जालना रोडने मोटारसायकलवरून सिडको सिग्नलजवळ असताना मोबाईलची रिंग वाजू लागली. मोटारसायकलवर असल्याने मोबाईलवर बोलणे शक्य नव्हते. सिग्नल सुटला. मी गाडी जरा पुढे जाऊन रोडच्या कडेला घेतली. तेवढ्यात पुन्हा रिंग वाजली. नंबर न बघताच मी फोन रिसिव्ह केला अन कानाजवळ नेला.
“हॅलो, कोण?” मी म्हणालो, “भोसले सर बोलताय का?” समोरून विचारणा झाली. “हो, हो, मी शहाजी भोसले बोलतोय, आपण कोण बोलताय?” मी विचारले. “सर, मी वारेगावहून बाबूराव जाधव बोलतोय, मला तुम्हाला भेटायचे आहे. अगदी तातडीने. कृपया आत्ताच कुठे भेटायला येऊ, सांगता का?” जाधव म्हणाले, “आत्ताऽऽऽ एवढे अर्जंट, काय काम आहे?” मी जरा कपाळावर आट्या आणतच विचारले. कारण दोन दिवसांनी मला समितीच्या कामासाठी औरंगाबादच्या बाहेर जावे लागणार होते. म्हणूनच मी घरासाठी काही खरेदी करण्यासाठी अरूणाला घेऊन मार्केटला चाललो होतो. त्यामुळे त्यांची भेट आत्ताच घेणे थोडं अवघड जाणार हे मला माहीत होते. तो माणूस आजीजीने “सर, नाही म्हणू नका, मला तुमच्या मार्गदर्शनाची फार गरज आहे. मात्र मी फोनवर बोलू शकत नाही.” अशी मला विनंती करत होता. अशा स्थितीत त्यांना भेट न देणे बरोबर दिसले नसते. “किती वेळात औरंगाबादला याल.” मी म्हणालो. “अवघ्या दोन तासात. पण कुठे येऊ?” जाधव यांनी प्रतिप्रश्न केला. “हे बघा मी सध्या शहरात मार्केटमध्ये चाललोय, तुम्ही औरंगाबादच्या गुलमंडी भागात या. मी तिथेच आसपास असू शकेन. गुलमंडीला आल्यावर मात्र मला फोन करा.” मी त्यांना म्हणालो. “हो सर, आपण भेटूच.” असे म्हणत त्यांनी फोन बंद केला. मीही अरूणाच्या उत्सुक चेहर्याकडे बघत मोबाईल खिशात ठेवत गाडी चालू केली अन् मार्केटच्या दिशेने निघालो. अरूणाने काहीही न विचारता ओळखले. नवीन केस आलेली दिसते.
सायंकाळचे पाच वाजले होते. आमची खरेदी आटपतच आली होती. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मी नंबर ओळखला. जाधवांचाच होता. “बोला जाधव साहेब, कुठे आलात?” मी विचारले. “गुलमंडीवर, गाडी पार्किंगच्या ठिकाणी.” “ठीक आहे. तुम्ही तिथेच थांबा मी आलोच.” असे म्हणत मी अरूणाला खरेदी झाल्यावर गुलमंडीवर गाडी पार्किंगच्या जवळच्या हॉटेलात येण्यास सांगितले. दर महिन्याला आमची खरेदी झाली की, मी आणि अरूणा तेथेच चहा घेत असू. तो हॉटेलवाला मला तसा ओळखतही होता. गुलमंडीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी थोडा निवांतपणा त्या हॉटेलातच मिळाला असता. मग मी जाधवांना भेटण्यास गुलमंडीवर गेलो. गुलमंडीवरील वर्दळीत फोन करून एकमेकाला भेटलो. हस्तांदोलन केले. जाधव साधारण पन्नाशी पार केलेले. किरकोळ शरीरयष्टी असलेले पांढराशुभ्र लेंगा-शर्ट, नेहरू टोपी घातलेले काळे सावळे खेडूत व्यक्तिमत्वाचे दिसत होते. हॉटेलच्या गडबडीपासून थोडेसे दूर असलेल्या टेबलाजवळ बसत मी चहाची ऑर्डर दिली. तेवढ्यात अरूणाही खरेदी आटोपून आली. अरूणाची ओळख करून देत मी खिशातला टेपरेकॉर्डर चालू केला व म्हणालो, “जाधवसाहेब, बर पहिल्यांदा सांगा तुम्हाला माझा मोबाईल नंबर कोणी दिला?” “कोणी दिला नाही सर. लोकमत वर्तमानपत्राच्या कार्यालयातून मी मिळवला.” बरं, जाधवसाहेब आता मला तुमची अडचण सांगा. अगदी सुरवातीपासूनच्या घटना कोणताही आडपडदा न ठेवता सांगा. तरच आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल. काहीही लपवून ठेवू नका. त्याची वाच्यता होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो.
