अंनिसचे कार्यकर्ते अरविंद पाखले यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांशी संबंधित असलेल्या विविध कवींच्या कविता एकत्रित केल्या आहेत.
त्यातील काही कविता आम्ही अंनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.

त्यांच्यासाठी
देव ज्यांना माहीत नाही
त्यांच्यास्तव देऊळ
विशाल शिल्पे धूप नगारे
पूजेचा गोंधळ!
धर्म न उमजे त्यांच्यासाठी
शतकांच्या संहिता
मृत शब्दांची कवळुनी थडगी
बसलेली अंधता!
लुळे पांगळे पृथ्वीवर जे
कुस्करल्या चेतना
त्यांच्यासाठी सोज्वळ सुंदर
स्वर्गाच्या कल्पना!
त्यांच्यासाठी ज्या न जाणवे
नीती हृदयातील
नरनारींच्या निर्बंधाचे
डुंबाया पल्लव!
माणुसकीचे प्रखर रूप ना
बघती जे पामर
त्यांच्यासाठी दुबळे अश्रू
करूणेचे पाझर
-कुसुमाग्रज

सद्गुरूवाचोनी। सापडेल सोय
सद्गुरूवाचोनी। सापडेल सोय
करितो आदरे। सद्गुरू स्तवन
ज्यांनी सत्यज्ञान। वाढविले
धन्य पायथागोरस। धन्य तो न्यूटन
धन्य आईनस्टाईन। ब्रम्हवेत्ता
धन्य पाश्चर आणि धन्य मादाम क्युरी
थोर धन्वंतरी। मृत्यंजय
धन्य फ्रॉईड आणि धन्य तो डार्वीन
ज्यांनी आत्मज्ञान। दिले आम्हा
धन्य धन्य मार्क्स। दलितांचा त्राता
इतिहासाचा गुंता सोडवी जो.
धन्य शेक्सपिअर। धन्य कालिदास
धन्य होमर, व्यास। भावद्रष्टे
फॅरॅडे, मार्कोनी। वॅट राईट धन्य
धन्य सारे अन्य। स्वयंसिद्ध
धन्य धन्य सारे। धन्य धन्य मीही
सामान्यांना काही। अर्थ आहे.
सद्गुरूंच्या पाशी। एक हे मागणे
भक्तिभाव नेणे। ऐसे होवे
सद्गुरूंनी द्यावे। दासा एक दान
माझे दासपण। नष्ट होवो.
सद्गुरू वाचोनी। सापडेल सोय
तेंव्हा जन्म होय। धन्य धन्य.
-विंदा करंदीकर

आचार्यांना गंज चढतो...
आचार्यांना गंज चढतो
अध्यात्माच्या भाषेचा
प्रवचनांच्या कफनीमागे
वास कुबट आशेचा
बगळ्याहून शुभ्र कपडे,
शब्दांत संस्कृतीचा धूप,
साधा वेष, उच्च विचार
काळे पैसे खिशात खूप
साधी राहणी, उच्च विचार
असे घरात बाळकडू;
जगातला अधर्म बघून
याला येते टचकन रडू.
सामान्य माणसाची मने सामान्य असतात;
कधी नसतात संस्कृतीहीन, परंपरा पोरकी;
असतात पालखी अस्ताव्यस्त पणाला कसल्याही,
कुठल्याही : पोमेड चोपडल्या केसांसारखं.
सामान्य माणसे बुद्धिवादी असतात, घोषवतात;
फक्त जातात शिरडीला नियमीत गर्दी करून,
पुण्य जोडून श्रद्धेने कृतार्थ, तर्र होतात,
गोळा करतात आटीव दुधावर पोसलेले गुरू
सामान्य माणसे बिळाबिळातून जगत असतात
आणि सामान्य माणसांना मुले होतात.
धर्माचा उदोउदो करीत त्यांनी
निरपराध माणसं मारली!
समतेची भाषा बोलत आणि कोणी
जातीचं भांडवल करून सत्ता हेरली!
कळप वाढवित कळपांचे
बघता बघता मालक झाले
लाखोंच्या नियतीचे
चलाखीने चालक झाले!
धर्माचे धनी आता
विमानातून उडू लागले
धर्मरक्षण करण्यासाठी
कधी नाटकी रडू लागले!
बुडाखाली सत्ता आली
नावांचे पंथ झाले
कित्येकांच्या भाडोत्री गौरवाचे
लठ्ठ लठ्ठ ग्रंथ झाले!
त्यांनी हाक दिली की
कळप धावू लागले
त्यांनी खूण केली की
आगी लावू लागले!
निष्ठेने कळप त्यांची
पापं झाकू लागले
डोळे मिटून पेटीमध्ये
मतं टाकू लागले!
-मंगेश पाडगावकर

