डॉ.जयंत नारळीकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’

गेल्या चार दशकांहून अधिक काळ अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन आणि लेखन करून विज्ञानाची दालने समृद्ध करणार्या डॉ.जयंत नारळीकर यांना या वर्षीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 1997 पासून दरवर्षी एका व्यक्तीला ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. पाच लाख रूपये रोख, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ.जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्राचे संशोधन तर केलेच; तसेच त्यांनी साध्या, सोप्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये लेखन करून सामान्य माणसापर्यंत विज्ञान पोहोचविले. त्यांच्या या कार्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांना ‘कलिंग पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला; तर केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना आता जाहीर झाला आहे.
डॉ.जयंत नारळीकर अंनिसचे समविचारी मित्र व मार्गदर्शक आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र अंनिसला आनंद वाटत आहे. डॉ.नारळीकरांनी ज्योतिष विषयक चाचणीसाठी अंनिसला वेळोवेळी सहकार्य केले आहे. खगोल विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असताना लोक अजूनही भविष्यसारख्या फसव्या विज्ञानावर विश्वास ठेवतात याबद्दल ते वेळोवेळी आपला विषाद व्यक्त करतात. ‘फलज्योतिषाचे थोतांड’ या शिर्षकाच्या त्यांच्या लेखातील महत्वाचे मुद्दे आम्ही या निमित्ताने प्रसिद्ध करीत आहोत.
– संपादक
मी खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे असे कळल्यावर मला जे अनेक प्रश्न विचारले जातात त्यांत खालील प्रश्नांचा समावेश प्रामुख्याने असतो.
1) ग्रहांचा मानव जीवनावर प्रभाव पडतो का?
2) जन्मकुंडली मांडून त्या व्यक्तीबद्दल बरीच माहिती कशी सांगता येते?
3) पौर्णिमेच्या वेळी काही मानसिक रूग्णांवर विशेष परिणाम होतो असे म्हणतात त्या तथ्य आहे का?
4) फलज्योतिष हे विज्ञान आहे का?
ह्या प्रश्नांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून दखल घेणे आवश्यक आहे. कारण हा दृष्टिकोन आपल्या समाजात रूजवण्याची धडपड गेली अनेक वर्षे चालू आहे. आणि तो रूजवताना असे आढळून येते की, फलज्योतिष हे समाजात भक्कम प्रकारे रूजलेले आहे. राजकीय पुढारी, व्यापारी वर्ग, सुशिक्षित-पदव्या मिळवलेली माणसेसुद्धा फलज्योतिषावर प्रकटपणे किंवा आडून विश्वास ठेवताना दिसतात. मग अशिक्षितांची काय कथा?
फलज्योतिष हे विज्ञानावर आधारलेले आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर जर वैज्ञानिक चौकटीतून हवे असेल तर ते तडकाफडकी देता येणार नाही. ज्याप्रमाणे रोग्याची नीट तपासणी न करता त्याला औषध देणे वैज्ञानिक चौकटीत बसत नाही तसेच परीक्षण केल्याशिवाय फलज्योतिषाला ‘अवैज्ञानिक’ घोषित करणे संयुक्तिक ठरत नाही. थोडक्यात, फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी काय म्हणते?
आजपर्यंत अशी अनेक परीक्षणे झाली आहेत. विज्ञानाचे निकष लावून फलज्योतिष्यांची भाकीते पडताळून पाहण्यात आली आहेत. अशातून काय निष्पन्न झाले ते आपण आता पाहू या.
म्हणजे ओघा-ओघाने वर नमूद केलेल्या प्रश्नांची उत्तरेपण मिळतील.
गृहीतकांचा आणि नियमांचा अभाव?
विज्ञानाच्या कुठल्याही शाखेत काही गृहितके आधारभूत मानली जातात आणि त्या विशेष विषयाचे काही नियम असतात. त्या विषयातून उद्भवणारी भाकिते या गृहितकांत व नियमांद्वारे केली जातात. त्या भाकितांची सत्यासत्यता पडताळून पाहणारे प्रयोग व्यक्तीनिरपेक्ष असतात आणि त्यांची पुनरावृत्ती होऊ शकते. प्रयोग करणारा कोणी का असेना, त्याने ठरलेल्या कार्यप्रणालीनुसार जर प्रयोग केले तर ते नेहमी तीच उत्तरे देतील. विज्ञानाच्या शिस्तीची ही उदाहरणे आहेत.
