Categories
रिंगणनाट्य

भोंदू ‘अस्लम बाबा’चे ऑपरेशन

पिंपरी चिंचवड गट
वार्षिकांक – २०१४

20 ऑगस्ट 2013 ला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला, अजून खुनी सापडत नाहीत.

मारेकर्‍यांचा निषेध वेगवेगळ्या पातळीवर चालू आहे. त्याला एक वैचारिक-साहित्यिक पातळीवर निषेध व्यक्त करण्यासाठी रिंगणनाट्य हा देखील दखल घेणारा पर्याय असू शकतो. रिंगण नाटकाच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी सक्षम ताकदीने वैचारिक बाजू असणारे अनेक घटक निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी अतुल पेठे सर आणि त्यांचे सहकारी राजू दादा इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य कार्यशाळा घेण्याचे ठरले. पुण्यातून बरेच लोक उत्सुक होते कार्यशाळा 5 दिवसांची म्हटल्यावर या कार्यशाळेला येण्यास बरेच जण गळाले.. 3 दिवसांची कार्यशाळा ठरल्यावर 40 च्या वर पुण्यातून लोक जमा झाले. पुणे, कोल्हापूर अशी मिळून आमची रिंगण नाट्य कार्यशाळा कोल्हापूरला झाली. बरेचजण नवखे होते, तर काही जण नाट्य क्षेत्राशी संबंधित होते, बरेच अंनिस कार्यकर्ते होते, रिंगण नाट्य कार्यशाळातून बर्‍याच नव्या गोष्टी शिकण्यास, जीवनाकडे बघण्यास मिळाले. बर्‍याच लोकांनी म्हटले आपण या शिबिरात आलो खूप चांगले केले. नाहीतर खूप सार्‍या चांगल्या गोष्टींना मुकलो असतो. अतुल पेठे सर आणि राजू दादा इनामदार यांनी त्यांच्या जवळील कलेशी संबंधित असणारी सर्व शिदोरी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला.

या शिबिरातून अंधश्रद्धांची कारणे, त्यांचे परिणाम आणि त्यावरील उपाय या अंगाने चर्चेला सुरवात होऊन या चर्चेतून येणार्‍या मुद्यांवरून प्रत्येक गटाने नवीन गाणी, नवीन चाली आणि विशेष म्हणजे याच मुद्यांवरून प्रत्येक गटाचे नवीन नाटक लिहिले गेले आणि बसवले गेले. अवघ्या 3 दिवसांच्या शिबिरात आमचे जसे शिबीर झाले तशी अनेक अंनिस लोकरंग मंच रिंगण नाट्य कार्यशाळा झाल्या. त्यातून 18 गट तयार झाले आणि 18 नाटके आणि गाणीसुद्धा.

प्रत्येक निर्मिती ही वेगळी असते आणि सुंदर असते…. हे सुद्धा याच शिबीरातून शिकण्यास मिळाले. प्रत्येक नाटक आणि गाणी वेगळी होती यात कोणीच व्यावसायिक कलाकार नव्हते. नोकरी करणारे, कॉलेजमध्ये शिकणारे, व्यवसाय करणारे कार्यकर्ते मंडळी होती, यांची चौथी खिडकी खोलण्याचे काम खर्‍या अर्थाने अतुल पेठे आणि राजू दादा इनामदार यांनी केले.

पुण्यातील शिबीरात येणार्‍यांची संख्या जास्त होती म्हणून पुण्याचे दोन गट तयार झाले. आमचा पिंपरी-चिंचवडचा गट तयार झाला. गटातील सर्वजण अंनिस कार्यकर्ते नवीन. त्यामुळे गटाचे नाटक ठरवताना जास्त परिश्रम लागले. नाटकाचा फारसा अनुभव कुणास नाही, असेल कोणी तेवढेच!

आरोग्याविषयी सगळ्यात जास्त समस्या आपल्याकडे आहे. त्याचा गैरफायदा घेणारे बुवाबाबा पण आपल्याकडे जास्त आहेत. त्यात चमत्कार करून आजार बरे करून देतो सांगणारे आहेतच, अंनिसवरती नेहमी आरोप केला जातो की, नेहमी हिंदू बुवा बाबा विषयीच समिती काम करते, भांडाफोड करते. इतर धर्माच्या बाबाविषयी काही बोलत नाही. डॉक्टर दाभोलकर यांनी त्यांच्या अनेक पुस्तकातून या आरोपाला उत्तर दिले आहेच. आम्ही देखील याला उत्तर म्हणून बागलकोटचा बोटाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करणारा भोंदू अस्लमबाबा विषयीचं नाटक करण्याचं ठरवलं आणि आमचं नाटक बसलं. कार्यशाळेत काही तासात बसलेले आणि तेथेच सादर केलेले नाटक छान जमले. पटातील सर्वांना एक हुरूप आला. आपल्याला जमू शकते असा कार्यशाळेतून विश्वास मिळाला.

