Categories
भूताटकी

पाठलाग भुतांचा

मे - २०११

भित्र्या माणसांचा पाठलाग मुंजा, हडळ, आग्यावेताळ इ. नावाने ओळखली जाणारी भूतं करतात. भित्यापोटी ब्रम्हराक्षस ह्या म्हणीतून हेच सांगितले जाते. वास्तवात अशी माणसांचा पाठलाग करणारी, त्याला झपाटणारी भुतं नसतात. मग ती कुठं असतात? भुतं असतात माणसाच्या मनात. तथाकथित विविध प्रकारच्या भुतांचा पाठलाग निर्भयतेने केला तर भूत सापडत नाही. तरीसुद्धा माणसं भुताच्या भ्रमाने पिडलेली आढळतात. तो असतो सावल्यांचा खेळ किंवा आवाजाचा भ्रम किंवा केवळ मनाचाच भास.

            अमेरिकेतील एका सर्वेक्षणात सुमारे 40% लोक भुतावर विश्वास ठेवल्याचे आढळते. आपल्याकडे हे प्रमाण यापेक्षा जास्तच असेल. भुतांच्या गप्पा सुरू करा आणि पहा. लोक, मी भूत पाहिल्याचे छातीठोकपणे सांगतात, भुताशी झटापट झाल्याचे रंगवून सांगतात, भुताने हाक मारल्याचे ऐकवतात.

            वास्तव सृष्टीत नसलेल्या भुताचे हे खेळ खरे वाटतात याला कारण आहे आपणाला होणारे विविध प्रकारचे भ्रम किंवा भास. हे भ्रम खरेखुरे वाटतात. परिणामी लोक त्याला कवटाळतात.

            भ्रम तीन प्रकारचे आहेत. इंद्रियभ्रम, मनाचे भ्रम व विचारभ्रम.

इंद्रियभ्रम : या भ्रमाला Illusion असे नाव आहे. आपली ज्ञानेंद्रिये फसू शकतात.

क्र.1 पहा. चित्रातील काळ्या भागावर लक्ष केंद्रीत केले तर तो फ्लॉवरपॉट वाटतो. पण दोन्ही बाजूच्या पांढर्‍या भागावर लक्ष केंद्रीत केले तर दोन माणसांचे चेहरे समोर येतील.

            चित्र 2 मधील उभ्या रेषा कमी जास्त लांबीच्या वाटतात. पण मोजून पाहिल्यास त्या समान लांबीच्या आहेत हे लक्षात येते.

            आकृती 3 मध्ये दोन आडव्या समांतर रेषा वरच्या चित्रात आत वाकलेल्या तर खालच्या चित्रात त्या मध्ये बाहेर वाकलेल्या दिसतात.

            वरील तीनही उदाहरणे दृष्टीभ्रमाची आहेत. नसलेले भूत दिसण्याला दृष्टीभ्रम हे एक महत्वाचे कारण आहे. दृष्टीभ्रमाप्रमाणेच ध्वनीभ्रम, स्पर्शभ्रम, गंध(वास) भ्रम, चवीचा भ्रम असे विविध भ्रम आपणाला होत असतात.

            आपणाला बाह्य जगाचे ज्ञान होण्यात डोळा व कान यांचे मोठे योगदान असते. भुताचा भ्रम होण्यामागे दृष्टी व आवाज महत्वाचे ठरतात. याचे अनेक अनुभव सांगता येतील. उदाहरण म्हणून अब्राहम कोवूरांच्या ‘बीगॉन गॉडमेन’ या पुस्तकातील एक अनुभव सांगता येईल.