फलज्योतिषात ही शिस्त पाळली जाते का? त्या विषयाची गृहितके निश्चित सांगितली जात नाहीत. सांगितली तरी त्यात सगळीकडे सारखेपणा नाही. नियमांचेही तसेच…. मग भाकिते तरी निश्चित स्वरूपाची आणि व्यक्तिनिरपेक्ष कशी असणार? नवीन वर्षाच्या आरंभी वृत्तपत्रांत देशातल्या काही प्रसिद्ध फलज्योतिष्यांची ‘यंदा कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार’ ह्या बाबतची भाकीते प्रसिद्ध होतात. त्यांची तुलना करून पहावी म्हणजे वरील विधानाचा प्रत्यय येईल.
ह्या आक्षेपाला उत्तर देताना फलज्योतिषाचे समर्थक म्हणतात की, ‘हवामानाचा अंदाज’ हा देखील ह्या आक्षेपांना पात्र ठरतो, मग त्याला तरी विज्ञान का म्हणायचे? ह्या टीकेबाबतीत थोडा खुलासा आवश्यक आहे.
हवामान कसे असेल हे ठरवण्याकरता पृथ्वीभोवतालच्या वायुमंडळाची सविस्तर माहिती हवी. हवा, वाफ, पाणी, बर्फ, ढग इत्यादींची आजची स्थिती, त्यांच्या गतीत होणारे बदल, त्यात स्थानीय भूभागांच्या रचनेचे परिणाम, मानवी व्यापारांमुळे वातावरणावरील परिणाम इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. ह्यामागचे गणित आणि भौतिक शास्त्राचे सिद्धांत जरी माहीत असले तरी ते सोडवून हवामानाचे भाकीत करण्याकरता महासंगणकाची आवश्यकता आहे. अलीकडे उपग्रहांद्वारे वायुमंडलाची माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे हवामानाची भाकीते जास्त बिनचूक होत चालली आहेत. थोडक्यात फलज्योतिष आणि हवामानशास्त्र ह्या दोघांना एकाच माळेत बसवणे योग्य नाही.
विज्ञानाच्या अनेक शाखा सुरूवातीला अनुभवाधिष्ठित स्थितीत गेल्या आहेत. जेव्हा त्या शाखांचे मूळ नियम निश्चित नव्हते आणि प्रयोग व निरीक्षण यांच्यातून दिसून येणार्या अनुभवांवरून ते शोधण्याचे काम चालू होते, अशा वेळी प्रयोग पुन्हा पुन्हा केले जात. वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे केले जात आणि त्यातून हळूहळू एक आकृतिबंध तयार होई. आणि त्या आकृतीबंधावरून त्याच्या मुळाशी असलेले नियम शोधले जात.
फलज्योतिषामध्ये असा आकृतीबंध सापडतो का ते पाहण्याचे काम अनेक वैज्ञानिकांनी केले आहे. त्याचे काही नमुने पहा.
फलज्योतिषाच्या चाचण्या
बर्नी सिल्व्हरमॅन ह्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राज्ञाने 1967 व 1968 मधील 2978 लग्नांचा आणि 478 घटस्फोटांचा फलज्योतिषाच्या चाकोरीतून अभ्यास केला. दोन फलज्योतिष्यांनी पत्रिकेवरून कुठल्या जोड्या योग्य(म्हणजे जुळणार्या) आणि कुठल्या अयोग्य(न जुळणार्या) हे ठरविले होते. ते निदान आणि वस्तुस्थिती यांची तुलना संख्याशास्त्राचे निकष लावून सिल्व्हरमन यांनी असा निष्कर्ष काढला की, पत्रिकेतल्या निकषांचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. म्हणजे पत्रिका जुळतात म्हणून लग्न टिकले आणि जुळत नाहीत म्हणून मोडले असे म्हणायला काही जागा नाही.
त्याचप्रमाणे सिल्व्हवरमन यांनी पत्रिकेवरून ठरणार्या गुणांचा वास्तविक गुणांशी संबंध आहे का ते पाहिले. ‘समता’, ‘बुद्धिमत्ता’, ‘खरेपणा’ इत्यातींची कदर अमुक अमुक तर्हेची पत्रिका असणारे करतात असे फलज्योतिषी म्हणतात. सिल्व्हरमन याने 1600 मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना ‘तुमचे प्रमुख गुण, आवडी निवडी कोणत्या?’ हे विचारले. त्याचप्रमाणे त्यांची जन्म तारीख वगैरे माहिती मिळवून त्यांच्या पत्रिका करून त्यावरून फलज्योतिषाचे निकष लावून, गुण आणि आवडीनिवडी ठरवल्या. प्रत्यक्ष आणि पत्रिका या दोन्हीत कसलाही मेळ आढळला नाही. तेव्हा मानवी व्यक्तिमत्वात आणि जन्मवेळेत कसलाही संबंध नाही. असा निष्कर्ष सिल्व्हरमन यांनी काढला.
