Categories
भांडाफोड

देवीने ‘गुप्त’ केलेल्या संगीताला ‘अंनिस’ने शोधले

मे - २०१४

‘मी गुप्त होईन माझा शोध घेऊ नका. निघोजच्या कुंडाच्या काठाला माझी साडी, जोडवी सापडतील’ हे उद्गार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील भानसहिवरे गावातील संगीता कोकाटे(वय 34 वर्षे) हिचे. संगिताला आजारपणाने घेरले. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, दातखिळी बसणे असे प्रकार सुरू झाले. तिच्या पतीने वैद्यकीय उपचारही सुरू केले. संगिताला दोन मुलं, पती उच्चशिक्षित. संगिताचे माहेर गावातच. संगिताच्या माहेरच्या लोकांनी, गावातच असलेल्या अनिल चौधरी नावाच्या देवर्षीकडे संगिताला उपचारासाठी नेले. संगिताच्या तब्बेतीत सुधारणा झाली व संगिता अनिल चौधरीची भक्त बनली. वारंवार चौधरीकडे जाणे-येणे सुरू झाले. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात संगिता आठ दिवस घरात झोपून राहिली. ‘मला साक्षात्कार झाला. मी आठव्या दिवशी जिथपर्यंत जाऊन थांबेन तिथे पाणी लागेल.’ आठव्या दिवशी गावकर्‍यांनी गाव सजवले, फुलांचा सडा घातला. वाद्याच्या तालावर डुलत संगिता चालू लागली. अर्थातच साथीला अनिल चौधरी (वय 34 वर्षे) होता. संगिताच्या अंगात देवी संचारली तर अनिलच्या अंगात खंडोबा खेळू लागला. भंडार्‍याची उधळण सुरू झाली. अफाट गर्दी जमली. डुलत डुलत संगिता तिच्याच मालकीच्या पडीक जागेत चाफ्याच्या झाडाजवळ जाऊन कोसळली. तिथे अनिल चौधरीने उकरायला सुरवात केली. अन् हाताने भुसभुशीत जमीन उकरली. तिथे घागर व देवीचा तांदळा निघाला. त्याच जागेवर बोअर घेतले गेले व संगिताने सांगितले प्रमाणे तिथे पाणी लागले. सर्व गाव अवाक् झाला. भले भले संगिताच्या पाया पडू लागले. त्याच जागेवर संगिताच्या सांगण्याप्रमाणे मंदिर बांधून देवीची प्रतिष्ठापना करणेत आली. अनिल चौधरीचे जाणे-येणेही वाढले.

संगिता घरातील व गावातील लोकांना सुमारे 4-6 महिन्यांपासून वारंवार सांगत होती की, देवीबरोबर निघालेली घागर जोपर्यंत आहे तोपर्यंतच मी राहणार. घागर फुटली की, देवी मला घेऊन जाणार, मी गुप्त होऊन निघोज कुंडावर माझी साडी, हळद-कुंकू, जोडवे, मासोळ्या सापडतील. मी मात्र पुन्हा दिसणार नाही माझा केस अगर नखेही दिसणार नाहीत. माझी चौकशी करू नका.

15 एप्रिल 2004 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घरातून अचानक संगिता गायब झाली. तिचे पती 4.30 वाजता उठून पाहतात तर संगिता घरात नाही. घराशेजारच्या मंदिरात कुंकवाचा सडा, झेंडूची फुले, कुंकवाची पाऊले उमटलेली होती व घागरही फुटलेली होती. संगिताचे पतीने अनिल चौधरीकडे चौकशी केली(यापूर्वीही एकदा संगिता अचानक, मध्यरात्री गायब झाली होती व ती अनिल चौधरींचे घरी सापडली होती.) अनिलने मला काहीही माहीत नाही. पण घागर फुटल्यामुळे संगिताला देवी घेऊन गेली असावी, असे सांगितले. संगिताचे नातेवाईक निघोजच्या कुंडावर गेले. तिथे साडी, मासोळ्या, जोडवी सापडली. गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. नेवासे शाखेतील ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आरगडेंना ही घटना समजलेवर बाबा भानसहिवरेला सांगिताच्या घरी केले. बाबांनी अनिल चौधरीला बोलावून विचारपूस केली परंतु तो काहीही सांगत नव्हता. बाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला. तेव्हा मात्र अनिल चौधरी कबूल झाला. अनिल चौधरीला घेऊन पोलीस कॉन्स्टेबल राठोड व सरपंच भगवान जाधव व अन्य रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे गेले व रात्री तीन वाजता(संगिता गायब झालेनंतर चार दिवसांनंतर) चिपळूणच्या एस.टी. स्टँडवरून तिला घेऊन आले. संगिता व अनिल चौधरी विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रयत्नामुळे जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कस्टडीही मिळाली.

