Categories
फसवे विज्ञान

ब्लड लेटींगचा अस्त

जुलै - २०१४

मे 2014 च्या अंकात ब्लड लेटींगवर प्रकाश टाकला होता. वैद्यकीय क्षेत्रात औषध चाचणीची सुरुवात झाली. ती आरमारातील सैनिकांना ग्रासणार्‍या स्कर्व्ही रोगाच्या बाबतीत. नंतर ती ब्लड लेटींगसारख्या संशयास्पद उपचाराना लावली जाऊ लागली. परिणामी अशा चुकीच्या उपचारातील फोलपणा उघड होत गेला.

ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा एके काळच्या ब्रिटीश साम्राज्याचे सामर्थ्य कशात होते? ते होते त्यांच्या आरमाराच्या सामर्थ्यात. पण ह्या सामर्थ्याची किंमतही ब्रिटनला चुकवावी लागली. समुद्रावरील संघर्षात युद्धांमध्ये चार सैनिक मेले तर 1000 लोक स्कर्व्ही नावाच्या रोगाने मरण पावले. ब्रिटीश नेव्हीचा हिरो कमांडर जॉन अ‍ॅन्सॉन चार वर्षांची मोहीम संपवून जेव्हा ब्रिटनला परतला तेव्हा त्याच्या सैन्यदलातील 2/3 सैनिक स्कर्व्ही या आजाराने मेले. एलिझाबेथ राणीच्या सैन्य दलात सहभागी असलेला सर्जन विल्यम क्लोव्हज् याने स्कर्व्हीच्या तडाख्यात सापडून मृत्यूमुखी पडलेल्या वीस लाख नाविकांची भयानक लक्षणे तपशीलवारपणे टिपून ठेवली आहेत.

वाचकहो! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की, या सैनिकांचे प्राण वाचले असते जर त्यांच्या रोजच्या जेवणात लिंबाचा वापर झाला असता तर! लिंबामध्ये असते क-जीवनसत्व. जे स्कर्व्हीसारख्या आजारांना नियंत्रणात ठेवू शकते.

क-जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्हीची लागण झालेल्या सैनिकाच्या हिरड्या सडायच्या, गाल सुजून कठीण व्हायचे, श्वासाला दुर्गंधी सुटायची, पायाच्या पोटर्‍या सुजायच्या व अशक्तपणा वाढायचा. हे आपणाला उशीरा माहीत झाले. क-व्हिटॅमिन्सचा शोध घेणार्‍या वैज्ञानिकांनी एकूण मानव जातीवर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. या शोधाचा इतिहास जाणून घेणे स्फुर्तीदायक ठरेल. मानवी शरीरात क-व्हिटॅमीन हे स्नायू व रक्तवाहिन्या यांना धरून ठेवण्यासाठीचे चिकट द्रव्य म्हणून कार्य करते. शरीरातील जखमा व ओरखडे भरून काढण्यासाठी याची मदत होते. पण गंमत अशी की, हे जीवनसत्व शरीर स्वत:हून निर्माण करू शकत नाही. त्याचा पुरवठा बाहेरून करावा लागतो. क-जीवनसत्वाचा पुरवठा विशेष करून लिंबामधून व इतर फळामधून होतो. आपल्या आहारात फळांचा व लिंबाचा समावेश अत्यंत आवश्यक का आहे याचे कारण आता आपणास कळेल.

स्कर्व्हीच्या आजारावर उपाय करण्याचा यशस्वी प्रयोग केला तो 1746 साली जेम्स लिंड या स्कॉटीश सर्जनने. त्याच्या अगोदर अनेक विद्वानानी या रोगाला आटोक्यात आणण्यासाठीच्या विविध उपपत्ती मांडल्या पण त्या सर्व निरर्थक ठरल्या. लिंडने प्रचलित समजुती, पूर्वग्रह व ऐकीव माहिती यांचा त्याग करून त्याऐवजी काटेकोर तर्कशक्ती, विवेकबुद्धी व चोखंदळपणा यांचा वापर करून स्कर्व्हीवर यशस्वी मात केली. त्याने स्कर्व्हीसारख्या आजाराच्या संशोधनात प्रथमच काटेकोर नियंत्रित वैद्यकीय निदान चाचणीचा वापर केला जी आज मेडिकल क्षेत्रात सर्वत्र वापरली जाते. आधुनिक औषधे बनवताना या पद्धतीचा जगभर वापर केला जातो.

