Categories
मानसमित्र

‘नो हेल्थ विदाऊट मेन्टल हेल्थ’

एप्रिल - २०११

अनेक वर्षे गाव कुसाबाहेर राहिलेल्या कुटुंबाला गावामध्ये अचानक मान मरातब मिळू लागल्यावर जसे चित्र होईल तसे सध्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांचे झाले आहे. पुराव्यादाखल कोणत्याही दैनिकाची एखादी पुरवणी काढून बघा! त्यामध्ये ‘मानसिक स्वास्थ्य कसे टिकवावे’, ‘सुजाण पालकत्व’, ‘कौटुंबिक नातेसंबंध’, ‘ताणतणावावर मात’ ह्यापैकी कोणत्यातरी विषयांवरचे लेख हमखास सापडतील. आतापर्यंत उच्चवर्णीय आजारांमध्ये मोडणार्‍या डायबिटीस, ब्लडप्रेशर अशा आजारांच्या तुलनेत मानसिक आरोग्याच्या प्रश्नांची थोडी तरी दखल समाज आताशा घेऊ लागला आहे.

            झालेय असे की, गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये एकुणातच आयुष्यामधील ताणतणाव हा प्रचंड वाढला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला जाणवेल असे ह्या ताणतणावांचे अस्तित्व झाले आहे. स्वाभाविकच त्याचा प्रभाव माध्यमांमध्ये पडतो आहे. आरोग्याच्या क्षेत्रातील महत्वाचा पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला मानसिक आरोग्याचा प्रश्न समाजासमोर आणण्यासाठी विविध माध्यमांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे. परंतु मानसिक आरोग्याचा प्रश्न तिथेच संपत नाही त्यामुळे ह्या प्रश्नाची व्याप्ती जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

            जागतिक आरोग्य (WHO) संघटनेने ‘आरोग्य’ ह्या संकल्पनेची व्याख्या करताना म्हटले आहे की, ‘आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे ही स्थिती अपेक्षित नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक अशा चारही अंगांनी आरोग्यपूर्ण असणे होय.’ ह्या व्याख्येमधील मानसिक आणि अध्यात्मिक  ह्या दोन बाजू मनाच्या स्वास्थ्याशी संबंधित आहेत. म्हणून मनाला अस्वस्थ करणारे दोन प्रमुख घटक म्हणजे ‘मानसिक ताणतणाव’ व ‘मानसिक आजार’, यांची सामाजिक पातळीवरील व्याप्ती पाहूया.

            प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची व्यक्तीची क्षमता जेव्हा कमी पडते तेव्हा त्यामधून निर्माण होणार्‍या परिस्थितीला ताणतणाव(स्ट्रेस) असे म्हणतात. ही झाली स्ट्रेसची पुस्तकी व्याख्या. ही व्याख्या जर आपल्या स्वत:च्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्याला लावून बघायची ठरविली तर ‘स्ट्रेस न येणारी व्यक्ती दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा’ ही घोषणा हास्यास्पद ठरणार नाही. मानसिक ताणतणाव इतके सार्वत्रिक झाले आहेत. आयुष्याचा वाढलेला वेग, बदलती कुटुंबव्यवस्था, आयुष्याचे बदलते प्राधान्यक्रम अशी अनेक काणे ह्या वाढत्या ताणतणावांमागे आहेत. मानसिक ताणतणावांच्या सार्वत्रिक वाढीमुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न हा काही रस्त्यावर भटकणार्‍या मनोरूग्णांपर्यंतच मर्यादित नसून आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडित आहे हे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. उशीराने का होईना पण जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आपला पहिला रिपोर्ट 2001 साली प्रसिद्ध केला. ह्या रिपोर्टचे नावच मुळी ‘नो हेल्थ विदाऊट मेन्टल हेल्थ’ असे होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी हा प्रश्न संबंधित आहे हीच भूमिका हे घोषवाक्य अधोरेखित करते. सतत तणावग्रस्त राहण्यातून मानसिक आजार निर्माण होण्याची शक्यता वाढते. ह्या मानसिक आजारांच्या व्याप्तीविषयी देखील जरा समजून घेऊ या.

