अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संमेलनाचे आमंत्रण मला मिळाले तेव्हा मी थोडासा चक्रावलो, ह्याचे कारण विज्ञानकथा अंधश्रद्धा निर्मूलनास मदत करीत असतील अशी पुसटशी शंकादेखील मला ह्यापूर्वी कधी आलेली नव्हती. ज्यावेळी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी, विज्ञानकथांमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रूजण्यास मदत होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा दूर करण्यास मदत करतो, तेव्हा हे सूत्र धरून तुम्ही बोला, असे मला सांगितले तेव्हा मी ‘हो’ म्हणालो, कारण ह्या प्रकारे मी ह्यापूर्वी विज्ञानकथांबद्दल असा विचार कधीच केला नव्हता. अशा प्रकारे विज्ञानकथा तपासून पाहायच्या असे ठरवले तेव्हा मी मराठीत विज्ञानकथा ह्या वाङ्मय प्रकाराबद्दलचे समज गैरसमज आधी तपासले. दरम्यान डॉ.दाभोलकर यांचे पत्र मला मिळाले. त्यानुसार मला जो विषय देण्यात आला होता तो केवळ विज्ञानकथांपुरता मर्यादित नव्हता तर ‘मराठी साहित्यातील विज्ञान विषयक ग्रंथांनी वैज्ञानिक द़ृष्टिकोन कसा जोपासला वा रूजवला’ असा विषय पाहताच मला बरे वाटले कारण आता माझे काम बरेच सोपे झालेले होते. ह्याचे कारण मराठीतील पहिला वैज्ञानिक ग्रंथ ते आजमितीस प्रकाशित झालेल्या शेकडो ग्रंथांनी, मराठी जनता नावाचा जो पालथा घडा आहे त्यावर भरपूर पाणी ओतले आहे. मराठी माणूस खरेच ग्रंथप्रामाण्य मानत असता तर एव्हाना महाराष्ट्रात सर्वत्र बुद्धिप्रामाण्य बळावून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गरजच उरली नसती; मराठी जनतेने अंधश्रद्धा जोपासणार्या ग्रंथांचे प्रामाण्य मान्य केल्यामुळे किंबहुना अंधश्रद्धेचा वसा घेतल्यामुळे आज हे संमेलन घेणे भाग पडते आहे, आणि डॉ.दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इतर कार्यकर्त्यांना ह्या कार्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे.
भारतात अंधश्रद्धेची पाळेमुळे अतिशय खोलवर रूजलेली आहेत. आपल्याला कल्पना नसेल पण अनेक ज्योतिर्विदांनी इसवीसनाच्या आधीपासून त्यांच्या ग्रंथातून जनतेच्या भ्रामक समजुतींविरूद्ध जाणारी वैज्ञानिक सत्ये सांगितली होती. त्याशिवाय इसवीसनपूर्व सातव्या शतकापासून भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत होत्या. त्यांचे स्वरूप बघितले तर त्या काळातल्या वैद्यराजांनी आधी शवविच्छेदन करून शरीरांतर्गत अवयवांचा अभ्यास केल्याशिवाय अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांना अवगत असतील असे वाटत नाही. पुढे प्रेताला शिवणेच अशक्य झाल्यावर ही प्रगती थांबली असणार. स्मशानात पाऊल ठेवले तरी स्नान करणे, अशी सक्ती सुरू झाली. त्याकाळात रोगराई पसरू नये म्हणून हा नियम योग्यही असेल पण त्यासाठी जी कारणे देण्यात येऊ लागली. त्यामुळे शवविच्छेदन आणि वैद्यकीय प्रगती ह्या दोहोंचाही शेवट झाला आणि मग वैद्यकात अंधश्रद्धा घुसली.
सिकंदराच्या आधीपासून ग्रीक भारतात येत होते. भारतातली प्रगती विशेषत: वैज्ञानिक प्रगती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत असत. जे ग्रीकांचे तेच चिनी लोकांचे. अपार कष्ट करून ते भारतात येत असत आणि आधी संस्कृत शिकत मग इथल्या ग्रंथांच्या नकला करून ते चीनमध्ये घेऊन जात आणि तिथे त्यांची भाषांतरे करीत. भारतीय ग्रंथांची अशी अनेक भाषांतरे चीनमध्ये नीडहॅम ह्या पौर्वात्य संस्कृतीचा आणि चिनी विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार्या विज्ञान संशोधकाला मिळाली. चीनमध्ये रसायनशास्त्राची आणि धातूच्या ओतकामाची जी प्रगती ऐतिहासिक काळात झाली त्याला नागार्जुन ह्या भारतीय रसायनशास्त्रज्ञाचे ग्रंथ कारणीभूत होत.
प्राचीन भारतीय ज्योतिर्विदांपैकी बरेच जण विदर्भ आणि मराठवाड्यातले होते. त्यातल्या आर्यभटाने(पहिला) पृथ्वी सूर्याभोवती फिरते ह्याचे कारण सूर्याचे आकर्षण, आकाशाकडे फेकलेला दगड पृथ्वीवरच परत पडतो, ह्याचे कारण पृथ्वीचे आकर्षण, राहू केतू हे राक्षस नव्हेत तर दोन भासमान बिंदू आहेत, चंद्रावर पृथ्वीची सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण होते, चंद्र जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते, हे स्पष्ट शब्दात लिहून ठेवले. त्यानंतरच्या काळातल्या ज्योतिषाचार्यांनी धार्मिक दबावाला बळी पडून ह्यावर टीका केली. हे सर्व अशासाठी सांगितले की, आपल्याकडे बुद्धिप्रामाण्यवाद पूर्वापार होताच पण धर्माचा रेटा एवढा जबरदस्त होता की, बुद्धिप्रामाण्य मानणार्यांना प्रचंड विरोधाला तोंड द्यावे लागले.
दुर्योधनाचा एक सल्लागार कणिक. त्याची कणिकनीती प्रसिद्ध आहे. त्याने देवधर्माचा स्वत:च्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घ्यावा हे दुर्योधानस सांगितले होते. प्रजेला अज्ञानी ठेवले की ती सुखी राहते, असे तो म्हणतो. कौटिल्य तर स्पष्ट शब्दात गावोगाव देवळे निर्माण करावीत, त्यात चमत्कार घडवून आणावेत, म्हणजे तथाकथित भाविक तिथे पैसे टाकतील. ह्या देवतांचे वार्षिक उत्सव करावेत. मग पुजार्यांना त्यांचा वाटा देऊन उरलेला पैसा सरकारी खजिन्यात जमा करावा, असे स्पष्टपणे सांगतो. जत्रेच्या गर्दीत साधूंच्या वेषात हेर पाठवून जनमत कोणत्या प्रकारचे आहे, ते आजमवावे, असेही तो सांगतो. त्याचा हा एवढाच सल्ला सध्याच्या राज्यकर्त्यांनी मनावर घेतला हे आपले दुर्दैव म्हणावे लागते.
