अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक डॉ. आशुतोष मुळे यांचे दिनांक 2 जून 2019 रोजी अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या आजाराने अकाली अवघ्या 51 व्या वर्षी निधन झाले. व्यवसायाने डॉक्टर असलेले आशुतोष फिनोलेक्स या कंपनीत 1993 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. अलिकडे काही वर्षांपासून त्यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी पदाचाही कार्यभार होता. या काळात त्यांनी कंपनीच्या सीएसआर धोरणांतर्गत ग्रामीण भागात पाणी योजना, शाळांना संगणक संच, गरजू रुग्णांना वैद्यकीय व आर्थिक मदत देण्याच्या कामी पुढाकार घेतला होता.
कोकण विभागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात अंनिसच्या कामाचा पाया रचण्यात आणि विस्तारण्यात त्यांचा वाटा खूपच मोठा आहे. 1996-97 साली डॉ. दाभोलकरांच्या मालगुंड येथील शिबिरापासून आशुतोष व आदितीचा अंनिसशी संबंध जोडला गेला. त्यानंतर 2003 पासून डॉ. आशुतोष मुळे यांनी वार्तापत्रात सहसंपादक म्हणून जवळजवळ दहा वर्षेकाम केले. या काळात त्यांनी वार्तापत्रात विविध विषयांवर विपुल लिखाण तर केलेच; पण अंनिसचा कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईतही ते कधी मागे राहिले नाहीत. नरेंद्र महाराजांच्या विरोधातील लढाईत आशुतोष व आदिती अग्रभागी होते. रत्नागिरीत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या उपस्थितीत नरेंद्र महाराजाविरोधातील जाहीर सभा व नंतर नरेंद्र महाराजांना त्यांच्या आश्रमात जाऊन डॉ. दाभोलकरांनी दिलेले आव्हान या आंदोलनाचे आयोजन आशुतोष यांनी कोणत्याही धमक्यांना भीक न घालता आपल्या रत्नागिरीतील सहकार्यांसह मोठ्या धाडसाने केले होते. त्याचप्रमाणे कोकणातील ‘गावपळण’ या प्रथेविरोधात केलेले आंदोलन खूप गाजले होते व त्या आंदोलनाने अशा प्रथा विरोधातील चर्चेला वाचा फोडली होती.
रत्नागिरीत झालेल्या ज्योतिष परिषदेच्या वेळेस ज्योतिष्याना आव्हान देत त्यांच्याशी आमनेसामने वादविवाद करायलाही मागेपुढे पाहिले नव्हते.
कोकणात त्यांनी अंनिसची अनेक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती. ही शिबीरेही वैशिष्ट्यपूर्ण असत. विषयमांडणीही जास्तीतजास्त सोपी कशी होईल, कार्यकर्त्यापर्यंत त्या विषयाचा आशय थेटपणे कसा पोचेल याचा गंभीर विचार करून शिबिरात तसेच महाराष्ट्रातील इतर भागातही ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध विषयांवर व्याख्याने देत. वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय त्यांच्या विशेष आवडीचा होता. या विषयावर, तसेच आरोग्यासंदर्भात अंनिवामधून आणि स्थानिक वृत्तपत्रांतून त्यांनी बरेच लिखाण केले. आकाशवाणीवरून भाषणेही दिली.
अंनिवामधील त्यांचे लिखाण सोपे आणि माहितीपूर्ण असे, त्यामुळे कार्यकर्ते व सर्वसामान्य वाचक त्यांच्या लिखाणाला भरपूर प्रतिसाद देत. इस्कॉन गुरूंचे पाशवी चाळे, नरेंद्र महाराज, ज्योतिष, शरीर आणि आत्मा, अंगात येणे, अशा विषयांबरोबर त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन, पर्यावरण आदी विषयांवरही अनिवामधून लिखाण केले.
आशुतोषला संगीताची खूपच चांगली जाण होती. आर्ट सर्कल, रत्नागिरी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. या सर्व सामाजिक-सांस्कृतिक कामात त्यांच्या पत्नी आदिती या आशुतोष बरोबरीने कार्यरत होत्या.
आशुतोषचे हे अकाली निधन अंनिसला व एकूणच विवेकवादी पुरोगामी चळवळीला चटका लावणारे आहे.
अंनिस व अंनिवाचे संपादक मंडळ त्याची पत्नी आदिती व इतर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत आहे.