Categories
बुवाबाजी

बालिकेचा विनयभंग करणारा भोंदूबाबा अटकेत

जून – २०११

चाळीसगाव(जि.जळगाव) येथील पाटणादेवी रोडवरील सैलानीबाबा दर्ग्यावरील नुरोद्दिन गफरू रंगरेज नामक भोंदूबाबाने अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

            याबाबत माहिती अशी की, इगतपुरी, कोपरगाव येथील गरीब कुटुंबातील बालिका तिच्या आईसमवेत भोंदूबाबा  नुरोद्दिन गफूरकडे उपचारासाठी आली होती. उपचाराचे नाव सांगून बाबाने बालिकेसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार देण्यासाठी बालिकेची आई व बालिका पोलीस ठाण्यात आली. मात्र, बालिका घडलेला सर्व प्रकार सांगत असूनही नंतर तक्रार देण्यास तयार नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा.गौतम निकम यांनी बालिकेशी चर्चा करून घडलेला सर्व प्रकार स.पो.नि.शिरसाठ यांच्यासमोर कथन केल्यानंतर प्रा.गौतम निकम यांनी पोलिसात भोंदूबाबा विरोधात तक्रार दिल्याने या प्रकरणात भोंदू नुरोद्दिन गफूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याच भोंदूबाबाविरोधात दि.27 डिसेंबर 2010 व 2 नोव्हेंबर 2009 रोजी भारतीय माईनारिटीज महासंघाचे सैय्यद युसूफ अली मोहम्मद अली यांनी पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. त्यात नुरोद्दिन सैलानीबाबांच्या नावाने रोशननगर परिसरात भोंदुगिरी करतो. व्याधीग्रस्त भोळ्या भाबड्या लोकांना लिंबू, नारळ, गंडे, दोरे, भूतबाधा झाल्याचे सांगतो व त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतो. या व्यवसायातून भोंदूबाबाने मोठ्या प्रमाणावर काळी माया जमा केल्याचे म्हणणे आहे. तक्रारीच्या प्रती अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, पोलीस उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव व पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्याचे नमूद केले आहे.

प्रा.गौतम निकम, चाळीसगाव