ब्रिटीशांच्या काळातही बर्याच जणांनी वैज्ञानिक प्रगतीची कास धरायला हवी, असे म्हटले. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणमधून रूढींच्या घातकपणाबद्दल लिहिले, महादेव गोविंद रानडे यांनी टिळकांना पत्र लिहून सार्वजनिक गणेशोत्सवास विरोध केला. देवाचे सार्वजनिकीकरण योग्य नव्हे, पुढे ह्याचा असामाजिक प्रवृत्तीचे लोक त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी उपयोग करतील असेही म्हटले. त्याचाही काही उपयोग झाला नाही. बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सयाजी ग्रंथमाला सुरू केली. चांगले वैज्ञानिक पुस्तक लिहायचे, त्याचे हस्तलिखीत संस्थानकडे पाठवायचे. सयाजी ग्रंथमालेतर्फे ते प्रसिद्ध होईल. आणि लेखकास रू.2000/- ते रू.5000/- पर्यंत मानधन मिळेल असे त्यांनी जाहीर केले आणि अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले.
आगरकरांनी तर अक्षरश: भिंतीवर कपाळ आपटावे तसा अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार केला. त्याकाळात वेगवेगळ्या पंचांगांमध्ये आणि नियतकालिकात येणार्या जाहिराती बघितल्या तर एक वेगळेच दृश्य समोर येते. खास गाईच्या तुपात तयार केलेले काजळ, रामपंचायतनाचे चित्र झाकणात असलेली घड्याळे, ह्यांच्या जाहिरातींबरोबरच नको त्या ठिकाणचे केस उडवून लावणारा बादशाही साबण ह्या जाहिराती शेजारी शेजारी असत. त्यात छापणार्याला आणि वाचणार्यालाही काही वावगे वाटत नसे.
त्याकाळातही वैज्ञानिक ग्रंथ आणि मासिके होती. कॉलरा, प्लेग यांच्या साथी कशामुळे येतात, देवीच्या रोगाचा आणि कुठल्याही देवदेवतेचा संबंध नाही, हे सांगणारी गद्य आणि पद्य, पुस्तके आणि पुस्तिका होत्या. त्याकाळात पुस्तकांमध्येही जाहिराती असत, हे लक्षात घेता काही नियतकालिकांमध्ये आणि पुस्तकांमध्ये संपादकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत त्या जवळजवळ सारख्याच आहेत. खरे तर ही प्रकाशकांची निवेदने असावीत पण त्या काळात बरेचदा प्रकाशकच संपादकांची भूमिका बजावत असत, हेही लक्षात घ्यायला हवे. इतर प्रकारच्या म्हणजे रहस्यकथांच्या पुस्तकांची त्या काळात चलती होती, हेही त्यावरून लक्षात येते. ज्ञानप्रसार, विविध ज्ञान विस्तार, केरळकोकीळ त्याच प्रमाणे. प्लेगच्या साथीचे वर्णन, देवीच्या उपचारांची माहिती देणारी पुस्तिका आदी लोकोपयोगी पुस्तकांमध्ये प्रकाशक/संपादक म्हणतात-‘कोणत्याही सुशिक्षित व्यक्तीस महिना दीड आणा अथवा वर्षास सव्वा रूपया एवढे पैसे जास्त नव्हेत. तरीही बरेच वाचक हे पैेसेही देत नाहीत पण केवळ मनोरंजनपर मजकूर देणार्या मासिक पुस्तकांस मात्र मोठ्या प्रमाणावर उठाव दिसतो. दिवसेंदिवस हा आर्थिक भार सहन करणे आम्हास अवघड होत आहे. त्यामुळे प्रकाशन अनियमित झाल्यामुळे आम्ही हा आतबट्ट्याचा व्यवहार बंद करण्याचे योजिले आहे.’ – हे निवेदन 1890 च्या सुमारास बंद पडलेल्या पहिल्या सृष्टीज्ञानचे आहे.
मराठी माणूस स्वत:चे पैसे वाचनावर क्वचितच खर्च करताना दिसतो. मध्यंतरी एका प्रदर्शनात ओळखीच्या विक्रेत्याबरोबर गल्ल्यावर त्याच्या शेजारी बसलो होतो. त्याने मला एका गृहस्थाकडे इशारा करून ते काय करतात ते बघायला सांगितले. ते धार्मिक ग्रंथांच्या विभागात गेले. त्या विभागातले एक पुस्तक त्यांनी उचलले. त्यातले हवे ते पान शोधले. मग खिशातून एक डायरी काढली आणि त्यातले एक स्तोत्र त्यांनी उतरवून घेतले. नंतर मला कळले की रोज ते असे एक स्तोत्रच उतरवून घेतात किंवा त्यांना हवा तो एखाद्या व्रताचा भाग उतरवून घेतात; पण पुस्तके मात्र खरेदी करत नाहीत. विक्रेता म्हणाला, ‘त्यांना अडवले तर ते तमाशा करतात. ते नेहमी गर्दीच्या वेळेलाच येतात.’ दुसर्या एका पुस्तक प्रदर्शन भरवणार्याने ‘किमान 15 % पुस्तके चोरीला जातातच. त्यामुळे काही शहरात आम्ही प्रदर्शने लावणे बंद केले आहे,’ असे सांगितले. हे सांगायचा उद्देश असा की, महाराष्ट्रात पुस्तके विकत घेऊन वाचणारे तसे कमीच. घेतलेली पुस्तके वाचणारेही कमीच. अशा परिस्थितीत ग्रंथ वाचनाने एखादा ठाम रूजलेला विचार कुणी वाचन करून बदलत असेल असे लोक प्रत्यक्षात कमीच असणार, हे सांगायला नकोच.
आता मला आणखी एक मुद्दा स्पष्ट करायचाय तो म्हणजे विज्ञानग्रंथांचा. विज्ञानग्रंथ आणि विज्ञान नियतकालिके ह्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. पाठ्यपुस्तके ही त्या त्या विषयाचे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक यत्तेनुसार वाचतात. ती पाठ्यपुस्तके त्या विषयाचे विद्यार्थी सोडले तर जनसामान्यांच्या संपर्कात येत नाहीत. दुसरे म्हणजे ह्या पुस्तकांच्या भाषेत लालित्य नसले तरी चालते. बहुधा ती आपल्या दृष्टीने क्लिष्ट भाषेत लिहिलेली असतात. ह्यानंतरचा प्रकार म्हणजे एखाद्या संशोधन पत्रिकेत लिहिलेले शोध निबंध आणि संशोधन विषद करून सांगणारे ग्रंथ. हेही त्या विषयासंबंधी अभ्यासकांपेक्षा इतरांनी वाचावेत अशी लेखकाची आणि प्रकाशकाचीही अपेक्षा नसते. हे ग्रंथ वाचणार्या वाचकाला विषयाचे ज्ञान असेलच हेही गृहीत धरलेले असते. त्यामुळे ह्या विषयाशी ज्यांचा संबंध नसतो, त्या शास्त्र शाखेच्या व्यक्ती सोडून इतर बहुधा शास्त्र शाखातील व्यक्तीही अशा ग्रंथांच्या वाटेस जाताना दिसत नाहीत. ह्याशिवाय इतर काही नियतकालिके आणि पुस्तके बहुउद्देशी असतात. त्यात सर्व शाखांसंबंधींचे माहितीपर लेखन असते. अलिकडे बहुशाखीय संशोधन सुरू झाले आहे. त्यातल्या दोन शाखांचा समन्वय करून संशोधन करणार्यांना आणि विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या आणि लोकार्थी विज्ञानलेखन करणार्या माझ्यासारख्या लेखकांना ही पुस्तके नियतकालिके उपयुक्त ठरतात.
