Categories
परिसंवाद

दृश्यावर नको मुळावर घाव घाला

वार्षिकांक – २०१३

पहिल्या अंधश्रद्धा निर्मुलन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, याबद्दल मला खूप आनंद झाला. मी अध्यक्षपदी असलेली संमेलनं पुढं खूप चालतात असा माझा अनुभव आहे. हे संमेलनही केवळ प्रतिकात्मक होणार नाही. हे खूप वर्ष पुढं जाऊन गावोगाव फिरेल आणि समाजाला दृष्टी देण्याचं काम अखंडपणे करेल अशी मी शुभेच्छा आणि खात्रीही व्यक्त करतो.

खरं म्हणजे अध्यक्षीय भाषण करताना तयारी करावी लागते. ती तयारी न करताच इथं आलो आहे. आज पहिल्यांदाच मी तयारी न करता आलो. इथं आल्यावर मला सातत्यानं जाणवत होतं, की तयारी करण्याची गरज का भासली नाही मला? त्याचं एक कारण होतं आणि ते म्हणजे मी गेली चाळीस वर्षे या भाषणाची तयारीच करत होतो. मी स्वतः अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीत असल्यानं सातत्यानं या विषयाची तयारीच करीत होतो.

मी असं मानतो, की माणसाला आणि समाजाला घडवण्यामध्ये साहित्यिकाची खूप मोठी भूमिका असते. खूप मोठा वाटा असतो समाज घडवण्यामध्ये. पण असं समाज घडवणारं साहित्य आपल्याकडे किती आहे आणि त्यानं कुठं किती समाज घडवलाय असा प्रश्न आहे. अर्थातच मी मराठी साहित्याविषयी बोलतोय. साहित्यामुळे समाज बदलू शकतो. समाज विज्ञानवादी होऊ शकतो. समाज इहवादी होऊ शकतो. समाज अंधश्रद्धांपासून

दूर जाऊ शकतो. समाज चित्रविचित्र कल्पनांपासून दूर जाऊ शकतो. समाज आत्मा, स्वर्ग, नरक या कल्पनांपासून दूर जाऊ शकतो. पण असं साहित्य आपल्याकडं किती आहे? ते खूप कमी आहे. तुम्ही बघा, अगदी पहिलीच्या धड्यापासून काय सुरू होतं, देवा तुझेकिती सुंदर आकाश. देव पाऊस पाडतो, देव लग्न लावतो, देव बायको पळवतो, सगळं काही देव करतो. काय परिणाम होणार आहे याचा मनावर, समाजावर? म्हणजे माणसानं काही केलंच नाही, हेच आपली व्यवस्था सांगत असते. हे सगळं करणारी कोणी तरी अनामिक शक्ती आहे. तिच्यामुळं हे सगळं घडत राहतं. पाऊस पाडण्यापासून ते दुष्काळ पाडण्यापर्यंत तीच जबाबदार आणि हेच जर सगळं साहित्यात असेल तर मग समाज बदलणार कसा? अंधश्रद्धेला शरण जाणारं साहित्य मराठीत खूप आहे.

देवाला शरण जाणारं साहित्य खूप आहे. प्रथा, परंपरा आणि संस्कृतीला आपलं मानणारं साहित्य खूप आहे. गंमत म्हणजे ते आपण सगळं डोक्यावर घेतलं आहे. या सगळ्याचा अर्थ असा, की या साहित्यानं आपली मानसिकता आंधळी केली आहे. नाही तर हे साहित्य जास्त खपतं कसं? स्वयंपाकावरचीच पुस्तकं जास्त खपतात असं काही नाही तर. अध्यात्मंही खपतं असंतच असतं.

