‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूनं नि निष्ठेनं मी चित्रीत करणार आहे नि करीत आहे.’
पारंपारिक धार्मिक मुल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणार्या व आपल्यावरील विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेनं राहणार्या लोकशाहीर, साहित्यिक कॉ.अण्णा भाऊ साठे यांची 1 ऑगस्टला जयंती आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ हे कामगार-कष्टकर्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून अधिक नावाजले. परंतु तथाकथित प्रस्थापित ब्राम्हणी साहित्य-संस्कृतीच्या ठेकेदारांनी व त्यांच्या समिक्षकांनी कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा साहित्यिक म्हणून उचित गौरव व सन्मान केला नाही. त्यांच्या वाट्याला 1960 च्या दशकापर्यंत म्हणजे दलित-आंबेडकरी-प्रगत साहित्याच्या चळवळीच्या उगमापर्यंत उपेक्षाच आली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या निवनिर्मितीत लोकशाहीर कॉ.अण्णा भाऊ साठे, कॉ.अमर शेख व शाहीर कॉ.द.ना.गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. परंतु या तिघांचेही भव्य उचित स्मारक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या पन्नास वर्षानंतरही झालेले नाही. या मधल्या कालखंडात अखिल भारतीय म्हणविणारी अनेक मराठी साहित्याची संमेलने झाली. परंतु त्यापैकी एकाही साहित्य संमेलनाला अण्णाभाऊ साठे वा अमर शेखांना सन्मानाने निमंत्रित केले नाही वा नाही त्यांच्या साहित्यावर चर्चा केली. वरील साहित्यिकांच्या वाट्याला जी उपेक्षा आली, त्याचे एक कारण ते कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित होते व दुसरे म्हणजे ते ज्या जातवर्गीय समाजातून आले होते व त्यांनी ज्या दलित-शोषित, कष्टकरी जातवर्गीयांची वेदना, दाहक जीवन वास्तव आपल्या साहित्यातून मांडले व प्रस्थापित समाजव्यवस्थेवर, संस्कृतीवर आपल्या लेखनातून, गाण्यातून जे आसूड ओढले ते सत्तेवरील प्रस्थापित राज्यकर्त्यांना व त्यांची पालखी वाहणार्या सांस्कृतिक क्षेत्रातील मक्तेदारांनाही न रूचल्यामुळे त्यांनी यांची उपेक्षा केली. परंतु असे असले तरी सर्वसामान्य लोकांत यांचे स्थान अढळच राहिले.
त्यासंदर्भात अण्णा भाऊ आपल्या ‘वैजयंता’ कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते, हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथं समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचं नंदनवन व्हावं अशी मला रोज स्वप्नं पडत असतात.’ जनतेची कदर करणारा अण्णाभाऊ सारखा कलावंत देशात व जगात सर्व प्रकारच्या शोषणविरोधातील समाव्यवस्था निर्माण व्हावी, आर्थिक-सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी ज्या राजकीय चळवळी होत्या त्या चळवळीत लेखणीसह सक्रीय होता. अण्णा भाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. जीवन-संघर्षाच्या विद्यापीठातच ते शिकले. त्याबाबत ते एका ठिकाणी म्हणतात, ‘मला माणसं खूप आवडतात. त्यांना विद्रूप करणे मला आवडत नाही. जे मी स्वत: जगलो आहे, पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बर्याच व्यक्तीरेखा मला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत. माझ्या लेखनातील अनेक व्यक्तीरेखा खर्या आहेत.’ अण्णाभाऊंच्या साहित्यातील वैविध्य, भाषेवरील पकड पाहिली की कोणीही अचंबित होईल एवढे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. त्यांनी गाणी, लावण्या, पोवाडे, भारूड, लोकनाट्ये, तमाशे, नाटकं, कथा, कादंबर्या, प्रवासवर्णन, पुस्तक परिक्षणे, चित्रपट परिक्षणे, कम्युनिस्ट पक्षाची साप्ताहिके, लोकयुद्ध, युगांतरमध्ये त्यांनी वृत्तांत लेखन, मुलाखती, लेख लिहिले ‘वाट्टेल ते’ आणि ‘हवे ते’ ही सदरे लिहिली. ‘मराठा’सारख्या दैनिकातही लेखन केले. त्यांनी आपली पहिली कथाही कम्युनिस्ट पक्षाच्या ‘मशाल’ साप्ताहिकात लिहिली.