शिंक
चिकट चिकट दुधाने अंघोळ घालतात
तुला अंगणात उभं करून
मध, तेल, हळद आणखी काय काय ते मिसळून
डोक्यावर ओततात मात्र भरभरून
बायका गातात जेव्हा उच्च स्वराने
पायावर पाय ठेऊन उभा राहतोस तू
एक दगडलेले हास्य चेहर्यावर ठेवून
मूर्ती नसशील तर त्रास निश्चित होत असेल
जेव्हा धूर देत राहतो पुजारी सारखा
ओवाळीत तेला तुपाचे दिवे
एक लहानशी शिंक जरी दिलीस
तरी विश्वास वाटेल, तू सारं पाहतो आहेस.
-गुलजार
प्रार्थना
वाईट तर नक्कीच वाटलं असेल तुला
हे परमेश्वरा
जांभई देत होतो मी
प्रार्थनांच्या या अंमलाने मी थकून गेलोय पार
पाहतो ऐकतो आहे मी
आठवतं आहे मला
परमेश्वर पेटवत विझवत रहायचा हे दिवसरात्र
परमेश्वराच्याच हातात आहे सारं बरं-वाईट
प्रार्थना करा!
खरंच किती विलक्षण आहे हे
एक व्यर्थ एकतर्फी संवाद
अशा एकाशी
कल्पनाच ज्याचा चेहरा
आणि कल्पनाच ज्याचा पुरावा.
-गुलजार

माणूस नामका
रात धुंड्या, दीस धुंड्या,
पर कोन आयताच गवशा नय
पीर धुंड्या दरगा धुंड्या
पर होनी को किसने टाल्या नाय
जुम्मेसे बैठ्या महयनेसे बैठ्या
पर हज का पानी आट्या नय
खुदा को धुंड्या माळरान धुंड्या
कोन पाक नजर गवशा नय
दीस भाय धुंड्या रात बेगम धुंड्या
पर माणूस नामका धरम गवशा नय
-प्रकाश जाधव

भ्रम
त्यानं विचारलं
“सत्य असत्यामधील फरक
कसा समजून घेतोस तू?”
मी सांगितलं
“भ्रमाच्या मागं नाही लागत मी.”
त्यानं विचारलं,
पाप आणि पुण्याविषयी
कधी विचार करतोस का तू?
मी सांगितलं
भ्रमात घुसमटून जात नाही मी.
बुद्ध
त्यानं विचारलं
“जगात पुन्हा महायुद्धाची
गर्दी असल्यास काय करशील तू?”
मी म्हणालो,
“बुद्धमं शरणं गच्छामी!”
भयराक्षस
त्यानं विचारलं,
“इतर अनेकांप्रमाणे
देवावर विश्वास ठेवतोस का तू?”
मी सांगितलं,
माझ्यातला भयराक्षस मारतोय मी.
धर्माच्या पाऊलखुणा
त्यानं विचारलं,
“जगभरातल्या धर्मांच्या
पाऊल खुणा पाहतोस का कधी तू?”
मी सांगितलं,
“काट्यांपासून स्वत:ला वाचवतोय मी.”
धर्मस्थळ
त्यानं विचारलं,
“धर्मस्थळाजवळ जाऊनही
नेहमी बाहेरच का थांबतोस तू?”
मी सांगितलं,
“धर्मस्थळात देव येण्याची प्रतीक्षा करतोय मी.”
देवासाठी शाळा
त्यानं विचारलं,
“भल्यांना नि बुर्यांनाही प्रसन्न होणार्या
देवाविषयी काय म्हणशील तू?”
मी सांगितलं,
“असतील देव तर त्यांसाठी बालवाडी काढेन मी.”
स्वर्ग
तो म्हणतो,
“स्वर्गासाठी एवढी धावपळ असताना
कशासाठी शांत चालतोस तू?”
मी सांगतो,
“पायांखाली स्वर्ग पहातोय मी.”
सत्ता
तो म्हणाला,
“सार्या जगाचा सत्ताधीश झाल्यावर
काय करशील तू?
मी म्हणालो, “विषमतेची पेरणी नाकारतोय मी.”
चांगलं नि वाईट
त्यानं विचारलं,
“चांगलं नि वाईट याच्यात
कसा फरक करतोस तू?”
मी म्हणालो,
‘निष्पक्ष निसर्गाचे आभार मानतोय मी.”
दंगली
तो म्हणाला,
“एवढ्यात सार्या जातीय-धार्मिक दंगलीत
निर्भयपणे कसा चालतोस तू?”
मी म्हणालो,
“मोकाट जनावरांना कोंडवाड्याकडे नेतोय मी.”
अमृत
त्यानं विचारलं,
“अमृतावरून देव-दानवांमध्ये झालेल्या
युद्धाविषयी काय लिहिशील तू?”
मी म्हणालो,
“मनातील डबकी साफ करतोय मी.”
-उत्तम कांबळे

निराशा
सोडली केव्हाच चिंता माणसांची
लागली आम्हास घाई स्मारकांची
घालतो आम्हीच माळा गाढवांना
हौस आम्हां लाथखाऊ उत्सवांची
काय पाषाणास आम्ही दोष द्यावा?
शोधतो आम्ही दुकाने शेंदरांची
पायरीला तेच, गाभार्यातही ते
वाटते देवांस भीती देवळांची
पूजिले आम्ही स्वत: या आसवांना
केवढी झाली निराशा सांत्वनांची!
-लक्ष्मीकांत तांबोळी

नास्तिक एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो, तेव्हा खरं तर गाभार्यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची! एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो, तेव्हा शक्यता होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची! एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो, तेव्हा कोर्या नजरेने पाहात राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा. कोणीतरी स्वत:चे ओझे स्वत:च्याच पायांवर सांभाळत असल्याचं समाधान लाभते देवालाच! एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो, तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे! देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, ‘दर्शन देत जा अधून मधून’...... तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना!’ देवळाबाहेर थांबलेला एक खरा खुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवांचे एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर थांबतो -संदीप खरे