साहित्य जर आपली भूमिका नीट पार पाडत नसंल, तर मग कुणीतरी ती जबाबदारी घ्यावी लागते. तसं लिहिण्याची, तसं घडवण्याची, साहित्याला वळण देण्याची, साहित्याची भूमिका अधिक स्पष्ट करण्याची भूमिका घ्यावी लागते. मला वाटतं तशी भूमिका बनविण्यासाठी अंधश्रद्धा समितीनं उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे हे साहित्य संमेलन आहे. मी एक कादंबरी वाचली आणि मला खात्री आहे इथं बसलेल्या प्रत्येकानं ती वाचली असावी. खूप गाजलेली कादंबरी. कादंबरीचा शेवट काय आहे? नायिका सती जाते. कादंबरीची टी.व्ही. सिरीयलही झाली. आपण ती रडत पाहिली आणि म्हणालो, काय बाई आहे नाही? काय निष्ठावान, काय पतिव्रता! नवर्‍याशिवाय ती एक क्षणही जगू शकली नाही. पळाली आणि शेवटी घेतलं स्वतःला जाळून. बाई असावी तर अशी!!

एक मॉडेल तयार करतो आपण. आपण असा प्रश्न नाही केला की नवर्‍याच्या मरणानंतरही बाई जगण्याला पात्र आहे. का मरावं तिनं? आणि फुल्यांनी तर सांगून ठेवलं होतं, जर बाई सती होते तर मग बुवा सत्ता का नाही होत? याचं उत्तर दिलंच नाही आपण. हे असं बाई जाळणारं साहित्य खूप गाजलं होतं. पण ह्या साहित्याला विरोध करणारं साहित्यसुद्धा आलंच ना? संख्येनं कमी का असंना पण आलं. त्याच काळामध्ये नारायण सुर्वेकविता लिहित होते. त्यात त्यांनी कल्पना अशी केली की आपण मेल्यानंतर आपल्या बायकोनं काय केलं पाहिजे? नवरा मेल्यावर बायकोनं काय केलं पाहिजे? सती गेलं पाहिजे की अजून काहीतरी केलं पाहिजे की समर्थपणे जगलं पाहिजे. ही कविता तुम्ही वाचली नसणार. कारण तुम्ही रूमाल काढण्यामध्ये, हुंदके देण्यामध्ये, रडण्यामध्ये गुंग असणार. काय सांगितलंय सुर्व्यांनी? सुर्वेम्हणाले,

जेव्हा मी अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर.

ऊतू जाणारे हुंदके आवर

नव्याने हिरवे चुडे भर

नव्यानं एक घर कर

मला स्मरून कर

किंवा विस्मरून कर

क्या बात है? हे नव्यानं जगणं आहे. माणूस जाळणार्‍या परंपरेतून बाहेर पडणं आहे.

आपण जे करतो आहोत त्यात परंपरा खूप मोठी आहे. असं समजू नका, की आपण रूटस् नसलेले लोक आहोत. आपली

मुळं खूप लांब आहेत. चार्वाकापर्यंत आहेत. बुद्धापर्यंत आहेत. संतसाहित्यापर्यंत आहेत. आपण काही छोटी मुळे असलेले लोक नाही आहोत. आपण काही कुंडीतली रोपं नाही आहोत. ऊन कमी पडलं की लगेच मान टाक. पाऊस नाही आला की मान टाक अशी

