बाबूराव मंत्रालयात नोकरी करतात, मुंबई येथे. बाबूराव हे त्यांचं खरं नाव नाही. पण आपल्या सोयीसाठी आपण त्यांना बाबूराव म्हणू. त्यांनी सांगितलेली ही हकीकत.
सात-आठ महिन्यानंतरच त्यांच्या लग्नाचा सारीपाट उधळला गेला. आता दहा-बारा वर्षे झाली आहेत. अद्याप रितसर घटस्फोट नाही. कोर्ट-कचेर्या करायच्या नाहीत असं ठरवलेलं. तिला दुसर्याशी लग्न करायचं होतं. तिला हे लग्न मान्यच नव्हतं. तिला परत जायचं होतं, आणि ती गेली. ती कशी गेली, तिने कसा त्रास दिला हे सांगण्याचं इथे प्रयोजन नाही कारण मुळातली कथा वेगळी आहे. मधून मधून तिकडून नोटीसा येत राहिल्या, अजून येतात. नंतर पुढे बाबूरावांनी संन्यास घेतला. आता संबंधच्छेद ही भूतकाळातली कथा झाली आहे.
एक अनपेक्षित सकाळ. दार ठोठावलं जातं. बाबूराव दार उघडतात, तर कुणी अनोळखी माणूस. नंतर नमस्कार-चमत्कार, या बसा.
“मी कमल निनावेचा भाऊ-”
“कोण कमल निनावे?”
“आमूक आमूकची बायको!”
बाबूरावच्या डोक्यात तरी प्रकाश पडत नाही.
“बरं मग!”
“तुमच्या मिसेसने माझ्या बहिणीचा संसार उध्वस्त केला आहे!.. आम्हाला कोर्टात जायचंय, तुमची साक्ष लागेल!… तुम्ही मदत कराल का?”
“नाही!”
थेट, आणि संक्षिप्त उत्तराने अपरिचित गृहस्थ स्तब्ध. पण विषादाने भरून गेलेला. तो उठला आणि म्हणाला,
“मला वाटलं होतं, तुम्ही आम्हाला मदत कराल!… पण नकळत तुम्ही त्यांनाच प्रोटेक्ट् करताहात!.. तुम्हाला माहीत नाही, तुमचा संबंध कोणत्या राक्षसीणीशी आणि तिच्या भयंकर नातेवाईकांशी जुळलाय ते!… तुमच्यावर मारेकरी घालण्याचं चाललंय!-”
“मारेकरी?”
“हं!.. सुपारी देऊन!.. तुम्ही त्यांनाच प्रोटेक्ट करताय! अजून विचार करा!”
‘सॉरी!.. मला कोणत्याही भानगडी नकोत-”
तो गेला. बाबूराव त्यानंतर मनस्तापात काही दिवस. नंतर कार्यालयातच एक पत्र मिळालं.
बाबूराव त्या पत्राकडे प्रथम अविश्वसाने, नंतर सुन्न होऊन पाहात राहिले आणि पाठोपाठ प्रचंड भिती मनात शिरून ते थरथरू लागले. सावधान-सावधान!.. आज (किंवा उद्या) तुमचा खून होणार आहे!.. सुपारी दिली आहे!… कुठे मुडदा पडेल सांगत येत नाही-’ वेडंवाकडं अक्षर, लाल पेनने लिहिलेलं चुरगाळेलेलं आंतरदेशीय पत्र.
“काय झालं, बाबूराव, तब्येत बरी आहे ना?”
“काय झालं?.. काय झालं?”
जिकडे तिकडे चर्चा. बाबूरावांना घाम येऊ लागला आणि काही सुचेना. त्यांना धीर देण्याऐवजी भोवतालचे सहकारी रस घेऊन चर्चा करीत राहिले. अंडर सेक्रेटरीने बाबूरावांना बोलावलं. पत्र पाहिलं.
“कोण तुला कां मारेल?”