            अब्राहम कोवूर व त्यांच्या पत्नी आक्वा कोवूर रात्रीच्या वेळी त्यांच्या टेकडीवरील घरी चालले होते. त्यांचा रस्ता खिंडीतून जात होता. खिंडीत झाडांनी रस्त्यावर दाट काळोख पडला होता. या काळोखात आक्वा कोवूरांना भूत दिसते. या भूताने हत्तीचा आकार धारण केला होता. तो भूतरूपी हत्ती विचित्र ओरडत होता. तो कान हालवीत होता. अब्राहम कोवूरांनी निर्भयपणे या भुताला हाक मारली. तेव्हा समोर आला एक माणूस. हा गृहस्थ कारमध्ये झोपला होता. कारण कार तेथे बंद पडली होती. कार म्हणजे हत्ती हा आक्वा कोवूरांना झालेला दृष्टीभ्रम होता. त्या गृहस्थाचा घोरण्याचा आवाज हा ध्वनीभ्रम होता व आक्वा कोवूर त्यास भुताचा आवाज समजत होत्या. तो गृहस्थ दरवाजा उघडत असताना त्याची हालचाल म्हणजे हत्तीचा कान हलतोय असे आक्वा कोवूरांना वाटले. हा दृष्टीभ्रमच होता.

            खरं तर भूत बाह्य वास्तवात नसतंच. पण भुताचे विचार आपल्या मनात पक्के झाले असतील तर आपणास भुताचे भ्रम कसे होतात हे वरील उदाहरणावरून स्पष्ट होईल. भिंतीवरच्या छायेला, अंधारात बागुलबुवा समजणे हा लहान मुलांचा भ्रम व मोठेपणी होणारे भुताचे भ्रम एकाच प्रकारचे होत.

            भूत डोक्यात बसणे म्हणजे भुताचा विचार मनात पक्का होणे हा विचारभ्रम आहे. याला डेल्युजन(Delusion) असे नाव आहे. म्हणून भुताची भीती दूर करण्यासाठी हा विचारभ्रम नाहीसा होणे आवश्यक आहे. भुताची भीती हा अज्ञानमूलक विश्वास (Irrational) आहे. हा उखडून टाकला तर भूत लागणार नाही. भुताचा विचार मनात असेल तर भुताच्या तथाकथित अड्ड्याजवळून आपण जात असताना, आपले मन, भुताची सूचना घेते व कसलाही आवाज आला तर तो भुताचा किंवा कोणतीही आकृती दिसली तर ती भूतच आहे असे वाटायला लागते. याला सूचनावर्तन म्हणतात.

            सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला भूत दिसायचं नसेल तर डोक्यातील भूत घालवणे व इंद्रियभ्रमांना ओळखणे आवश्यक आहे. पण समाजात याच्या उलट संस्कार घडत असतात. यासाठी प्रबोधन हाच उपाय आहे.

            भुतांचा समाजमानसावरील प्रभाव ओळखून काही लोक ढोंगाचे भूत उभे करतात. काही वेळा संकटातून बाहेर पडण्यासाठी ढोंगाचे भूत निर्माण केले जाते. देवऋषी व बुवा महाराज असं भूत निर्माण करून लोकांचं शोषण करतात. ढोंगाच्या भुतामागे इंद्रियभ्रम किंवा मनाचा आजार नसतो. फक्त असते नाटक. अशी नाटके ओळखायला शिकले पाहिजे. त्यासाठी दाखवायला हवा निर्भयपणा. अंनिसच्या सहवासात असा निर्भयपणा आपण मिळवू शकाल.

मनाचे भ्रम व मनाचे आजार (Hallucination)

            भूत लागण्याचा हा प्रकार सर्वात गंभीर आहे. प्रथम मनोभ्रम म्हणजे काय ते पाहू या. दोरीला साप समजणे हा दृष्टीभ्रम झाला. पण दोरीच नाही पण तेथे साप आहे असा भ्रम झाला तर हा मनातील बिघाड होय. मनाच्या भ्रमांना हॅल्युसिनेशन(Hallucination) असे नाव आहे.

            नसलेली दृश्ये दिसणे, नसलेला आवाज ऐकू येणे इ.प्रकारचे भ्रम हे मनोभ्रम होत.