            प्रथम येतात सौम्य स्वरूपाचे मानसिक आजार. उदासीनता(डिप्रेशन) आणि चिंता(अँक्झायटी) ह्या दोन प्रकारांमध्ये  मोडणारे हे बहुतांश आजार आहेत. दर पाच माणसांमध्ये एका व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी सौम्य स्वरूपाचा एखादातरी मानसिक आजार होतो ह्या गोष्टीवर अनेकांचा विश्वास बसणार नाही परंतु ही ‘वर्ल्ड मेन्टल हेल्थ रिपोर्ट 2001’मध्ये प्रसिद्ध झालेली आकडेवारी आहे. जगाला त्रास देणार्‍या आजारांमध्ये ‘डिप्रेशन’ हा आजार 2020 साली हृदयरोगाच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर असेल असा इशारा खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

            बहुतांश वेळा हे आजार तीन ते सहा महिन्यांचे औषधोपचार आणि समुपदेशन ह्यांच्या माध्यमातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. परंतु पेच असा आहे की, सौम्य मानसिक आजारांचे बहुतांश रूग्ण हे मनोविकार तज्ञांकडे जाण्यापेक्षा आजार अंगावर(खरेतर मनावर) काढतात. ह्याचे सगळ्यात महत्वाचे कारण आहे मनोविकार शास्त्राशी जोडली गेलेली कलंकाची भावना! मनोविकार तज्ञ हा वेड्यांचा(मनोरूग्णांसाठी समाजमान्य शब्द) डॉक्टर असतो आणि त्यांच्याकडे जायला आपण काही वेडे झालेलो नाही. ह्या विचारांमधून अनेकजण नाईलाज झाल्याशिवाय मनोविकार तज्ञांकडे जात नाहीत. जनरल फिजिशियन हा सर्दी-खोकल्याचाही इलाज करतो आणि हार्टअ‍ॅटॅकचा देखील! त्याच्याकडे सर्दी खोकल्याचा इलाज करून घेण्यासाठी रूग्णांना अडचण वाटत नाही परंतु मनोविकारतज्ञाकडे सौम्य मानसिक आजारांचा इलाज करायला जाताना मात्र खूपच अपराधीपणा व कलंकाची भावना वाटत रहाते. त्यातून दुखणे बळावत जाते आणि काही वेळा उपचार करणे अवघड होऊन बसते. मनोविकार तज्ञ झोपेच्या गोळ्या देतात, त्यांच्या औषधांमुळे मंदपणा येतो. त्यांची औषधे एकदा घ्यायला लागले की, त्यांची सवय लागते असे अनेक गैरसमज सौम्य मानसिक आजाराचा रूग्ण व त्याला योग्य उपचार मिळण्याची शक्यता त्यामध्ये अडथळा बनून उभे राहतात.

            मग अशावेळी ह्या रूग्णांना सांस्कृतिकदृष्ट्या स्वीकारल्या गेलेल्या आणि कमी कलंकित उपचार पद्धती जवळच्या वाटतात. ह्यामध्ये रेकीपासून फेंगशुईपर्यंत असंख्य प्रकार मोडतात. ह्याचा आणखी एक गंमतशीर संदर्भ तपासून बघण्यासारखा आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये भारतात आध्यात्मिक बुवाबाजीची प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. ह्या सर्व बाबा-बुवांचा खरा भक्तगण(की ग्राहक?) हा सौम्य प्रमाणात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेली व्यक्ती आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. दैनंदिन आयुष्य तणावपूर्ण बनत जाणे व अध्यात्मिक बुवाबाजीची वाढ ह्या दोन्ही गोष्टी आपल्या समाजात गेल्या पंधरा वर्षांत एकाच वेळी झाल्या हा काही निव्वळ योगायोग नाही. सुरवातीला केवळ पारलौकिक सुखाबद्दल बोलणारे बाबा-बुवा आता ‘अलविदा तणाव’ सारख्या नावांनी मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या कार्यक्रमांची जाहिरात करतात व त्याला हजारोंनी माणसे गोळा होतात ह्यामध्येच काय ते समजून घ्यावे.

            ह्यामध्ये अध्यात्मिक बाबा-बुवांच्या पंथांचे जसे कर्तृत्व आहे तसे भारतीय मनोविकार शास्त्राचे अपयशदेखील आहे. हे अपयश संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन पातळ्यांवर आहे.