लिंडने तर्क केला की, स्कर्व्हीने आजारी पडलेल्या वेगवेगळ्या रोग्यांना वेगवेगळा आहार दिला तर? पण असा विचार इतर लोक करत नव्हते. हेच लिंडचे वेगळेपण होते. लिंडने रोग्यांचे गट करून एका गटाला आहारात संत्रे व लिंबू दिले. खरं तर ही अंधारातील उडी होती. लिंडच्या असं लक्षात आलं की, इतर खाद्यपदार्थ ज्यांना दिले ते रोगी बरे झाले नाहीत पण संत्रे व लिंबू दिलेले रोगी बरे झाले. पण लिंडचे निष्कर्ष दुर्लक्षित राहिले कारण त्याच्या काळात आजच्यासारखे मेडिकल संशोधन सुनियोजित नव्हते. फ्रान्सबरोबरच्या चाललेल्या सात वर्षांच्या युद्धात इंग्लंडने 1512 खलाशी लढाईत गमावले तर स्कर्व्हीमुळे गमावलेले सैनिक होते 1 लक्ष.

पुढे 33 वर्षांनी गिल्बर्ट ब्लेन याने लिंडच्या संशोधनात लक्ष घातले व नाविकांच्या आहारात लिंबाच्या रसाचा उपयोग करण्याची शिफारस केली. या संशोधनाला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी इंग्लंडमध्ये 50 वर्षे काळ गेला.

पण स्कर्व्हीवरील उपचारात इंग्लंड इतर राष्ट्रांपेक्षा पुढे राहिले आणि याचा फायदा इंग्लंडच्या आरमाराला मिळाला. 1805 च्या ट्राफलगारच्या लढाईपूर्वी नेपोलियनने ब्रिटनवर हल्ल्याचा बेत आखला. पण ब्रिटीश नौकांनी नेपोलियनच्या आरमाराला जखडून ठेवण्यात यश मिळविले कारण त्यांच्या सैनिकांना झालेला ताज्या लिंबाच्या रसाचा पुरवठा. लिंबातील क जीवनसत्वामुळे ब्रिटीश सैनिक स्कर्व्हीपासून वाचले. त्यामुळे ते फ्रेंच आरमाराला रोखू शकले जरी फ्रेंच आरमार अधिक सामर्थ्यवान होते तरी.

एखाद्या राष्ट्राचे भवितव्य ऐतिहासिक महत्वाचे हे खरेच पण औषधी उपचाराची चाचणी(क्लिनिकल टेस्ट) पुढच्या अनेक शतकाचा विचार करता त्याहून महत्वाची ठरते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ संशोधनात अशा चाचण्या नियमितपणे वापरू लागले. ज्यांचा उपयोग कोणता उपचार यशस्वी व कोणता निरूपयोगी हे ठरविण्यासाठी होऊ लागला. परिणामी जगभरात लाखो लोकांचे जीव वाचविण्यात यश मिळू लागले कारण चाचणीत परिणामकारक म्हणून सिद्ध झालेली औषधे वापरात येऊ लागली व फसव्या, चुकीच्या उपचाराचा प्रचार कमी होत गेला.

नियंत्रित क्लिनिकल चाचणीचा पहिला प्रयोग उपचार क्षेत्रात महत्वाचा गणल्या गेलेल्या ब्लड-लेटिंगवर केला गेला. मरणासन्न जॉर्ज वॉशिंग्टनवर ब्लड लेटिंगचा उपचार झाल्यानंतर 10 वर्षांनी स्कॉटीश मिलिटरी सर्जन अलेक्झांडर हॅमिल्टन याने ब्लड लेटींग ही उपचारपद्धती तपासायचे ठरविले. वास्तविक कोणत्या तरी एकाच प्रकारच्या (उदा.ताप) आजारावर अशी चाचणी घेणे हे तर्काला धरून आहे. पण हॅमिल्टन हा पोर्तुगालमध्ये एका युद्धात व्यग्र होता. साहजिकच त्याला अशा तर्‍हेने निवड करून पेशंटवर उपचार करणे अवघड होते. मग त्याने सर्व प्रकारच्या आजारांची एकत्रित निरीक्षणे नोंदवणे पसंत केले. कारण ब्लड-लेटिंगचा सर्व प्रकारच्या आजारावर उपचार करण्यास त्यावेळी वैद्यकीय क्षेत्रात मान्यता होती.