विज्ञानप्रसारक लेखक हा समाजाला विज्ञानाची गोडी लावावी ह्यासाठी सोप्या भाषेत विज्ञानलेखन आणि विज्ञानविषयक भाषणे आणि प्रयोग करीत असतो. त्याचा उद्देश सामान्य माणसाचा आणि विज्ञानाचा परिचय घडवून आणणे हा असतो. हे करतानाच तो विज्ञानाची मूलतत्वे वाचकाच्या गळी उतरवायचा प्रयोग करीत असतो; अत्यंत दुर्दैवाने विज्ञान म्हटले की, आपल्यासाठी नव्हे, ते लहान मुलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठीच असणार, असा एक गैरसमज जनमानसात ठाम रूजलेला आहे. त्यामुळे विज्ञानाची पुस्तकेही नेहमी मुलांसमोर टाकली जातात. मग विज्ञान लेखक सोप्या भाषेत लिहीत नाहीत, ते विद्यार्थ्यांना समजत नाहीच ते त्यांच्या हाती का जावे? विज्ञानाबद्दलची अलिप्तता आपल्या समाजात अशी फार खोलवर रूजलेली दिसते.
विज्ञानाची म्हणून खपवली जाणारी काही अवैज्ञानिक पुस्तके मराठीत बर्यापैकी खपतात, असा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये अशा विषयांना ‘स्यूडो सायंटिफिक’ असे म्हटले जाते. मराठीत ह्यांना ‘असत् वैज्ञानिक’ असे म्हणावे लागेल. ‘बर्म्युडा ट्रँगल’, ‘गॉड्स फ्रॉम आऊटर स्पेस’ अशा पुस्तकांची ही स्वैर भाषांतरे असतात. भारतीय मनाला ह्यांची भुरळ पडायचे कारण ह्यामध्ये रामायणात विमान होते, महाभारतात अणुबाँब होते, अशा तर्हेची माहिती ह्यात असते. प्रथमदर्शनी ही पुस्तके आकर्षक वाटतात. वाचताना हा शास्त्रीय प्रबंध आहे, असे वाटावे, अशा तर्हेने ही पुस्तके लिहिलेली असतात. त्यामुळे सामान्य माणसांना ह्याची भुरळ पडते. विद्यार्थीदशेत मीही ह्यांच्याकडे आकृष्ट झालो पण जसजसे विज्ञान शिकत गेलो तसतसा माझा भ्रम दूर झाला.
पुढे मी हे सर्व खोटे आहे, असे सांगणारे लेख लिहिले आणि लोकांचे शिव्याशाप खाल्ले. मला भारतीय संस्कृतीचा अभिमान नाही असे आरोपही मी सहन केले. पुढे पंढरीनाथ सावंत ह्या माझ्या ज्येष्ठ मित्राची आणि माझी एकदा चर्चा झाली. त्याने जे शब्द वापरले ते जसेच्या तसे सांगणे अवघड आहे; पण देवाला न मानणार्या ह्या माझ्या मित्राने मला एक कानमंत्र दिला. तो म्हणजे ‘भारतीय माणूस कशालाही भुलू शकतो. मात्र ते सांगणार्याने एकदम विद्वान असल्याचा आव आणला पाहिजे.’ ह्यानंतर मी आपल्या पूर्वजांचे विज्ञान-तंत्रज्ञान ही पुरातत्वीय पुराव्यांवर आधाराने लेखमाला मार्मिकमध्ये लिहीली. लोकांनी दूरध्वनीवरून त्यांची स्तुतीही केली आणि तितक्याच भारतीय संस्कृती प्रेमी लोकांनी मला हिंदू संस्कृतीचा अभिमान नाही, आपल्या पुराणात खूप प्रगत विज्ञान तंत्रज्ञान होते त्याबद्दल ह्या लेखमालेत काही नाही, अशा तर्हेनं निर्भत्सनाही केली.
ज्यावेळी ह्या लेखमालेची आपल्या पूर्वजांचे विज्ञान आणि आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान ही दोन पुस्तके छापायचे ठरले तेव्हा मी ह्या लेखनामागची भूमिका समजावून सांगताना ‘ज्यांचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत, अशीच उदाहरणे ह्या पुस्तकात घेतली आहेत,’ हे स्पष्ट केले. त्यावेळी ‘महाभारत बारा हजार वर्षांपूर्वी घडले, त्याचे पुरावे आता कसे मिळणार, तुम्हाला भारतीय संस्कृतीचा अभिमानच नाही’, असे मला सुनवण्यात आले. त्यातच ह्या पुस्तकाच्या एका आवृत्तीत मी लिहिले- ‘वाल्मिकी रामायणाचे शुद्ध संस्करण उपलब्ध आहे. त्यात कुठेही रामाने नर्मदा नदी ओलांडल्याचा उल्लेख नाही. एच.डी.सांकलिया, इरावती कर्वे, रावबहाद्दूर किवे ह्यांच्यासारख्या मराठी आणि भारतातल्या इतर संशोधकांनी आणि बर्याच पाश्चात्य विद्वानांनी रामायणावर जे संशोधन केले आहे त्यानुसार रामायणातील लंका आताच्या झारखंड म्हणजे पूर्वीच्या ओरिसा आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर होती.
