Categories
कायदा

चमत्काराचे दावा करणार्‍या महाराजाविरोधात खटला

अभिरूप न्यायालय
मार्च - २०१४

जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी आता सर्वत्र सुरू झाली आहे. या कायद्यातील अनुसूचीमध्ये जी 12 कलमे आहेत त्यांचे अधिक स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. या कलमासंदर्भात विविध शंका व प्रतिवाद निर्माण केले जातील. यांचे समर्पक स्पष्टीकरण देणारे ‘अभिरूप न्यायालय’ हे सदर आम्ही सुरू करित आहोत.

माय लॉर्ड, माझ्या अशिलाला चमत्काराचे दावे करून त्यांचा प्रचार करत लोकांना फसवतो म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुसूचीतील कलम 2 खाली अटक करून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. हा चमत्कार करून दाखवत असल्यामुळे त्याच्यात दैवीशक्ती व अलौकिक सामर्थ्य आहे असे जनसामान्याना वाटते. त्यामुळे अशा दैवीशक्ती लाभलेल्या व्यक्तीला जेलमध्ये डांबून ठेवणे अन्यायकारक आहे. तरी कृपया या आरोपातून त्याला मुक्त करावे.

तुमचा अशील कुठले कुठले तथाकथित चमत्कार करून दाखवू शकतो हे आपण थोडक्यात सांगू शकाल का?

माय लॉर्ड, ही यादी फार मोठी आहे. कारण चमत्काराचा प्रकार भक्ताची अडचण वा दुखण्याच्या स्वरूपाप्रमाणे बदलत जाते. त्यामुऴे आमचा अशील प्रसंगानुरूप चमत्कार करून दाखवत असतो. सामान्यपणे तळहातातून विभूती, तोंडावाटे गणपतीची लहान मूर्ती, हवेत हात फिरवून हार, काढून दाखवतो. एखाद्या सौभाग्यवतीच्या सौभाग्याला धोका आहे, हे आमच्या बाबांच्या अंतर्मनाने कळविल्यास तिच्याच घरातले कुंकू तिच्या हातावर ठेऊन मंतरलेले चार थेंब त्यावर टाकल्यावर बघताबघता लालभडक कुंकू काळेकूट्ट होते. व त्या महिलेला धोक्याची खात्री होते. एखाद्या रुग्णाला पोटाचा विकार आहे हे बाबांना कळल्यास त्याच्यासमोरच नारळ फोडून नारळातून रक्तसदृश पाणी काढून दाखवतात. व रुग्णाला आपल्या पोटातील अशुद्ध रक्त बाहेर पडल्याची खात्री झाल्यामुळे आपण बरे झालो असे त्याला वाटू लागते. अमानवी शक्ती वापरून नुसत्या नजरेने पेटलेल्या ऊदबत्तीला फिरवून त्यानी कौल दिला होता. उकळत्या तेलात बोट बुडवले तरी बोटं न भाजल्यामुळे त्यांच्यातील अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय जमलेल्याना झाला. तांदळाच्या भांड्यात थंड पाणी टाकून भात शिजवून दाखवला होता.

तुमच्या अशीलाकडे खरोखरच तथाकथित दैवीशक्ती असल्यास चमत्काराने शिजवलेला भात त्यानी खाऊन दाखवावा. हातवारे करून हार काढून दाखवण्याऐवजी भोपळा काढून दाखवावा. परंतु तसे तो काही करून दाखवणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही आता सांगितलेले व न सांगितलेले चमत्कार दैवीशक्ती नसतानासुद्धा करता येतात. असल्या गोष्टी हातचलाखीने अगर युक्तीने करणारे पुष्कळ जण सापडतील. त्यासाठीचे साहित्य व करण्याची पद्धत माहित असल्यास हे चमत्कार कुणीही करू शकतो. सबंध कट्यार घशात खुपसल्यासारखे वा जिभेत सुई टोचल्याचे दाखवणे, विस्तव खाणे, विषारी द्रव्य पिणे, संबंध अंगाची घडी करणे, इत्यादी अलौकिक वाटणार्‍या गोष्टी, रस्त्यावर खेळ करून दाखवणारा डोंबारी, गारुडी वा जादूगार सहजपणे करून दाखवू शकतो. परंतु अशा खेळप्रकारातून आपल्याकडे दैवीशक्ती आहे असे ते कधीच दावे करत नाहीत. परंतु तुमचा अशील फसवणुकीच्या उद्देशानेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी तथाकथित चमत्कारांचा वापर केल्यामुळे त्याला अटक केली आहे. तुमच्या अशीलाकडे कुठलीही दैवीशक्ती नसून इतरांच्या या विषयीचा अज्ञानाचा गैरफायदा घेत तो लोकांची आर्थिक फसवणूक करत आहे. जर तुमचा अशील असल्या चमत्काराचे प्रयोग स्वतःपुरते मौजमजेसाठी, छंद म्हणून करत असता तर आरोपीच्या पिंजर्‍यात अडकून पडण्याची वेळ त्याच्यावर आली नसती.