रोपं नाही आहोत आपण. व्यवस्थेच्या डोंगरकपारी फाडून वर आलेली झाडं आहोत आपण. या परंपरेनं आपल्या भोवती निर्माण झालेल्या अंधाराची चिकित्सा केली आहे. अंधारात जन्माला आलेल्या वेगवेगळ्या वृत्तीची चिकीत्सा केली आहे. आपली एक परंपरा अशी आहे, की एखादी गोष्ट खूप लोक करतात तेव्हा ती खरी असायला पाहिजे. सगळे बुवाच्या नादाला लागले, खरं आहे. सगळेच भगवे कपडेवाले झाले खरं आहे; पण मी वेगळे कपडे घालून आलो, मला एखादा वेगळा पोषाख असला तर ते खरं नाही. संख्येच्या जोरावर काही मुद्दे आपण माफ करतो. संख्याच सत्य, असत्य ठरवायला लागते. सत्य, असत्य ठरवणं खरं म्हणजे लोकांच्या आकलनाचं काम असतं. त्याला वेगळी परिमाणं वापरावी लागतात. चार्वाकची बायको त्याच्याशी एकदा भांडताना म्हणाली, तुम्ही हे खोटं म्हणता. ते खोटं म्हणता. समाज खोटा म्हणता. कायहो तुम्ही जगात एकटेच शहाणे आहेत काय?’ चार्वाक म्हणाला, ‘होय मी एकटाच शहाणा आहे.’ मग सगळा समाज खुळा आहे का? ती म्हणाली, हो, खुळा आहे.,चार्वाक म्हणाला. ‘सिद्ध करा.’ असं सांगणारी चार्वाकची बायको होती ती. आंधळी नव्हती. सिद्ध करा म्हणाली. आणि मग चार्वाक म्हणाला, “ सिद्ध करून दाखवतो.” त्या दिवशी रात्री चार्वाक आणि त्याची बायको दोघं मातीनं भरलेल्या, मळलेल्या वाटेवर गेले. मग चार्वाक म्हणाला, आता आपण प्राणी चालतो तसं चालू या. चार पायानं चालू या. ते चालायला लागले. त्यांच्या हाताचे आणि पायांचे ठसे उमटायला लागले. दहा पाऊलं चालल्यानंतर ते बाजूला झाले. बायको म्हणाली, ‘काय झालं?’ चार्वाक म्हणाला, आता आपण घरी जाऊ, निवांत झोपू. सकाळी काय घडतं ते बघ.‘

सकाळी चार्वाकच्या घरी दूध द्यायला एक माणूस आला. तो म्हणाला, ‘गावाबाहेरच्या वाटेवर खूप गर्दी झाली आहे. कोण्या

विचित्र प्राण्याचे ठसे उमटले आहेत.’

चार्वाकची बायको धावत धावत गर्दीजवळ गेली. ठसे पाहून लोक तर्क-वितर्क लढवत होते. कोणता विचित्र प्राणी येऊन

गेला असंल याचा अंदाज बांधत होते. चार्वाकची बायको गर्दीत शिरली आणि म्हणाली, “हे प्राण्यांचे नव्हे आमचे ठसे आहेत.”

गर्दीनं तिला मुर्ख ठरवून बाहेर ढकललं. ती रडंतच घरी आली. नवर्‍याला म्हणाली, “तुम्ही बोललात ते खरं आहे की लोक

मूर्ख असतात.”

आपल्याकडं देव ही स्विकारायची गोष्ट आहे. तिथं प्रश्न विचारायचे नसतात. पहिल्यांदा बसव पंथातल्या बायांनी देवाला

प्रश्न विचारला, आणि सांगितलं हिम्मत असेल तर आमच्या जवळ ये. घाणीत बसून चपला शिवायचं काम करा, देव आला नाही.

देव दुर्बल असतो हे त्या बायकांनी सिद्ध केलंय. आपण म्हणतो देव महाशक्तीमान असतो. देवाला दहा तोंडं असतात; पंचवीस पोटं

असतात. चाळीस हात असतात, त्याच्या हातात साप असतो, जर देवता असतील तर त्यांचं वाहन वाघ असतो. त्याच्या तोंडातून जाळ बाहेर पडतो. आणि पुरूष देव असेल तर त्याचं आसन भारी असतं. न चावणारं, न भाजणारं. देव कोमल असतो. दुर्बल असतो हे त्या बाईनं सांगितलं. काळब्वा नावाची चांभाराचं काम करणारी बाई, त्या कुजलेल्या पाण्याच्या कुंडाजवळ राहून रोज काम करणारी बाई, चपला शिवणारी बाई. अंगठे शिवता शिवता तिनं देवाला चॅलेंज केलं, हे महान शक्तीमान देवा तू खरोखरंच शक्तीमान असशील तर इथे मेलेल्या पाण्याच्या कुंडाजवळ येऊन या दुर्गंधीचा वास घेऊन दाखव. या सार्‍या तुटलेल्या चपला आहेत. त्यांचे अंगठे बदलून दाखव; मग समजेल शक्तीमान तू आहेस की आम्ही? तू कष्ट करून दाखव देवा; तुझी हिंमत असेल तर ये. पण देव नाही आला आणि तिनं सांगितलं देव दुर्बल असतो त्याच्याकडं असलं काम करण्याची शक्तीच नाही. पंढरपूरमध्ये चोख्या महाराच्या पोराचा कर्ममेळ्याच्या विठ्ठलाला प्रश्न आहे. तू एकदा बाहेर पडून बघ. एकदा उष्ट खावून बघ. पण कोण आलं नाही. देव दुर्बल असतो आणि माणूस शक्तीमान असतो. कारण माणसानं देव बनवलेला असतो. जो प्रोड्युसर असतो तो शक्तीमान असतो आणि जे प्रॉडक्ट असतं ते दुर्बलच असतं. गॉड इज बायप्रॉडक्ट ऑफ ह्युमनबिईंग. माणसानं तयार केलेलं एक उप उत्पादन म्हणजे आहे. आणि तिच्यात शक्ती भरणारा सुद्धा माणूसच आहे. त्या शक्तीला घडवणारा. त्या शक्तीला रंगरूप देणारा. चेहरा देणारा माणूस आहे. बाबूराव बागूलांनी एक कविता लिहिली आहे,