त्या काळात(आणि आजही) आदिवासी टोळ्या त्यांच्या ध्वजचिन्हावरून ओळखल्या जात; म्हणजे त्यांच्या ध्वजावर जर अस्वलाची आकृती असेल तर ती अस्वल जमात वगैरे. मारूती हा अशा वानर जमातीचा होता. त्याने केलेले सागर उड्डाणही असेच. इंग्लंडपासून व्हिएटनामपर्यंतच्या पुराव्यांनी मारूती समुद्र लंघोनी लंकेस कसा गेला हे स्पष्ट करता येते. पाण्याच्या कुठल्याही मोठ्या साठ्यास सागर असे म्हटले जाते. पूर्वीच्या राजांच्या राजधान्या एखाद्या मोठ्या सरोवरात किंवा दलदलीच्या प्रदेशामध्ये भराव टाकून त्यावर शहर वसवून तयार केल्या जात. इथे पोहोचण्याचा एक राजमार्ग काही मुद्दाम तयार केलेले गुप्तमार्ग असत. ते फार थोड्या जणांना ठाऊक असत. राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्ती, गुप्तहेर प्रमुख वगैरे. बिभिषणाने असा एकादा मार्ग मारूतीला दाखवला असणार, मगरीचा ध्वज असलेल्या टोळीवाल्यांनी ह्या दलदलीतून त्याला लंकेपर्यंत पोहोचवले असावे; जवळपास असे हे स्पष्टीकरण आहे. त्याला लोकांनी जास्त दाद आणि कमी शिव्या दिल्या.
मराठीत अशा प्रकारचे ग्रंथलेखन तसे कमी झाले आहे. जे झाले आहे, त्यात आक्रस्ताळेपणा आणि दैवतांची थेट निंदा आहे, ह्याचा परिणाम म्हणजे सनातनीही ह्या प्रकारच्या पुस्तकांचा प्रतिवाद करताना आक्रमक बनतात मग ‘वादे वादे जायते कंठशोष:!’ अशी परिस्थिती निर्माण होते. आता आपण विज्ञानातील गेल्या शंभर वर्षांतील काही वैज्ञानिक ग्रंथांकडे वळू. ह्यात ‘विज्ञानबोध’ हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. श्री.म.माटे ह्यांनी त्या काळातील विज्ञानाचे अध्वर्यू असलेले प्राध्यापक गोळा करून त्यांच्याकडून विज्ञानाच्या प्रमुख शाखांवर लेखन करून घेतले. तो ग्रंथ निर्माण करताना लेखक आणि संपादक ह्या दोघांनीही बरेच परिश्रम घेतले होते. विज्ञानबोधची प्रस्तावना तर विज्ञानाच्या भूमिकेबद्दल सांगणारा एक स्वतंत्र ग्रंथ म्हणूनही महत्वाची ठरेल. ती काही काळ मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट होती. त्या प्रस्तावनेतही मराठी माणूस अधिक विज्ञानाभिमुख व्हावा, म्हणून हा ग्रंथ निर्माण केल्याचे स्पष्ट म्हटले आहे. ‘एकदा का वैज्ञानिक विचारसरणी ह्या व्यक्तींनी आपलीशी केली की दैनंदिन आयुष्यात वाचक सारासार विचार करून आधुनिक जीवनदृष्टीचा स्वीकार करतील’, अशी माटे ह्यांची अपेक्षा होती. आज हा ग्रंथ फारच थोड्यांना ठाऊक आहे आणि ह्यात असलेल्या विज्ञानाच्या आणि साहित्याच्या अभ्यासकांपैकी फारच थोड्यांनी तो बघितला आहे, हे मी वेगवेगळ्या विद्वानांशी झालेल्या अनौपचारिक चर्चांवरून सांगू शकतो. साहित्य संस्कृती मंडळाने खरे तर ह्या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करायला हवे. महाराष्ट्राला विक्षिप्त विद्वानांची कधीच उणीव भासली नाही. त्यातले एक म्हणजे ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर. ह्यांचा ज्ञानकोश आजही उपयुक्त ठरतो. ह्या ग्रंथाची प्रस्तावना खरोखरच वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणारी आहे. ह्या गृहस्थांचे विचार थोडेसे एकांगी आहेत, अशी त्याकाळात टीका झाली. त्यात काही चूक असावी असे नाही. त्यांच्या विविध मतांवर त्याकाळात टीकाही झाली पण त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्व कमी होत नाही. त्यांनी जे प्रस्तावना खंड लिहिले आहेत ते वाचूनही बरेच उद्बोधन होऊ शकते. अत्यंत खडतर परिस्थितीस तोंड देऊन न्यायालयाच्या पायर्या झिजवून केतकरांना त्यांचा हा भव्य प्रकल्प पूर्ण करावा लागला आणि नंतर ते ओझे खांद्यावर वागवत, तो दारोदार जाऊन विकावा लागला. ह्या ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड पचविणे परंपरागत विचार करणार्यांना झेपणारे नाही. मराठी माणसाने मात्र ह्या ग्रंथाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
मराठीमध्ये वैज्ञानिक ग्रंथांची परंपरा तशी फार मोठी आहे. इ.स.1833 मध्ये पहिला मराठी वैज्ञानिक ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला. मिस् मार्सडेनच्या ‘कॉन्व्हर्सेशन ऑन फिजीक्स’ ह्या ग्रंथाचा तो सुरस अनुवाद होता. त्याचे नाव सिद्ध पदार्थ विज्ञान विषयक परिसंवाद, 19 व्या शतकाच्या अखेरच्या काळात ‘भारतीय ज्योतिर्विद्येचा इतिहास’ हा शं.बा.दिक्षितांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ फलज्योतिषाच्या पूूर्ण विरोधात असून मराठीतील खगोलशास्त्र विषयक तो एक महत्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर विज्ञानबोध आणि ज्ञानकोश ह्यांच्या समकालीन एक वैज्ञानिक चळवळ म्हणजे सृष्टीज्ञान हे मासिक.
प्राचार्य गो.रा.परांजपे ह्यांनी 1928 साली जानेवारी महिन्यात ह्या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. रॉयल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स’ ह्या संस्थेकडे भारतीय वंशाचे ते पहिले प्राध्यापक आणि प्राचार्य. ते जर्मनीत संशोधन करून पदव्युत्तर शिक्षण करावयास गेले होते. पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यांना शत्रू राष्ट्राचे नागरिक म्हणून तुरूंगात डांबण्यात आले. तिथून सुटून परतल्यावर ते रॉयल इन्स्टिट्युटमध्ये पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक झाले. जर्मनांची राष्ट्रभाषा निष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जर्मन समाजात चर्चला असलेले दुय्यम स्थान ह्यांनी ते प्रभावित झाले. परांजपे स्वत: पूर्णपणे नास्तिक होतेच पण निष्ठावान वैज्ञानिक होते.
