Categories
भांडाफोड

धाडसीपणा : एक संसर्गजन्य गुण

अर्थात अमेरिकेची भांडाफोड
वार्षिकांक – २०१३

ब्राझीलच्या अध्यक्षा दिलमा रौसेफ यांनी आपली एक महिन्यावर आलेली अमेरिकन भेट रद्द केली. कारण काय घडले? अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी(National Security Agency-NSA) या संस्थेने ब्राझीलच्या अध्यक्षांच्या फोनवरचे संभाषण व ई-मेलचा मजकूर याची चोरी केली. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी ब्राझीलच्या अध्यक्षांची फोनवर 20 मिनिटे बोलून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ठरलेली भेट रद्द करू नये अशी विनंतीही करण्यात आली. परंतु ब्राझीलच्या अध्यक्षांनी ओबामाच्या या भीकेला गळ घातली नाही. ब्राझीलचे अध्यक्ष व ब्राझीलमधील सर्वात मोठी सेल कंपनी पेट्रोब्रास व याचबरोबर अमेरिकेच्या शेजारचा देश-मेक्सिकोचे अध्यक्ष निरो यांचेही फोन व ई-मेल्स टॅप केले गेले होते.

ब्राझील या देशात दहशतवाद नाही. तिथे बॉम्बस्फोट होत नाहीत. वॉर ऑन टेरारिझम म्हणणारी अमेरिका थेट एखाद्या राष्ट्राच्या अध्यक्षांचे फोन व ई-मेल टॅप करते व तेही दोस्त राष्ट्र म्हणवणार्‍या राष्ट्राचे-याचा अर्थच ही हेरगिरी दहशतवादासाठी नसून आर्थिक हितसंबंधासाठी आहे हे स्पष्ट आहे. मेक्सिको व ब्राझील या देशांनी याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.

ही बातमी प्रसारित झाल्याच्या दुसर्‍याच आठवड्यात अमेरिकेचे दुसरे एक बिंग फोडण्यात आले. ‘द. न्यूयॉर्क टाईम्स’ व ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रांनी बातमी दिली की, अमेरिकेच्या NSA या संस्थेने, ज्यामध्ये गुप्तता पाळली जाते अशा व्यक्तिगत मोबाईलवरचे संभाषण व इंटरनेट बँकिंग हॅक करण्याचे तंत्रज्ञान प्राप्त केले आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही बँकेचे व्यवहार व मोबाईल संभाषण गुप्त राहू शकत नाही.

जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केला यांचा फोन टॅप करण्यात येत होता व त्यास ओबामाने मान्यताही दिली होती, अशी खळबळजनक बातमी त्यानंतर आली. 2002 पासून जर्मनीच्या चँसलर मर्केल यांचा फोन टॅप होत होता. जगभरातील किमान ऐंशी बड्या नेत्यांच्या हालचाली NSA कडून टिपल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. खुलासे करता करता ओबामाच्या नाकीनऊ आले आहे. अमेरिकेचा मित्र देश फ्रान्स या देशातील बड्या नेत्यांचे फोनही टॅप केले जात आहेत. डिसेंबर 2012 ह्या 30 दिवसांच्या काळात फ्रान्समधील 7 कोटी फोन रेकॉर्डस टॅप केले गेले. ही बातमी येते न येते तोच आणखी एका बातमीचे अमेरिकेची नाचक्की झाली. स्पेन या अपेमरिकेच्या मित्र देशातील नेत्यांच्या, कंपन्यांच्या 30 दिवसांच्या काळात 6 कोटी फोन व ईमेल्स टॅप केले गेले. यावरून NSA च्या शक्तीची ताकद लक्षात येते. हे झाले मित्र देशाबाबत. अमेरिकेच्या शत्रू देशाबाबत काय स्थिती असेल याची कल्पना यावरून यायला हरकत नाही.