हॅमिल्टनने 366 सैनिक या चाचणीसाठी निवडले. त्यांचे तीन गट केले. दोन गटावर स्वत: व अँडरसन नावाच्या डॉक्टरकडून उपचार केले. या उपचारात ब्लड-लेटिंगचा समावेश नव्हता. तिसरा गट लॅन्सेट या उपकरणाच्या मदतीने ब्लड-लेटिंग करणार्‍या एका डॉक्टरकडे सोपविला होता. निष्कर्ष काय? हॅमिल्टनचे चार पेशंट दगावले. अँडरसनचे दोन परंतु ब्लड-लेटिंग ग्रुपमधील 35 जणांचा मृत्यू झाला होता. ब्लड-लेटींग उपचारात मृत्यू पावल्याचा दर त्याशिवाय उपचारात मृत्यू पावलेल्यांच्या दहापट जास्त होता. याचा अर्थ स्पष्ट आहे. ब्लड-लेटिंग हा माणसे वाचविण्याचा उपाय नव्हे तर माणसं मारण्याचा उपाय होता.

फक्त ब्लड-लेटिंग सोडले तर इतर सर्व घटक वरील चाचणीत समान होते. यामुळेच ब्लड लेटिंगचा परिणाम तपासणे शक्य झाले. तीनही गटांची देखभाल व सोयी समान दर्जाच्या होत्या. म्हणून ब्लड-लेटिंग हे तिसर्‍या गटात जास्त रोगी दगावण्याचे कारण आहे हा निष्कर्ष बरोबर ठरतो.

हॅमिल्टनने सर्व गटात पेशंटची विभागणी शंकेला जागा न उरेल अशी केली होती; म्हणजे मुद्दामहून जास्त वयाचे म्हातारे रोगी ब्लड-लेटिंग गु्रपकडे असं केलं नव्हतं. वय, उत्पन्न, लिंग, रोगाची तीव्रता इ. घटकांच्या बाबतीत सर्व गटात समान न्याय म्हणजे गटातील निवड ही स्वैरपणे randamized अशी केलेली होती. यामुळे आपणास अज्ञात असे घटक सर्व गटात सारखेच होतात व चाचणीला अधिक विश्वसनीयता येते. Fair न्याय्य व balance समतोल अशी ही चाचणी, गटातील संख्या जितकी जास्त तितकी अधिक बिनचूक बनते. हॅमिल्टनच्या चाचणीत 366 ही संख्या तशी योग्य आहे. अशा चाचणीला इंग्रजीतrandomized controled trial किंवा randomized clinical trial असे नाव आहे. आधुनिक वैद्यक क्षेत्रात अशी चाचणी म्हणजे gold standard आहे. जरी हॅमिल्टन ब्लड-लेटिंग बाबतची स्वैर क्लिनीकल चाचणीत यशस्वी झाला तरी त्याने या चाचणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले नाहीत. त्याची त्याविषयीची कागदपत्रे 1987 मध्ये नजरेस आली. रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियनच्या एडींबरो येथे एका ट्रंकमध्ये ती ठेवलेली होती. कोणतेही महत्वाचे संशोधन प्रसिद्धीस न देणे म्हणजे कर्तव्य परांमुखता होय कारण असे प्रकाशन दोन प्रकारचे परिणाम करते. एक म्हणजे संशोधन रिपीट करणे व निष्कर्ष पुन्हा पडताळणे(दुसर्‍यांनी) यामुळे मूळ संशोधनातील चुका कळतात किंवा त्या संशोधनाच्या खरेपणाला दुजोरा मिळतो. दुसरे म्हणजे नवीन संशोधन इतरांपर्यंत पोचविण्याचा तो उत्तम मार्ग आहे, ज्यामुळे त्याचा इतर लोक उपयोग करू शकतात.