            मनोभ्रम निरोगी अवस्थेत तसेच मानसिक बिघाड झाल्यावर होऊ शकतात. निरोगी व्यक्तींना झोपेत जाणेपूर्वी किंवा झोपेतून जागे होण्यापूर्वी अने भ्रम होऊ शकतात. या भ्रमांचे कारण काय? आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे आलेले सिग्नल जसेच्या तसे मेंदूमध्ये संग्रहित केले जात नाहीत. उदा.एखाद्या दृश्यापासूनचे किरण डोळ्यातील भिंगाने रेटिनावर एकवटतात. व तेथे त्या दृश्याची प्रतिमा तयार होते. कॅमेर्‍यात देखील हीच क्रिया घडते. पण कॅमेर्‍याने फोटो घेणे व आपण एखाद्या वस्तूला पाहणे यात एक फरक आहे. रेटिनावरील प्रतिमा तुकड्या तुकड्यांनी मज्जातंतूद्वारे मेंदूकडे विद्युत सिग्नलच्या स्वरूपात पाठविली जाते. तेथे तीत इतर सिग्नल मिसळले जातात(भावना, स्मृती इ. केंद्राकडून आलेले). संगणकात जशी आंतरक्रिया घडते तसेच हे आहे. यामुळे डोळ्यांनी दिलेली प्रतिमा एवढेच तिचे स्वरूप रहात नाही. मेंदूने त्यात भर टाकून त्या प्रतिमेचे नवे मॉडेल बनते.

            पण ज्ञानेंद्रियाशिवाय मेंदूत अशा काही आंतरीक क्रिया घडू शकतात ज्यामुळे व्यक्तीस विविध दृश्ये वा आवाज यांची जाणीव झाल्याचा भास होतो.

            एके दिवशी मी कुशीवर वळून झोपी जात होतो. पूर्ण झोपेत जाण्यापूर्वीची ही अवस्था होती. खिडकीतून आलेल्या बाहेरच्या धूसर प्रकाशात मला माझ्या नातीचा चेहरा दिसत होता. एकाएकी माझ्या लक्षात आले. माझे डोळे मिटलेले मग तिचा चेहरा मला कसा दिसतोय? विशेष म्हणजे मी तिच्या चेहर्‍यावरून माझा हात हळूवारपणे फिरवीत असल्याचे मला जाणवत होते. एकाएकी बाहेरच्या आवाजाने मी डोळे उघडले पण माझा हात नातीच्या चेहर्‍याजवळ नव्हता. तो बाजूला माझ्या अंगावरच्या चादरीत होता हे माझ्या ध्यानात आले. डोळे मिटलेले असताना नातीचा चेहरा दिसणे व माझा हात तिच्या चेहर्‍यावर फिरताना जाणवणे हा माझा मनोभ्रम होता.

            मनाच्या आजारामुळे आपल्याला मनोभ्रम होतात. सिझोफ्रेनियासारख्या आजारात व्यक्तीला भुताने झपाटल्याचा भ्रम होऊ शकतो. विचित्र आवाज ऐकू येतात. मादक पदार्थांच्या सेवनामुळे मनोभ्रम होतात.

            भुताने झपाटलेल्या व्यक्ती या मानसिक आजाराच्या बळी असतात. त्यांना होणारे भुताचे भ्रम हे त्यांच्या मानसिक असुंलनातून निर्माण होतात. हा आजार बरा झाला की, त्याला दिसणारी भुते पळून जातात. मानसिक संतुलन ढळलेल्या अनेक स्त्रियांवर भुताने झपाटले अशा समजुतीतून अनन्वीत अत्याचार केले जातात. अजूनही हे घडताना दिसते.

            शोधक बुद्धीच्या निर्भय माणसांनी आतापर्यंत भुताचे वास्तव्य असलेल्या जागांचा शोध घेतला आहे. तेथील भूतं पळाली. नाहीशी झाली. कारण ती तेथे नव्हतीच. पण मानसिक व्याधींनी ग्रस्त झालेल्या व्यक्तींना ज्या तथाकथित भुतांनी पछाडले, ती भुतं कधी पळून जाणार? यासाठी मानसिक आरोग्याची चळवळ उभारणे हाच उपाय वाटतो.

-प्रा.प.रा.आर्डे