माय लॉर्ड, क्षणभर आपण तो फसवणूक करत आहे यावर विश्वास ठेऊ या. परंतु त्याच्या हजारो भक्तांच्या पैकी एकालाही तो फसवणूक करत आहे हे कसे काय लक्षात आले नाही? त्याच्या विरोधात आवाज का उठवला नाही? इतकी वर्षे उजळ माथ्याने तो कसा काय वावरू शकतो?

या बुवा बाबा लोकांचे अनेक प्रकार आहेत. कोणी चमत्कार करून तर कोणी चमत्कार न करताही लोकांना भुलविणारे. आकर्षक व्यक्तिमत्व, सफाईदार जडबंबाळ, शब्दजंजाळ भाषा, संत महंताची उदाहरणं पेरलेली वाणी, ही काहींची खासियत असते. काही जण भलतेच हुशार असतात. पैसे चारलेल्या शिष्यगणांचा गोतावळा स्वतःभोवती गोळा करून सावज हेरत असतात. विज्ञानाची भाषा वापरून, अंधश्रद्धांच्या विरोधात असल्यासारखे भासवत फसवणूक करणारे बुवाबाबा कमी नाहीत. जनसामाऩ्यांचा त्याच्यावर विश्वास बसण्यामागे चमत्कार हे एक महत्वाचे कारण आहे. साधी सुधी बहुसंख्य माणसे, अडचणीत सापडलेले, कितीही मिळाले तरी त्याहून अधिक समृद्धी हवी यासाठी हपापलेले, या सर्वांना कोणता तरी आधार हवा असतो. हे सर्व नियती व नशीब मानणारे असतात. व नियतीचे इशारे समजावून देणारा, व शक्य झाल्यास त्यात बदल करू शकणारा त्याना कोणी तरी हवा असतो. व चमत्कार करणारी बाब हे काम करू शकेल याची त्यांना खात्री असते. म्हणूनच या बुवा बाबांची चलती असते. फसवणूक लक्षात आली तरी काहीही न झाल्यासारखे गप्प बसतात. परंतु एखाद्याने धैर्य दाखवून वाच्यता केल्यास हजारो जण पुढे येऊन बाबाच्या विरोधात साक्ष देतात.

माय लॉर्ड, आपल्या पुराण कथेत व काही संत – महंतांच्या चरित्रात चमत्कार केल्याचे उल्लेख सापडतात. दगडाला पाय लावल्यानंतर त्या दगडातून एक महिला बाहेर पडली, ज्ञानेश्वरानी भिंत चालविली, रेड्याकडून वेद वदवून घेतले, तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले, इत्यादी किती तरी गोष्टी चमत्कार सदृश वाटतात. मग त्या खोटे आहेत असे म्हणता येईल का?