वेदाआधी तू होतास, म्हणजे कोण? माणूस.

वेदाच्या परमेश्वराआधीही तूच होतास

पाहून विश्वाचे विराट विक्राळ स्वरूप

तू व्यथीत व्याकूळ होत होतास

आणि हात उंचावून याचना करत होतास. त्या याचना म्हणजेच ऋचा. हे माणसा, तू सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य

झाला. सूर्याला नाव कुणी दिलं? माणसानं.

हे माणसा, तू चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला.

अवघ्या विश्वाचं नामकरण तूच केलंस

आणि सगळ्या देवांचं बारसंही तूच घातलंस.

प्रश्न असा आहे, आपण कुणाच्या बाजूचे आहोत? माणसाच्या बाजूचे की माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विविध

प्रकारचं चमत्काराचं जग तयार करणार्‍या त्या शक्तीच्या बाजूचे? साहित्यिकांनीही पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या बाजूचे आहोत? कुणाच्या बाजुनं लिहिणार आहोत? मुक्तीबोध या हिंदी साहित्यिकानं त्याच्या डायरीमध्ये एक वाक्य लिहिलयं, ’पार्टनर तेरा पॉलिटिक्स क्या है?’ पॉलिटिक्स म्हटलं की लोक गडबडतात. अंगावर पाल पडल्यासारखं दचकतात आणि सांगतात, “आम्ही इकडं बघत नाही. तिकडं बघत नाही, मागं बघत नाही, नाकासमोर चालतो. आम्ही पॉलिटिक्स करतच नाही” तर यांच्या कानाखाली खाडकन् आवाज काढायला पाहिजे. सरळ चालणं म्हणजे काय पॉलिटिक्स आहे? रोख कुठं आहे तुमचा? तुमची भूमिका काय आहे, तुमची बाजू काय आहे? तुम्ही काही न बघता जर सरळ चालत असाल तर तुम्ही माणसाची हानी करून बसता. तुम्ही साहित्याची हानी करून बसता. विचारांची हानी करून बसता. तुम्ही रोलशिवाय लिहिते राहता…

आपली अंधश्रद्धा निमुर्लन चळवळ भूमिका घेणारी आहे. विज्ञानाला सामोरी जाणारी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेक जागा करणारी आहे. माणसाकडं सगळं काही असंल आणि फक्त विवेक नसंल तर त्याचं जीवन कुरूप झालं असं समजावं. विवेक बॅलन्स ऑफ पॉवर आहे. तराजूचा काटा आहे. काटा थोडा जरी हलला ना तर लगेच पारड्यांचा बॅलन्स जातो. माणसाला विवेकाचा डोळा देऊन त्याला नीट चालायला शिकवणं. त्याला अंधारातून दूर काढणं हाच खरा रोल आहे. मला वाटतं इथं साहित्यिकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपले अनेक साहित्यिक भित्रे आहेत. काही झालं, की लगेच पाया पडतात. कोण काय तर कोण काय करत असतो. साहित्यिकाचं काम डोळे द्यायचं आहे. कोणते डोळे ते जगाला देतील? माझ्यासारखे चष्मा लावलेले डोळे की डोळ्यावरची धूळ साफ करून निर्मळ झालेले डोळे? कोणते डोळे देणार आहोत आपण?