रॉयल इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी सर्व मराठी व्याख्यात्यांना एकत्र करून मूळ रॉयल सोसायटीच्या धर्तीवर एक साप्ताहिक सभा सुरू केली. ही दर बुधवारी असे. ह्या सभेत एक सदस्य त्याच्या विषयातील एखाद्या संशोधनाबद्दल, प्रगतीबद्दल किंवा त्या विषयाची ओळख करून देणारे एक व्याख्यान देत असे. हे तो लिहून आणीत असे. रॉयल सोसायटी अशा व्याख्यानांची छापील पत्रिका दरवर्षी प्रसिद्ध करीत त्याच प्रथेला अनुसरून ह्या व्याख्यानांची संपादित आवृत्ती आणि काही नवे लेखक तयार करण्याची प्रयोगशाळा म्हणून सृष्टीज्ञान मासिक निघू लागले. ‘मातृभाषेतून विज्ञानप्रसार केल्याशिवाय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजणार नाही; वैज्ञानिक दृष्टिकोन रूजल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. भारतीय समाज परंपरागत समजुतींच्या आणि रूढींच्या वेढ्यातून मुक्त करायचा असेल तर त्यासाठी समाजप्रबोधन होणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजणे आवश्यक आहे, असे ते म्हणत. गेली 85 हून अधिक वर्षेसृष्टीज्ञान हे कार्य करीत आहे.
सृष्टीज्ञानचा मुद्दाम उल्लेख करायचे कारण ह्यातील लेखांचे अनेक संग्रह वेळोवेळी प्रकाशित झाले. ‘परभाषेतून विज्ञान शिकवले तर ते फक्त पाठ केले जाते. स्वभाषेतून विज्ञान शिकवले तर ते आत्मसात करता येते’, असेही परांजपे म्हणत. त्यांनी स्वत: परिभाषा निर्मिती केलीच पण ‘सृष्टीज्ञान खगोल दर्शन अॅटलास’ हा आजही प्रमाणभूत मानला जाणारा संदर्भग्रंथ निर्माण केला.
विज्ञानविषयक ग्रंथ निर्माण करणार्यांची यादी तशी मोठी आहे. वा.रा.ढवळे, प्रल्हाद विनायक आपटे, प्रभाकर सोवनी, भालबा केळकरांपासून अलिकडच्या सुबोध जावडेकर, डॉ.बाळ फोंडके आणि डॉ.जयंत नारळीकर ह्यांच्यापर्यंत अनेकांनी विज्ञान ग्रंथांचे लेखन केले. मात्र मराठी वाचक ऐतिहासिक रम्याद्भुत कथा कादंबर्यातून अजूनही बाहेर पडलेला नाही हे सत्य आहे. मराठीत 1833 ते 1900 ह्या काळात एकूण पुुस्तकांपैकी साडेचार टक्के पुस्तके विज्ञानावरची होती. दाते सूची आणि मराठी विज्ञान वाङ्मयाची रा.वि.सोवनीकृत सूची बघितली तर विसाव्या शतकातही (अगदी वैद्यक विषयाची पुस्तके धरून) ह्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. किंबहुना विज्ञानविषयक पुस्तकांचा टक्का साडेवरून चार टक्क्यांवर आलेला दिसतो. ह्याला जी अनेक कारणे आहेत त्यात स्वप्रकाशित कविता संग्रह आणि पाककृतींच्या पुस्तकांच्या संख्येतील वाढ हेही कारण असू शकते, हे नाकारता येणार नाही.
आता आपण विज्ञान वाङ्मयातील एका महत्वाच्या विभागाकडे म्हणजे विज्ञान साहित्याकडे वळू या. विज्ञान साहित्य म्हणजे ज्याला इंग्रजीत सायन्स फिक्शन म्हणतात, तो साहित्य प्रकार. इथे मला विज्ञानसाहित्य कशाला म्हणतात हे स्पष्ट करून सांगणे आवश्यक वाटते. ह्याचे कारण विज्ञानसाहित्य ह्या नावाखाली बर्याच अवैज्ञानिक कथा, कादंबर्याही बाजारात आलेल्या मी बघितलेल्या आहेत. विज्ञानकथा/कादंबरी ही आजच्या विज्ञानप्रगतीचे भविष्यात प्रक्षेपण करते आणि अशा तर्हेच्या प्रगतीचा त्या भविष्यकाळातील समाजावर आणि नागरिकांवरही ह्या प्रगतीचा कोणत्या प्रकारे प्रभाव पडेल, ह्याचा विचार करते. थोडक्यात म्हणजे आजच्या एखाद्या वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञान विषयक प्रगतीच्या पुढील वाटचालीची दिशा कोणती असेल आणि त्या प्रगतीला समाज कसे तोंड देईल ह्याचबरोबर समाजाच्या घटकांवर म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर ह्या प्रगतीच्या परिणामाचा कसा प्रभाव पडेल ह्याचा विचार करेल.
हे म्हणायचे कारण समाजाचे सर्वच घटक वैज्ञानिक प्रगतीचा स्वीकार करतातच असे नाही. जे करतात ते ह्या वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानविषय प्रगतीचा वापरही एकाच प्रकारे करतात असेही नाही. वेगवेगळ्या प्रकारे ध्वनिमुद्रणात आणि ध्वनिचित्रप्रक्षेपणात जी प्रगती झाली ती कशी वापरली जाईल हे शोध लावणार्यांना अजिबात कल्पना नव्हती. ध्वनिमुद्रण आणि चित्रध्वनी एकीकरण ह्यांचा उपयोग करून जसे शैक्षणिक साहित्य निर्माण झाले, त्याचप्रमाणे करमणुकीचे साहित्यही निर्माण झाले. एकीकडे तथाकथित संत महाराजांची धार्मिक व्याख्याने घराघरात पोहोचली त्याचबरोबर अश्लील आणि विकृत संबंधांचे चित्रीकरणही घराघरात उपलब्ध होऊ लागले. काही विज्ञान साहित्यिकांंनी अशा तंत्रज्ञानाचा मानवी हालचालींवर आणि व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी शासन वापर करील, अशा अर्थाच्या कथा खूप पूर्वी लिहिल्या होत्या. विज्ञानकथा/कादंबर्या/नाटके आदी साहित्य प्रकारांना मूलत: पुढील येणार्या काळाची पार्श्वभूमी असते, हे महत्वाचे. त्या साहित्य कृतीत जर प्रचलित विज्ञान वापरले असेल तर ते बिनचूक वापरणे आवश्यक असते. त्याचे भविष्यकाळात प्रक्षेपण करतांना त्यात तर्कसंगती असणे महत्वाचे ठरते. कथानकाच्या ओघात त्यांचे स्पष्टीकरण आले तर दुधात साखर पण ह्याचा अर्थ लेखकाने त्याची कल्पनाशक्ती स्वैर सोडावी आणि वाट्टेल तो, अद्भूत चित्र चक्षुचमत्कारिक मजकूर लिहावा असे नाही. दुसरे म्हणजे विज्ञान साहित्यिक हा भविष्यकथन करीत नसतो. त्याने लिहिल्याप्रमाणे प्रत्यक्षात तशा घटना घडायलाच हव्यात असा आग्रह धरायचा नसतो; हे इथे स्पष्ट करणे भाग आहे. विज्ञान लेखक भविष्यकथन करण्यासाठी लिहीत नाही तर तो भविष्याबद्दलचा सुशिक्षित अंदाज (एज्युकेटेड गेस) वाचकापुढे मांडत असतो.