दि.22/4/2014 रोजी मी स्वत: बाबा आरगडे, डॉ.मच्छिंद्र वाघ, बी.के.चव्हाण आम्ही सर्व भानसहिवरे येथे संगिताचे घरी जाऊन तिचे पती, मुलं, भाऊ, सासू यांची भेट घेतली. मंदिराची पहाणी केली. अनिल चौधरीचे वस्तीवर जाऊन त्याचे कुटुंबियांचीही भेट घेऊन तिथं असलेल्या मंदिराचीही पहाणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांकडून समजले की, संगिताचे अंगात देवी आल्यानंतर व घागर तांदळा सापडल्यानंतर वर्षभराचे काळात आमचे गावातील सुमारे 150 ते 200 बायकांचे अंगात यायला लागले. पुढच्याच पंधरवड्यात देवीचा संचार झालेल्या एका मुलीची मिरवणूक काढून काही विधी अनिल चौधरी करणार होता.(म्हणजे दुसरी संगिता?) अनिल चौधरीचे वर्तन बर्‍याच काळापासून आक्षेपार्ह असलेचे व पारनेरच्या मलगंगा देवीच्या बड्या ट्रस्टीशी त्याचे संबंध असलेबाबत गावकर्‍यांकडून समजले. अनिल चौधरीचे अंगात खंडोबा व मिरवली बाबा येत असे. तो गंडे तोडे देऊन अनेकांना फसवत असे हे ग्रामस्थांकडून समजले. परंतु संगिताने सांगितलेल्या जागेवर योगा-योगाने पाणी लागल्याने आम्ही प्रभावित झालो परंतु या प्रसंगाने आमच्या डोक्यावरची अंधश्रद्धेची झापड उडाली असेही ग्रामस्थांनी बोलून दाखवले. मागच्या वर्षी घागर व तांदळा निघाला त्यावेळी मच्छिंद्र वाघांनी या चमत्काराला जाहीर आव्हान देऊन ग्रामस्थांनाही समजावून सांगणेचा प्रयत्न केला परंतु तेव्हा कोणाचीही ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही भोंदू अनिल चौधरीला आव्हान दिले होते व ते त्याने स्वीकारले नव्हते.

खरं तर हे प्रकरण संगिता व भोंदू अनिल पुरतेच मर्यादित नसावे या घटनेमुळे अनेक प्रश्न समोर झाले आहेत संगिताचे अचानक गायब होऊन चिपळूणला सापडणे ती चिपळूणपर्यंत पोहचली कशी? कुंडाच्या बाजूला साडी, जोडवे कोणी नेऊन ठेवले? मंदिरातील संगिताचे उमटलेले पाऊलही संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी पी. आय. नेवासे यांची भेट घेतली. त्यांनी योग्य चौकशीचे आश्वासन दिले.

यासाठी प्रेस फोटोग्राफर अशोक पेहेरकर, माजी सभापती भाऊसाहेब पठारी, नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडुभाऊ काळे, भानुदास वालतुरे, पोलीस पाटील संजय तुपे, सरपंच भगवान जाधव, अ‍ॅड. बन्सी सातपुते, देविदास पराड आदींनी सहकार्य केले.

अ‍ॅड. रंजना गवांदे

लेखक संपर्क : 9850491611