1982 साली सर्व ग्रह एकाच बाजूला आल्यामुळे पृथ्वीवर अनेक उत्पात होतील असे भाकीत फलज्योतिषांनी केले होते. वास्तवात काही घडले नाही. पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम(मानव-प्रणीत) आपत्ती वेळोवेळी येतच असतात. परंतु त्यांचा संबंध ग्रहांशी किंवा धूमकेतूंशी जोडण्यात कोणालाही यश आले नाही. हॅलेचा प्रख्यात धूमकेतू 1985-86 मध्ये येऊन गेला त्याचा तरी असा कोणता दुष्परिणाम झाला?
टेड न्यूमन ह्या शास्त्रज्ञाने लहानसे गणित मांडून एक गमतीदार निष्कर्ष काढला आहे. समजा सर्व ग्रह एका रांगेत एकाच बाजूला आलेत. त्यांच्या एकत्रित गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरच्या वस्तू त्यांच्याकडे खेचल्या जातील. हा आकर्षणाचा जोर किती असेल? जर ते पृथ्वीच्या विरूद्ध बाजूला असेल तर त्यामुळे आपले वजन किंचित कमी हेईल. ते किती कमी होईल? जर आपण बसललेल्या स्थितीतून उठून उभे राहिलो तर आपले वजन कळत-न-कळत कमी हेते कारण आपला गुरूत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून थोडा लांब जातो. सर्व ग्रहांचा संयुक्त परिणाम याहूनही कमी आहे!
असे असूनही फलज्योतिषाला लोकप्रियता का लाभते? त्यामागे वैज्ञानिक चौकट असेल असे लोकांना का वाटते?
बार्नम इफेक्ट
1974 साली 192 शास्त्रज्ञांच्या सहीसकट(ज्यात अनेक नोबेल पारितोषिकांचे मानकरी पण होते) एक पत्रक प्रसिद्ध झाले. त्यात फलज्योतिषावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून टीका होती. शेवटी त्यात असे म्हटले होते की, लोक फलज्योतिषाकडे धाव घेतात कारण त्यांना त्यातून आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर समाधान मिळेल असे वाटते. आपल्यावर आलेली संकटे दूरच्या ग्रहांमुळे आहेत, त्यावर मानवाचे प्रयत्न चालणार नाहीत, केवळ त्या ग्रहांना संतुष्ट केल्यावरच संकट दूर होईल इत्यादी आश्वासनामुळे साहजिकच त्यांची काळजी दूर होते…. निदान दिलासा मिळतो. शिवाय ग्रहच आपल्या विरूद्ध आहेत असे कळले की, स्वत: मेहनत घ्यायची आवश्यकता रहात नाही. अशा विविध कारणांमुळे फलज्योतिषाचा आसरा घ्यायचा मोह आवरत नाही.
फलज्योतिषाचे समर्थक असे म्हणतात की, लोक आमचा आसरा घेतात कारण फलज्योतिष्यांचे भविष्य चुकत नाही. जर ते चुकले असते तर आतापर्यंत लोकांनी फलज्योतिष केव्हाच टाकले असते. ह्या संदर्भात ‘बार्नम इफेक्ट’चा उल्लेख करावासा वाटतो.
‘बार्नम अॅण्ड बेली’ सर्कसचा मालक पी.टी.बार्नम आपल्या सर्कसच्या लोकप्रियतेचे कारण सांगत असे. त्याच्या सर्कशीत विविध प्रकारचे खेळ असतात. त्यामुळे कुठला ना कुठला तरी खेळ प्रत्येकाच्या आवडीचा असतो व म्हणून त्याची सर्कस लोकप्रिय झाली. फलज्योतिष्यांचे निदान असेच असते. त्यात पुरेसा मोघमपणा आणि व्यापकता असते म्हणून प्रत्येकाला ते पटते. बार्नमची पद्धत वापरून तयार केलेले व्यक्तीचित्र कसे असते त्याचा नमुना पहा.