मी 78 च्या सुमारास देवदासी चळवळीत काम करीत होतो. देवदासींच्या कपाळावरचा भंडारा पुसायचो. तिच्या जटा सोडवायचो. तिच्या अंगात आलं, की तिचं प्रबोधन करून तिला शांत करायचो. तरीही लक्षात येत होतं की आपलं काहीतरी चुकतंय.

एवढी करूनही ही पुन्हा भंडारा लावतेच. पुन्हा जटा वाढवतेच. सौंदत्तीला पळतेच. काय करायला पाहिजे? त्यावेळेला प्रबोधनपर

कथा लिहिली होती एका देवदासीवर. 30 वर्षांपूर्वी… एक अतिशय सुंदर देवदासी आहे. रोज गावोगाव फिरते. डोक्यावर परडी घेते. त्या परडीच्या भोवती टाक आहेत. टाक म्हणजे छोटे देव. आपलं घर कितीही मोठं असलं तरी देवासाठी जागा छोटीच असते. ताटाइतकी. त्यांना रोज अंघोळ नसते. पौर्णिमेला अंघोळ असते. ज्या देवानं आपल्याला शक्ती द्यायची त्याला अंघोळ मात्र वर्षातून एकदाच. त्याला जागा ताटाएवढीच. माणूस किती शहाणा प्राणी आहे नाही! तर ही देवदासी परडी घेऊन एक दिवस जोगवा मागत असताना तिला चालूनचालून तहान लागते. शेजारी असलेल्या पाटामध्ये जावून पाणी प्यावं आणि पुन्हा जोगवा मागायला जावं म्हणून यल्लमाचा घोष करत ती पाटावर गेली. परडी बाजूला ठेवली. पाणी प्यायला लागली जनावरासारखं… तहान लागली होती खूप आणि तेवढ्यात शेताच्या मालकानं बघितलं. किती सुंदर बाई आपल्या पाटाचं पाणी प्यायला आलीच. तोंड बुडवून पाणी पितेय.

पदर पडलेला आहे. आणि तो हे पाहतो सगळं. तो जवळ जवळ येतो. तिला धरतो आणि बलात्काराचा प्रयत्न करतो. तिनं परडी बाजूला ठेवलेली आहे. ती यल्लमाचा धावा करायला लागते. आई माझ्यावर बलात्कार होतोय बघ. माझ्या मदतीला धाव आई. पण आई नाही येत. झोंबाझोंबीत परडी विस्कटते. देव सगळे शेतात विस्कटतात. हा बलात्कार करतो. ती पुन्हा आपले सगळे देव गोळा करून परडीत ठेवते. आपल्या घरी असलेल्या लेकीला सांगते. तिलाही ती देवदासी म्हणून सोडणार होती. ती म्हणते त्याने माझी

अब्रु लुटली.

मुलगी भाबडेपणाने विचारते, “डोक्यावर परडी असताना कशी काय लुटली? अंगात यल्लमा असताना कशी काय लुटली?

टाक पाटीत असताना कशी काय लुटली? मग देव कुठं गेले?”

ती म्हणाली, “झोंबाझोंबीत देव पण शेतात पडले. ते पुन्हा गोळा केले आणि परडीत घालून आणले.”

मग मुलगी विचार करते आई तुझ्या डोक्यावरचा देव तुझी अब्रू वाचवत नसंल तर मी आणि तू देवाच्या नादाला कशाला

