शोषणमुक्त, समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी जात ही अंधश्रद्धा म्हणून व कालबाह्य रुढी-प्रथा-कर्मकांडांना झुगारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंनिसने चालविला आहे. त्याचा कृती कार्यक्रम म्हणून आंतरजातीय, आंतरधर्मिय, सत्यशोधकी, साधे व नोंदणी पद्धतीचे विवाह समितीच्या कार्यकर्त्यांनी मागील पाच वर्षात लावण्याचा द्विशतकी टप्पा नुकताच ओलांडण्यात आला. अतिशय गतिमान, स्पर्धात्मक, चंगळवादी, अस्थिर अशा जागतिक परिस्थितीत अंधश्रद्धेकडे जाण्याचे आकर्षण व कल वाढतो आहे. असे असताना महाराष्ट्र अंनिससारख्या, हितसंबंधी व्यवस्थेच्या विरोधी काम करणार्या संघटनेकडून राबविला जाणारा जात निर्मूलनाचा कार्यक्रम हा राष्ट्रहिताचा कार्यक्रम आहे. त्यातून सर्वसामान्यांना विवाह संस्थेच्या शोषण यंत्रणेपासून वाचविण्यासाठी केला गेलेला दिशादर्शक प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण व दखलपात्र ठरला आहे. समितीच्या एकट्या लातूर शाखेच्या पुढाकाराने आत्तापर्यंत शंभर विवाह लावले गेलेत. तर कोल्हापूर केंद्राकडून 30 पेक्षा जास्त विवाहांची नोंद झाली आहे. त्याशिवाय समितीच्या शाखांमधून लावले गेलेले कार्यकर्त्यांचे असे विवाह आहेतच.
त्याचे औचित्य साधून संघटनेने आंतरजातीय/धर्मिय विवाहांना बढावा देण्यासाठी अधिक व्यापक काम करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात असे विवाह केलेल्या जोडप्याची राज्यस्तरीय नोंदणी, सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न असणार आहे. समितीने लावलेल्या विवाहांच्या जोडप्यांना एकत्रित बोलवून त्यांचे राज्यस्तरीय कुटुंब संमेलन केले जाणार आहे. तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचे कथन करणारे पुस्तक संपादित करण्याचा देखील समितीचा विचार आहे. दुसर्या टप्प्यात समितीतर्फे लातूर व कोल्हापुर शाखांकडून चालविले जाणारे विवाह लावण्याची मदत केंद्रांच्या धर्तीवर राज्याच्या प्रत्येक महसुल विभागात किमान एक केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. तसेच जिल्हानिहाय किमान एक शाखेकऐडून आंतरजातीय-आंतरधर्मिय सत्यशोधकी साधे नोंदणी पद्धतीच्या विवाहांचे स्वागत, समर्थन व मार्गदर्शन करणारे केंद्र सुरु करण्याचे ठरविण्यात आले आहे. आपणास आवाहन आहे याला यथाशक्ती आपले सहकार्य व आपला सहभाग देण्याचे आणि आपल्या स्वत:चा किंवा आपल्या माहितीतील कोणाचा असा वैशिष्ट्यपूर्ण विवाह असल्यास त्याची माहिती पाठविण्याचे!
संपर्कासाठी – माधव बावगे – 9422469564,
ईमेल- bawgemv2007@rediffmail.com
दिलीप आरळीकर-9422468413 aralikar@yahoo.com