आता आपल्याला जो मुद्दा तपासायचा आहे तो म्हणजे विज्ञानसाहित्याने अंधश्रद्धा निर्मूलन होते का? किंवा होऊ शकेल का, हा!’ मराठीमध्ये दोन प्रकारच्या विज्ञानकथा लिहिल्या जातात. असे म्हणावे लागेल. डॉ.जयंत नारळीकर यांनी ‘विज्ञान शिकविण्याचा उपाय’ म्हणून विज्ञानकथा लिहिल्या. असे त्यांच्या ‘यक्षाची देणगी’ ह्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे. विज्ञानकथेला ते ‘शर्करागुंठीत गोळी’ असे म्हणतात. ह्यामुळे बर्याच समिक्षकांनी विज्ञानकथा ही विज्ञानाचे शिक्षण देणारीच असायला हवी असा आग्रह करून घेतलाच पण बर्याच लेखकांनीही तशीच समजूत करून घेतली. हे माझे वैयक्तिक मत आहे.’ हे नारळीकरांचे वाक्य सोयिस्कररित्या विसरले गेले.
नारळीकरांच्या विज्ञानकथांना मराठीतील सर्वश्रेष्ठ विज्ञानकथा म्हणायचे ही अंधश्रद्धा जोपासली गेली. नारळीकर हे वैज्ञानिक आहेत त्यामुळे त्यांच्या कथा ह्या विज्ञानकथा आहेत, असे एक विधान युगवाणीपासून महाराष्ट्र साहित्य पत्रिकेपर्यंत अनेक ठिकाणी केले गेले. ही अंधश्रद्धा इतकी जोपासली गेली की, डॉ.दाभोलकरांनी स्वत: मराठीत काहीही न लिहिता त्यांना प्र.सा.पत्रिकेने विज्ञान कथाकार बनवले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाच्या एका खंडात मराठीमधील विज्ञानकथाकारांच्या कथांबद्दल परखड लेखन केल्यानंतर ‘तुम्ही फारच शेंदूर खरडलाय!’ असे लेखकाला सांगण्याच आलेच; पण हा खरडलेला शेंदूर लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्या लेखात काटछाट करतांना तारतम्यही बाळगले गेले नव्हते, त्यामुळे काही मूळ विधाने चुकीच्या पद्धतीने छापली गेली आणि त्यांचा अर्थ बदलला. पुढे ह्या संपादकांनी एका सुप्रतिष्ठित संस्थेने जाहीर केलेले निकष बदलून, एका नियमानुसार वय बसत नसलेल्या एका आदरणीय वैज्ञानिकाला साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कार स्वत:च्या अखत्यारीत द्यायला लावला, असे कानावर आले.
स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणारे जेव्हा अशा तर्हेचे एखाद्या व्यक्तीचे दैवतीकरण करतात, तेव्हा सामान्य माणसाची अंधश्रद्धा हे कशी दूर करणार हा प्रश्न निर्माण होतो. आता विज्ञानकथेने अंधश्रद्धा दूर होण्यात मदत होईल का ते बघू. मराठीच काय पण जागतिक विज्ञानकथांबद्दल एक आक्षेप नेहमीच घेतला जातो. तो म्हणजे विज्ञानकथा भविष्यकाळाची निराशाजनक काळी बाजूच जास्त करून मांडतांना दिसतात. तो आक्षेप खरा आहे. 80 ते 90% विज्ञानकथा ह्या भविष्यकाळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापरामुळे येणार्या संकटांचाच विचार करताना दिसतात. ह्या विज्ञान कथाकारांची काही चूक आहे, असे म्हणता येणार नाही. ह्याचे कारण आजपर्यंतच्या मानवी इतिहासातील उदाहरणे बघितली तर विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रत्येक नवा अविष्कार हा मानवी कल्याणापेक्षा अकल्याणासाठीच वापरला गेलेला दिसतो. फार तर तो जास्त प्रमाणात वापरला गेलेला दिसतो असे आपण म्हणू शकतो. ह्या शिवाय एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे मिळणारे बरेच फायदे एकतर वाढत्या लोकसंख्येमुळे फारसे परिणामकारक ठरत नाहीत, किंवा ते फारच थोड्या लोकसंख्येला-समाजातील धनिकवर्गालाच मिळतात. हे भविष्यकाळातील वास्तवाचे चित्रण लोकांना निराशाजनक वाटते. न घडलेल्या भविष्यकाळातील परिस्थितीच्या अंदाजाला वास्तव म्हणणे हा वदतोव्याघात ठरेल हे खरे पण तो एक अभ्यासपूर्ण अंदाज असल्यामुळे त्याला ‘भविष्यकालीन वास्तव’ म्हणणे फारसे चुकीचे ठरू नये. वाचकांच्या प्रतिक्रिया आजकाल थेट दूरध्वनीवरून ऐकाव्या लागतात पण ह्या प्रतिक्रिया देणारे बहुसंख्यवाचक विज्ञानकथांमुळे भविष्यकाळाबद्दल चिंताच वाटू लागते, असे म्हणतात. विज्ञानकथा खरे तर समाजाला भविष्यकाळात असे घडू शकेल बरे का, हे सांगायचा प्रयत्न करीत असतात. ताजी उदाहरणे द्यायची तर जीवतंत्रज्ञान, क्लोनिंग असे जैवी क्षेत्रातले विषय किंवा गर्भाशय भाड्याने देणे, आदी बाबी विज्ञानकथांनी फार पूर्वी जगापुढे आणल्या होत्या, त्याकाळातच ह्या प्रगतीची शक्यता गृहीत धरून कायदे केले गेले असते, तर अलिकडे हे कायदे नसल्यामुळे किंवा घाईघाईने अपुरे असे कायदे केल्यामुळे जे कज्जे-खटले उभे राहिले आणि बालक कुणाचे, ह्या प्रश्नांवर न्यायालयांची कोंडी झाली तशी ती झाली नसती. तसेच जैवतंत्रज्ञानाने जी पिके निर्माण झाली, त्यांच्याबद्दलचे वादही अस्तित्वात आले नसते. हे समजावून घ्यायला वाचकांना वेळ नसतो. त्यांनी एकदा एखादी गोष्ट मनात निश्चित केली की, त्यापेक्षा दुसरी बाजू ते ऐकून घ्यायला तयार नसतात.
