भूत ही कल्पना मानवी मनाच्या भितीतून निर्माण झालेली एक भयानक व्याधी आहे. मनाच्या ह्या व्याधीला समाज मनाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनेची झालर देऊन लोक विविध प्रकारे व्यक्त होतात आणि त्यातूनच ‘अनेक प्रकारच्या मनोविकाराला’ भूतबाधा असे संबोधतात. यामुळेच अनेक वेळा माणसं श्रद्धेपोटी म्हणा किंवा अंधश्रद्धेपोटी म्हणा अशा तर्हेच्या मानसिक आजारात, भूत उतरवणे गरजेचे आहे त्यासाठीच विविध ठिकाणी धाव घेतात; रूग्णांना घेऊन जातात आणि नाहक श्रद्धेपोटी बळी देखील जातात. या समजुतींच्या फेर्यात केवळ हिंदूच नव्हे, तर इतर धर्मीयही येतात. खास करून शुभअशुभ ह्या कल्पना तर सर्वत्र आढळतात. जेव्हा स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या दु:खाचे वा आपत्तीचे कारण सहजासहजी लक्षात येत नसेल किंवा परिस्थितीचा अंदाज येत नसेल तर मग खापर नशीबावर फोडण्याची प्रथा सर्वत्र आणि सर्वदूर दिसते. जेव्हा दु:खाचे आघात खूपच असह्य होतात तेव्हा संबंधित व्यक्तीला ‘बाहेरची बाधा’ झाली असावी, एखादा अतृप्त आत्मा पिच्छा पुरवत असावा. काळ्या शक्तीने झपाटले असावे. अशा समजुती जगभर सर्वत्र आणि सर्व धर्मियांत आढळतात.
सोऊळ, सह, आत्मा, जीन या सर्व कल्पना प्रत्येक धर्माची प्रतिके आहेत. भुताने झपाटलेल्या घरात बायबलचं वाचन करणे, क्रॉस फिरवणे, आटे काढून 786 असे क्रमांक लिहून चौकटीत चिकटवणे, बाधा उतरवणार्या बाबाकडे, पिराकडे, ब्रदरकडे जाऊन गंडेदोरे, मेणबत्त्या आणि तावीज दंडाला अडकवणे हे सर्व धर्मात सारखेच असते. परंतु भूतबाधित व्यक्तीला फोकाने बदडणे, मोरपिसाने झाडणे, हे हिंदू मुसलमानात दोघातही आढळते तसेच जैन, शीख, बौद्ध या धर्मांत मुलत: अशा संकल्पनांना थारा नसला तरी भारतातील बहुसंख्य हिंदू धर्मियांच्या प्रभावामुळे या धर्मियांमध्येही या सर्व समजुतींचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहेच. त्यामुळेच महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर भूत उतरविण्याची काही ठाणी प्रसिद्धच आहेत. या ठिकाणी अशाच काही ठाण्यांचा धावता आढावा घेतला आहे.