“माहीत नाही!… पण ग्रुप इन्शुरन्सचे लाखभर रूपये तिला मिळतीलच!”
अंडर सेक्रेटरी त्यावर गप्प बसले विचार करीत. मग त्यांनी होम डिपार्टमेंटच्या डेप्युटी सेक्रेटरीला फोन लावला. तोपर्यंत बाबूराव पत्र वाचत राहिले, पुन्हा पुन्हा. अंडर सेक्रेटरीने घड्याळात पाहिलं. पाच वाजले होते. त्यांचे पाश त्यांना ओढू लागले होते. थोड्याच वेळात त्यांना जावं लागलं असतंच. आणि हे ‘लफडं’ निर्माण झालं आहे.
“हे बघा, बाबूराव!.. तुमच्या घराजवळच्या पोलीस स्टेशनला होमचे डेप्युटी सेक्रेटरी फोन करणार आहेत!.. तुम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जा!.. तिथले इन्स्पेक्टर तुम्हाला प्रोटेक्शन देतील! डोंट वरी!”
मग त्यांनी फोनवर खात्री केली. मग घड्याळ पाहात ते म्हणाले,
“केलाय त्यांनी फोन! जा आता!-”
मग एखादी फाईल, एखादं प्रकरण ‘डिस्पोझ् ऑफ्’ करावं तसं त्यांनी बाबूरावांचं प्रकरण निकाली काढलं.
बाबूराव उद्या दिसतील की नाही याबद्दल कुणाला चिंता नसणार असं नाही. पण घड्याळाचे काटे सरकू लागले आणि प्रत्येक जण एकमेकांपासून सुटा सुटा होऊन आपापल्या प्राक्तनाच्या दिशेने धावू लागला. बायकांनी चेहरे ठाकठीक केले. पुरूषांनी गळत्या केसांवर कंगवे फिरवले. जो तो निघून गेला.
बाबूरावांचे पाय घुटमळू लागले. जीभ आत ओढली जावू लागली. त्या सरत्या संध्याकाळी आयुष्यात प्रथमच त्यांना नितांत एकटं वाटू लागलं. सालं, कुणी कुणाचा नसतो!
त्यांनी आख्खी टॅक्सी केली. (मंत्रालयीन कर्मचार्याने आख्खी टॅक्सी करणं दुर्मिळच) एकट्याने जायची त्यांची हिंमत होईना. पण टॅक्सी बरी, सुरक्षित. बाबूराव पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा रात्र होऊ लागली होती.

पोलीस स्टेशन. उदास पिवळा प्रकाश. कर्कश वाजणारा फोन. आणि आपलं असं कुणीच नाही. प्रथम कुणीच नीट बोलेना. इन्स्पेक्टर बाहेर गेले होते. एका हडकुळ्या माणसाला तीन-चार पोलीस मारत होते. तो गुरासारखं ओरडत होता. टाईपरायटरचा खड्खडाट्. मारणार्या पोलीसांच्या घाणेरड्या शिव्या. जप्त केलेल्या दारूचा आंबट वास. भिंतीवरच्या फळ्यावर खडूने लिहिलेला गुन्ह्यांचा तपशील, आणि च्यायला, महात्मा गांधींचा फोटो! बाबूराव एका खुर्चीवर वाट पाहात बसून राहिले. आता इथून सकाळ होईपर्यंत हालायचंच नाही. सकाळी बघू मग. ते वाट पाहात बसून राहिले. मार खाणार्याच्या अमानुष ओरडण्याने दचकू लागले आणि पोटात भीतीचा खड्डा पडू लागला. आज आपला खून होणार? सुपारी दिली आहे? हात पाय गार पडू लागले आणि बसल्या बसल्या डुलकी पण लागू लागली. रात्री दीड वाजता इन्स्पेक्टर ईगल आले. तांबरलेले डोळे. ढेरपोटे, उग्र मिशा. आल्या आल्या त्यांनी बाबूरावांला भोसडायला सुरूवात केली, (शब्द बाबूरावांचेच आहेत)-फैलावर घ्यायला सुरूवात केली.