“सर, मीच बाबूराव जाधव. वारेगावचा माजी सरपंच. पाच एक एकर जमीन मी, बायको आणि माझा एकुलता एक मुलगा कसतो. त्यावरच आमची गुजराण चालू आहे. दोन मुलींची लग्नं चांगल्या घरी झालेली आहेत. गेल्या अकरा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचे लग्न झाले. खूप आनंदात लग्न झाले. लता माझी 19 वर्षांची सून, नात्यातीलच आहे. सगळे आनंदात चालू होते पण काय! सुनेला दिवस गेले आणि अन् तिची दातखिळी बसायला लागली. कधी अंगात यायला लागले. गडबडा लोळू लागली. आरडाओरडा करायला लागली. भांडी फेकू लागली तर कधी दिवसेंदिवस गप्प बसू लागली. एक दिवस तर तिला चालताच येईना. पांगळीच झाली हो. गावात बाबूरावच्या घरात सुनेला भानामतीने झपाटल्याची चर्चा चालू झाली. घाटीत चार दिवस ठेवले. गुण आला नाही. त्यानंतर औरंगाबादच्या ‘धनवाई’ या खाजगी इस्पितळात जवळपास आठ दिवस ठेवले. काय काय चाचण्या केल्या कुणास ठाऊक! हजारो रूपये खर्च केले. पण गुण काही नाहीच. त्या इस्पितळातील ‘ईक्बाल’ नावाच्या डॉक्टरने तर ही बाहेरची बाधा असलेली केस असल्याचे सांगितले. त्यामुळे दवाखान्यात पैसा न खर्च करता ‘बाबरा’ या गावातील एका मुस्लीम डॉक्टरचा इलाज घेण्याचा सल्ला दिला. आम्ही बाबरा गावीही गेलो. ‘त्या’ डॉक्टरांना भेटलो. तो नुसता डॉक्टरच नाही तर छाछुगिरी करून बाहेरची बाधाही काढणारा होता. त्याने नमाजचे पाणी आणले, ते मंत्र म्हणून भारले. लताच्या अंगावर शिंपडले. तिला प्यायला लावले. सातशे रूपये फी घेतली. गुण येईल म्हणून सांगितले. पण गुण काही आला नाही.”
“अखेर दरेगाव येथे नरसोबाचे ठाणे आहे. तिथे एका महाराजाकडे घेऊन गेलो, महाराजांच्या सांगण्यावरून लताला 20 दिवस नरसोबाच्या ठाण्यात ठेवले. सोबत मात्र तिची सासूबाई म्हणजे माझी पत्नी अवंता पण होती बरं का! पण गुण काही आला नाही. आजवर दवाखान्यात जवळपास वीस हजार रूपये, देवाधर्माच्या ठिकाणी अकरा हजार रूपये असे एकतीस हजार रूपयांपेक्षा जास्त खर्च केले पण गुण आला नाही. आता तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ आहे. आजही पहाटे चार वाजल्यापासून तिची दातखिळी बसलेली आहे. अजूनही सुटली नाही.”
