Categories
न्याय

भानामतीची दहशत

अभिरूप न्यायालय
एप्रिल - २०१४

युवर ऑनर, माझ्या अशिलाला भानामती करतो, भानामती करून लोकामध्ये घबराट निर्माण करतो, व भानामतीला प्रोत्साहन देतो या कारणासाठी पकडून खटला भरला आहे. परंतु या जगात कुठेना कुठेतरी अतृप्त आत्म्यांचा वावर असल्यामुळे त्यांच्याकडून भानामतीसारखे प्रकार घडत असतात. खरे पाहता या अतृप्त आत्म्यांना शांत करण्याचा प्रयत्न माझा अशील करत होता. पोलीसानी अशा अतृप्त आत्म्यांचा शोध घेऊन त्यांना डांबून ठेवण्याऐवजी माझ्या अशीलाला पकडले आहे. हे सारासार अन्याय आहे. आपणच यावर तोडगा सुचवू शकता.

तुमचा हा अशील यापूर्वीसुद्धा गुप्तधन शोधून देतो, हरवलेले मौल्यवान वस्तू सापडून देतो, शेतात विहिर खोदल्यास पाणी लागेल की नाही हे सांगू शकतो, अशा प्रकारचे दावे करतो म्हणे. त्याच्याकडे विशेष शक्ती असून त्यातून गावातील भानामतीसारखे प्रकार थांबवू शकतो, असा विश्वास त्यानी निर्माण केले आहे म्हणे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका कुटुंबातील लोकांना नरबळी द्यायला हवे असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुचवत होता म्हणे. हे सगळे खरे आहे का?

युवर ऑनर, एखाद्याच्या घरी अचानकपणे कपड्यानं पेट घेणं, कपडे आपोआप फाटले जाणं, कपड्यावर डाग उमटणं, घरातील वस्तू नाहिश्या होणं, अज्ञात विष्टा पडणं, अंगावर फुल्या उमटणं, अंगावर जखमा होणं, घराच्या छपरावर दगडांचा मारा होणं, इत्यादी प्रकार अनपेक्षितपणे घडू लागल्यास घरात, गावात घबराट होणं अत्यंत स्वाभाविक आहे. घरातली लोक घाबरतात, मुलं – बाळं रडू लागतात. अशा वेळी गावातील इतर मंडळी भानामतीचा प्रकार आहे म्हणून कुजबूज करू लागतात. त्यावेळी माझा अशील घरातल्यांना मदत करत असेल तर त्यात काय चूक आहे?

तुमच्या या अशीलाला आपण सिद्धपुरुष असून भटकत्या आत्म्यांचा नियंत्रण करू शकतो, ताब्यात ठेवू शकतो यावर प्रचंड विश्वास आहे. हाच सिद्धपुरुष या आत्म्यांना कुणाच्या घरीसुद्धा पाठवून त्रासही देवू शकतो. भानामतीचे प्रकार घडवू शकतो. या आत्म्यांना कह्यात घेऊन अघोरी प्रकार करण्याची कामगिरी करून दाखवू शकतो, अशी अफवा जनसामान्यात पसरवून नडल्यांच्याकडून पैसे उकळतो हेही खरे असेल.

युवर ऑनर, अतृप्त आत्मा काही कारणामुळे एखाद्या घराला झपाटतो, अघटित अशी एखादी घटना घडवून आणतो. या आत्म्याला सगळ्या जगाच णूत व वर्तमानाच ज्ञाऩ असतं, असही मानलं जातं. हा अतृप्त आत्मा सैतानी प्रवृत्तीचा असल्यामुळे घरच्यांना प्रचंड छळू शकतो. अशा अतृप्त आत्म्याला शांत करण्याची, काबूत ठेवण्याची विद्या आमच्या अशीलाजवळ असल्यामुळे त्याचा उपयोग तो करत असतो. मागणी तसा पुरवठा या नियमाप्रमाणे भानामतीने झपाटलेल्यांचा व आमच्या अशीलांच्या मधला हा साधा सरळ व्यवहार आहे. यात गैर काय आहे हेच मला समजत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे काही तरी कारणांनी मानसिक दृष्ट्या अस्वस्थ बनलेली, वा तिरस्कृत, वैफल्यग्रस्त, वा अपयशी व्यक्ती इतरांच लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने, वैफल्य वा अपयश पचवण्याची कुवत नसल्यामुळे आपण किती त्रासात आहोत म्हणून, वा सहज गंमत म्हणून, वा कुणावर तरी सूड उगवण्यासाठी या प्रकारचे घटना कुणालाही पत्ता न लागू देता घडवत असते. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वा सहानुभूती वा प्रेम मिळविण्यासाठी या आत्मक्लेशाच्या घटना संबंधित व्यक्तीकडून होत असतात. अनेकदा हा प्रकार अगदी लहान सहान गोष्टीपासून सुरुवात होते. व हे घटित साधे वा थिल्लर वाटणारे असतात. नंतर हळू हळू हा प्रकार वाढत जातो. ब्लेडने कपडे कावणे, कापूर जाळणे, अंधारात भांडी उचलून ठेवणे, उचलताना आवाज करणे, असले छोटे मोठे प्रकार यात असतात. अंधश्रद्धेच्या संस्कारात वाढलेले लोक भानामतीने घडवलं, भानामती सुरु झाली, असे बोलू लागतात व भीतीचे वातावरण तयार करतात. तिखट मीठ लावून गोष्टी फुगवून सांगू लागतात. आपण केलेला उपद्व्याप भानामतीच्या नावाखाली खपतोय हे पाहताच ती विकृत व्यक्ती आणखी काही गोष्टी करू लागते व सगळ्यांना घाबरवून सोडते. अधिकाधिक निर्भय बनते. अधिक सक्रीय बनते. समाजातील काही लोकांच्यातील अंधश्रद्धाच अशा व्यक्तीला उत्तेजन देते, बळ देते. अशा वेळी तुमच्या अशीलासारखा मांत्रिक येऊन काही तंत्र – मंत्र करू लागला की काही दिवस त्या धाकाखाली ती थांबून जाते. काही वेळा त्यातली गंमत संपली म्हणून थांबते, कंटाळा आला म्हणून थांबते वा कुणीतरी पकडतील या भीतीपोटी थांबते. घरच्याना मात्र मांत्रिकाच्या चमत्कारावर विश्वास बसतो. यात आत्मा-बित्मा काही नाही हे आपल्या लक्षात आले असेलच. भानामतीसारख्या गोष्टी घडतात हे बिंबवण्याचा प्रयत्नच मुळात गैर आहे व समाजात अशी दहशत निर्माण करण्यात तुमचा अशीलही यात सहभागी आहे.