“लफडी तुम्ही करायची आणि प्रोटेक्शन आम्ही द्यायचं काय?”
“न.. नाही, साहेब, पण-”
“खामोश!.. वरून डेप्यूटी सेक्रेटरीचा फोन करता?.. प्रेशर टाकता?”
“साहेब..ऐकून तरी घ्या!”
“काय ऐकून घ्या!… मी सगळी माहिती काढली आहे!.. आम्हाला दुसरं काही काम नाही?-”
दहा एक मिनिटं इन्स्पेक्टर ईगल बाबूरावांवर तोंडसुख घेत राहिला आणि एकदा तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देणार नाही, समजता कोण स्वत:ला, अशा अर्थाचं वाक्य उच्चारून त्याने ते पत्रं टेबलावर बाबुरावांच्या दिशेने आपटलं. पुन्हा ‘लफडं तुम्ही करायचं’ हे त्यांचं वाक्य होतंच. बाबूरावांचा धीर खचला.
त्याच्या हातापायाला कंप सुटला. चक्कर आली. भितीने त्यांना पूर्णत: ग्रासलं. त्यातून, मार खाणारा गुरासारखं ओरडत, विव्हळत होताच. इन्स्पेक्टर ईगलने बाबूरावांचा नाद सोडला आणि तुच्छतेने त्यांच्याकडे पाहून मग ते आतल्या ‘कस्टडीकडे’ गेले,
“अरे मारता का काय त्याला!”
पण असं म्हणत असतांना टेबलावरचा रूळ त्यांनी उचलला होताच.
बाबुराव तिथून उठले. भितीने थरथर कापत ते त्या खोलीतून बाहेर पडले. कुठे तरी सुरक्षित बसावं, लपावं, कुठे जावं आता? बाहेर कॉरिडॉर. दोन्ही बाजूला खोल्या. एका खोलीत तसलाच पिवळा प्रकाश. तिथं एक इन्स्पेक्टर काहीतरी वाचत बसला आहे. तिथं जरा शांत वातावरण आहे. बाबूराव हेलपाटल्यासारखं होऊन आत गेले, जणू त्यांच्या अंगात त्राण नाही. आणि मन भितीमुळे सुन्न झालं आहे.
“या!-”
बाबूरावांनी खुर्ची घट्ट पकडली.
“बसा!”
बाबूराव बसले. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच डेप्युटी सेक्रेटरीने फोन केला होता वगैरे ही सांगण्याचा प्रयत्न केला, पण नीटसं जमलं नाही. तोंड कोरडं पडलं होतं. इन्स्पेक्टर अर्धवट वाचत त्यांचं म्हणणं थोडं ऐकलं. पत्रही पाहिलं. परत दिलं. पण ते पुस्तक वाचत राहिले, थोडं हसत. खूष होऊन. मग बाबूरावांना म्हणाले,
“अहो, घाबरलाय किती?.. कशाला घाबरलाय एव्हढं?.. तुम्ही हे पुस्तक वाचलंय? वाचा!.. मै मृत्यू सिखाता हूँ!…. भगवान श्री.रजनीश!…. वाचलंय?…. काय सुंदर लिहिलंय हो!…. च्यायला, मै मृत्यू सिखाता हूँ -वा ऽ!”
बाबूरावांना जणू विजेने स्पर्श केला. जणू एखाद्या उमद्या धनुष्याची प्रत्यंचा खेचली जावी आणि झण्त्कार उठावा. जणू हिमाच्छादित शिखराला सूर्याच्या तीव्र किरणाने स्पर्श करावा. बाबूराव अविश्वासाने त्या अनोळखी इन्स्पेक्टरकडे आणि त्याच्या हातातल्या पुस्तकाकडे पाहात राहिले.
