कोल्हापूरला रिंगणनाट्य प्रशिक्षणाची कार्यशाळा घेण्याचे निश्चित झाले आणि मग सर्वजण आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहू लागलो. कार्यशाळा 20 ते 22 जून अशी तीन दिवसांची होती मात्र आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडचे सर्व साथी 19 तारखेलाच मुक्कामी जाणार होतो. त्यासाठी पाच वाजता स्वारगेटला सर्वजण जमा झालो आणि त्यानंतर सुरु झाला आयुष्यातील सर्वात कंटाळवाणा प्रवास. गाडी चालवणार्यांचा कदाचित पुनर्जन्मावर विश्वास असावा. कारण तो ज्या गतीने गाडी चालवत होता त्यावरून आयुष्यात कधी आम्ही कोल्हापूरला पोचू की नाही याचा संशय वाटायला लागला होता. कसेबसे रात्री दोन वाजता मुक्कामाच्या स्थळी पोहोचलो. तिथे गेल्यावर अतुल सर आणि सहकारी काळजीने आमची वाट पाहत होते हे पाहून हायसे वाटले. मध्यरात्रीनंतरच्या भोजनाचा अनुभव घेतला आणि झोपेमध्ये गुडूप झालो.
सकाळी उठल्यावर परिसराच्या सुंदरतेची जाणीव झाली. नितांत सुंदर परिसरामध्ये फिरताना रात्रीच्या प्रवासाचा सगळा शीण पळून गेला. त्यानंतर कळले की आम्ही राहणार आहोत ती शाहू महाराजांची आवडती जागा होती. आता त्या जागेला स्काउट बंगला म्हणून ओळखतात. कार्यशाळेमध्ये केलेले पहिले काम होते परिसरातील स्वच्छतेचे. राजुदादाने आमचे सहा गट पाडले. आणि परिसरातील सर्व कचरा, मोडक्या फांद्या फेकून दिलेल्या वस्तू यांना एकत्र करून फुल बनवायला सांगितले. प्रत्येकाने मदत करून आपापल्या गटाचे फुल बनवले आणि त्यानंतर प्रत्येक गटाचे अभिनव पद्धतीने अभिनंदन केले. त्यानंतर राजुदादाने निर्मितीचा आनंद म्हणजे काय, प्रत्येक कलाकृती कशी अभिनव असते, आणि कलाकृतीचे रसग्रहण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात अतुलसरांनी विषय मांडला होता चौथ्या खिडकीचा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की ज्या करण्याची त्याची क्षमता असते मात्र त्या त्याने कधी करून पाहिलेल्या नसतात. मनाच्या कोपर्यामध्ये ही चौथी खिडकी असते जी आपण कधी उघडून पाहिली नसते. सर सांगत असताना माझ्या मनात विचार चालू झाला की आपल्या चौथ्या खिडकीच्या मागे काय दडलेले असेल? कारण अंनिसच्या विचारधारेत आल्यापासून आत्मविश्वासाची कमी कधीच भासली नाही, स्टेजडेअरिंग होते, कुणासमोर बोलताना, गाणी म्हणताना, नाचताना न्यूनगंड नव्हताच. मग आपल्या चौथ्या खिडकीच्या मागे काय या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. अतुलसरांनी प्रत्येक गटाला स्वत:च्या रिंगणनाट्यासाठी एक एक गाणे बनवायला सांगितले होते. आम्ही सर्वजण मिळून विचार करतोय.. साने गुरुजींच्या आता उठवू सारे रान या गीतावर बेतलेले गाणे बनवायचे ठरले. मात्र तासा दीडतासात दोन कडव्याच्या पुढे गाडी सरकेना.. मग उद्या सकाळी पाहू असे म्हणून जेवायला पळालो.
रात्री जेवण झाल्यानंतर कोल्हापूरचे शाहीर निकम आणि सहकार्यांचा जलसा आयोजित केला होता. शाहिरांनी जलसा असा रंगवला की बासच बास… रात्री बारा वाजता झोपायला गेलो. जलश्याने केलेले चार्जिंग उतरायला तयार नाही. दीड वाजेपर्यंत झोप लागली नाही. आणि कविता सुचायला लागली.
एकच आहे रक्त आपुले .. किती ह्या जातीपाती र..
या जातीला देवूया मूठमाती र
पुढची कडवी जुळायला लागल्यावर मग विचार केला.. सकाळ होईपर्यंत विसरून जाईल म्हणून रात्री उठून मोबाईलच्या उजेडात मनात येणारे कागदावर उतरवले. तीन वाजेपर्यंत फायनल प्रोडक्ट तयार झाले आणि शांत झोप लागली.