इंटरनेटद्वारे होणार्‍या संवादाच्या दळणवळणावरती ब्राझीलच्या बाहेर नियंत्रण असू नये असे तंत्रज्ञान(सर्व्हर) देशांतर्गत बसविण्याचा ब्राझीलचा विचार चालू आहे. एकूण 35 देशांच्या प्रमुखांचे फोन व ई-मेल अमेरिकन प्रशासनाची NSA ही संस्था हॅक करत होती असे आता प्रकाशात आले आहे. एकूण 80 देशांच्या वकिलातील फोन, फॅक्स मशीन व ई-मेल्स हॅक केले जात होते असे प्रकाशात आले आहे. या हेरगिरीची एकूण व्याप्ती अमेरिकेच्या NSA या संस्थेने केलेल्या नोंदीवरून लक्षात येईल. फ्रान्स देशातील एकूण 7 कोटी फोन रेकॉर्डस एका महिन्याच्या काळात मिळविण्यात आले. दुसर्‍या महायुद्धानंतर एकमेकांवर हेरगिरी न करण्याचा करार ब्रिटन, न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांपुरताच मर्यादित होता. इतर देशांवर हेरगिरी करायला अमेरिका, ब्रिटन व रशिया हे देश अग्रक्रमावर हेरगिरी करत होते. परंतु इतर देशांच्या प्रमुखांचे फोन कॉल्स व ई-मेल हॅक करण्यापर्यंत अमेरिकेची मजल गेली. शत्रू राष्ट्र-मित्र राष्ट्र असे काहीही पाहायची अमेरिकेला गरज वाटली नाही. जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केला यांचा फोन टॅप करण्यासाठी खुद्द ओबामाने परवानगी दिली होती. ही बातमी ऐकून जर्मनीच्या चँसलर तर खूप भडकल्या आहेत. फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, मेक्सिको व आता स्पेन ह्या मित्र देशांचे व ह्या देशांच्या नेत्यांचे फोन व ई-मेल ट्रॅक करण्यात अमेरिका पुढे होती.

एडवर्ड स्नोव्हडेन व ब्रॅडली मॅनिंग यांनी उघड केलेली माहिती
* एका महिन्यात NSA ने गुप्तपणे फोन व ईमेलद्वारे जमा केलेली माहिती.
इराण- 14 अब्ज रेकॉर्डस,
पाकीस्तान- 13.5 अब्ज रेकॉर्डस,
जॉर्डन – 12.7 अब्ज रेकॉर्डस,
इजिप्त – 7.6 अब्ज रेकॉर्डस,
भारत – 6.3 अब्ज रेकॉर्डस
फ्रान्स- 7 कोटी रेकॉर्डस
स्पेन – कोटी रेकॉर्डस
* एकूण 35 देशांच्या प्रमुखांचे फोन व ई-मेल हॅक केले जात होते/ आहेत.
* एकूण 80 वकिलांतीमधील फोन व फॅक्स व ई-मेल हॅक केले जात आहेत/होते.
* एकूण 6कोटी केवळ फोन्स टॅप केले जात होते/आहेत.
* मार्च 2013 पर्यंत 97 अब्ज रेकॉर्डस्ची माहिती जमा करण्यात आलेली आहे. अमेरिकन लोकांच्या माहितीची संख्या आहे 3 अब्ज रेकॉर्डस.

अमेरिकेला शत्रू वाटणार्‍या किंवा मित्रही नाही आणि शत्रूही नाही अशा देशांबद्दलची काय स्थिती होती. इराण, पाकिस्तान, जॉर्डन, इजिप्त व भारत हे पाच देशा अमेरिकेच्या यादीत हेरगिरी करण्यामध्ये प्रमुख होते. 30 दिवसांच्या काळात अमेरिकन प्रशासनाने (NSA) किती फोन कॉल्स व ई-मेल्स हॅक केले याच्या नोंदी जर पाहिल्या तर चक्रावून जाते. उदाहरणार्थ मार्च 2013 या महिन्यात अमेरिकेच्या NSA या संस्थेने इंटरनेट व फोनद्वारे इराणच्या 14 अब्ज नोंदी त्यानंतर पाकिस्तानच्या 13.5 अब्ज नोंदी, जॉर्डनच्या 12.7 अब्ज नोंदी, इजिप्तच्या 7.6 अब्ज नोंदी तर भारताच्या 6.2 अब्ज नोंदीची हेरगिरी करण्यात आली आहे. भारताचा पाचवा क्रमांक म्हणजे भारत हा हेरगिरी प्रकरणात सर्वात वरच्या यादीत होता हे स्पष्ट होते.