1) गाणगापूर(कर्नाटक), 2) मीरा दातारचा दर्गा, मुंबई, 3) सैलानी बाबांचा दर्गा – पिंपळगाव सराई, चिखली, 4) पुरूषोत्तम गड-कोंडीराम बढेबाबा, जामगाव(नगर), 5) मौला बाबाचं ठाणं, गंगाखेड(जि.परभणी)-रईसा शेख व दत्ता भगत(जोडगोळी), 6) करीम बाबा (मिरज रेल्वे स्टेशनजवळ), 7) भाळवणी(ता.पंढरपूर, जि.सोलापूर) अमृता कांबळे(येशू बाबांचा संचार) म्हणून ‘संचार कन्या ठाणं’ अशी एक ना अनेक ठाणी भूत उतरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी काही ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तेथील बुवाबाजी बंद पाडली आहे. परंतु अजूनही काही ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आजारी व्यक्तींचा(मनोरूग्णांचा) भूत उतरवण्याच्या नावाखाली छळ केला जातो. त्यापैकी ही काही ठिकाणं –
1) गाणगापूर – हे ठिकाण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक प्राचीन तीर्थक्षेत्र. हे दत्ताचे ठाणं म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भस्माचे डोंगर आहे म्हणे. वास्तवात 2 ते 3 फूट उंचीची एक जागा आणि भला मोठा खड्डा पडलेली अशी पुराणकथांनी रंगवलेली काळ्या मातीची छोटीशी टेकडी. परंतु गुरूचारित्र्यात खच्चून वर्णन केलेली अशी ही जागा भूतं उतरविण्यासाठी एक ठाणं म्हणून प्रसिद्ध आहे. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रातूनच जास्त मनोरूग्ण व इतर भक्त देवदर्शन घेण्यासाठी जातात. त्यापैकी भूतबाधा झालेली आहे असे गृहीत धरून गेलेले अनेक मनोरूग्ण व त्यांचे कुटुंबीय येथे महिनोंमहिने झोपड्यांतून तर कधी उघड्यावर वस्ती करून राहतात. त्यांना अनेक गैरसोईंना सामोरे जावे लागते.
वास्तविक पाहाता येथे येणार्यांच्या कथा ऐकल्या तर त्यात कित्येकांच्या समस्या ह्या घरगुती अडचणीतून निर्माण झाल्यामुळे त्यांना मानसिक दौर्बल्य आलेले असते. काहींना ही बाहेरची बाधा, करणी, देवदेवस्की, जारण मारण आहे असे देखील वाटते. कित्येकांच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य असते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात परंतु असे असताना लोक मात्र पदरमोड करून दत्ताच्या ठाण्याला भेट देतात व दत्ताला आपलं गार्हाणं ऐकवतात. त्यासाठी लोक अनेक तास, दिवस रात्र, पालखी उठण्याची वाट बघतात व तिच्या मागे धावतात. जेव्हा पालखी उठते तेव्हा ढोल-ताश्यांचा नगारा वाजतो व माणसं सोबत आणलेल्या, कधी मनोरूग्णासह, तर म्हतार्या आई वडिलांसह सैरावैरा धावत सुटतात. त्या गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये कित्येकांना गुदमरायचेदेखील होते. कुणाला मार लागतो, तर कुणी विव्हळत तेथेच मागे मुर्छीत पडून राहतात, पालखी मात्र पुढे जाते. कित्येक मनोरूग्ण दगडी खांबावर मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत(गाभार्यासमोर) वर चढण्याचा प्रयत्न करतात. (वास्तवात हे खांब चढण्यास फारच सोपे आहेत) लोक मात्र येथील मनोरूग्णांच्या कथा फुगवून सांगतात. म्हणे, भूत लागलेल्या व्यक्ती सर सर भिंतीवरून वर चढतात व मंदिरात मध्यभागी छताला चिकटतात वगैरे वगैरे. यात तथ्य काहीच नसते. ते केवळ कपोलकल्पित सांगणं असतं.
अधिक अभ्यास करता असे लक्षात येते की, येथे चातुर्वर्ण्य ठायी ठायी भरलेला आहे. शिवाय येथे भटभिक्षुकांची रोजगार हमी योजना अष्टौप्रहार चालू असते. त्यामुळे येथे रूग्ण बरा होणं दूरच; उलट तो अधिक आजारी होण्याची शक्यताच जास्त.