            आजमितीला भारतामध्ये आजारांचा औषधोपचार करू शकणार्‍या मनोविकार तज्ञांची संख्या चार हजारच्या आसपास आहे. साधारणपणे एक कोटी तीव्र स्वरूपाचे मनोरूग्ण आणि दहा ते पंधरा कोटी सौम्य स्वरूपाचे मानसिक आजार असणारे रूग्ण ह्यांच्यासाठी ही संख्या अत्यंत अपुरी आहे. हे उघडच आहे. केवळ संवादाच्या माध्यमातून शास्त्रीय समुपदेशन करणार्‍यांची संख्या तर काही शेकड्यात आहे. हे झाले आपले संख्यात्मक अपयश! पण गुणात्मक अपयशदेखील दुर्लक्षिण्यासारखे नाही. आपल्या देशात वापरल्या जाणार्‍या बहुतांश मानसोपचार पद्धती ह्या थेट परदेशामधून आयात केलेल्या आहेत. भारतीय मन कसा विचार करते, त्याची भावना व्यक्त करण्याची पद्धत कोणती, भावनिक मदत मागण्याची पद्धत कोणती ह्याचा कोणताही विचार न करता वापरल्या जाणार्‍या उपचार पद्धती ह्या इथल्या माणसांना दूरच्या वाटल्या नाहीत तरच नवल! मग प्रश्न असा उरतो की, अशा परिस्थितीत अध्यात्मिक बाबा-बुवांच्या तथाकथित मानसोपचारांना आपण विरोध करण्यासारखे काय आहे?

            जोपर्यंत मानवी मनाला आधार व उभारी देणे एवढेच त्यांचे अस्तित्व मर्यादित रहाते तोपर्यंत त्याविषयी आपण आक्षेप घ्यावा असे काही नाही. परंतु बहुतांशवेळा अध्यात्मिक पंथांचा हा केवळ बुरखा असतो. त्या बुरख्यामागे लोकांच्या विचार करण्याच्या आणि स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्याच्या क्षमता पद्धतशीरपणे पंगू केल्या जातात. हा निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखा धोका नाही. समाजामध्ये मनोविकारांसाठी उपचारांच्या सुविधा वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करणे, इथल्या समाजमनाला जवळच्या वाटणार्‍या उपचार पद्धतींविषयी संशोधन आणि त्यांचा वापर, तसेच लोकांना स्वत:च्या प्रश्नांची जबाबदारी स्वत: घ्यायला शिकविणे अशा अनेक पातळ्यांवर आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.

            तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांमध्ये हर्षवायू, स्किझोफ्रेनिया इ.आजार येतात. ह्या आजारांमध्ये व्यक्तीचे वास्तवाचे भान गमावलेले असते, तसेच आपण आजारी आहोत आणि आपल्याला उपचाराची गरज आहे ह्याचे भानदेखील रूग्ण गमावतो. समाजामध्ये कोणत्याही वेळी तपासणी केल्यास साधारणपणे 1% लोकांना तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार दिसून येतो. ह्याचाच अर्थ असा की, संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे 1 कोटी लोकांना तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराच्या उपचारांची गरज आहे. ह्या तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार असलेल्या रूग्णांच्या केवळ औषधोपचारापलिकडे देखील अनेक गरजा असतात. हे आजार व्यक्तीच्या मेंदूवरच घाला घालत असल्याने ह्या रूग्णांच्या अनेक क्षमता कमी झालेल्या असतात. अनेक रूग्णांना स्वत:ची काळजी घेता येत नाही, शिक्षणामध्ये खंड पडतो, आजाराच्या लक्षणांमुळे कौटुंबिक नाते संबंधात बाधा येते, नोकरी मिळणे व टिकविणे अवघड जाते. बाहेरून शरीर धडधाकट दिसते; परंतु मेंदू तर नीट काम करत नाही. त्यामुळे आयुष्याच्या अनेक प्रांतांमध्ये घसरण होते. जसे दृष्टिहीनता, कर्णबधीरपणा हे अपंगत्व मानले जाते तसे तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार हे आता कुठे अपंगत्व मानले जाऊ लागले आहे. परंतु शासकीय पातळीवर अजूनही मानसिक आजारातील अपंगत्वाची कल्पना माहीत नाही. त्यामुळे शासनाच्या अपंगांसाठी असलेल्या सोयीसुविधांपासून बहुतांश तीव्र स्वरूपाचे मनोरूग्ण वंचितच रहातात. ह्या रूग्णांना दीर्घकाळ औषधोपचार घ्यावे लागतात. औषधांचा खर्च, प्रवास खर्च, रूग्णमित्राचे अनुत्पादक असणे, आजाराच्या लक्षणांमुळे कुटुंबाला होणारा त्रास आणि त्यावर कुटुंबामध्ये मनोरूग्ण असण्याचा कलंक अशा अनेक आघाड्यांवर ही कुटुंबे लढत असतात. अशा वेळी शासनाच्या अपंगत्वाच्या सुविधा त्यांना आधार देणार्‍या ठरू शकतात.