“घाबरताय काय एव्हढे? … वाचा, हेऽऽ-”
बाबूराव विस्फारित डोळ्यांनी त्या पुस्तकाकडे पाहात राहिले. मग म्हणाले,
“सा… साहेब-”
“वाचा हे!…. वाचलंय? सुंदर विचार! काय?”
त्या पार्श्वभूमीवर दूर ओरडणार्या माणसाचं विव्हळणं. मंद पिवळा प्रकाश. एक अनोळखी चेहरा, पुस्तक वाचून चकित झालेला. बराचसा आत्ममग्न… मै मृत्यू सिखाता हूँ-
“साहेब!… वाचायचं कशाला? अहो, मी ती प्रवचनं ऐकलीत!…. मी रजनीश संन्याशी आहे!”
बाबूरावांनी शर्टच्या आतमधली माळ बाहेर काढून दाखवली. इन्स्पेक्टरचे डोळे विस्फारले हळूहळू. तो आता अविश्वासाने बाबूरावांकडे, मग माळेकडे पाहात राहिला. मग एकदम त्याच्या तोंडून शब्द आले; जणू चाबकाचा फटकारा-
“मग घाबरताय कशाला?”
ते शब्द बाबूरावांच्या मनापर्यंत पोहोचले. बाबूराव हळूहळू एकदम उठून उभे राहिले, तेव्हा त्यांचं डोकं छताच्या वर उंच आभाळात पोहोचलं. मन स्थिर, शांत झालं. त्यांनी म्हटलं,
“यू आर राईट!.. मी कशाला इतका घाबरलो कुणास ठावूक!…. मला तुमचं प्रोटेक्शन नको!.. तुमचं पोलीस डिपार्टमेंट गेलं भोसड्यात-”
इन्स्पेक्टर हसला. म्हणाला,
“बरं, उद्या या दहा वाजता!”
काही क्षणापूर्वी भितीमुळे अर्धमेले झालेले बाबूराव कोणतेही संरक्षण न घेता रात्री दोन वाजता बाहेरच्या अथांग अंधारात एकट्याने बाहेर पडले. आता त्यांचं मन भयग्रस्त नव्हतं. ते शांत आणि अंतर्यामी स्थिर होतं. आता त्यांना स्वत:चं आणि स्वत:च्या दुबळेपणाचं आश्चर्य वाटू लागलं. अंधारात एकटेच चालत (धावत नव्हे) ते घरी पोहोचले. कुणीच त्यांची वाट पाहात थांबलं नव्हतं. कुणीच त्यांच्यावर त्या रात्री हल्ला केला नाही. बाबूराव त्या रात्री मेले नाहीत. बाबूरावांची श्रद्धा सांगते की त्या रात्री पोलीस स्टेशनमधे त्यांच्या गुरूचं पुस्तक त्यांनी पाहिलं आणि त्यांचा भीतिग्रस्त दुबळेपणा संपला. (आणि हा काही चमत्कार झाला असं मात्र बाबूराव म्हणत नाहीत.) आणि ते एकटेच रात्री पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. याचा अर्थ हल्ला झाला नसता असं नाही. पण होईल ते स्वीकारण्याची त्यांची तयारी झाली होती. (बाबूराव सांगतात की भयग्रस्त मन म्हणजेच मृत्यू!) बाबूरावांचा खरं तर मृत्यू झाला होता त्या रात्री, आणि अचानक ते ‘जिवंत’ ही झाले होते. धोका बाहेर दबा धरून बसलेला असताना ते एकटेच धैर्याने बाहेर पडले. थोड्या वेळापूर्वी ते प्रोटेक्शनची मागणी करीत होते, भीक मागत होते आणि आता त्यांनी प्रोटेक्शन नाकारलं होतं. पण इथे बाबूरावांची कथा संपत नाही.
दुसर्या दिवशी बाबूराव पोलीस स्टेशनवर पोहोचले. ड्यूटी संपत आलेले आणि तारवटलेल्या डोळ्याचे ते कालचे इन्स्पेक्टर अजून बसून होते. ते आता पुस्तक वाचत नव्हते. ते हसले,
“या बाबूराव!.. जिवंत आहात?”
