो. शनीची सुंदर कडी पाहण्यासाठी मात्र दुर्बिणीची आवश्यकता आहे. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 9.6 कि.मी.प्रती सेकंद या वेगाने शनीला जवळ-जवळ 30 वर्षे लागतात. एका राशीमध्ये अडीच वर्षे वास्तव्यास असणारा आणि गुरूनंतर सर्वाधिक वस्तुमान असलेल्या या ग्रहावर 1997 साली पाठवलेले कॅसीनी यान सात वर्षांनंतर म्हणजे 2004 साली पोहचले. शनीभोवती पूर्वी एखादा उपग्रह आला असला पाहिजे आणि गुरूत्वाकर्षणाच्या ताणामुळे त्या उपग्रहाचे तुकडे होऊन ते कड्यांच्या रूपात फिरत राहीले असले पाहिजेत असे वैज्ञानिकांचे मत आहे.

            शनीची घनता आहे फक्त 0.7 ग्रॅम/सेमी3. पाण्याची घनता आहे 1 ग्रॅम/सेमी3. शनीला जर पृथ्वीवरील पाण्यात आणून टाकलं तर तो पाण्यावर तरंगेल इतका हलका आहे. अर्थात शनीला पाण्यात टाकणे शक्य नाही, पण कल्पना करायला काय हरकत आहे? शनीबद्दल प्रचंड भीती पंचांगवाल्यांनी घातलेली आहे. त्याला जरा उघड्या डोळ्यांनी दाखवायची तसदी पंचांगवाल्यांनी घेतली तरी सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेले समाजकार्य फलद्रूप झाले असे समजायला काहीच हरकत नसावी. पण असे ते करणार नाहीत. कारण शनी पंचांगवाल्यांनी तरी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे की नाही याची शंका आहे. ज्यांनी स्वत:च शनी पाहिलेला नाही ते दुसर्‍याला काय शनी दाखवणार म्हणा! पोथ्या पुराणे फक्त वाचून दुसर्‍याला फसवण्यात यांचा हातखंडा.

प्रा. डॉ. नितीन शिंदे