कॉलेजचा अभ्यास अवघड जात असल्याने मुलगी कॉलेजला सतत गैरहजर राहत होती, या कारणास्तव त्या मुलीला कॉलेजच्या परीक्षेला बसता आले नाही. या गोष्टींमुळे आई बेचैन झाली. आपल्यावर काहीतरी संकट कोसळले अथवा मुलीला काहीतरी बाधा झाली आहे, या समजुतीने कोंढवा (पुणे) येथील एका दैवी शक्तीवाल्या महिलेकडे घेऊन गेली. या दैवी शक्तीवाल्या महिलेने दैवी शक्तीची भीती दाखवून या पीडित मुलीला व तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला ‘संकट टाळते’ या बहाण्याने घरी बोलावून मानसिक छळास सुरुवात केली. या मांत्रिक बाईच्या मित्राने दोन मुलींवर बलात्कार केला. या प्रकरणी या दोन मुलींचे समुपदेशन महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव व मिलिंद देशमुख यांनी केले. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊन या मांत्रिक बाई विरोधात व तिच्या मित्रा विरोधात फिर्याद नोंद करण्यास तयार केले.
हजरत अंगामध्ये संचारणार्या या मांत्रिक बाईने आपल्या मित्राच्या घरी या मुलींना घेऊन गेली, तिथे तिच्या मित्राने स्वत: व त्याच्याकडे कामास असलेल्या मुलाने दुसर्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मांत्रिक बाई फरीन फारूख शेख (रा. कोंढवा, पुणे) व तिचा मित्र शफीक रफीक शेख (वय 28, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी मुलगी ही कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.कॉम.चे शिक्षण घेत असताना तिला इंग्रजी माध्यम अवघड जात असल्याने ती कॉलेजमध्ये गैरहजर राहत होती. त्यामुळे तिला परीक्षेस बसता आले नाही. त्यामुळे मुलीच्या आईने आपल्यावर काहीतरी संकट आले आहे, असे समजून इतरांच्या सांगण्यावरून फरीन फारूख शेख हिच्या अंगात येते व तिच्याकडे दैवीशक्ती आहे. ती संकटांवर उपाय करते, या भावनेने या पीडित मुलींची आई तिला घेऊन शेख हिच्याकडे गेली. आरोपी फरीन हिने पीडित मुलीला ‘तुझ्या अंगात हजरत येईल व तुझे पेपर हजरत लिहील,’ असे सांगून आईला पटविले. मुलीला घरातून अचानक गायब करण्याचा कथित चमत्कार दाखवून तिच्या आईचा विश्वास संपादन केला.
‘दैवी उपचार करण्यासाठी तुमच्या मुलीला माझ्याकडे पाठवा’ असे सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी व तिची अल्पवयीन मैत्रीण आरोपी फरीन हिच्या घरी गेल्या असता, तिचे हातपाय दाबायला सांगितले; न दाबल्यास ती मारहाण करीत असे. असे अमानुष प्रकार सुरू होते. या जाचाला कंटाळून मुलीने सर्वप्रकार आपल्या घरी सांगितला. पीडित मुलीच्या बहिणीने महाराष्ट्र अंनिस आणि पोलिसांचा सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार केली. पुणे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस अधिकारी मनीषा झेंडे यांनी याप्रकरणी पीडित मुलींचे समुपदेशन केले. त्यांना धीर दिला.
त्यानंतर पीडित मुलीने 11 डिसेंबर रोजी मुंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार भारती होले व सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर या आरोपींवर बलात्कार व पोस्को, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी-प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर पुढील तपास करीत आहेत.
– नंदिनी जाधव, पुणे