अलिकडे मला आलेला एक अनुभव सांगतो. माझी ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ आणि ‘आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान’ अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यावर त्यात प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानाची मी दखल घेतली नाही, अशी टीकाही बर्याच वाचकांनी केली. त्या म्हणण्याला मी उत्तरही दिले. ज्या भारतीय प्रगतीबद्दल स्पष्ट आणि ठोस पुरावे उपलब्ध आहेत, तेवढीच उदाहरणे ह्या पुस्तकांमध्ये आहेत, ज्या सांगोवांगीच्या गोष्टी पुराणांमध्ये आहेत पण ज्यांचे पुरावे नाहीत, त्याबद्दल मी ह्या पुस्तकांमध्ये लिहिलेले नाही, हे माझे स्पष्टीकरण होते. भारतात इ.स.पूर्व पंधराशे पर्यंत पाषाणयुग सुरू होते. काही ठिकाणी ताम्रपाषाण युगाची सुरवात झाली होती, असेही स्पष्टीकरण रामायण दहा हजार वर्षांपूर्वी घडले असे म्हणणार्यांना मी दिले होते. ह्यावर माझे जे वाद झाले त्यात माझ्या म्हणण्याचा प्रतिवाद करणार्यांनी नारळीकर यांच्या ‘अभयारण्य’ आणि ‘वामन परत न आला’ ह्या कादंबर्यांचा आधार घेतला होता आणि आजही घेत आहेत.
एका वैज्ञानिक कांदबरीमध्ये नारळीकर यांनी वीस हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर “मोनाद” नावाची संस्कृती अस्तित्वात होती, असे लिहिलेले आहे तर तुम्ही इ.स.पूर्व पंधराशे मध्ये भारताच्या बर्याच मोठ्या भागात पाषाणयुग होते असे कसे म्हणता? हा प्रश्न मला अनेकांनी आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञानच्या संदर्भात विचारला. ‘अहो, ती कादंबरी आहे, त्यातले वर्णन काल्पनिक असते.’ असे म्हटले की, ‘तुम्ही असे कसे म्हणता, नारळीकर तर विज्ञान शिकविण्यासाठी विज्ञान कथा कादंबर्या लिहितात.’ असे हे लोक म्हणतात; म्हणजे नारळीकर जे लिहितात त्यावर कुठलाही प्रश्न न विचारता विश्वास ठेवायचा, हे तर विज्ञानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे. विज्ञानातले कुठलेही तत्व हे तावून सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारायचे नाही. कुठलाही सामान्य माणूस कुठल्याही मोठ्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्याला आक्षेप ठेवू शकतो. त्या आक्षेपाचे निराकरण करणे, हे त्या शास्त्रज्ञाचे काम असते. ह्या तत्वाचा स्वीकार प्रत्येकाने करणे, म्हणजे वैज्ञानिक द़ृष्टिकोन. वरील विधानात शास्त्रज्ञाऐवजी बुवा, महाराज घातले तर बर्याच जणांचे माथे भडकते. ह्यात नारळीकरांचा अधिक्षेप करायचा हेतू नाही तर वाचक कसा विचार करतात, ते सांगणे हा उद्देश आहे.
आपण सर्वांना सारखे नियम लावीत नाही. आपल्याकडे विज्ञानाची पुस्तके ही वाचली जातात पण त्यातली वृत्ती अंगीकारली जात नाही, पण हे आपल्याकडेच घडते, असे नाही. पाश्चात्य देशातही हे घडते. हर्मन पाद्रीबुवांची लबाडी उघड केली. तो एका बाईचा वेष घेऊन चाकाच्या खुर्चीत बसून त्या बुवांकडे गेला. तो सार्वजनिक कार्यक्रमात रूग्णांच्या रांगेत आपल्या चाकाच्या खुर्चीसह नंबर लावून उभा राहिला. त्याचा नंबर लागला त्याने बाईच्या रूपातच त्या फादरला सर्व अडचणी सांगितल्या. बाळंतपणात मणक्यात दिलेल्या इंजेक्शनमुळे अधू बनले, पायातील ताकद गेली, हे ऐकताच त्या फादरने तिच्यावर पवित्रपाणी शिंपडले. ती खुर्चीतून उठून उभी राहिली. मग फादरने तिला चालायला सांगितले. काठीचा आधार सोडताच ती पडली. तेव्हा फादर चिडले. मग त्या स्त्रीने तिची वस्त्रे उतरवायला सुरवात केली. लोक चकित झाले. वस्त्रे उतरवता उतरवता ती पडलेली स्त्री उठून उभी राहिली आणि नाचत नाचत तिने उरलेली वस्त्रे उतरवली फक्त अंडरपँटवर एक पुरूष म्हणजे ब्लाँडी उभा राहिला आणि ‘हा फादर जर मी पुरूष आहे, हे ओळखू शकला नाही, तर हा काय चमत्कार करणार, असे स्टेजवरूनच त्याने विचारले.
ब्लाँडीला वाटले लोक त्या बुवाचा धिक्कार करतील, त्याऐवजी लोकांनी ब्लाँडीला शिव्या द्यायला सुरवात केली. त्याच्यामुळे आपली बरे होण्याची संधी गेली, असा घोषाच त्यांनी चालविला. ब्लाँडीला त्यामुळे जीव मुठीत धरून पळ काढावा लागला. तेव्हा बुवाबाजीवर विश्वास ठेवणार्यांना त्यांच्या बुवांचे बिंग फोडलेले रूचत नाही, असे ब्लाँडीच्या लक्षात आले.
आपल्याकडे अलिकडच्या बुवांचे असेच प्रस्थ माजलेले आहेच पण आपले देव आकाशातून आलेले परग्रहवासी होते, ह्या प्रकारचा एक गैरसमजही दृढ होत चालला आहे. त्यालाही विज्ञानकथेचा हातभारच लागला आहे. खरे तर विज्ञान कथेमध्ये जे परग्रहवासी असतात त्यांचा वापर हा मानवी समूह मनावर प्रकाश टाकण्यासाठी केला जातो. मानवात ‘झेनो फोबिया’ म्हणजे परक्यांबद्दल भीती हा एक वंशपरंपरागत चालत आलेला गुणधर्म सापडतो; त्यामुळेच स्वदेशीवाद, भूमीपुत्रांचा हक्क, स्थलांतरितांचे प्रश्न अशा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात. त्याच्यावर थेट टीका करण्यात धोका असल्यामुळे परग्रहवासीयांचा त्यासाठी वापर केला जातो. काही वेळा ह्या कथांच्या अद्भुतीका(फँटसी) बनतात पण ज्यांना खर्या अर्थाने विज्ञानकथा म्हणावे लागते त्यात परग्रहवासीयांना देवत्व देण्याचा उद्देश नसतो.
ह्या सर्व विवेचनामधून एक लक्षात येईल की, मराठी माणूस हा स्वत:चे पैसे खर्च करून पुस्तके घेण्याची क्षमता असूनही शक्यतो पुस्तके विकत घेण्याचे टाळतो. घेतलीच तर विज्ञानाची पुस्तके कमी प्रमाणात घेतो. ती वाचून तो वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारेल ह्याची खात्री देता येत नाही. पाश्चात्य समाजातली स्थिती काही वेगळी नाही. रिचर्ड डॉकिन्स, कार्ल सागन, मार्टिन गार्डनर ह्यांच्या सारख्या अनेकांनी देव आणि अंधश्रद्धा ह्यांच्या विरोधात भरपूर लिहिलेले आहे. ती पुस्तके खपली पण तिथली अंधश्रद्धाही दूर झालेली नाही.