“तुम्हाला असे फार वाटते की, लोकांना आपण आवडो, लोक आपली प्रशंसा करोत, आपल्या गुणांची कदर करोत. तुम्ही स्वत: स्वत:चे कडक परीक्षण करता. तुमचा उत्कर्ष होईल, तो घडवून आणण्याची क्षमता असलेले पण पूर्ण वाव न मिळालेले गुण तुमच्यात आहेत. तुम्ही शिस्तबद्ध आणि स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत असला तरी आतून तुम्हाला कधी कधी चिंता भेडसावतात आणि असुरक्षितता जाणवते. कधी कधी तुम्हाला शंका वाटते की, आपण योग्य निर्णय घेतला का. मधून मधून तुम्हाला बदल हवा असतो. जीवनात विविधता हवी असते. चाकोरीबद्ध जीवनाचा कधी कधी तुम्हाला उबग येतो. तुम्हाला अभिमान आहे की, तुम्ही स्वतंत्रपणे विचार करता आणि दुसर्यांची विधाने परीक्षणाशिवाय मानीत नाही. तुम्ही पूर्णपणे कोणाजवळही मन मोकळे करत नाही. कधी कधी तुम्ही खुशीत, बहिर्मुख, मनमिळाऊ असता तर कधी विमनस्क आणि अंतर्मुख. तुमच्या काही आकांक्षा अवास्तव असतील पण एकंदरीत आयुष्यात सुरक्षितता तुम्हाला हवी असते.”
पत्रिका पाहून असे निदान जर केले तर कोणालाही ते पटण्याजोगे आणि लागू पडणारे आहे. कारण खरोखर त्यात विशेष काहीच म्हटलेले नाही. हे जरा विचार केल्यावर ध्यानात येते. आपण अशा तर्हेच्या व्यक्तीचित्राला ‘बार्नम व्यक्तीचित्र’ म्हणू. जरी फलज्योतिषात खरोखरच बिनचूक भाकीत करायची यंत्रणा असेल तर एखाद्या व्यक्तीचे त्याची पत्रिका पाहून रेखाटलेले व्यक्तीचित्र बार्नम व्यक्तीचित्रापेक्षा अधिक बिनचूकपणे या व्यक्तीला लागू पडायला पाहिजे. वास्तवात असे घडते का?
ह्या संदर्भात अलीकडे घेतलेली एक चाचणी उद्बोधक ठरते. कॉलेजमध्ये शिकणार्या 52 अमेरिकन विद्यार्थ्यांना (त्यांत 35 मुली होत्या) ह्या चाचणीसाठी बोलावले. त्यांच्या जन्माबद्दलची माहिती (तारीख, वेळ, जागा इ.) आणि फलज्योतिषाबद्दल त्यांना काय वाटते हे सर्वप्रथम नोंदवले गेले. मग काही दिवसांनी त्यापैकी प्रत्येकाला तीन व्यक्तीचित्रे देण्यात आली. त्यापैकी एक बार्नम व्यक्तीचित्र, दुसरे त्याच्या कुंडलीवरून फलज्योतिष्यांनी वर्तवलेले व्यक्तीचित्र तर तिसरे ‘चुकीचे’ म्हणजे त्या 52 पैकी दुसर्याच कोणाचे कुंडलीवरून केलेले व्यक्तीचित्र-अशी तीन व्यक्तीचित्रे, ती कुठून तयार केली हे न सांगता देण्यात आली. आणि त्यांना विचारण्यात आले की, कुठले व्यक्तीचित्र सर्वात बरोबर व कुठले त्यानंतर अशी क्रमवारी 5 पैकी मार्क देऊन ठरवावी. जर फलज्योतिषातले भाकीत बिनचूक असेल तर त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तयार केलेली पत्रिका सर्वात जास्त मार्क मिळवून ‘पास’ व्हायला पाहिजे.
प्रत्यक्षात बार्नम व्यक्तीचित्र 5 पैकी सरासरी 3.69 गुण मिळवून सर्वप्रथम आले. उरलेल्या ‘बरोबर’ आणि ‘चुकीच्या’ व्यक्तीचित्रांना 5 पैकी 3.08 व 3.06 गुण मिळाले. गंमत म्हणजे ज्या(7) लोकांनी आपल्या वैयक्तिक माहितीत फलज्योतिषावर मोठा विश्वास दर्शविला होता त्यांनी बार्नमला 5 पैकी 4.14 गुण(सरासरी) तर उरलेल्या दोन व्यक्तीचित्रांना सारखे 3.29 गुण दिले! म्हणजे बार्नमसदृश गुळमुळीत विधानाचे वर्णन लोकांना जास्त पटते हे दिसून येते. त्याचप्रमाणे फलज्योतिषात कुंडलीवरून रेखाटलेले चित्र अचूक असते हे विधानही ह्या प्रयोगाने खोडून काढले.