लागायचं? सोडून दे सगळं… दोघी मिळून चांगलं जगूया… माणूस होऊ या…

अनेक वांझोट्या बायका खेड्याकडं घुमतात. कोणत्या कोणत्या देवाला अंगात खेळवतात. थोडा विचार करूया. तिचा पदर लवकर भरला असता तर बाबा- बुवा तिच्या अंगात शिरलेच नसते. वांझपणाला समाजमान्यता असती, प्रतिष्ठा असती तर बायका सुखात वांझ राहिल्या असत्या. पण तसं नाहीय. या जगात पृथ्वीच्या पाठीवरची प्रत्येक बाई ही फळे देणारीच असली पाहिजे. वांझ असण्यानं बाईचं आयुष्य खलास झालं होतं. वांझपणा दडपण्यासाठी देव अंगात घेणार्‍या अनेक बाया आहेत. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जावून आपण विचार करायला पाहिजे. विचार करत करत जी माध्यमं स्वीकारायची आहेत त्यामध्ये एक साहित्य आहे. मी भूमिका घेणारा माणूस आहे. मी भूमिका रेटून मांडणारा साहित्यीक आहे. इतरांना पटो न पटो पण आपल्याला जे पटतं ते मांडत राहिलं पाहिजे. आपण अशा समाजाचं स्वप्न बाळगायला पाहिजे; असा सुंदर समाज की ज्या समाज्यामध्ये अंधाराचे खाचखळगे नाहीतच. त्या समाजामध्ये असहाय्य माणसं काही अचाट प्रयोग करायला निघालेली नाहीत. कोण कोणाचा बळी घेत नाहीये, कोण कुठल्या नारळाचे गणपती करीत नाहीये, कुठं कुठल्या मूर्ती दूध पित नाहीये, हे सगळं घडणं माणसाच्या दुर्बलतेचं, कुरूपतेचं लक्षण आहे. माणसावर अशी काय वेळ आली की दगडाच्या मूर्तीला दूध पाजून संकटमुक्त व्हावं लागतं? व्यवस्थेनं जर त्याला संकटमुक्त केलं तर आपण तिकडं शरण जाणार नाही.

साहित्य पर्यावरणाचा वेध घेणारं असावं. देवा- धर्माच्या नादाला लागूच नका म्हणून सांगणारं असावं. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. मी पुन्हा पुन्हा म्हणतोय ‘गॉड ईज बायप्रॉडक्ट ऑफ ह्युमनबीईंग, व्हाय वुई आर फायटींग व्हिथ द बायप्रॉडक्ट?’ कुणाशी लढायला पाहिजे. लढाई माणसासाठी पाहिजे. लढाई व्यवस्थेविरूद्ध पाहिजे, लढाई कायद्याशी, लढाई न्यायासाठी, लढाई इथल्या परंपरांशी पाहिजे कारण त्यांच्यातून हे बायप्रॉडक्ट जन्माला आलेलं आहे. विहिरीत वरवर जंतूनाशकं टाकू नका. खराब पाणी घेऊन येणारा जो झरा आहे त्याच्यात दुरूस्ती करा म्हणजे विहिरीतलं पाणी स्वच्छ होईल. बिस्लरी घेतली काय अन् न घेतली काय विहिरचं खराब असंल तर वरचं पाणी बदलून चालत नाही. झर्‍यात बदल करावा लागतो. आपलं साहित्य म्हणजे मानवी जीवन सुंदर करणारा एक झराच आहे. त्या अर्थानं आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. असं काम ते नीट काम करत नसंल तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं हे काम केलं पाहिजे. तसं घडवायला मदत केली पाहिजे.

शेवटचा मुद्दा, जर ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ तीस वर्षे महाराष्ट्रात चालली नसती तर काय घडलं असतं? आपल्या महाराष्ट्रामध्ये बुवांची संख्या पुढार्‍यांपेक्षा जास्त झाली असती. पुढारी पण बुवा झाले असते अन् बुवा पण पुढारी झाले असते. कदाचीत महाराष्ट्र मतीमंद झाला असता. मतीमंद झाल्यामुळे गतीमंद झाला असता. त्यानं चालायचं बंद केलं असतं. त्यानं बघायचंच बंद केलं असतं. महाराष्ट्र अंधार घेऊन शंभर वर्ष मागं गेला असता. रॅडिकल चळवळी माणसाचं जीवन सुंदर करण्यासाठी असतात. आम्ही नुसतं बुवा संपवतो असं नाहीये. बुवा एक दृष्य आहे. आपल्याला विवेकवादी बनवायचं आहे. ही लांब चालणारी चळवळ आहे. अशा संमेलनांमुळं तिला बळ मिळावं, मिळत राहिल अशी मी अपेक्षा करतो.

–उत्तम कांबळे