मी आणि अरूणा लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यांचे सांगून संपल्यावर मी विचारले. “सासू-सुनेची काही भांडणे?” अरूणाच्याही मनात हाच प्रश्न होता हे मला जाणवले. जाधव पटकन म्हणाले, “आजिबात नाही हो! आमची बायको शांत आहे आणि एकच एक मुलगा, त्याला मूल होणार, आपल्याला नातू होणार. परत सुनही काही परक्या घरातील नाही. नात्यातीलच. खूपच आनंदात होती ती. सगळे आम्ही आनंदात असताना हे चालू झाले हो.” जाधवांचा चेहरा रडवेला झाल्याचे जाणवत होते. “मग आमच्याकडे यावे असे का वाटले तुम्हाला?” माझ्या मनातला प्रश्न अरूणानेच विचारला. जाधव स्वत:ला सावरत म्हणाले, “मी दररोज लोकमत पेपर वाचतो. त्यात भोसले सरांच्या भानामतीवरील लेख वाचनात आला. मग मनात विचार आला प्रयत्न करावा. लोकमतमध्ये आमच्या गावातला एकजण काम करतो. त्याच्याकडून घेतला नंबर व फोन करून भेटलो. घरात अजूनही कोणालाच बोललेलो नाही.” मग मी जाधवांना समितीच्या सर्व अटी सांगितल्या. लेखी अर्ज देण्यास सांगितले. शोध घेताना घरातील सर्वांचे सहकार्य लागेल असे सांगितले. जाधवांनी सगळेच मान्य केले. तेवढ्यात जाधव यांचा मोबाईल वाजला. मोबाईलवर बोलताना त्यांच्या चेहर्यावरील ताण कमी होत असल्याचे जाणवत होते. “अहो सकाळपासून सुनेची बसलेली दातखिळी आत्ताच सुटली. पोराचाच फोन होता.” परवापासून आठवडाभर मी औरंगाबादच्या बाहेर असणार होतो. त्यामुळे वारेगावला उद्याच जायचे ठरवून आम्ही घरी आलो.
घरी आल्यावर मी डॉ. आशुतोष यांना फोन केला. मला दातखिळी बद्दल माहिती करून घ्यायची होती. “दातखिळी बसते म्हणजे जबड्याचे स्नायू एकदम आकुंचित होऊन जबड्याची हालचाल बंद होते. जबरदस्त मानसिक धक्का बसल्यामुळे किंवा हिस्टेरिक झाल्याने किंवा फिट वगैरे आल्यावर हे होते.” अशावेळी काय करायचं?” मी विचारले. “प्रथम दाताखाली जीभ सापडणार नाही याची काळजी घ्यायची. मग शरीराला तीव्र वेदना होईल म्हणजे टाचेला टाचणी वगैरे टोचायची किंवा नाकपुडीजवळ ‘अमोनिया’ सारखा उग्र वास द्यायचा. कांदा किंवा चपलेचा तळवा नाकासमोर धरताना तू बघितले असशीलच. दातखिळी बसल्यावर मांत्रिक मारहाण करतात ती त्याकरताच. उग्र वासामुळे किंवा तीव्र वेदनेमुळे जबड्याचे आकुंचित झालेले स्नायू सैल होतात आणि दातखिळी सुटते.”
“आणि कधीकधी दातखिळी बसणे हे चक्क नाटक देखील असू शकते. अन् नाटक म्हटलं तर ते रंगण्यासाठी प्रामुख्याने प्रेक्षकांची गरज असते. अशा व्यक्तीला एखाद्या खोलीत एकटेच ठेवले असता दातखिळी आपोआपच सुटते. पण हा फरक कळण्याची आपली क्षमता असायला पाहिजे.” डॉ.आशुतोषने माहिती पुरवली.