2) सैलानी बाबाचा दर्गा : महाराष्ट्रातील पिंपळगाव सराई हे चिखली पासून जवळच असलेले ठाणं- येथे सैलानीबाबांचा दर्गा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक अघोरी प्रकार दृष्टीस पडतात. नुकतेच फेबु्रवारी 2011 मध्ये येथे एक मोठी दुर्घटना घडली, नव्हे घडवून आणली असे सुकृत दर्शनी दिसून येते. जवळच्या एका झोपडीत तीन महिलांना जाळून मारण्यात आले. झोपडीत आग लागली(का लावली?) आज हे भुताचं ठाणं फारच प्रसिद्धीच्या झोतात आहे. देशभरातून अनेकजण येथे आपापले मनोरूग्ण घेऊन येतात. येथे मात्र ह्या रूग्णांचे हाल कुत्रंही खात नाही. त्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नातेवाईक आपल्या रूग्णांना येथे सोडून निघून जातात. बिचारे मनोरूग्ण कधी भीक मागून तर कधी छोटी मोठी चोरी करून, कधी छोटं मोठं अंग मेहनतीचे काम करून आपला गुजारा करतात, काही मनोरूग्णांनी स्वत:साठी जवळच्या डोंगरात झोपड्या उभ्या केलेल्या आहेत. येथे यात्रेनिमित्ताने लाखो लोक हजेरी लावतात. यात्रा कालावधीत तर येथील रूग्णांना पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध होत नाही. साधा मोबाईल चार्ज करायचा तर 15/20 रूपये मोजावे लागतात. पिण्याच्या पाण्याची तर आणखीनच गोष्ट वेगळी. येथे भूतबाधा झाली आहे याच्या नावाने रूग्णांना(मनोरूग्ण) चक्क साखळदंडाने बांधतात. हातापायात चक्क बेड्या ठोकतात. कधी वेताच्या छडीने तर कधी केसांची ओढाताण करून मनोरूग्ण/स्त्रियांचा छळ केला जातो. येथे प्रशासक नावाची कोणतीही गोष्ट नाही. हे ठिकाणं म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी जेव्हा तीन महिलांचा जळून मृत्यू झाला तेव्हा नागरिकांच्या दबावापुढे जिल्हाधिकारी एन.रामास्वामी नमले व त्यांनी रूग्णांच्या हाता-पायात बेड्या न घालण्याचे आदेश दर्गा व्यवस्थापनाला दिले. आणि लवकरच जवळच एक पोलीस ठाणे स्थापण्याची घोषणा केली.
3) मुंबईतील मीरा दातारचा दर्गा : हा असाच वर्षोंवर्षे भूतबाधा झालेल्यांच्या(वास्तवात मनोरूग्ण) उपचारासाठी प्रसिद्ध आहे. ठार वेडा ज्याला म्हणावे असे जुनाट आजार झालेले अनेक रूग्ण येथे साखळदंडाने जखडून महिनोंमहिने बांधून ठेवतात. बिचारे मनोरूग्ण ओरडतात, रडतात परंतु येथे कुणालाही त्यांची दया येत नाही. येथे अनेक रूग्णांना भूत -बाधेच्या नावाने मारहाण ही केली जाते. येथे भूत उतरवण्याचे अनेक प्रकार दृष्टीस पडतात. कधी वेताच्या छडीने बदडतात. कधी मोरपिसाने तर कुणाला चक्क लोखंडी साखळदंडाचा प्रसाद. कधी कोंडून ठेवतात. कधी उपासमार करतात तर कधी आठ/पंधरा दिवस रूग्णांना आंघोळ देखील घातली जात नाही. हे सर्व भूतबाधेच्या नावाने चालू असते. अनेक वेळा स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील येथील हे अघोरी, मारहाणीचे प्रकार बंद केले जात नाहीत. कारण सगळा समाजच अंधश्रद्धेची शिकार झालेला आहे अशी स्थिती आहे तेथे न्याय कुणाकडे मागायचा?
