Categories
शाखा वार्ता

शाखा उपक्रम

मे - २०१४

संगमनेर अंनिसने केली विकृतीची होळी

होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करताना लाकूड, गोवर्‍या(शेण्या) जाळल्या जातात व एक प्रकारे पर्यावरण र्‍हासाला मदतच होत असते. काळानुसार रूढी, परंपरांमध्ये बदल तर केलाच पाहिजे. परंतु आज सामाजिक स्थिती लक्षात घेता खरी गरज आहे दुष्कृत्य, हिंसाचार, भ्रष्टाचार, स्त्रीभृणहत्या, स्त्री देहावरील अत्याचार ज्या विकृत विचारातून व विकलांग मनोवृत्तीतून घडतात त्या प्रकृतींची व विचारांची होळी करण्याची.

डॉक्टर गेल्यानंतर समितीचे काम थंडावते की काय अशी काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती तर काही विघ्नसंतोषी व सनातनी विचारांच्या लोकांना तर वाटले की, आसा समितीचे कामच थांबणार. पण डॉक्टर गेल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कामाला लागला.

संगमनेर अंनिसने होळीनिमित्त एक अभिनव उपक्रम राबविला. होळीचे निमित्त साधून संगमनेर शाखेच्या कार्यकर्त्यांनी दि.16/3/2014 रोजी सकाळी दहा वाजता संगमनेर खुर्द येथे पुणे-नाशिक महामार्गालगत विकृत, हिंसक मनोवृत्ती-प्रतिकृती बनवून त्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेले संगमनेर खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ गुंजाळ यांच्या हस्ते ही होळी पेटवून प्रतिकृती जाळणेत आली.

या कार्यक्रमास संगमनेर शाखेचे काशीनाथ गुंजाळ, हरिभाऊ उगले, असिफ शेख, बी.के.बांगर, आनंद साबळे, नेहे हे कार्यकर्तेव अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. होळीच्या आयोजनास अरविंद गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

अ‍ॅड.रंजना पगारगवांदे, संगमनेर, जि.नगर.


पर्यावरणपूरक इको फ्रेंडली होळी साजरी

कासारे(ता.साक्री, जि.धुळे) येथे ‘होळीची पोळी दान करा-पर्यावरण पूरक इको फ्रेंडली होळी साजरी करा’ हा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कासारे शाखेतर्फे राबविण्यात आला. त्याला नागरिकांनी-महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दि.16 मार्च 2014 रोजी संध्याकाळी 7.30 ला सार्वजनिक चौकात होळी पेटविण्यात आली. होळीमध्ये परिसरातील केर-कचरा गोळा करून टाकण्यात आला. तसेच होळीमध्ये दुर्गुणात्मक प्रतिक गुटखा, तंबाखूच्या पुड्या टाकण्यात आल्या. तरूणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. होळीच्या ठिकाणी अंनिसचे कार्यकर्तेतरूणांना, नागरिकांना, महिलांना पोळी दान करण्याची विनंती करीत होती. त्यांना अंनिसचे विचार पटले. सर्वांनी पोळ्या दान केल्या. त्या पोळ्या अंनिसचे कार्यकर्तेगरीब वस्त्यांमध्ये जाऊन गोर-गरीबांना, गरजुंना वाटून आले. त्यांना खूपच आनंद व समाधान वाटले, त्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.

सदर उपक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती-कासारे शाखेचे अध्यक्ष सुरेश पारख, कार्याध्यक्ष- विलास देसले, अल्का गांगुर्डे, जिल्हा महिला सदस्य-सौ.मंगला पारख, अनिल देसले, सुरेश गवळे, जितेंद्र चौधरी, विकास भावसार, यादव पवार, ययाती सोनवणे, सागर देसले, गरजा महाराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी प्रविण खैरनार, किशोर जाधव, पिनु तोरवले, डॉ.हिरालाल पारख, रामलाल जैन, आर.पी.राजपूत आदिींनी प्रयत्न.

सुरेश पारख, कासारे, जि.धुळे.


‘होळी लहान करा, पोळी दान करा’ या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्रे भरून घेण्यासाठी प्रबोधन केले. न्यू.हायस्कूल मराठी शाखा, कोल्हापूर या प्रशालेत हा उपक्रम राबविणेत आला. 500 हून अधिक विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे भविष्यातही स्वागत व स्वीकार होऊन चांगले परिणाम अनुभवावयास मिळतील, याची खात्री वाटते.


कृष्णात कोरे यांचा गृहप्रवेश कर्मकांडाविना

कोणताही विधी नाही, मुहुर्त नाही लोकांच्या सोयीची वेळ ठरवून अंनिस राज्य सचिव कृष्णात कोरे यांनी कोल्हापूर बी.डी.कॉलनी येथे नवीन घरात आजीच्या हस्ते फीत कापून प्रवेश केला. घराचे नाव ‘चिकित्सा’ हे ठेवण्यात आले. कार्यक्रमास कृष्णात कोरे यांचे नातेवाईक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यज्ञ, होम असे खर्चिक, कर्मकांड कृष्णात यांनी टाळले. आहेर नम्रपूर्वक नाकारून लोकांनी अंनिसची पुस्तके घ्यावीत असे आग्रहपूर्वक सांगितले. कृष्णात यांच्या उपक्रमास त्यांची पत्नी स्वातीने साथ दिली.

या कार्यक्रमास अंनिस जिल्हा अध्यक्ष सुनील स्वामी, विष्णू काटकर, सचिन ओतारी, सुजाता म्हेत्रे, काळे, तानाजी कुरळे, कॉ.दिलीप पवार, उमेश सुर्यवंशी, रमेश वडणगेकर, माणिक यादव, संजय सुळगावे, सीमा पाटील, कॉ.सतिशचंद्र कांबळे, दिनकर जगदीश आदी उपस्थित होते.


वर्ध्यात जादूटोणा कायद्यावर व्याख्यान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे श्रमसंस्कार शिबीर सोनेगाव(आबाजी) ता.देवळी, जि.वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘जादूटोणाविरोधी कायदा वाटचाल व अंमलबजावणी’ या विषयावर अंनिसचे सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर शिबीर संयोजक प्रा.माधुरी झाडे, प्रा.खेडकर, प्रा.राठोड आदी प्राध्यापक उपस्थित होते.

महिला अणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि चमत्काराचे सादरीकरण करून समाजात असलेले महिलांचे दुय्यमस्थान त्यामुळे त्या कशा बळी पडतात यावर सुरकार यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.झाडे यांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.