भारतात ढोबळमानाने 70 कोटी फोन आहेत. त्यातील 50 लाख आंतरराष्ट्रीय दूरचे फोन कॉल्स आहेत तर अंदाजे 16 कोटी ई-मेल आय.डी.आहेत. 8.5 कोटी फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस व अन्य सोशल साईटस्चा वापर करणारे आहेत. ह्या सगळ्यांचा डाटा सुरक्षित नाही व तो चोरून वाचला जातो. गुगलच्या जी-मेल वर आपण जेव्हा काही शब्द टाईप करतो तेव्हा त्याची हिस्टरी तयार होते व त्या शब्दाला अनुसरून ई-मेलच्या बाजूला व नंतरही तशा जाहिराती आपणास दिसतात. हा अनुभव गुगल वापरणार्‍याला येत असेल. गुगल वापरकर्त्याच्या कोणत्या आवडीनिवडी आहेत, खरेदी करण्यासाठी त्याला किंवा तिला काय आवडते, वापरकर्त्यांची व्यक्तिगत माहिती, वर्तणुकीचा कल, पैसे खर्च करण्याची कुवत अशा कितीतरी गोष्टी गुगलला कळतात. व्यक्तिगत डाटा सुरक्षित ठेवण्यात लोक एवढे जागरूक दिसत नाहीत. परंतु युरोपियन देशात याबद्दल काय करावे यासाठी जनमत तयार होत आहे. फ्रान्स, जर्मनी, युके, नेदरलँड, स्पेन, इटली या देशांनी गुगल विरोधात कायदेशीरपणे कारवाई करू असे गुगलला धमकावले आहे. गुगलच नव्हे तर फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, याहू, अ‍ॅपल, स्काईप व यु-ट्युब या अमेरिकन कंपन्याद्वारे NSA ने माहिती गोळा केली. NSA ने या कंपन्यांकडून माहिती मागविली व या कंपन्यांना ती देणे भाग पडले. फेसबुकनेही आपल्या प्रायव्हसी सेटींगमध्ये बदल केल्याने कोणताही फेसबुक वापरकर्ता इतर कोणत्याही फेसबुक वापरकर्त्याचा शोध घेऊ शकतो. यापूर्वी प्रायव्हसी सेटींगमध्ये प्रायव्हसी टूलला सेट केल्यास इतर वापरकर्त्यांना प्रायव्हसी सेट केलेल्या वापरकर्त्याला बघता येत नव्हते. अर्थात गुगल, फेसबुक यांना तुम्ही काय करता हे सगळे माहिती होते. व तो डाटा NSA ने यांच्याकडून घेतला. NSA ने त्याद्वारे थेट पाळत ठेवण्याचे तंत्र विकसित केले असे म्हणावे लागेल.

ब्राझीलच्या खाण व ऊर्जा मंत्रालयाचे फोन NSA ने टॅप केले गेले. ब्राझीलच्या या मंत्रालयाचे कॅनडा, सौदी अरेबिया, जॉर्डन, साऊथ आफ्रिका, इक्वेडोर, पेरू, व्हेनेझुएला, पोलंड व सिंगापूर या देशांशी व्यापारिक व राजकीय व्यवहार होत होते. NSA च्या ‘अ‍ालिंपिया’ या प्रोग्राम अंतर्गत अत्यंत गोपनीय माहिती मिळविण्यात आली. ‘ऑलिंपिया’ प्रोग्राम एवढा परिणामकारक होता की ज्याद्वारे फोन नंबर, सिमकार्ड कोणाच्या नावे रजिस्टर्ड आहे, फोन कोणत्या कंपनीचा आहे व मॉडेल नंबर काय आहे. इथपर्यंत माहिती जमा केली जात होती.

व्हिडीओ-कोलॅटरल मर्डर

12 जुलै 2007 रोजी अमेरिकेची दोन हेलिकॉप्टर्स बगदाद शहराजवळच्या आसपास आली. पायलटला रस्त्यावर काही हालचाल दिसली. त्यातील दोन माणसे रायटर या वृत्तपत्र समुहाची पत्रकार-फोटोग्राफर होते. एक ड्रायव्हर व एक स्थानिक जागा दाखवणारा होता. पायलटने गोळ्या झाडण्यासाठी रेडिओवर आपल्या बॉसला परवानगी मागितली. पायलटला वाटले पत्रकार फोटोग्राफरच्या कॅमेराची झूम लेन्स म्हणजे ठझॠ लाँचर गन असावी. झूम लेन्स 14 इंचाची तर लाँचर गन 4 फूट लांब असते. परंतु पायलटच्या एकंदर टोनवरून त्याला गोळ्या झाडायच्या होत्या. खालील रस्त्यावरून एकही गोळी झाडली गेली नव्हती. तरी हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडल्या गेल्या. जखमी झालेल्यांना उचलण्यासाठी एक व्हॅन थांबली. पायलटने पुन्हा गोळ्या झाडल्या. यामध्ये ड्रायव्हर मारला गेला व व्हॅनमधील दोन मुले जखमी झाली. दोन्ही पायलटने एकमेकांना शाबासकी दिली. या हल्ल्यात 15 लोक मारले गेले त्यापैकी एकही सैनिक नव्हता. रायटर वृत्तसंस्थेने व्हिडीओ व संभाषण अमेरिकेत प्रशासनाकडे मागितले. परंतु त्यांना ते दिले नाही. ब्रॅडली मॅनिंग ह्या 23 वर्षाच्या अमेरिकन जवानाने हा व्हिडीओ विकिलिक्सच्या ज्युलिएन असांजे यांना दिला व त्याने तो प्रसिद्ध केला. यानंतर एक महिन्यांनी ब्रॅडली मॅनिंगला अटक झाली. ऑगस्ट 2013 मध्ये त्याला 90 वर्षांची शिक्षा झाली. Collateral Murder या नावाने विकिलिक्स व अन्य संकेतस्थळावर हा 34 मिनिटांचा व्हिडीओ उपलब्ध आहे.