20 ऑगस्ट 2014 ला पुण्यात सर्व गटांचे नाटक मिळून 20 नाटकं होणार होती. त्या पूर्वी रंगीत तालीम म्हणून सातार्‍याला सर्वांची नाटके होणार होती. शिबिरात सर्वसाधारण बसलेले आमचे नाटक त्यावर रंगसफेदी करण्याचे काम पुण्यात खर्‍या अर्थाने अतुल पेठे सरांनी करून घेतले. पुण्यात रात्री 11.30 वाजेपर्यंत आमच्या नाटकाच्या तालमी करून घेतल्या. आमच्या एवढ्या तालमी झाल्या की, बाजू वाल्यांना त्रास झाला. एकदा तालमीच्यावेळी चहा घेऊन येणारा मुलगा आमच्याकडे रागाने बघत होता. त्याला विचारल्यावर त्याने सांगितले त्याच्या वडिलांचे नाव अस्लम आहे. त्यानंतर त्याला समजावून सांगितले, अस्लमबाबा कोण होता, तो कशा पद्धतीने ऑपरेशन करत होता, कसा फसवायचा? अंनिस म्हणजे काय सांगितले. आमचा पहिला प्रयोग हा सातार्‍याला झाला. आम्हाला चांगलाच हुरूप आला.

आमच्या गटाच्या काही मर्यादा आणि जमेच्या बाजू आहेत. आमच्या गटातील बरेच जण नोकरी करणारे असल्यामुळे सायं.6.30 नंतर फ्री होतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. काहीजण दोन विरोधी टोकाला साधारण 30 कि.मी.अंतरावर राहतात. रविवार शिवाय सुट्टी नसते. त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये आमच्या नाटकाचे प्रयोग होत नाहीत. हीच आमची खरी मर्यादा आहे. जमेची बाजू म्हणजे आमच्या गटात शिक्षण, वकील, उच्चशिक्षित लोक आहेत. आमच्या नाटकातील सर्वच पात्रे एकमेकांची भूमिका करतात. त्यामुळे एखादा दुसरा कोणी नसला तरी आमचे नाटक होते. विशेष म्हणजे आमच्या नाटकाच्या बरोबर आम्ही नरबळीवर आधारीत पपेट शो सुद्धा करतो. तो मुलांना आणि मोठ्यांनापण आवडतो. आणि आम्ही सर्वजण चळवळीतील असल्याने एकमेकांना सांभाळून घेतो. आम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये कार्यक्रम घेता येत नसले तरी आम्ही 20 ऑगस्टनंतर गणपती उत्सवात, निवासी शाळेत, सोसायटीमध्ये 14 प्रयोग घेतले. विशेष म्हणजे आम्हाला नाटक करताना जागेची कमतरता कधी जाणवत नाही. 20 बाय 10 च्या गच्चीवर देखील आम्ही आमचे नाटक घेतले… भोंदू अस्लमबाबा आमच्या या नाटकाला कोणीच विरोध केला नाही. आमच्या नाटकातून बुवाबाजीला बळी पडून नाहकपणे आपण आपल्या जवळच्याचा जीव गमावून बसतो. नवीन येणार्‍या कायद्यामुळे आता शिक्षा होऊ शकते, हा संदेश लोकांपर्यंत आम्ही नेत आहोत.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आता चमत्कार आणि भाषण यावर न थांबता रिंगण नाटकाच्या माध्यमातून लोकात जात आहे, रिंगण नाटकच्या माध्यमातून लोकांच्या अधिक जवळ जात आहे. लोकांना आपले विचार सांगत आहे. लोक अधिक जवळ येत आहेत. लोकांचे प्रोत्साहन मिळत आहे.

दोन महिन्यात आम्ही 14 प्रयोग केले. असेच सातत्य राहिल्यास आम्ही नक्कीच 100 प्रयोग करू. कारण आमच्याबरोबर तुम्ही आहात आणि अतुल सरांचे मार्गदर्शन आहेच. त्याबरोबर आमच्या गटात हेवा वाटणारे मिलिंद, मनिषा, सम्यक, अर्चना, नितीन, अरूणा, अक्षय, प्रिया, भानुदास, संदीप, बिना आणि स्नेहा उत्साहाने तळमळीने काम करणारे आहेत…

-प्रा. विवेक सांबरे

लेखक संपर्क: 9763924374