अशा ह्या ठिकाणी एका बाजूला देवाच्या/भुताच्या धर्माच्या नावाने सामान्य माणसांचीच नव्हे तर शिकल्या- सवरलेल्या शिक्षित(सुशिक्षित नव्हे) आडल्या, नाडलेल्या सार्यांचीच फसवणूक होत आहे. कुठे गंडे, दोरे देतात; कुठे रूग्णांना चटके दिले जातात; तर कुठे मिरच्यांची धुरी देऊन छळ केला जातो. मनोरूग्णांना साखळदंडाने बांधण्याची प्रथा तर 12 व्या शतकापासून चालत आलेली दिसते. परंतु अशा ठिकाणी उपचाराच्या नावाने रूग्णांना/भक्तांना फक्त अघोरी प्रकारांना बळी पडावे लागते. उपचार करून कुणी बरा झालेला आहे अशी शक्यता हजारात एखादीच असते, ती सुद्धा मनोशारीरिक आजाराने पछाडलेल्या व्यक्तीची. हे सर्व प्रबोधनाने बंद होईल असे वाटत नाही कारण येथे काही हितसंबंधित लोकांचे रोजी रोटीचे, काळ्या धंद्याचे गुपीत लपलेले असते. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची गरज आहे. आणि ते सुद्धा सहकारी व्यवस्थेने इच्छाशक्ती व्यक्त केली तरच शक्य आहे. अन्यथा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभर अशी अघोरी उपचारकेंद्रे चालू राहतील व त्यात अनेक जणांचा बळी जाईल यात शंका नाही.
महाराष्ट्र अंनिसने अशा तर्हेची अनेक ठाण्यांवरील बुवाबाजी बंद पाडली आहे. त्यात प्रामुख्याने (अ) नगर जिल्ह्यातील जामगावच्या कोंडीराम बढे बाबा यांचा 40 एकर जागेतील मठ समितीने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बंद पाडला व मुख्य इमारतदेखील जमीनदोस्त केलेली आहे. आज तेथली बुवाबाजी, भूतबाधा उतरवण्याचे काळे कारनामे थांबलेले आहेत. त्याचप्रमाणे (ब) परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील मौलाबाबाचं ठाणं. जे रईसा शेख व दत्ता भगत ह्या जोडगोळीने सुरू केलेले होते. येथेसुद्धा भूतबाधा, करणी, जारण मारण, चेटूक, काळी जादू, मूठ मारणे वगैरे गोष्टीकरीता जालीम उपाय केले जात. त्याचप्रमाणे अंगदुखी, पाठदुखी या करिता देखील सकनावती मातेचा संचार/मोलबाबांचा संचार वगैरे करून अनेक मनोरूग्णांच्या नातेवाईकांना रईसा शेख व दत्ता भगत यांनी प्रत्येकी 8 ते 10 हजार रूपयांना गंडा घातलेला आहे. त्याशिवाय सोन्या चांदीची मागणीही वरकरणी चालत असे. ही बुवाबाजी देखील स्थानिक शाखेने पोलिसांच्या मदतीने बंद पाडली आहे. (क) अशाच प्रकारे भाळवणी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर येथील येशूबाबाचा संचार अंगात आणून ‘संचारकन्या’ म्हणून नावारूपाला आलेली अमृता कांबळे ह्या येशू भक्तीनीची भूतबाधा, करणी, चेटूक उतरवण्याची पद्धत भयानक होती. ती रूग्णांच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जोराने दाब देऊन पेशंटना बेशुद्ध करीत असे, तर कधी कधी आजारी व्यक्ती मुर्छा येऊन धाडकन खाली पडत असे. मग रूग्णांच्या कानात बाईचे टोळकं जोराने ‘हलुलिया जिऽझ्ऽऽस? असे ओरडत असे. सोलापूर, बार्शी शाखेने ही बुवाबाजी बंद पाडली खरी परंतु कांबळे बाईंनी कार्यकर्त्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. कार्यकर्त्यांना त्याकरिता 7 ते 8 वर्षे सतत झगडावे लागले.
या प्रकारे अनेक ठिकाणी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर समिती प्रबोधन व संघर्ष या माध्यमातून लढा देत आहे. तुम्हीही साथ दिल्यास अंतिम विजय आपलाच होईल. यात शंका नाही.
-मच्छिंद्रनाथ मुंडे