अर्थातच या माहितीद्वारे दहशतवाद रोखला जात नव्हता तर अमेरिका व अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंध जपले जात होते. राजकीय उलथापालथी केल्या जात होत्या.

वॉशिंग्टन व न्यूयॉर्क येथील भारतीय वकिलातील संगणक, फॅक्स मशीन, फोन्स यावरील माहितीही NSA ने हेरगिरीद्वारे मिळवली. मॅनहटन येथील युनायटेड नेशनच्या संघटनेत असलेले भारतीय कार्यालय हेरगिरी करण्यासाठी अमेरिकन सरकारच्या NSA च्या सर्वात वरच्या क्रमांकावर होते. भारताच्या या कार्यालयातील फॅक्स मशीन, संगणकाच्या स्क्रीनवर पाहिली जाणारी माहिती(स्क्रीन शॉट), एवढेच काय संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये साठवली गेलेली संपूर्ण माहितीदेखील NSA ने हॅक केली होती. 35 देशांतील प्रमुखांचे फोन व ई-मेल हॅक केल्याची माहिती प्रसारित झाल्यानंतर भारताची प्रतिक्रिया काय होती? आपले पंतप्रधान मोबाईल फोन वापरत नाहीत व त्यांचा ई-मेलही नाही. परंतु कार्यालयाचे अधिकृत ई-मेल, सचिवांचे मोबाईल, लॅण्डलाईन फोन्स, पंतप्रधान कार्यालयातील इतर सचिव व पंतप्रधानाच्या हाताखालील राज्यमंत्री यांचे फोन्स, फॅक्स, ई-मेल हॅक झाले नसतील याची शाश्वती कोणी देऊ शकणार नाही. मध्यंतरी संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात- ए.के.अँथोनी यांच्या कार्यालयात बंग सापडला गेला. खाजगी एजन्सीला बोलावून सर्व कार्यालय बंगरहित करावे लागले. होंडूरास, पेरूग्वे, अर्जेंटिना, पनामा, कोस्टारिका, कोलंबिया, चिले, पेरू, या देशांप्रमाणेच व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, क्युबा, ब्राझील, मेक्सिको या लॅटीन अमेरिकन गणल्या जाणार्‍या देशांवरही अमेरिकेच्या NSA ने मोठ्या प्रमाणात इथल्या महत्वाच्या लोकांवर, कंपनी व सरकारी एजन्सीजवर हेरगिरी करून माहिती जमा केली. त्यामुळे सर्व लॅटिन अमेरिकन देशात अमेरिकेविरूद्ध निषेधाची लाट उसळली आणि अमेरिका सरकारकडे याचे स्पष्टीकरण मागितले गेले. ब्राझील, कोलंबिया, मेक्सिको आणि व्हेनेझुएला या प्रमुख लॅटिन देशांवर अमेरिकेच्या NSA ने पाळत ठेवली.

NSA च्या हेरगिरी करण्याबाबतचे दोन मुख्य प्रोग्राम होते. एक प्रिझम (PRISM) नावाचा- ज्यामध्ये ई-मेल, इंटरनेट चॅट, इंटरनेटचा शोध घेताना वापरले जाणारे शब्द, वाक्ये यांचा मायक्रोसॉफ्ट, गुगल, ट्वीटर, फेसबुक, यु-ट्युब व स्काईप या आय.टी.कंपन्यांच्या सर्व्हरवरील थेट माहिती गोळा केली जात होती. NSA चा दुसरा प्रोग्राम होता ‘बाऊंडलेस इन्फोरमंट’ (Boundless informant) याद्वारे टेलिफोन कॉल्स, फॅक्सेस व इतर संपर्क यंत्रणाद्वारे केले जाणारे संपर्क टॅप केले जात होते.

आणखी एक NSA चा प्रोग्राम होता ज्याला त्यांनी सांकेतिक नाव दिले होते- ‘सिल्व्हर झिफायर’, या प्रोग्रामचा उद्देश होता सॅटेलाईटद्वारे व टेलिफोन नेटवर्कद्वारे खाजगी कंपनीद्वारे माहिती ज्या लाईन्सद्वारे पाठवली जाते त्या लाईन्स टॅप करून मिळविणे व त्याद्वारे माहिती गोळा करणे.

