नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू डांगोरे (वय 62, रा. रामनगर) व रजनी माहुले (वय 35, रा. बुद्धनगर) यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली व पोलीस कोठडीत टाकले.
तंत्रमंत्र आणि जादूटोणा या उपचाराने पुत्रप्राप्ती करून देतो यासाठी मुकेश ऊर्फ टिल्लू बाबाने साथीदार महिलेच्या मदतीने पीडित महिलेकडून 7 लाख रुपये उकळण्याची घटना नुकतीच नागपूर येथील पाचपावली भागात उघडकीस आली. पीडित 40 वर्षीय महिलेचा पती सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी असून त्याला निवृत्तीचे दहा लाख रुपये मिळाले. त्याने दोन वर्षांपूर्वी पीडित महिलेसोबत दुसरे लग्न केले. दोन वर्षांपासून तिला मूल होत नव्हते. दरम्यान पीडित महिलेची रजनी माहुलेसोबत ओळख झाली. एका भेटीत तिने पांढराबोडीतील मुकेशबाबाने जादूटोणा, मंत्रतंत्र केल्यास तुला पुत्रप्राप्ती होईल, अशी खात्री रजनीने पीडित महिलेस दिली. पीडित महिला बाबाच्या संपर्कात आली. पूजा करण्याच्या बहाण्याने बाबाने पीडित महिलेकडून वेळोवेळी असे एकूण सात लाख रुपये उकळले. तसेच त्याने औषधोपचारही केला. मात्र त्यानंतरही पीडित महिलेला मूल झालेलं नाही. त्यामुळे तिने मुकेशबाबाला पैसे परत मागितले. मुकेशबाबाने तिला पैसे परत न करता जादूटोणा व मंत्रतंत्राची भीती दाखविली. यामुळे पीडित महिलेने पाचपावली पोलीस स्टेशन येथे घडलेला प्रकार सांगून तक्रार नोंदविली.
पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, उपनिरीक्षक टी.एम.ढाकूलकर, हेडकॉन्स्टेबल संजय वानखेडे, सारीपुत्र फुलझेले, अविराज भागवत, सचिन भिरटे, प्रवीण वाकोडे, विनोद गायकवाड यांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. तसेच मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू याच्याकडून लिंबू, बाहुली व जादूटोण्याचे साहित्य जप्त केले आहे. उपनिरीक्षक ढाकूलकर यांनी दोघांनाही दिनांक 19 जानेवारी 2019 ला न्यायालयात पुढील कार्यवाहीस हजर केले. न्यायालयाने दोघांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. प्रस्तुत या प्रकरणाची माहिती कळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मा. जगदीश सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, प्रधान सचिव गौरव आळणे, उपक्रम कार्यवाह रामभाऊ डोंगरे, रवी सहारे इत्यादींच्या उपस्थितीत पाचपावली येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. अशोक मेश्राम, तसेच मा. उपनिरीक्षक टी. एम. ढाकूलकर, हेडकॉन्स्टेबल संजय वानखेडे यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष एम. जी. धंदरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नरबळी अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची पुस्तिका तसेच प्रस्तुत कायद्याचा अंनिसचा विशेषांक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
– मधुकर धंदरे, नागपूर