सकाळी सहा वाजता उठून सर्वांना ओरडून ओरडून सांगू लागलो की आपले गाणे तयार झाले. सर्वांना आश्चर्य वाटले, मात्र म्हणून दाखवल्यावर हेच गाणे फायनल करायचे ठरले. अतुलसरांना देखील गाणे आवडले. त्यांनी तोंड भरून कौतुक केले. आणि कार्यशाळेमधले सर्व मला अण्णा नावाने ओळखायला लागले. आता गाणे लिहून झाले पण गायचे कुणी हा प्रश्न होता. कारण इतर चार गटामध्ये चांगले अनुभवी गायक होते. आमच्या गटात याआधी स्टेजवर गाणी म्हणालेला कुणीच नव्हता. मात्र सम्यक आणि भानुदासने प्रयत्न केला आणि त्यांना सूर सापडला देखील.. संतोष दादाने आमचे गाणे ठेक्यात बसवून दिले. आता मुद्दा बाकी होता नाटकाच्या विषयाचा .. विवेकने हा प्रश्न सोडवला आणि अस्लमबाबाचा भांडाफोड हा नाटकाचा विषय फायनल झाला.
रात्री जेवल्यानंतर नांगरे बंधूंची गाण्याची मैफिल होती. दोघा भावांनी किशोर कुमार, महम्मद रफी यांना साक्षात आमच्या कार्यशाळेत उतरवले.. मैफिल खूपच रंगली. विनायक आणि स्वप्नीलने देखील मध्ये मध्ये चान्स मारून घेतला.. एक से बढकर एक गाण्यांची मैफिल बारा वाजता संपली. त्यानंतर बाकीचे सर्व झोपायला गेले. पण आम्ही बाप्पू नांगरेंच्या मागेच.. बाहेर पारावर आमची बैठक बसली आणि बाप्पुंचे किस्से चालू झाले. नायकवडी अण्णांचे किस्से, बाप्पुंनी त्यांच्या महाविद्यालयात नाटक बसवताना केलेले प्रयोग हे सर्व योगेश कुदळे आणि बाप्पुंच्या तोंडून ऐकताना रात्रीचे तीन कसे वाजले कळले नाही.. मग मात्र झोपी जाण्याचा दु:खद निर्णय घेतला.
सकाळी सहा वाजता परत दिवस सुरु..आमचे नाटक सुंदर बसले. कारण डोळ्यात हुकुमी पाणी आणणारी प्रति मीनाकुमारी प्रिया नायिका म्हणून आणि विवेकसारखा हरहुन्नरी आणि हजरजबाबी खलनायक आमच्याकडे होता. नाटकातील मुख्य भूमिका त्या दोघांच्याच होत्या. त्या त्यांनी लगेच आत्मसात केल्या. आम्ही सर्वांनी त्यांना चांगली साथ दिली. सर्व गटांच्या नाटकांचे सुंदर सादरीकरण झाल्यावर मग कार्यशाळेची सांगता झाली. परतीच्या प्रवासाची तयारी सुरु झाली आणि त्यानंतर जगाचा विचार करायला डोके मोकळे झाले.
गेल्या तीन रात्री मिळून फक्त आठ नऊ तास झोप मिळाली होती. मात्र चेहर्यावर शीण नव्हता की डोळ्यावर झोप नव्हती. माझे मलाच आश्चर्य वाटायला लागले की एवढी उर्जा माझ्यात कुठून आली. ही उर्जा तर आपल्या चौथ्या खिडकीमध्ये लपून बसली नव्हती ना? या उर्जेचा स्त्रोत होते इतर साथींमध्ये असलेला उत्साह.. तीन दिवस चाललेला सृजनाचा सोहळा. आपल्या विचारांची एवढी माणसे एकत्र येवून निर्मितीचा उत्सव साजरा करत असताना झोप येणे किंवा थकवा येणे शक्यच नव्हते. या शिबिराने मला माझी चौथी खिडकी उघडून दिली. या खिडकीमध्ये माझ्या साठी बरेच काही होते ज्यांची जाणीव मला झाली नव्हती. शिबिरातून परत आल्यावर देखील माझी बर्या वाईट कवितांची निर्मिती चालू राहिली.. आता ठरवलेय आयुष्यभर नवीन काही तरी कला शिकत राहायच्या.. शिकताना लाजायचे नाही. बरेच काही बोलावेसे वाटते पण त्या सर्व भावनांना या कवितेत थोडक्यात मांडतो,
निर्मितीची ओढ जेव्हा .. रात्र सारी जागविते,
अंतरीच्या त्या कळांना.. थोपविता कामा नये.
भीड तुज वाटे कशाची.. तज्ञ ना बसले सामोरी,
कला तुझी आहे अनोखी..लपविता कामा नये.
दाद देताना तुला रे … वाटते भीती कशाची,
भावना ही अंतरीची .. वांझ होता कामा नये.
करुनी घे जे वाटते ते… वाट तू पाही कुणाची,
डाव असतो एकट्याचा.. विसरता कामा नये.
जिंदगी बरबाद झाली.. व्यक्त होता का ना आले?
येईल अंत समीप तेव्हा .. तुज वाटता कामा नये.
वापरूनी घे तिला तू.. प्रतिभा तुला जी लाभली,
ही असे तलवार भारी.. ही गंजता कामा नये.
–अण्णा हांडे