जुलिएन असांजे

विकिलिक्स ही वेबसाईट व संस्था याने 2006 साली स्थापन केली. संगणक हॅकर म्हणून सुरवातीस प्रसिद्ध. ज्युलिएन असांजे याला 2009 साली अम्नेस्टी आंतरराष्ट्रीय मेडिया अ‍ॅवार्ड मिळाले. 2010 च्या TIME मासिकावर “Person of the year” म्हणून निवड झाली. 2011 साली सिडने पिस फौंडेशन तर्फे पत्रकारितेसाठी गोल्ड मेडल देण्यात आले. 2011 साली नॉर्वेच्या पार्लमेटरी बॉडीने नोबल पिस प्राईस साठी नाव सुचविले होते. एडवर्ड स्नोव्हडेनला रशियात आसरा देण्यात विकिलिक्सने महत्वाची भूमिका निभावली. “Courage is Contigious” हे विकिलिक्सचे ध्येयवाक्य आहे. Universal Human rights च्या कलम 19 च्या माहितीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. कोणत्याही भीतीशिवाय व कुणाचीही मर्जी न सांभाळता अतिगुप्त माहिती उघड करीत राहणे हे विकिलिक्सचे काम आहे.

सध्या लंडन येथील इक्वेडोरच्या वकिलातीमध्ये एक वर्षापासून आसरा. वकिलातीच्या बाहेर आल्यास लंडन पोलीस पकडून खोट्या केसखाली स्वीडनच्या हवाली करतील व नंतर गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध केल्याबद्दल अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात येईल अशी शक्यता बाळगण्यात येते. इक्वेडोरने नागरिकत्व दिल्यामुळे इक्वेडोरमध्ये जाता येईल; परंतु इक्वेडोरच्या लंडन येथील वकिलातीच्या बाहेर निघता येत नाही अशी परिस्थिती आहे. सध्या नुकताच जुलिएन असांजे यांच्यावर ढहश ऋळषींह एीींरींश या नावाचा चित्रपट नुकताच प्रसारित करण्यात आलेला आहे.

अमेरिकेने इतर देशांवर पाळत ठेवून मिळवलेली माहिती जी मोठ्या प्रमाणावर सध्या उघडकीस येत आहे. त्यापाठीमागे एका धाडसी 29 वर्षांच्या नौजवानाचा हात आहे. NSA या अमेरिकन संस्थेचा कर्मचारी असलेल्या एडवर्ड स्नोव्हडेन या तरूणाने अमेरिकेचा नकली चेहरा जगासमोर आणलेला आहे. एका महाबलाढ्य अशा अमेरिकन शक्तीला नाकीनऊ आणण्यास या धाडसी एडवर्ड स्नोव्हडेनने भाग पाडले व ओबामा सरकारला बहुतांश देशाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातून अमेरिकेच्या नागरी स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य या बद्दलचा नकली कळवळा, नकली पाठिंबा सामोरा आला. स्वत:च्या अमेरिकन घटनेची पायमल्ली केली, उल्लंघन केले तर आंतरराष्ट्रीय कायद्याची वासलात लावली. अमेरिकन नागरिकांच्या इतर सर्व देशातील नागरिकांच्या खाजगीपणाच्या हक्काला पायदळी तुडवले.

एडवर्ड स्नोव्हडेन याने ‘द गार्डीयन’ या वृत्तपत्राचा पत्रकार ग्लीन ग्रीनवाल्ड यास NSA बद्दलचे गोपनीय दस्तऐवज सुपूर्द केले. हाँगकाँग या चीनच्या अखत्यारित असलेल्या शहरात तो अमेरिकेतून NSA च्या कचाट्यातून पळून आला. हाँगकाँगमध्येच एका अनोळखी अशा हॉटेलातून NSA ची माहिती उघड करणारा मीच आहे हे जाहीर केल्यानंतर अमेरिकेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. ‘पीपल्स डेली’ या चीनी वृत्तपत्राने अमेरिकेची चांगलीच खिल्ली उडवली. हाँगकाँगमधून स्नोव्हडेन याला सोडू नका त्याला तेथेच थोपवा असे अमेरिकेने प्रयत्न केल्यानंतर ‘पीपल डेली’ ने म्हटले. एक चोरच ओरडत आहे की, चोराला थोपवा म्हणून. ही अमेरिकेची दांभिकता बंद करण्याचा अमेरिकेने विचार करावा असे बजावले. ग्लीन ग्रीनवॉल्ड यास दिलेली व्हिडीओ मुलाखत जून 2013 मध्ये प्रसारित करण्यात आली. त्यानंतर ग्रीनवॉल्ड या पत्रकाराने स्नोव्हडेनने दिलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकेची पोल खोलणारा एकेक माहितीवजा लेख प्रसारित करण्यास सुरवात केली. स्नोव्हडेनला नंतर रशियाने निर्वासित म्हणून आसरा दिला. एडवर्ड स्नोव्हडेन याने एका मुलाखतीत मी हे का जगासमोर आणले हे सांगितले. स्नोव्हडेन म्हणतो, “मला अशा जगात राहायचं नाही जिथे एकांतता नाहीए, जिथे आपली कुशलता व सर्जनशीलता दाखवण्यास वाव नाही, जिथे बौद्धिक कुवत दाखवण्यास वाव नाही. माझा मुख्य हेतू जनतेला हे दाखवण्याचा आहे की, त्याच्या संरक्षणाच्या नावाखाली काय चालले आहे आणि त्यांच्या विरोधात काय चालले आहे. मी मुक्त मत स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो. मी देशाच्या दृष्टीने देशद्रोही किंवा विश्वासघातकी म्हणून काम केलेले असेल परंतु जनतेच्या दृष्टिकोनातून मी योग्य गोष्टीसाठी काम केले आहे असा माझा विश्वास आहे. ज्या देशांतील नागरिकांवर आपण निवडून दिलेल्या सरकारकडूनच जर पाळत ठेवण्यात येत असेल तर अशा देशात मला राहायचे नाही.”