या वेळच्या भानामतीचे स्वरूप थोडे वेगळे होते. इथे तरूण बाईच्या अंगात येत होते, तिच्याशी एकांतात बोलताना स्त्री-पुरूष दोघेही असणे गरजेचे होते. त्यामुळे मी अरूणाला बरोबर घ्यायचे ठरविले. घरी आल्यावर मी आणि अरूणाने टेपवरील सगळी हकीकत पुन्हा एकदा ऐकली तेव्हा लक्षात आले हे सगळे प्रकार लग्नानंतर लगेच सुरू झाले नव्हते तर लताला दिवस गेल्यानंतर सुरू झाले होते. गरोदरपणात अती ताण तणावाने किंवा तीव्र मानसिक धक्के बसल्यास ती बाई हिस्टेरिक होऊ शकते हे मला माहीत होते. मग असा कोणता मानसिक धक्का लताला बसला असावा? मी विचार करू लागलो. बाबूरावांनी सांगितलेल्या हकिकतीवरून वरवर तरी अशा लताच्या विरोधात जाणारी कोणतीच घटना दिसत नव्हती. सासू-सून भांडण, मनाविरूद्ध लग्न, नवरा-बायको विसंवाद असे विषय केंद्रस्थानी ठेवीत मग मी आणि अरूणाने आपापसात चर्चा करून मुलाखतीचे स्वरूप ठरविले.
दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजता मी आणि अरूणा वारेगावला पाहोचलो. बाबूराव जाधव, त्यांची बायको अवंता मुलगा आनंद, त्यांचा घरगडी महादेव आणि लताच्याच वयाची शेजारी राहणारी कलावती आमची वाट पाहत होते. बाबूरावांनी अटी, नियम मान्य असलेले पत्र आमच्या हातात दिले. मी त्यावर बारकाईने नजर टाकली. बाबूरावांनी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेअसल्याचे लतासकट सर्व कुटुंबियांना माहिती दिली होती. लता कोठे दिसत नव्हती. गेल्याबरोबर आम्ही घराची पाहणी सुरू केली. घराची पहाणी करत असतानाच माजघरातून विचित्र कण्हण्याच्या आवाजाबरोबर एकदम घुमण्याचा आवाज येऊ लागला. आवाज वाढू लागला घरातील आम्ही सर्वजण माजघराकडे धावलो. तिथले दृश्य बघून मी आणि अरूणा स्तंभितच झालो. लताच्या अंगात आले होते. आळोखे पिळोखे देत ती जमिनीवर गडबडा लोळू लागली होती. सात महिन्याचा गर्भ पोटात असताना पोटावर गडाबडा लोळण्याच्या त्या विचित्र कृत्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. अरूणा एकदम पुढे आली आणि लताला आपल्या कवेत घट्ट धरून ठेवले. लताच्या डोळ्यात रोखून मी पाहत म्हटले, “घाबरू नको, मी आलोय ना आता. बिनधास्त राहा.” मी आवाजात अतिशय प्रेमळ सहानुभूती आणत लताने ऐकावे या उद्देशाने मोठ्याने म्हणालो. माझ्या शब्दातला विश्वास जाणवल्याने अवघ्या दोन तीन मिनिटात लता उठून बसली. लताच्या पाठीवर हात फिरवत अरूणा तिच्याजवळ बसली.
वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. त्या तणावाखाली वातावरणातच आम्ही आधी ठरविल्याप्रमाणे मुलाखती घेण्यास सुरूवात केली. प्रथम आम्ही जाधव यांच्या मुलाला बोलावले. मुलगा एकदम साधा दिसला. शिक्षण 12 वी पर्यंतचे. त्याचे आणि लताचे संबंध चांगले होते. त्याची लताबद्दल काहीच तक्रार नव्हती. त्याच्या मते लताचे गरोदरपण सुरू झाले आणि लताचा हा आजार सुरू झाला. त्याच्या आवाजात लताबद्दलची काळजी जाणवत होती. मग आम्ही बाबूरावांची पत्नी अवंताला बोलावले. आम्हाला सासू-सुनेच्या संबंधाबद्दल अवंता काय म्हणते याबद्दल उत्सुकता होती. बाबूरावांनी काल जे सांगितले होते ते खरेच असल्याचे आमची खात्री झाली. लता आणि त्या दरेगावच्या नरसोबाच्या ठाण्यात 20 दिवस राहून आल्याचे बाबूरावांनी सांगितलेले होते त्याबद्दल त्यांना विचारले. तिथेही काहीच फायदा झाला नाही पण महाराजांनी हिला मुलगीच होईल असे सांगितले होते आणि हिचे अंगात येणे जास्त वाढल्याचे सांगितले. त्यांनीही लताला दिवस गेल्यानंतरच हा त्रास सुरू झाल्याचे सांगितले. “तिला माहेरचा ओढा मात्र जरा जास्तच आहे हं!” हे लताच्या सासूबाईंचे वाक्य माझ्या मनात रेंगाळत ठेवत मी बाबूरावांच्या घरगड्याकडे वळलो. त्याच्याकडून घरातील एकूण वातावरणाबद्दल अंदाज घेतला. त्याच्याही मुलाखतीनंतर मला जाणवले घरात तसे काही भांडण तंटे फारसे नव्हते. घरातील माणसांच्या मुलाखतीनंतर सासू-सून, नवरा-बायको, बाप-मुलगा यांच्यात सर्वसामान्यपणे खुले संबंध होते. बोट दाखवायला तशी जागा नव्हती. याची मला खात्री पटली.
आता मला बाबूरावांच्या शेजारी राहणार्या लताच्याच वयाच्या असणार्या कलावतीची मुलाखत घ्यावयाची होती. माझ्या दृष्टीने ती महत्वाची होती. कारण दोघी समवयस्क असल्याने तिच्याकडून काही समजेल असे मला वाटत होते. पण तिनेही सर्वसामान्यपणे इतर सर्वांनी सांगितलेलेच सांगितले. म्हणजे आता लताच्या मुलाखतीवरच आपल्याला विसंबावे लागणार व गरोदरपणाचा आणि लताच्या अंगात येण्याचा काहीतरी संबंध असल्याचे मनाशी निश्चित करीत मी व अरूणाने लताच्या खोलीत प्रवेश केला. लता आता बरीच सावरली पण अगदी मलूल दिसत होती. दिसायला चार चौघींसारखी, जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण असणार्या लताच्या डोळ्यात थकवा जाणवत होता. लताची मुलाखत घेताना सुरवात करताना मी आश्वासक स्वरात तिला म्हणालो, “हे बघ लता, तुला हा जो त्रास होतो आहे त्यातून तुझी मुक्तता आपल्याला करायची आहे. या सर्वांच्या सांगण्यावरून थोडीफार मला कल्पना आली आहे. पण तू जर मला पूर्ण सहकार्य करशील तर तू यातून बाहेर पडू शकशील. मी विचारेन त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे दे. मी आणि अरूणा यातील एकही शब्द बाहेर जाऊ देणार नाही याची खात्री बाळग. “तुला हे लग्न मान्य नव्हते काय?” मान नकारार्थी हालवत ती म्हणाली, “नाही नाही, तसे काही नाही. पण मला कोणी काही विचारले नव्हते आणि हे तर माझ्या नात्यातले ओळखीचेच होते.” तिच्या स्वरातील नाराजीची