जागतिक किर्तीचे प्राच्यविद्यापंडित व डाव्या समतावादी चळवळीचे विचारवंत कॉम्रेड शरद पाटील नुकतेच कालवश झाले. आपल्या अतुलनीय विचारसंपदेमुळे परिवर्तनाच्या लढाईतील अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी वैचारिक बळ दिले. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद आणि दासशुद्रांची गुलामगिरी अशा ग्रंथांतून आणि सत्यशोधक मार्क्सवादी या मासिकातून त्यांनी जातीव्यवस्थेचा प्रश्न चर्चेच्या आघाडीवर आणला. जातीव्यवस्था अंताच्या प्रश्नाला भारतीय राजकीय विचार धारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांच्या भाषणांनी आणि ग्रंथांनी केले. भारतातील जवळपास बहुतेक सर्व नामवंत विद्यापीठात वेगवेगळे शिबीरे आणि सभा याद्वारे त्यांनी प्रबोधन केले. जातीय सामंती सेवकत्व आणि भांडवली लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती या सारख्या ग्रंथांनी भारतातील लोकशाही क्रांतीची नवी कार्यक्रमपत्रिका त्यांनी पुढे आणली.
प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी महाराष्ट्राच्या विचारविश्वात आपल्या वैचारिक योगदानांनी भूकंप उभे केले. प्राचीन भारताच्या इतिहास-अभ्यासाची नवी संशोधन पद्धती पुढे आणली आणि जातीय वर्चस्ववादी पितृसत्ताक व्यवस्थेच्या प्रभावातून इतिहासलेखनास मुक्त केले. समाज परिवर्तक प्रवाहांच्या हाती नवी विचारसाधने दिली. एक नवा इतिहास घडविला. भारतीय प्रबोधनाचे शस्त्रागार अभ्यासकांना दिले.
कॉ. शरद पाटील यांच्या राजकीय कार्यामधील एक वैशिष्ट्य हे आहे की, महाराष्ट्रातील महत्वपूर्ण अशा काही चळवळीचा उगम त्यांच्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली धरणग्रस्तांची चळवळ उकाई धरणाच्या निमित्ताने कॉ. शरद पाटील यांनी उभी केली. आज आदिवासी भूमीहिनांसाठीचा वनकायदा शासनाने पुढे आणला आहे. त्यासाठीची भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सुप्रीम कोर्टात कॉ. शरद पाटील आणि त्यांच्या पार्टी-कार्यकर्त्यांनी दिली. नंदूरबार-साक्रीच्या आदिवासींच्या जनचळवळींनी जनकायद्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी उभी केली. आदिवासींचा आर्थिक लढा आणि नामांतराच्या जातीविरोधी लढा यांच्या एकजुटीतून परिवर्तनासाठी संयुक्त चळवळ उभी करण्याचा पहिला प्रयत्न हा धुळे जिल्ह्यातून पुढे आला. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकर्यांच्या आर्थिक लढ्याला स्त्रीसमतावादी लढ्याची दिशा देण्यासाठी पिंपळनेर ते चांदवड असा स्त्रियांचा महामोर्चा सत्यशोधक कष्टकरी महिला सभेने संघटीत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लाँगमार्च काढून आदिवासींना नामांतर चळवळीचा भाग बनविले. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळीच्या सहभागातून संयुक्त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेय देखील कॉ.शरद पाटील यांनाच जाते. याबाबत कॉ. शरद पाटील यांनी घेतलेली भूमिका पश्चिम महाराष्ट्रात प्रवाहित करण्याचा प्रयत्न क्रांतीवर नागनाथ अण्णा नायकवडी, सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक बाबूराव बागूल, प्रा.आनंद यादव इत्यादींनी केला. साक्री येथे पहिले संयुक्त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणबिंदूवर आणण्याचे कार्य कॉ. पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केला. अशा या थोर विचारवंताला अंनिस परिवाराचा सलाम.
– अविनाश पाटील