पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्रात दर दिवशी पुरोगामित्वाचे धिंडवडे काढणार्या घटना घडत आहेत. जादूटोण्याच्या संशयावरून इसमास मारहाण करून मानवी विष्ठा चारण्याचा किळसवाणा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील बोर्डा येथे घडला. विशेष बाब म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्यासाठी अंनिस पोटतिडकीने लढा देत असतांना सामाजिक न्याय मंत्री ना. मोघेंच्या गृह जिल्ह्यात असा प्रकार घडल्याने मानवाधिकाराचे हनन होऊन माणुसकीचे धिंडवडे काढले गेले आहेत.
तालुक्यातील बोर्डा येथे दि.2 फेब्रुवारीला जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावातील पती-पत्नीला मारहाण करून मानवी विष्ठा चारल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बोर्डा येथील गजानन जागृत राजूरकर हे शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. दि. 2 फेब्रुवारीला सकाळी 9 चे सुमारास गोठ्यात बैलांना चारा पाणी करत असताना गावातील काकडे परिवाराने जादूटोणा केल्याचा संशय घेत गजाननच्या पत्नीला मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकू आल्याने गजाननने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. व काकडे परिवारातील महिला ह्यांनी पत्नीला खाली पाडून मारहाण केली.
याबाबत पोलीस पाटलाकडे दाद मागितली असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा रात्री 9 वाजता काकडे परिवाराने गजाननच्या घरावर लाठ्या काठ्या घेऊन चाल केली. त्यावेळी त्याचेकडे पाहुणासुद्धा होता. त्याच्या समक्ष मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे गावातील नागरिक जमा झाले. त्यांनी दोघा पती पत्नीला हनुमान मंदिरामध्ये नेऊन जबरीने मानवी विष्ठा खाऊ घातली. या प्रकाराने राजूरकर पती-पत्नी अपमानित झाले असून या प्रकाराने पाच दिवसांपासून जेवण करणेही कठीण झाले आहे.
दि.3 फेब्रुवारीला तक्रार करूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने दि.8 फेब्रुवारीला पुन्हा अनिल काकडे, पांडुरंग काकडे, गजानन काकडे, अनुसया काकडे, शांताबाई यशवंत काकडे यांचेविरोधात वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भा.दं.वि. कलम 355, 328, 294, 306 व 34 व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सहा आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. या घटनेची माहिती घेणेसाठी अंनिसचे कार्यकर्ते प्रकाश डब्बावार यांनी बोर्डा गावास भेट दिली व तेथे गावकर्यांच्यासाठी प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला.
–किशोर पारटकर, यवतमाळ