हॅमिल्टनने ब्लड-लेटिंगचे संशोधन प्रकाशित केले नाही त्यामुळे ब्लड-लेटिंगच्या वापराबाबतचा उत्साह कमी झाला नाही. त्याऐवजी ब्लड-लेटिंगचा वापर थंडावण्यास आणखी काही वर्षेगेली. फ्रेंच डॉक्टर झळशीश र्ङेीळी व इतरांनी स्वत: याबाबत प्रयोग केले व हॅमिल्टनच्या संशोधनाला दुजोरा दिला. तेव्हाच ब्लड-लेटिंगचे प्रस्थ कमी होण्यास सुरवात झाली. नव्या संशोधकांनी काढलेले निष्कर्ष हेच सुचवित होते की ब्लड लेटिंग हे जीव वाचविणारे नाही तर जीव घेणारा उपचार आहे. या संशोधनाद्वारे असा निष्कर्ष निघू शकतो की जॉर्ज वॉशिंग्टनच्या मृत्यूला ब्लड लेटिंग मुख्यत: जबाबदार असावे.

प्रचलित समजुती सोडणे अवघड असते. विरूद्ध पुरावे मिळून सुद्धा. ब्लड लेटिंगबाबत असेच घडले. डॉक्टर मंडळींना हे प्रॅक्टीस सोडणे कठीण वाटू लागले. ते नव्या निष्कर्षाकडे कानाडोळा करीत. उदा. Piere Louis ने त्याच्या संशोधनाचे निष्कर्ष 1828 मध्ये जाहीर केले असले तरी अनेक डॉक्टरांनी ब्लड-लेटिंग बाबतचे नकारात्मक निष्कर्ष फेटाळले कारण हे निष्कर्ष काढण्यासाठी गोळा केलेल्या माहिती संख्येने मोठ्या असलेल्या रोग्याबाबत संख्याशास्त्रीय स्वरूपाची होती. संख्याशास्त्रीय निष्कर्षापेक्षा समोर असलेल्या पेशंटला ट्रीट करणे महत्वाचे असा डॉक्टरांचा युक्तीवाद. एखादा उपचार अनेक रोग्याबाबत एकत्रितपणे काढलेल्या निष्कर्षावरून सुरक्षित व परिणामकारक आहे का हेच योग्य असे लुईसचे मत. संख्याशास्त्रीय माहितीशिवाय खरे मेडिसीन अजमावणे शक्य नाही.

एखादे औषध वा उपचार कितपत परिणामकारक आहे याची पूर्वचाचणी(संख्याशास्त्रीय) घेणे आवश्यक आहे असे मत जेव्हा 1819 मध्ये स्कॉटीश डॉक्टर अलेक्झांडर मॅक्लिन यांनी मांडले(तेव्हा ते भारतात कार्यरत होते) तेव्हा डॉक्टर मंडळींनी याला आक्षेप घेतला. रोग्याच्या आयुष्याशी हा खेळ आहे असा दावा त्यांनी केला. मात्र डॉ. अलेक्झांडर यांनी असा प्रतीवाद केला की चाचणी न घेता रोग्यावर औषधांचा मारा करणे हे अधिक धोकेदायक व निरूपयोगी ठरू शकते. पुराव्याशिवाय औषधाचा वापर म्हणजे आपल्या बांधवाच्या जीवाशी खेळ आहे.

क्लिनीकल ट्रायलचा शोध लागूनसुद्धा आणि ब्लड लेटींगच्या विरोधात पुरावे मिळाले तरी पण युरोपात अनेक डॉक्टरनी ब्लड-लेटिंग चालूच ठेवले. त्याचे प्रमाण एवढे होते की, फ्रान्समध्ये 42 दशलक्ष जळवांची ब्लड-लेटींगसाठी 1833 या एका वर्षात आयात केली गेली. पण दशके उलटत जाताना डॉक्टर विवेकी वर्तन करू लागले, क्लिनीकल ट्रायलचे निष्कर्ष मानण्यास मान्यता वाढू लागली आणि ब्लड-लेटिंगसारख्या निरूपयोगी पद्धतींचा अस्त होऊ लागला.

क्लिनीकल चाचण्याच्या लिंडाच्या संशोधनामुळे 19 व्या शतकात वैद्यकीय उपचारात क्रांती घडू लागली. औषध व उपचार हा जुगार नव्हे तर काळजीपूर्वक शोधलेल्या विवेकी सत्याचा वापर आहे हे कळायला विसावे शतक उजाडले. क्लिनिकल चाचण्यांनी आधुनिक औषधशास्त्राला व उपचाराला जन्म दिला ज्यामुळे आज आपले आयुर्मान वाढले आहे. आरोग्य चांगले रहात आहे व आपण सुखमय जीवन जगू शकत आहोत.

  • प. रा. आर्डे