बहुतांश अमेरिकनांना तो देशभक्त वाटतो. आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे वाटते. असामान्य धैर्य घटनेशी असामान्य बांधिलकी आणि पुढील चांगल्या समाजाच्या हितासाठी कार्य अशा गोष्टी स्नोव्हडेनच्या कृतीतून व्यक्त होतात.

एका व्यक्तीच्या शूरपणाच्या कृतीने दुसर्‍याला धाडसीपणा दाखवायची प्रेरणा मिळते. यु-ट्युबवर एक धाडसीपणाचा व्हिडीओ आहे. म्हशीचे पिल्लू 5-6 वाघाच्या तडाख्यात सापडते. त्या पिल्लाला सोडवण्यासाठी अनेक म्हशी एकत्र येऊन पिल्लाला पकडून ठेवणार्‍या वाघांसमोर येऊन उभ्या राहतात. त्यातील एक म्हैस धाडसाने पुढे येऊन वाघाला ढोसायचा प्रयत्न करते. तिचे हे धाडस पाहून इतर म्हशींना प्रेरणा मिळते व त्यातील इतर म्हशींही धाडस करून सर्व वाघांना पिटाळून लावतात व आपल्या पिल्लाला सोडवतात.

एडवर्ड स्नोव्हेडेनच्याही अगोदर NSA च्या चार कर्मचार्‍यांनी सरकारच्या लोकांवर व अन्य देशांवर पाळत ठेवण्याच्या प्रोग्रामबद्दल अवगत केले होते. थोमास ड्रेक, विलियम बीन्ने, किर्क वायबे आणि आता एडवर्ड स्नोव्हडेन. थोमास ड्रेक याने ज्या कोर्टाने या गोपनीय पाळत ठेवण्याच्या पद्धतीबद्दल अधिकृत मान्यता दिली होती. त्याबद्दल टीका केली होती. थोमास ड्रेक म्हणतो, “आम्ही व्हिसलब्लोअर व सत्य सांगणार्‍यांच्या विरोधातले सरकारचे धोरण आताच पहात आहोत. जे पूर्वी कधीही नव्हते. आता सरकारचा गुन्हा उघड करणे हा गुन्हा समजला जात आहे. अनेक व्हिसलब्लोअर मी पाहिले आहेत त्यातील काही तुरूंगात आहेत, काहींवर खटले चालू आहेत तर काही तुरूंगातून सजा भोगून परत आले आहेत. मी माझे रहिलेले जीवन, इतरांचे जीवन, स्वातंत्र्य, याचा बचाव करण्यात व इतरांचा आनंद द्विगुणित करण्यात व्यतीत करणार आहे. गुप्तपणे पाळत ठेवणे हा प्रकार माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटत नाही. गुप्तपणे पाळत ठेवण्याच्या विरोधासाठी मी किंमत दिलेली आहे आणि एडवर्ड स्नोव्हडेनही ती देईल. परंतु तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भविष्यात रहायला आवडेल? गुप्तपणे पाळत ठेवण्याचा समाजात तर नक्कीच नाही.”

एडवर्ड स्नोव्हडेन म्हणतो की मला भीती कशाची वाटते तर मी जे काही उघडकीला आणले त्यातून कदाचित अमेरिका बदलणार नाही व काहीच बदल घडणार नाही. अमेरिकेची पोल खोलण्यात प्रथम सुरवात केली ती जुलिएन असांजे या ‘विकिलिक’ संस्थेच्या संस्थापकाने. जुलिएन असांजे झोतात आला तो डिसेंबर 2010 मध्ये. विकिलिक्सने इतर देशात असलेल्या अमेरिकन वकिलातीने पाठवलेल्या दोन लाख पन्नास हजारच्या वर पत्रे(cables/ letters) उघड केली. विकिलिक्सने दुसरा बॉम्बगोळा टाकला तो इराक युद्धामधील अत्यंत टॉप सिक्रेट व्हिडीओ आपल्या विकिलीक्स या वेबसाईटवर टाकून प्रसारित केला. या व्हिडीओमध्ये दोन आंतरराष्ट्रीय रायटर वृत्तसमुहाचे पत्रकार व अन्य 13 इराकी नागरीक असे एकूण 15 जण मरण पावले. कोलॅटरल मर्डर(Collateral murder) या नावाने हा व्हिडिओ प्रसिद्ध आहे.