“हो!”
त्यांनी दुसर्या एका इन्स्पेक्टरला हाक मारली,
“शिंदेऽ! हेच ते बाबूराव!”
शिंदे गडबडीत होते, पण थांबले, म्हणाले,
“अहो, घाबरता कशाला? या इलाक्यात सुपारी घेणारा एकच हरामखोर आहे, रफीक!.. त्याचा पत्ता देतो, त्याला भेटा, मी पाठवलं आहे असं सांगा!”
शिंदे गेले. पुस्तक वाचणारे इन्स्पेक्टर गेले. बाबूराव एकटेच, टेबलासमोर स्तब्ध उभे. म्हणजे यमदूताचा पत्ता शोधत जायचं त्याच्या गुहेत? त्यांनी पिवळ्या कागदांच्या ढीगाकडे, फायलींकडे पाहिलं. त्यातच कुठेतरी ते पुस्तक होतं दडलेलं, ‘मै मृत्यू सिखाता हूँ!’
बाबूरावांनी निर्णय घेतला. ते कार्यालयाला गेले नाहीत. त्यांनी रफीकचा शोध सुरू केला.
इकडे एकही पांढरपेशा माणूस आला नसता. गलिच्छ झोपडपट्टी. घाण. अस्ताव्यस्त दारिद्य्र. चोर, मवाल्यांची घरं. रांडांची वस्ती. थिजलेला आक्रोश.
“रफीक किधर है?”
“कौन रफीक?”
“काला रफीक बोलते जिसको, देखो!”
“क्या काम?”
“प्रायवेट!”
“चलो!”

एक माणूस त्यांना संशयाने पाहातो-न्याहाळतो, आणि चक्रव्यूहात खोल खोल घेऊन जावू लागतो. थोड्याच वेळात तो माणूस चाकू काढून म्हणाला असता की ‘चलोऽ, निकालो माल, घडी, अंगठी, सब!’ पण तसं होत नाही. अनेक चाळण्या. सावधगिरी. इथून तिथं, तिथून तिथं. कुजबुज. संशय. मग एका झोपडीच्या मागच्या मोकळ्या जागेत बाबूरावांना नेण्यात आलं. एका डांबराच्या ड्रमवर काळा रफीक बसला होता. त्याच्या शेजारी एक धिप्पाड बाई बसली होती. दोघं तीघं जरा दूर उभे.
“क्या है?”
“रफीक भायऽ… ये मिलनेको आए!”
“क्या है-”
बाबूराव पुढे झाले. त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. मग म्हटलं,
“सुना है, तुमने मेरी सुपारी ली है!.. तर आता मी समोरच आहे!… काय करायचं ते करा!”
काळा रफीक आश्चर्याने पाहातच राहिला. मग सावकाश उठला.
“नै साब, काय कू मजाक करताय-”
“मजाक नहीं!- क्या करना है बोलो-”
रफीक हबकला होता. त्याला काय बोलावं सुचेना. मग त्याने बाबूरावांच्या खांद्यावर हात ठेवला.
“हम भी पयले चौकशी करते है, साब!.. फिर काम करते है!…. तुम तो अच्छे इंसान हो!.. जाव, तुम्हारा बाल भी बांका नही होंगा!.. ममद्या, साब को छोडके आव-”
यमदूताकडून “प्रोटेक्शन”चं आश्वासन घेऊन, त्याच्या गुहेतून बाबूराव बाहेर पडले तेव्हा आपण काही ‘हिरोगिरी’ केली असं त्यांना वाटलं नाही. मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून पाहाण्याचा त्यांनी प्रयोग केला. त्यांना वाटलं, मृत्यू तर मित्रच आहे. जातांना ‘ममद्या’ने त्यांना सांगितलं की तो स्वत:च त्यांची वाट पाहात आदल्या रात्री नाल्याच्या शेजारी बसून राहिला होता आणि त्याने त्यांना त्या रात्री पोलीस स्टेशनमधून बाहेर
पडताना पाहिलं होतं.