सर्वसाधारणपणे जे अंधश्रद्ध नाहीत तेच लोक अंधश्रद्धेविरूद्धची पुस्तके वाचतात. जे अंधश्रद्धेकडे झुकणारे असतात, ते लोक ‘त्यात काय वाचायचे? ते काय लिहिणार ते माहीतच आहे.’ असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करतात. ह्याचा अर्थ अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य निरर्थक आहे, असा मात्र होत नाही. जेव्हा दख्खन पठारावरचा लाव्हांचा बनलेला खडक ओतला गेला तेव्हा तो पाच हजार फुटांहून जास्त म्हणजे पंधराशे मीटरहून अधिक जाडीचा होता. तो 2 लक्ष चौरस मैलापेक्षा म्हणजे सुमारे 5 लक्ष चौ.कि.मी. परिसरावर पसरलेला होता. गेल्या पाच कोटी वर्षांमध्ये त्यावर ऊनपावसाची प्रक्रिया होत होत झिजून तो आजच्या एवढा आक्रसला. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असेच आहे.
मुळात विज्ञान शिक्षण आणि विज्ञान ग्रंथवाचनाने अंधश्रद्धा कमी होईल, हे लगेच शक्य नाही. तसेच ह्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जाईल असेही नाही. ह्याचे कारण ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ ही एक वृत्ती आहे, ती जन्मजात असते किंवा नसते.’ अनेक वैज्ञानिक बुवांचे भक्त असतात. बरेच वैज्ञानिक अध्यात्माची ओढून ताणून विज्ञानाशी सांगड घालायचा प्रयत्न करतात. ह्या उलट विज्ञानाचा गंध नसलेले संत तुकाराम ‘नवस सायासे पुत्र होती तरी का करावा लागे पती। असा प्रश्न करतात. तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज ह्यांनी अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. तेव्हा विज्ञान शिकणे किंवा विज्ञान ग्रंथ वाचनाने अंधश्रद्धा दूर होणे अवघड आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. ते सर्वांनाच पटेल असे नाही. त्याबद्दल मी वेळोवेळी लिहिलेले आहे. त्यासाठी उत्क्रांती जन्म मानसशास्त्राचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. श्रद्धा हा मानवाचा उपजत गुण आहे. श्रद्धेचा अतिरेक म्हणजे अंधश्रद्धा. हा अतिरेक सर्वच व्यक्तींमध्ये दिसत नाही. मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर सर्वच जण अश्रद्ध असते तर प्रत्येकाने दुसर्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला असता. तसे झाले असते तर मानवी टोळ्या अस्तित्वातच येऊ शकल्या नसत्या. त्या काळातल्या परिस्थितीत एकट्या माणसाचा फार काळ निभाव लागला नसता. त्यातच स्त्रीला बाळंतपण आणि नंतरच्या काळात टोळीच्या संरक्षणाची गरज भासत होती. त्यामुळे मानवी टोळ्यांची निर्मिती झाली नसती तर मानवी जमात नष्ट झाली असती आणि मग आज हे भाषण द्यायची पाळीच माझ्यावर आली नसती.
टोळी आली की टोळीनायक आला. त्याच्या निर्णयांवर अवलंबून राहणारे टोळीवाले आणि स्वत:ला टोळीचा नायक म्हणून कधी संधी मिळते ह्याची वाट बघणारे उपनायक आले. नायकावर विश्वास दाखविणार्यांची संख्या सर्वाधिक असे. त्यांचेच पुढे श्रद्धाळू नागरिकात रूपांतर झाले. ह्याबद्दल मी बरेच लिहिले आहे पण मानव जात टिकून राहण्यासाठी श्रद्धा आवश्यक होती.
ह्याच काळात माणसांवर अनेक संकटे सातत्याने कोसळत होती. वीज पडणे, झाड पडणे, अचानक पूर येणे वगैरे. त्यातून कुठल्या तरी अतिमानवी नियंत्रकावर माणूस विश्वास ठेऊ लागला. जेवढा मानसिक ताण जास्त तेवढा अशा शक्तींवर विश्वास जास्त. हे सांगणारे ग्रंथही निर्माण झाले आहेतच. मात्र ताण दूर करणे हे इतर अनेक उपायांनी शक्य असतानाही माणसे अंधश्रद्धेच्या आहारी जातात, हे कटू सत्य आहे. ह्यामुळे मला असे वाटते की लोकांना अंधश्रद्धेच्या मार्गावरून दूर करायचे तर धर्मग्रंथात खरोखर काय सांगितले आहे ह्याचा आधी अभ्यास व्हायला हवा. ‘नो दाय एनेमी’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. कौटिल्यात हेच सांगितले आहे. शत्रूची समूळ माहिती करून घ्या म्हणजे शत्रूचा पराभव करणे सोपे जाते. मग त्या धर्मग्रंथांमध्ये नंतर फायद्यासाठी कुणी कुणी काय घुसडले आहे ते पुढे आणणे महत्वाचे. ज्या वेदांवर हिंदूधर्म आधारीत आहे, त्यात पुनर्जन्म किंवा उपास तापास ह्यांचा उल्लेखही नाही. ते नंतर घुसडले गेले. त्याच प्रमाणे वृद्ध, पांथिक, आजारी व्यक्ती आणि गर्भार स्त्रिया यांनी उपास तापास करू नये, असे शास्त्रात म्हटले आहे. आपण पोर्तुगिजांनी आणि पाश्चात्यांनी दक्षिण अमेरिकेतून आणलेली फळे आणि साबुदाणा वगैरे पदार्थ खातो ह्याचे कारण शास्त्रात उपासाला जे पदार्थ चालत नाहीत ह्यांची जी यादी दिली आहे त्यात ह्या पदार्थांचा उल्लेख नाही. तो असणारच नाही कारण हे पदार्थ शास्त्र ग्रंथांच्या निर्मितीनंतर भारतात आले.
अशी अनेक उदाहरणे आहेत. पुराणातल्या चमत्कारांची फोड करून सांगणारे आणि मिथके कशी निर्माण झाली हे सांगणारी बरीच पुस्तके मराठीत आहेत. ती स्वस्त किंमतीत वाचकांना उपलब्ध करून द्यायला हवीत. त्यातील प्रकरणांचा पाठ्यपुस्तकात समावेश होईल; असाही प्रयत्न करता येईल, तर कदाचित अंधश्रद्धा निवारणास आणखी हातभार लागेल. हे माझे मत आहे. सध्याच्या अं.नि.स.च्या कार्याला हे पूरक ठरेल असे मला वाटते. धन्यवाद!
–निरंजन घाटे