अफगाणिस्तानमधील युद्धात अमेरिकेच्या बी-आय बॉम्बर या विमानाने केलेल्या हल्ल्यात 147 अफगाण नागरीक मारले गेले. यामध्ये बहुतांश मुले व स्त्रिया होत्या. पुरूष केवळ 22 होते. हा व्हिडीओ विकिलीक्सच्या जुलिएन असांजेच्या जोडीदाराने पुसून टाकला.

23 वर्षीय ब्रॅडली मॅनिंग याने अफगाण व इराक युद्धाचे दोन व्हिडीओ व इराक व अफगाण युद्धाबद्दलच्या अमेरिकन वकिलातीच्या एकूण 7,50,000 केबल्स विकिलीक्सला पुरवल्या. ज्या विकिलीक्सने प्रसिद्ध केल्या.

विकिलीक्स या संस्थेचे बोधवाक्य आहे, “Courage is Contagions” ‘धाडसीपणा हा गुण संसर्गजन्य आहे.’ एकाच्या धाडसाने दुसर्‍याला प्रेरणा मिळते. डॅनियल इल्सबर्ग याने व्हिएटनाम युद्धाबद्दलचे पेटँगॉन पेपर्स 40 वर्षांपूर्वी उघड केले होते. त्यानंतर ब्रॅडली मॅनिंगचे युद्धाबद्दलचे व्हिडीओ व इराक व अफगाण वॉर लॉग्ज, आताच्या एडवर्ड स्नोव्हडेनच्या स्पाय फाईल्स याद्वारे एकमेकांना धैर्याची प्रेरणा मिळत राहीली. अमेरिकेच्या NSA ची भांडाफोड जरी स्नोव्हडेनमुळे उघडकीस आली तरी त्यापाठीमागे ‘द गार्डीयन’ या वृत्तपत्रामध्ये पत्रकार ग्लेन ग्रीनवॉल्ड व डॉक्युमेंटरी बनवणारी चित्रपट निर्माती लॉरा पोईट्रस हे लोक होते. ती म्हणते, “लोक धोका पत्करण्याचे धैर्य दाखवतात.” धोके घेण्यात स्नोव्हडेनच्या केसमध्ये मी एकटीच नाही . माझी जोखीम इतरांच्या मानाने फारच लहान आहे. विकिलीक्स कुठल्याही भीतीशिवाय व कुणाचेही हितसंबंध न पाहता कुणाचीही मर्जी न सांभाळता माहिती उघड करत असते. मूळ माहिती सोपी करून, त्याचे विश्लेषण करून मूळ माहितीसहीत ते wikileaks या वेबसाईटवर प्रकाशित करीत असते.

विकिलिक्सने उघड केलेली भांडाफोड

12/2006 - विकिलिक्सचा पहिला दस्तऐवज, सोमालिया या देशाच्या राजकीय क्षेत्रातील महत्वाची व्यक्ती शेख हसन दहीर आवेज याने शासकीय अधिकार्‍यांची हत्या करण्यासाठी आदेश दिला.

08/2007 - केनयाच्या राजकीय पुढारी डॅनियल अरप मोईच्या कुटुंबियांचा भ्रष्टाचारात सामील असल्याबद्दलचा पुरावा.

11/2007 - ग्वांटेनामो बे कॅम्प येथे ठेवण्यात आलेल्या इराकी कैद्यांवर कोण-कोणत्या प्रकारे बंधने घालावीत व अत्याचार कसे करावेत याबद्दलची अमेरिकन आर्मीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर.

03/2008 - चर्च ऑफ सायंटोलॉजी व त्याचा संस्थापक रॉन हनई याची हस्तलिखीत नोट व सिके्रट दस्तऐवज जनतेसाठी उघड केला.

09/2008 - अमेरिकेतील एका राज्याच्या राज्यपाल(governor) सारा पॉलिन यांचा ई-मेल प्रसारित करण्यात आला.

01/2009 - पेरू देशातील राजकीय पुढारी व व्यापारी यांच्यामधील टेलिफोनचे संभाषण जे ‘पेट्रोगेट’ तेल घोटाळ्याशी संबंधित होते.

07/2009- आईसलँड येथील बँक मोठ्या प्रमाणात थकीत कर्जे कशी बुडीत काढत आहे त्याबद्दलचे प्रकरण उजेडात आणले.