            मानसिक आजारानंतर तिसरा महत्वाचा भाग येतो व्यसनांचा. अनेक वेळा फॅमिली डॉक्टरना देखील व्यसन हा एक मानसिक आजार आहे हे माहीत नसते. तंबाखूपासून दारू, गांजापर्यंत असंख्य गोष्टींचे व्यसन लागू शकते. त्यामधून शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक अशा अनेक पातळ्यांवर व्यक्तीची हानी होत असते. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिजेस’ म्हणजे एकूण जगभरातील वेगवेगळ्या आजारांचा तुलनात्मक भार मोजण्याच्या पद्धतीमध्ये व्यसनांचा भार हा जवळजवळ 4% एवढा भरतो. मनोविकार शास्त्रामध्ये आता व्यसनांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. परंतु मोजकी व्यसनमुक्ती केंद्रे सोडली तर महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे उपचार सहजी उपलब्ध नाहीत हे वास्तव आहे.

            आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार करता विविध मानसिक आजारांची व्याप्ती आपल्याला दिसून येते. बालवयातील मतीमंदत्वासारखे आजार, कुमारवयीन व तरूणांमधील वाढत्या आत्महत्या, मध्यमवयात येणारे कौटुंबिक ताणतणाव, लग्नाच्या नात्यांमध्ये येणारे विसंवाद आणि वृद्धत्वात येणारे एकाकीपणा, उदासीनता व स्मृतीभ्रंशासारखे आजार असे अनेक आजार आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला गाठू शकतात.

            ‘लॅन्सेट’ ह्या प्रसिद्ध मेडिकल जर्नलने 2007 साली  आपल्या इतिहासात प्रथमच ‘जगाचे मानसिक आरोग्य’ ह्या विषयाला वाहिलेला विशेष अंक काढला. मानसिक आजारांची व्याप्ती, उपचारांच्या मर्यादित सुविधा उपलब्ध असणे, त्यामुळे रूग्णमित्रांचे मोठ्या प्रमाणावर उपचारांविना रहाणे ह्या सद्य परिस्थितीचे ‘माणुसकीचा पराभव’ असे लॅन्सेटने वर्णन केले आहे.

            हे सगळे जरी खरे असले तरी चित्र म्हणावे तितके निराशाजनक देखील नाही. जागतिक आरोग्य संघटनेचा 2001 सालचा ‘जागतिक मानसिक आरोग्य रिपोर्ट’, लॅन्सेटचा 2007 सालचा मानसिक आरोग्यावरचा विशेषांक ह्यांच्या प्रभावामुळे विविध देश मानसिक आरोग्याविषयी सजग होऊ लागले आहेत. जगातील बहुतांश देशांच्या आरोग्याविषयक तरतुदींमधील अवघी 2 ते 3% रक्कम ही मानसिक आरोग्यावर खर्च केली जाते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मानसिक आरोग्याचा वाटा पहाता ही रक्कम 15% आसपास असणे आवश्यक आहे. जगभरातील अनेक देश ह्या दृष्टीने प्रयत्न करू लागले आहेत.

            कुठल्याही आजाराचे उपचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजाराचे निदान लवकर होणे व आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध असणे आवश्यक असते. मानसिक आजार हे निदानाच्या बाबतीत खूपच दुर्दैवी असतात. तीव्र स्वरूपांचे मानसिक आजार, व्यसनाधीनता, मतिमंदत्व आणि फिटेचा आजार हे चार मानसिक आजार बाह्यलक्षणांवरून कोणत्याही सामान्य माणसाला ओळखता येऊ शकतात. बहुतांश सौम्य मानसिक आजारांमध्येदेखील व्यक्तीच्या वर्तणुकीत होणारा बदल जवळचे नातेवाईक अथवा मित्र यांना ओळखता येण्याजोगा असतो. ह्या विषयीच्या अज्ञानामुळे अथवा मनोविकाराशी संबंधित कलंकाच्या भावनेमुळे मानसिक आजारांचे निदान होण्यात अक्षम्य दिरंगाई होते. मानसिक आरोग्याविषयीच्या प्रभावी प्रबोधनामधून ही त्रुटी भरून काढणे सहज शक्य आहे.