अण्णाभाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले आहे. जुन्या रूढी, परंपरा, जातपंचायतींवर आघात केले आहेत. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नाटिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले. त्यांच्या ‘बंडवाला’ या कथेत जमिनदाराच्या अन्यायाविरूद्ध लढणारा मांग समाजातील तरूण आहे, ‘रामोशी’ नावाच्या कथेत यदू रामोशी हा जमिनदाराच्या अन्यायाविरूद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरूद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे. त्यांच्या ‘कोंबडीचोर’ या कथेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्य्र, उपासमार शिल्लक राहिल्यामुळे गरीबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे. अशाच प्रकारची अण्णाभाऊंची ‘स्मशानातील सोनं’ या नावाची गाजलेली कथा आहे. या कथेत भारतात गरीबी व बेरोजगारीमुळे एका कामगाराला स्मशानातील प्रेतं उकरून कसा उदरनिर्वाह करावयास लागतो व ते करताना प्रेतं खाण्यास येणार्या कोल्ह्यांसोबतही कसा सामना करवा लागला आणि प्रेताच्या तोंडात हात अडकल्यामुळे कशी बोटे गमवावी लागतात याचे अत्यंत हृदयद्रावक चित्रण अण्णाभाऊंनी केले आहे. त्यांच्या ‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. आणि या जातपंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या कंजारी व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे. अण्णाभाऊंच्या ‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरूंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात. त्यांच्या ‘जिवंत काडतूस’ या कथेत ते 1942 च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात. अण्णाभाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षेमुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगर या झोपडपट्टीत घालविली. त्या चिरागनगरमधील गरीब, व्यसनी, व्याभिचार, चोर्यामार्या करणार्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष अण्णाभाऊंच्या ‘चिरागनगरची भुतं’ या कथासंग्रहातील कथांमधील चित्रणात आढळतो.
अण्णाभाऊंनी अंधश्रद्धांविरूद्धही भुतांचा वाडा, बोलकं मुंडकं, तीन भाकरी, चालतं मढं, सूड, अमृत, मरीआईचा गाडा अशा काही कथा लिहिल्या. ‘मरीआईचा गाडा’ या कथेत मरीआई नावाची देवी कॉलरासारख्या रोगांच्या साथी सुरू करते तेव्हा तीची पूजा करून दुसर्या गावात सोडल्यास साथी निघून जातात अशी अंधश्रद्धा ग्रामीण भागात होती. त्या अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते. अण्णाभाऊंच्या ‘राम-रावण युद्ध’ या कथेत रामलीला कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी खिल्ली उडविली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचेही चित्रण अण्णाभाऊंच्या ‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये आढळते. दलितांनी मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे, त्याचे मांस खाणे थांबवावे असा संदेश डॉ.बाबासाहेबांनी दिला होता. त्या संदेशामुळे महाराष्ट्रातील अनेक गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती, अनेक गावात दलितांना बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते. अनेक दलितांना मृत मांस खाण्याच्या जुन्या सवयी सोडणेही जड जात होते. या द्वंद्वाचे चित्रणही अण्णाभाऊंच्या ‘वळण’, ‘सापळा’ सारख्या कथांत आढळते. भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण अण्णा भाऊंच्या ‘उपकाराची फेड’ या कथेत पहायला मिळते. त्यांच्या ‘आबी’ या कथेत ग्रामीण भागातील अन्यायाविरूद्ध धैर्याने लढणार्या तरूणीचे चित्रण आहे. अण्णाभाऊंनी आपल्या लेखन काळातील अल्प आयुष्यात जवळपास 21 कथासंग्रह म्हणजे असंख्य कथा लिहिल्या.
परंतु अण्णाभाऊंनी कथांसोबतच 30 पेक्षा अधिक कादंबर्याही लिहिल्या. त्यातील फकिरा, वारणेच्या खोर्यात, वैजयंता, माकडीचा माळ, चित्रा, चिखलातील कमळ, गुलाम, वारणेचा वाघ, आवडी, वैर, फुलपाखरू, अलगूज, रानबोका, मूर्ती, संघर्ष, चंदन आदी कादंबर्या खूप गालज्या त्यापैकी सात कादंबर्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले, फकिरासारख्या कादंबरीला 1961 साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालिन ज्येष्ट साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुकही केले. अण्णाभाऊंनी ‘फकिरा’ कादंबरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. या कादंबरीत भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटीशांचे खजिने, धान्य लुटून गरीबांना, दलितांना वाटप करणार्या मांग समाजातील फकिरा या लढाऊ तरूणाचे चित्रण आहे. ‘वारणेच्या खोर्यात’ या कादंबरीत 1942 च्या ‘चलेजाव’च्या स्वातंत्र्यलढ्याचे व स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणार्यांचे चित्रण आहे. ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीत सावकार-जमिनदार व ब्रिटीश साम्राज्यवाद्यांच्या शोषणाविरूद्ध लढा पुकारणार्या सत्तू भोसलेचे प्रत्ययकारी चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणार्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘आवडी’, ‘मुर्ती’ या कादंबर्यात जातीभेदाचा धिक्कार करून आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला आहे. ‘चित्रा’ या कादंबरीत परिस्थितीमुळे वेश्या बनलेल्या स्त्रीचे चित्रण आहे. फुलपाखरू कादंबरीतही सुधारगृहातून बाहेर पडलेल्या स्त्रीला कसे वेश्याव्यवसायात ढकलले जाते व त्यातून तीचा पुरोगामी मित्र तिला कसे बाहेर काढतो ही कहाणी आहे. ‘चिखलातील कमळ’ या कादंबरीत खंडोबाला मुली अर्पण करण्याच्या धार्मिक प्रथेच्या नावे मुरळ्या म्हणून स्त्रियांचे कसे अमानुष शोषण होते याचे चित्रण आहे. ‘चंदन’ या कादंबरीत झोपडपट्टीत राहणारी कष्टकरी स्त्री कशी साहसीवृत्तीने गुंडाचा सामना करते याचे चित्रण आहे. अण्णांच्या ‘गुलाम’, ‘वैर’ या कादंबर्यांतून सामान्य शेतमजूराचे वेठबिगार म्हणून कसे शोषण होते. जमिनदाराच्या जुलूम जबरदस्ती विरोधात शोषित वर्ग कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे. अण्णाभाऊंची ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सुक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तीचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. अण्णाभाऊंनी ‘अलगूज’, ‘रानगंगा’, ‘संघर्ष’, ‘अहंकार’, ‘रूपा’, ‘मयुरा’, ‘आग’, ‘रानबोका’, ‘तारा’ अशा प्रेमकथानकांच्याही कादंबर्या लिहिल्या. थोडक्यात अण्णाभाऊंनी दलित-शोषितांवरील अन्यायापासून भटक्या विमुक्तांच्या जीवनापर्यंत आणि सामान्यांच्या प्रेमभावनेपर्यंतच्या अनेक विषयांवर विपूल लेखन केले आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून, पोवाड्यातून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना बंगालचा दुष्काळ, तेलंगणासंग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील मुंबईची लावणी, माझी मैना, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तीसेना’ गौरवगान, रशियातील समाजवादी क्रांतीचे नेते कॉ.लेनिन वरील ‘लेनीन शुभनामाचे’ गीत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालूनी घाव-सांगुनी गेले मला भीमराव’ हे गाणे. अशा अनेक गाणी, कवनं, पोवाड्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे. अण्णाभाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपारिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही(form) अमुलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणार्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजा सारख्या शूर पुरूषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लिल भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. थोडक्यात अण्णाभाऊंनी महात्मा जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या तमशा-लोकनाट्यातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशीय कक्षा रूंदावल्या. त्यामुळे अण्णाभाऊंचे साहित्य इंग्रजी, हिंदी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषातही अनुवादित झाले.
अण्णाभाऊ साठेंच्या ह्या क्रांतिकारक विचारांचा वारसा खर्या अर्थाने ते जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा विकसित झाला. तत्कालिन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्तेकॉम्रेड आर.बी.मोरे, कॉ.के.एम.साळवी, कॉ.शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. वरील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या मार्क्सवादी विचारांच्या अभ्यास वर्गाला ते हजेरी लावू लागले. लेबर कॅम्प मधील अभ्यास वर्गातूनच त्यांना जगातील क्रांतीकारक विचार साहित्य व चळवळीशी ओळख झाली आणि नंतर त्यांची क्रांतीकारक विचारांची बैठक पक्की होत केली. याच लेबर कॅम्पमध्ये ते शिकण्याच्या प्रेरणेने पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्प मधील मच्छरावर लिहिलंय. याच लेबर कॅम्पमध्ये कॉ.अण्णाभाऊ साठे, शाहीर कॉ.अमर शेख व शाहीर कॉ.द.ना.गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक लाल बावटा कलापथकाची 1944 साली स्थापना केली. आणि क्रांतिकारक शाहीरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला. अण्णा भाऊ, अमर शेख, गव्हाणकरांसारखे शाहीर या कलापथकातूनच पुढे आले व मोठे झाले. अण्णाभाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहार, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित कॉ.स.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने, कॉ.वा.वी.भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णाभाऊंच्या कादंबर्या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णाभाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ.बलराज सहानी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात दिवंगत चरित्र अभिनेते कॉ.ए.के.हंगल यांनी महत्वाची भूमिका केली होती. नंतर कॉ.अण्णाभाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षही निवडण्यात आले होते. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्या सोबत कार्यरत होते. अण्णाभाऊंच्या फकिरा कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले. अण्णाभाऊंमधील लेखक-कलावंत जपण्याचे व फुलविण्याचे काम कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या कॉ.जयवंताबाई या त्यांच्या द्वितीय पत्नीने अपार त्याग व काबाडकष्ट करून अखेरपर्यंत केले. त्यांना त्यांच्या दोन मुली शांताबाई व शकुंतलाबाई यांचीही साथ लाभली. त्याची नोंद मात्र संबंधितांनी घेतली नाही व उचित सन्मान केला नाही याची खंत आहे. या क्रांतिकारक लेखकास दलित-शोषितांच्या चळवळीतर्फे अभिवादन!
– सुबोध मोरे
मोबा.9322025263