“फिर काम क्यों नहीं किया!”
ममद्या त्यावर बोलला नाही. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. दोघं चालत राहिले चक्रव्यूहातून. ‘करेज’ या इंग्रजी शब्दाच्या अर्थच्छटा आपल्या अंतरंगात स्थिर झाल्या असं बाबूराव सांगतात. पण या सांगण्यात अभिनिवेश नाही. आयुष्यात असे चमत्कारिक प्रसंग घडतात. मृत्यू त्यांना स्पर्श करून गेला आणि
साक्षीभावाने त्यांनी त्याला न्याहाळलं. त्या मध्यरात्री, श्रद्धेच्या एका क्षणाने त्यांच्यात परिवर्तन घडलं. ते स्वत: यमदूताला शोधत हिंडले.
* * *
‘श्रद्धा’ शब्दाचा अर्थ बाबूराव शोधत असतात.
त्यांचं म्हणणं की “श्रद्धा” या शब्दाच्या भोवती आणखी काही शब्द आहेत. जसं, विश्वास, अतिविश्वास, अंधविश्वास, अश्रद्धा, अंधश्रद्धा, इत्यादी.
बाबूराव मानतात की माणसाला बाह्याकाशाने जसं घेरलं आहे तसं त्याच्या अंतरंगात एक आंतराकाश आहे निराकार. अशा अर्थाने माणूस घटाकार असून त्या अर्थाने ‘घटा घटांचे रूप आगळं’ असतं. एखाद्या शक्तीबद्दल, व्यक्तीबद्दल श्रद्धा मनात निर्माण होते म्हणजे काय होतं? माणूस विकसित होतो काय? त्याचं आंतराकाश ‘प्रकाशमान’ होतं काय? श्रद्धा माणसाला काही आध्यात्मिक अनुपम अशी भेट देतं काय?
श्रद्धा ही नितांत व्यक्तिगत अशी बाब आहे. कुणी हातातून राख काढत असेल तर बाबूरावांची हरकत नाही. पण त्या राख काढण्याने कोणाच्या अंतरंगात काही क्रांती झाली काय, किंवा काही परिवर्तन झालं काय हे महत्त्वाचं आहे, असं त्यांचं म्हणणं. श्रद्धेचा स्वतःतल्या स्वत:शी संबंध आहे. श्रद्धा ‘न्यूट्रल’ आहे. तुम्हाला ती अध:पतित करील, कीडा-मुंगीसारखं हीन-दीन करील किंवा जीवनात परिवर्तनही घडवील. श्रद्धेचं अवतरण ही आंतराकाशातील प्रकाशमान घटना आहे. या प्रकाशात थोडंच दिसत असतं. या प्रकाशात गर्तेची वाट ही सापडेल किंवा मनुष्य म्हणून जगण्याचा श्रेष्ठ मार्ग ही सापडेल. आंतराकाशातील मंद प्रकाशात स्वत:ला पाहाताना, स्वत:ला शोधताना श्रद्धेला अनुपम अर्थ प्राप्त होतो. एरव्ही विभूतींचे ढीग व्यर्थ असतात असं बाबूरावांचं म्हणणं. ते चिंतन करतात, अर्थ सांगतात श्रद्धेचा, त्या घटनेच्या नंतर. श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा परस्पर संबंध नाही असंही सांगतात.
– बाबूराव अजूनही जिवंत आहेत. अजूनही कोणी त्यांना मारलेलं नाही. स्वतःवर श्रद्धा असलेला माणूस कधीच मरत नाही असं बाबूरावांचं म्हणणं आहे.
* * * * *
(सत्य घटनेवर आधारित. ही कथा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना समर्पित आहे.)
–भारत सासणे
लेखक संपर्क :9422073833