अस्पष्ट छटा माझ्या मनात नोंदविली गेली. “तुझ्या सासूबाई म्हणत होत्या, तिला माहेरचा ओढा मात्र जास्तच आहे हे खरंय?” ती थोडी बावरल्याचे माझ्या नजरेने टिपले. “हं…” सौम्यसा सुस्कारा सोडत ती म्हणाली, “लग्न झाल्यानंतरच्या काळात मी वरचेवर माहेरी जायचे हे खरंय.” “हे तुझे अंगात येणे माहेरी चालू झाले की येथे?” “येथेच.” “तुझे पहिल्यांदा अंगात केव्हा आले आठवते तुला?” “दिवस गेल्याचे कळल्यावर.” हे तिला पक्के माहीत होते. मी सहज प्रश्न केला, “तुला धक्का बसला की, घाबरलीस की तुला मुलंच नको होते?” सात महिन्याच्या त्या गरोदर बाईला अंगात आल्यावर गडबडा लोळताना पाहूनच माझ्या मनात हा प्रश्न आला होता की, हिला पोटातल्या बाळाची काळजी कशी वाटत नाही? कारण त्यामुळे गर्भपात होण्याची दाट शक्यता तर असतेच आणि त्याचबरोबर गर्भवती महिलाही दगावण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अंगात आलेल्या बाईचे भान जरी सुटत असले तरी ती आपले गरोदरपण विसरण्याइतकी काही बेभान होत नाही याची मला खात्री होती. आणि या प्रश्नाने ती ढासळली आणि दोन्ही हात तोंडावर घेत हमसून हमसून रडायला लागली. रडता रडता म्हणाली, “खरंय, मला मुलंच नको होते.” अरूणा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला धीर देत बोलली, “हे बघ लता, तू आम्हाला खरे खरे सांग आपण त्याच्यावर उपाय काढू. तुला मूल का नको होते?” ती काहीच सांगेना. “हे बघ लता,” मी तिला समजावत म्हणालो, “तुला आता सातवा महिना लागला आहे. अगं, सात महिन्याचा गर्भ पाडणे एवढे सोपे आहे का!!… त्यामुळे बाळ तर पोटात मेलं असतंच त्याचबरोबर तुझ्याही जीवाला धोका होताच. हे तुला समजतंय का? त्यामुळे मूल होऊ देणे हाच तुझ्यापुढे आता एकमेव पर्याय आहे.” मग मी एक अवैज्ञानिक आणि घाबरवणारा प्रश्न केला, “लता, गरोदर महिलाच्या अंगात येत असेल तर तिला होणारे मूल हे ‘नपुसक’ जन्माला येते. हे तुला माहीत नाही का?” लताला माझा प्रश्न समजला नसावा असे मला तिच्या चेहर्यावरून जाणवले. कारण ती ग्रामीण भागात राहत असल्याने व शिक्षणाचा अभाव असल्याने तिला ‘नपुसक’ याचा अर्थ समजला नसावा. म्हणून मी पुन्हा तोच अवैज्ञानिक प्रश्न केला, “गरोदर महिलेच्या अंगात येत असेल तर तिला होणारे मूल हे ‘हिजडा’ जन्माला येते. हे तुला माहीत नाही का?” लता बावरली, खालच्या आवाजात नाही म्हणाली. मग मी आवाजात थोडासा कडकपणा आणत बोललो, “त्यामुळे हे अंगात येण्याचे प्रकार एकदम बंद कर. मुलगा होऊ दे नाही तर मुलगी. आनंदाने त्याला सामोरे जा.” पण अजूनही आम्हाला तिला मूल का नको होते याचे उत्तर मिळालेच नव्हते. त्यामुळे तिला विश्वासात घेत मी बोललो, “तू आमच्यावर विश्वास ठेव. आम्हाला सगळे खरे खरे सांग. का म्हणून तुला हे मूल नको? नाहीतर मग आम्हाला तुझ्या घरातील सर्वांना सांगावे लागेल तू मूल नको म्हणून हे उद्योग करीत होतीस.” मी तिला एक प्रकारे भीतीच दाखवली. मी घातलेल्या भीतीचा परिणाम असेल अगर समजुतीचा, सुरवातीला आढेवेढे घेणारी लता त्यानंतर बोलू लागली.