चंद्राचा मानसिक रूग्णांवर परिणाम?
चंद्राच्या गुरूत्वाकर्षणामुळे भरती ओहोटी येते तसेच मानवी रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे पौर्णिमा-अमावस्येच्या वेळी मानसिक रोग वाढतात. हे विधानही वैज्ञानिक चाचण्यांनी खोडून काढले आहे. उदाहरणार्थ पोकॉर्नी जॅचिमेंझिक यांनी टेक्सस्मधल्या हॅरिस काऊंटीतील चौदा वर्षांतील 2494 खुनांच्या वेळा तपासल्या तेव्हा त्यांना चंद्राच्या कलांशी काहीही संबंध आढळला नाही.
अलिकडच्या काळात मानसशास्त्रज्ञांनी चंद्राच्या कलांचा मानसिक अवस्थेवर काही परिणाम होतो का हे पुष्कळ तर्हेने तपासून पाहिले परंतु उत्तर नकारात्मकच आले. मानसिक रूग्णांच्या इस्पितळात आलेल्या केसेस वेगवेगळ्या तर्हेच्या असतात. वेडाचा झटका, आत्महत्या किंवा तसा प्रयत्न एपिलेप्सी इ.च्या प्रकारांच्या चंद्राशी काहीही संबंध सापडलेला नाही.
फलज्योतिषावर विश्वास ठेवण्याचे गैरफायदे
फलज्योतिष हे विज्ञान नसले तरी त्यावर विश्वास ठेवून चालायला काय हरकत आहे? त्याने कोणाचे काय बिघडते? असाही एक मतप्रवाह आहे. हा मतप्रवाह देखील व्यक्तीच्या आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने घातक आहे. त्याची काही उदाहरणे.
काही आवश्यक आणि लवकर करायच्या गोष्टी केवळ शुभ मुहूर्तासाठी लांबणीवर टाकल्या जातात.
इतर व्यावहारिक दृष्टीने अनुरूप असलेल्या(आणि कधी कधी परस्परांबद्दल प्रेम असलेल्या) जोडप्यांची लग्ने पत्रिका न जुळल्याने मोडतात.
ग्रहांना ‘शांत’ करण्यासाठी परवडत नसले तरी केला जाणारा खर्च आणि व्रतवैकल्ये.
सूर्यग्रहणा दिवशी ‘हा खेळ सावल्यांचा’ हे माहीत असूनही जनसामान्याला वाटणशरी भीती. जिच्यामुळे मुंबईसारखे ‘मॉडर्न’ शहरही ओस पडू शकते.
वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास
फलज्योतिषाला वैज्ञानिक निकष लावायचं काम अनेक शास्त्रज्ञांनी केलं आहे. कुंडल्या, ग्रहांचे सुपरिणाम आणि दुष्परिणाम, धूमकेतूकडून होणारी अनिष्टे इत्यादींबद्दल फलज्योतिष्यांनी केलेले दावे खरे ठरतात का हे पाहण्याचे परिश्रम अनेक वैज्ञानिकांनी घेतले आहेत. त्यांचे समीक्षण सस्केचवान विद्यापीठातील शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ विभागातले डॉ.इव्हान केली यांनी ‘मर्क्युरी’ द्वैमासिकात(पहा-1980 अखेरचा आणि 1981 च्या सुरवातीचा असे दोन अंक) केलं आहे. त्याची थोडक्यात माहिती इथे देत आहे.
फलज्योतिषाची परंपरा एक नसून अनेक आहेत. जगातील वेगवेगळ्या भागातील ज्योतिषी वेगळी वेगळी तंत्रे वापरतात. ह्या सर्वांचा आढावा डीन आणि माथर यांनी एका पुस्तकात (Recent Acvances in Natal Astrology : A Critical Review 1900-1976) घेतला आहे. वैज्ञानिक विषयाला लागणारा पाया ह्या विषयाला लाभलेला नाही, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे.