09/2009 - आयवरी कोस्ट येथील ट्राफीगुरा ही मोठी कंपनी घातक रसायने कशा प्रकारे विल्हेवाट लावीत आहे, त्याबद्दलचा रिपोर्ट उघड केला.

04/2010 - अमेरिकेन आर्मीने कशाप्रकारे बगदाद येथे निर्दोष व्यक्तींना हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून खलास केले याबद्दलचा व्हिडीओ. ‘कोलॅटरला मर्डर’ या नावाने हा व्हिडीओ प्रसिद्ध आहे.

07/2010 - अफगाणिस्तान युद्धातील अमेरिकेची सिक्रेट कारस्थाने

10/2010 - इराकी सरकार सामान्य नागरिकांचा कशाप्रकारे छळ करत आहे याबद्दलची अमेरिकन आर्मीला असलेली माहिती. जवळपास 4 लाख इराक वॉर रिपोर्टस उघड केले गेले.

11/2010 - अमेरिकन वकिलांतीनी पाठवलेल्या सिक्रेट केबल्स्(गुप्तपत्रे) (दोन लाख पन्नास हजार अमेरिकन वकिलांतीची पत्रे) उघड केली गेली.

12/2011 - गुप्तहेर फाईल्स्
25 देशातील वकिलाती मंत्रालये व मंत्री व कंपन्यांचे फोन व ईमेल NSA ने टॅप केले. याबद्दलची माहिती विकिलिक्सने 287 फाईल्सद्वारा उघडकीस आणली.

02/2012 - जी.आय.फाईल्स
‘ग्लोबल इंटलिजन्स’ या टेक्सासमधील कंपनीचे 50 लाखाच्यावर ई-मेल्स. हे ई-मेल्स ग्लोबल इंटलीजन्स व भोपाळची डाऊ केमिकल कंपनी, लॉकहीड मार्टीन व रेथियान ह्या शस्त्रास्त्र निर्मिती गुप्त संबंध स्पष्ट करतात.

07/2012 - सिरिया फाईल्स्
ऑगस्ट 2008 ते मार्च 2012 पर्यंत सिरीयाच्या राजकीय पुढार्‍यांचे, मंत्र्यांचे व सरकारच्या संबंधित कंपन्यांचे 20 लाखांहून अधिक ई-मेल्स उघड केले गेले. यातून पश्चिमी देशातील कंपन्या सांगतात एक आणि करतात वेगळे, हे दाखवतात.

10/2012 - कैद्यांच्या छळाबद्दलच्या फाईल्स अमेरिकन आर्मी दस्तऐवज ज्यामध्ये कैद्यांना छळण्याचे प्रकार, प्रश्न विचारण्याची पद्धत, यांचा समावेश आहे. अबु घ्राईब व ग्वांटेनामो बे व तुरूंगातील सोईसुविधा बद्दलचे दस्त-ऐवज आहेत.

09/2013 - स्पाय फाईल्स-3
ग्लोबल इंटलिजन्स कंपनीचे 249 दस्तऐवज उघड केले गेले. अति मोठ्या प्रमाणात गुप्तपणे पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान या कंपन्यांनी विकसित केले आहे हे यातून स्पष्ट होते.

स्नोव्हडेनचे धाडसीपणाचे कृत्य हे सार्वत्रिक मानवाधिकाराला पाठींबा देते.

अमेरिकेच्याच नागरी स्वातंत्र्य युनियनने NSA च्या मोठ्या प्रमाणात लोकांवर गुप्तपणे पाळत ठेवण्याच्या प्रोग्रामला आक्षेप घेत कोर्टात दावा दाखल केला आहे. युरोपियन देशांनी अमेरिकेला बजावले आहे की, ह्या हेरगिरीमुळे दहशतवाद विरोधात हानी पोहोचेल. बहुतांश देशांनी आता खर्‍या दहशतवादापेक्षा अमेरिकेच्या ह्या हेरगिरीसदृश्य दहशतवादाचाच धसका घेतला आहे.

सार्वजनिक हितासाठी जे व्हिसलब्लोअर्स उभे आहेत ते दाखवून देतात की, धाडसीपणा हा सांसर्गिक गुण आहे. एकीकडे आल्यास तो इतरांद्वारे पसरत जातो.

अमेरिकेच्या NSA च्या संस्थेने झठखडच हेरगिरीचा प्रोग्राम आपल्याच लोकांवर ज्याप्रमाणे राबवला तसाच प्रोग्राम भारताची एखादी सरकारी संस्था राबवत असेल काय? असा प्रश्न व तसा लेख ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात अलिकडेच आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान! ज्युलिएन PRISM किंवा एडवर्ड स्नोव्हडेन बनण्याच्या तयारीस लागा!

टी.बी.खिलारे