“माझं लग्न अकरा महिन्यांपूर्वी झाले. मात्र त्या अगोदर माझे व माझा सख्खा चुलत भाऊ सुरेश त्याचे नाव. आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. कित्येकदा शारीरिक संबंध आले होते. त्याचे लग्न माझ्या अगोदर झाले. तरीही आम्ही एकमेकाला चोरून भेटायचो. नंतर माझे लग्न झाले. सासरी सारेच माझ्याशी चांगरले वागायचे. पण तरी मला सुरेशची सारखी आठवण यायची, करमत नसायचे. म्हणून मी सारखी माहेरी सुरेशला भेटायला जायचे. माझ्या लग्नानंतरही आम्ही काहीवेळा एकत्र आलो. आता मला दिवस गेले होते. मग मला वाटू लागले आपण चांगल्या माणसांना फसवत आहोत. माझ्या पोटातील बाळ माझ्या चुलत भावाचे तर नसेल ना! या विचाराने मला भीती वाटू लागली. झोप उडाली माझी. त्यात त्या दरेगावच्या महाराजांनीही मला मुलगी होईल असे सांगितले. अन् मला मुलगी झाल्यावर माझ्या सासरच्यांची नाराजी तर होईलच अशी भीती वाटू लागली. मग गर्भ पाडणे हाच एक उपाय मला दिसू लागला आणि त्यासाठी अंगात आणण्याचे मी सुरू केले. मी पोटावर गडबडा लोळू लागले. घुमू लागले. पण गर्भ काही पडत नव्हता.” ती हमसाहमशी रडू लागली. अरूणाने तिला सावरले. ती अरूणाला विचारू लागली, “ताई, आता काय करू ओ मी?” “आता काहीही करू नकोस. तुला बाळाला जन्म द्यावा लागणारच आहे. तो आनंदाने दे. सत्य तुला व आम्हालाच माहीत आहे. आम्ही हे कुणालाच सांगणार नाही. आज आम्ही आल्याचे व तुझी ‘भानामती’ बंद केल्याचं निमित्त आहे. परत त्या सुरेशच्या भानगडीत पडू नकोस’ अरूणाने तिला समजावले. मी मात्र तिला जोरात दमात घेत बोललो, “हं! आणि आता पुन्हा यानंतर अंगात आणण्याचे नाटक करू नकोस. जर का असे नाटक तू पुन्हा केलेस तर मात्र तुझी कहाणी मी तुझ्या आईवडीलांना व सासरच्यांना सांगेन.” अशी भीती दाखवत लताचे समुपदेशन केले.
त्यानंतर कुटुंबियांना एकत्र केले व यानंतर पुन्हा असली भानामती होणार नाही. याची ‘गॅरंटी’ दिली. आणि औरंगाबादला परतलो.
त्यादिवशी रात्री उशीराच घरी आलो होतो. आल्या आल्या अरूणाने जाधव कुटुंबियांकडून आलेला पेढा दिला. लताला मुलगा झाला होता. रात्र बरीच झाली होती. तरीही लताच्या भानामतीच्या शोधाचं स्ट्रिंग कॅमेर्याने केलेले चित्रण मी आणि अरूणाने पुन्हा बघितले. टेपवरच्या मुलाखती ऐकल्या. लताच्या जबाबाने ‘असंही घडू शकते!!!’ या विचाराने मन अस्वस्थ झाल्याचं मला आणि अरूणाला चांगलंच जाणवलं पण एका साध्यासुध्या मुलीच्या कुटुंबाच्या आयुष्याला सावरण्यासाठी आपला थोडासा का होईना हातभार लागला या समाधानाच्या भावनेत ती अस्वस्थता कुठच्या कुठे विरून गेली.
-शहाजी भोसले
प्रश्न : शहाजीने असा ‘अवैज्ञानिक आणि घाबरणारा’ प्रश्न विचारणे योग्य होते का?
(वाचकांना काय वाटते हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. कृपया आपल्या प्रतिक्रिया 25 एप्रिल पर्यंत पाठवाव्यात. – संपादक)