युवर ऑनर, आत्म्याच्या अस्तित्वावर बहुतेक धर्मांचा विश्वास आहे. ख्रिस्ती माणसाचा आत्मा सेंट पीटरपाशी, केलेल्या पापाचा धडा म्हणत स्वर्गात प्रवेश करतो. मुस्लिम धर्मीयांचा आत्मा कयामत के दिन तक निवाडा होण्याची वाट पाहतो. आपला हिंदू धर्म तर मरणोत्तर जीवनाचा पुरस्कर्ता आहे. हिंदू धर्म हा व्यक्तीच्या मृत्युनंतरसुद्धा त्याच्या आत्म्याचे अस्तित्व मानतो. शरीर व आत्मा भिन्न आहेत असे मानतो. मृत्यु हा जीवनाचा शेवट नसून मृत्युनंतर नष्ट होतो तो फक्त देह! जे जाते ते केवळ जड शरीर! आत्मा अमर असल्याने ते मोक्षप्राप्तीसाठी धडपडते. अतृप्त असल्यास भोग भोगण्यासाठी भूतयोनीत शिरते व इतरांना त्रास देऊ लागते. या आत्म्यात प्रचंड चैतन्य शक्ती व इतर अनेक प्रकारच्या शक्ती भरलेल्या असतात. आत्म्याच्या शास्त्रात प्रयोग करून अष्टसिद्धी प्राप्त करता येते. अष्टसिद्धी प्राप्त झाल्यास चमत्कार करता येतात. गेली हजारो वर्षे यावर विश्वास ठेवले जात आहे. त्याची प्रचीती आली आहे असे सांगणारे महाभाग नक्कीच सापडतील. आपण हे सर्व खोटे आहे असे कसे काय म्हणू शकता?

माझ्या माहितीप्रमाणे असले प्रकार घडण्यामागे पुढील तीन कारणं आहेत; एक ढोंगाच्या भानामतीचा प्रकार असू शकतो. यात प्रामुख्याने दुखावलेली व्यक्ती सूड घेण्यासाठी भानामतीसारखे प्रकार करत घरात दहशत निर्माण करू शकते. दुसरा प्रकार म्हणजे त्याच घरातील एखाद्याला सौम्य मानसिक आजार असल्यामुळे हा प्रकार घडू शकतो. सासूबद्दलचा संताप, व्यसनी नवर्‍याबद्दलचा वैताग, आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा, नाराजी, कामाचा ताण, इत्यादी गोष्टी सुप्त मनात साठत गेल्यामुळे मानाची सहनक्षमता संपते व भानामतीद्वारे बाहेर पडू लागते. एका प्रकारे हा उन्मादच असतो. काही गंभीर मानसिक आजारातसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. विचारभ्रम, मनाचे भ्रम इत्यादीमुळे अशा गोष्टी घडू शकतात, असे मानसतज्ञांचे निष्कर्ष आहेत. प्रामुख्याने ही एका प्रकारची मानसिक प्रक्रिया असते. त्यामुळे भानामतीचे केसिस हाताळताना भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या अशिलाप्रमाणे मारझोड करत सुटल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.

युवर ऑनर, हेच खरे असल्यास भानामतीचा हा प्रकार थांबवण्यासाठी नेमके काय करायला हवे?

जादूटोण्याविरोधी कायद्यातच दक्षता समितीच्या संबंधी काही सूचना आहेत. माझ्या मते गावात भानामतीसारखे प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यास तांत्रिक, मांत्रिक यांना न बोलवता वा घाबरून न जाता या समितीच्या सदस्याशी संवाद साधावा व चर्चा करून पुढील कार्यवाही करावी. भानामती प्रकरण नीटपणे तपासून कोणती व्यक्ती या गोष्टी करत आहे याची खात्री करून घ्यावी. संबंधित व्यक्तीस हे प्रकार न करण्याबद्दल योग्य त्या प्रकारे समज द्यावी. आवश्यक वाटल्यास मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊन वा मनोपृथक्करण करून समज सूचना द्यावेत. त्रास सोसत असलेल्या कुटुंबियांना सहानुभूती दाखवावी. भामानतीच्या प्रकाराचा गाजावाजा न करता वृत्तपत्र वा इतर प्रसार माध्यमांकडे न जाता सहानुभूती बाळगावी. भानामतीचे उदात्तीकरण करणार्‍यांना जबर शिक्षा द्यावी असे माझे स्पष्ट मत आहे.

युवर ऑनर, माझ्या अशिलाला …..

जास्तीत जास्त शिक्षा देणे हे माझे कर्तव्य ठरेल.

–प्रभाकर नानावटी

लेखक संपर्क : 9503334895