या तथाकथित चमत्कारांची शहानिशा करण्याचे काम या कोर्टाचे नाही. यासाठी तज्ञ अभ्यासकच काही निर्णय देऊ शकतील. एक मात्र खरे की या चमत्कारामुळे कुणाचेही आर्थिक नुकसान झालेले नाही. देवता वा संत महंतांच्यातील अलौकिक सामर्थ्याची ऐकणार्‍यावर छाप पडावी म्हणून त्यांच्या चरित्रात चमत्कारांची पेरणी केलेली असते. व पिढ्यान् पिढ्या त्या ऐकत असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याकडे कल वाढतो. कालानुरूप त्यात भरही घातली जात असावी. चिकित्सकांच्या मते हे चमत्कार घडल्याबद्दलचा कुठलाही ठोस पुरावा वा आधार नाही, हेही तितकेच खरे. शिवाय याच संतांच्या साहित्याचे मनन केल्यास त्यांचासुद्धा यावर विश्वास नव्हता हेही लक्षात येते. ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत सर्वांनी चमत्कार व त्यापासून मिळणारी फळे याबाबत धोक्याचे इशारे दिले आहेत, वाभाडे काढले आहेत, कोरडे ओढले आहेत. परंतु सारासार बुद्धी गमावून बसल्यामुळे या संतांच्यावरच चमत्कारांची लेबले लावून त्यांची खरी शिकवणच आपण विसरलो आहोत.

परंतु माय लॉर्ड, माझ्या अशिलाने एका निपुत्रिक महिलेला मंतरलेली विभूती दिल्यानंतर वर्षभरात मूल झाले. यावरून माझ्या अशिलाकडे दैवीशक्ती आहे याची लोकांना खात्री पटली. मग त्याचे काय?

तुमच्या अशिलाच्या भक्ताला मूल झाले याचे काऱण बाबाचा चमत्कार नसून त्याची काही मानसिक व लैंगिक कारणे असू शकतात. व ते मानसतज्ञ योग्य शब्दात सांगू शकतील. क्षणभर हातातून चमत्काराने विभूती निर्माण होते असे मानले तरी त्यामुळे आजार दूर होईल, मूल होईल, बक्कळ पैसा मिळू लागेल, परदेशगमनाची संधी लाभेल, कोर्टातील निकाल आपल्या बाजूने लागेल, असे मानावयास पुरावे आहेत का? मुळात तुमच्या अशिलाला आपण आरोपीच्या पिंजर्‍यात अडकवणार आहोत हेच त्यांच्यातील दैवीशक्तीने कळत नसल्यास त्या दैवीशक्तीचा उपयोग काय?

माय लॉर्ड, परंतु चमत्कार करणार्‍या बुवा-बाबांच्या चरणी आपले डोके ठेवल्यामुळे मानसिक समाधान मिळत असेल, काही काळ दुःख विसरता येत असेल तर चमत्कार करणार्‍या बाबांच्यावर फसवणुकीचा आळ का घेतला जातो?

चमत्कार, माणसाची बुद्धी आंधळी, पांगळी व दुबळी करतात. त्यांचे माणूसपण खच्ची करतात. नियतीच्या हातातील बाहुले बनण्याच्या मार्गावर ढकलतात. दैववादी बनवतात. बाबा, बुवा, महाराज हे दैववाद पसरवणारे संसर्गजन्य जंतू आहेत व तथाकथित चमत्कार अशा लोकांच्या हातातील एक अमोघ हत्यार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

माय लॉर्ड, चमत्कारांच्या दाव्यांचा विस्तृतपणे समाचार घेतल्याबद्दल धन्यवाद. तरीसुद्धा माझ्या अशिलाच्या हजारो भक्तगणांच्या इच्छेस्तव त्याला क्षमा करावी अशी मी विनंती करतो.

हा तुमचा अशील जाणून बुजून चमत्कारांचे दावे करत लोकांची फसवणूक करत आहे, हे तुम्हाला मान्य असेलच. त्यामुळे याला शिक्षा ठोठावणे हे माझे कर्तव्य ठरते. ही शिक्षा त्याच्यातील दैवीशक्तीची चिरफाड करत हा एक लफंगा, लुच्चा माणूस आहे हे शाबीत करेल. कदाचित कुणापुढे डोके टेकवावे याचे भान लोकांना येईल व शिक्षेच्या धाकेमुळे निदान काही जण तरी अशा फसवणुकीच्या प्रकारातून परावृत्त होतील अशी मी आशा बाळगतो.

या निकालानंतर पुढील कामकाज स्थगित करण्यात आले.

प्रभाकर नानावटी