            दुसरा भाग आहे उपचारांच्या सार्वत्रिकरणाचा आजपर्यंत मनोविकारतज्ञांची तोकडी संख्या हा उपचारांच्या सार्वत्रिककरणामधला मोठा अडथळा मानला जात असे. परंतु ह्या प्रश्नावर उत्तर म्हणून फॅमिली डॉक्टर, जनरल फिजिशियन अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना मानसिक आजारांचे निदान व उपचार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे धोरण गेल्या काही वर्षांमध्ये जोमाने पुढे आले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ फॅमिली फिजिशियन ह्यांनी ह्या उपचारांविषयी एक अत्यंत उपयुक्त पुस्तक प्रसिद्ध केले आहे. आफ्रिका खंडातील व दक्षिण अमेरिकेमधील काही देश ह्या धोरणाचा प्रभावीपणे वापर करीत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याने मनोविकारांचे निदान लवकर होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे ह्या डॉक्टरकडे जाण्याचा कलंक रूग्णमित्रांना वाटत नसल्याने मदत लवकर घेतली जाते. फॅमिली डॉक्टरला रूग्णाच्या कुटुंबाचे अनेक संदर्भ माहीत असल्याने मानसोपचारांमध्ये त्याची मदत होऊ शकते.

            भारताच्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमामध्ये देखील हेच धोरण वापरले गेले आहे. आपल्या देशातील बहुतांश राष्ट्रीय कार्यक्रमाप्रमाणे ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणीदेखील आतापर्यंत कागदोपत्रीच होत आली आहे. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये केंद्रसरकारने ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची’ अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालू केले आहेत. देशभरातील दहा प्रमुख महाविद्यालयांमधील मनोविकारशास्त्र विभागांना मोठा निधी देऊन मनोविकार शास्त्रात तज्ञ मनुष्यबळ घडविणे, नवीन नवीन प्रयोग करणे इ. गोष्टींसाठी बढावा देण्यात आला आहे. शासनाच्या अनेक योजनांप्रमाणे ह्या योजनेचे पुढे काय होणार हे कोणीच ठोसपणे सांगून शकत नाही; परंतु अनेक वर्षांच्या दुर्लक्षानंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात दखलपात्र होऊ लागला आहे हे निश्चित.

            भारतामधील मानसिक आरोग्याच्या 80% सुविधा ह्या खासगी क्षेत्रात असून 20% सार्वजनिक क्षेत्रांमध्ये आहेत. येत्या काळामध्ये ह्या दोन्ही क्षेत्रांनी एकमेकांशी जुळवून घेत सेवा पुरवायची ठरविले तरच मानसोपचाराच्या अधिकाधिक सुविधा समाजात उपलब्ध करून देणे शक्य आहे.

            भारतातील मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात वाढणारी स्वयंसेवी संस्थांची संख्या ही देखील गेल्या काही वर्षांमधील एक आशादायक घटना आहे. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, समाजाला उपचारांचे महत्व पटवून देणे. काही ठिकाणी अल्पदरामध्ये उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देणे अशी अनेक चांगली कामे ह्या संस्था करीत असतात.

            पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजामधील प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या मानसिक आरोग्याविषयी सजग होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक आरोग्याकडे कलंकाच्या नजरेने न बघता स्वत:मध्ये भविष्याच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक म्हणून आपण सर्वांनी बघायला सुरू करणे आवश्यक आहे. त्यामधूनच समाजाचे मानसिक आरोग्य सुधारेल व अंधश्रद्धांचा पगडा कमी व्हायला मदतच होईल अशी आशा वाटते.

– डॉ.हमीद दाभोलकर

(डॉ.हमीद दाभोलकर ह्यांच्या मानसिक आरोग्यावरील आगामी पुस्तकामधून)