संख्याशास्त्राचा उपयोग
समजा, एखाद्याने असं विधान केलं की, आपल्याला कुठलंही नाणं वर फेकलं की त्याची कुठली बाजू वर येणार हे निश्चितपणे सांगता येतं. प्रयोगादाखल त्याने एकदा नाणं वर फेकून यशस्वीरित्या भाकीत केलं. त्यावरून तुम्ही त्याच्या विधानावर विश्वास ठेवाल का? तुम्ही म्हणाल कुठलाही क्रिकेट कॅप्टनदेखील बरेचदा टॉस जिंकतो याचा अर्थ त्याच्यात काही अद्भुत शक्ती आहे असं नव्हे! जर आपण 20 वेळा त्या कप्तानाचा अनुभव पाहिला तर सरासरी 10 वेळा म्हणजे पन्नास टक्के प्रमाणात त्याचं भाकीत खरं ठरलं असं दिसून येईल. पण समजा एखाद्याने 20 पैकी 11 वेळा बरोबर भाकीत करणारा कोणी हरीचा लाल पुढे आला तर? आपण हे कसं ठरवायचं की, एखाद्याने केलेली भाकिते योगायोगाने खरी ठरली की त्यामागे अद्भुत शक्ती काम करत होती?
हे काम संख्याशास्त्र करून दाखवते, मात्र त्यासाठी पुष्कळ व व्यवस्थित केलेल्या प्रयोगांची आवश्यकता आहे. ‘व्यवस्थित’ म्हणजे ठराविक परिस्थितीत घडवून आणलेले प्रयोग. एखादं विधान बरोबर आहे की नाही हे अशा प्रयोगानंतर संख्याशास्त्र सांगू शकतं.
न्यूटनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगतो, “400 फुटावरून अलगद सोडलेला दगड 5 सेकंदात पृथ्वीतलावर पोचेल.” हे विधान सत्य आहे हे प्रयोगाद्वारे सिद्ध करता येईल. त्यातलं भाकीत योगायोगाने खरं ठरलं असं मानायला जागा नाही हे संख्याशास्त्र सांगते. अशा भाकितांतून विज्ञानाचे नियम हळूहळू कळू लागतात, फलज्योतिषातील भाकिते मात्र हे संकेत पाळत नाहीत.
केवळ ‘अमुक अमुक ज्योतिष्याने वर्तवलेलं माझ्याबद्दलचं तमुक तमुक भविष्य खरं ठरलं’ अशा विधानातून फलज्योतिषाला पाठिंबा मिळत नाही. त्या ज्योतिष्याने त्याच प्रकारे किती लोकांची भविष्ये वर्तवली, ती खरोखर स्पष्ट होती का मोघम शब्दात व्यक्त केली होती आणि किती टक्के लोकांना ती बरोबर असल्याचा प्रत्यय आला इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह झाला पाहिजे. हे संख्याशास्त्रीय निकष फलज्योतिषाला लावण्याचं काम अनेक शास्त्रज्ञांनी केलं आहे आणि त्यातून ह्या विषयातील विधाने फोल असल्याचं सिद्ध केलं आहे. एक उदाहरण पहा; ‘नेतृत्व ह्या गुणाला कन्याराशी पोषक नाही’ असं फलज्योतिषी म्हणतात. हे विधान तपासून पाहायला नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींपैकी 1500, 1500 व्यक्तींचे दोन यादृच्छिक नमुने निवडण्यात आले. (Random Sample) त्यातील व्यक्तींच्या जन्मराशीत कन्या रास योगायोगाने असावी त्यापेक्षा कमी आहे असं काही दिसून आलं नाही. त्याचप्रमाणे अमुक वेळी जन्मलेल्या व्यक्तीत अमुक तर्हेचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे अशा तर्हेचे फलज्योतिषी दावे अनेक प्रकारांनी नमुने गोळा करून तपासून, तथ्यहीन आहे असं अनेक संशोधकांनी दाखवलं आहे.
विज्ञानाच्या गरूडझेपेत आपल्या सूर्यमालेचे घटक ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांचीच काय तर लांबलांबच्या तार्यांच्या आणि त्याहून दूरच्या आकाशगंगांची माहिती आता मिळत आहे. विसाव्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. एकवीसाव्या शतकात तो मंगळ पादाक्रांत करेल. पाच सहा शतकांपूर्वीच्या मानवाने ग्रहांचे नीट आकलन न झाल्याने फलज्योतिषावर विश्वास ठेवणे आपण समजू शकतो. पण आजच्या काळात पुष्कळ माहिती उपलब्ध असूनही अनेक वैज्ञानिक चाचण्यात नापास झालेल्या कल्पनांवर विश्वास ठेवून वेळेचा, शक्तीचा आणि धनाचा निष्कारण अपव्यय करणे कितपत योग्य आहे?
– डॉ. जयंत नारळीकर