Categories
फसवे विज्ञान वास्तुशास्त्र

 फेंगुशुई : आधुनिक बुवाबाजी

सप्टेंबर - २०११

            फेंग आणि शुई हे चिनी शब्द आहेत. ही तथाकथित वास्तुविद्या मुळची चीनमधील. फेंगचा मूळ अर्थ पाणी तर ‘शुई’चा अर्थ हवा. फेंगशुई हा प्राचीन चीनमधील एक मृतांना पुरण्याचा विधी होता. नंतर त्याचा वास्तुरचनेत वापर करण्यास चलाख मंडळींनी सुरवात केली. या अंधविश्वासातून लुबाडणूक केली जाते हे साम्यवादी चिनी सत्ताधार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी फेंगशुईवर बंदी आणली. नंतर हे फसवे शास्त्र तैवानमार्गे जगात सगळीकडे प्रसारीत करण्याचा उद्योग हितसंबंधी  मंडळींनी केला. अमेरिका व युरोपमधील प्रगत राष्ट्रात देखील फेंगशुईने घुसखोरी केली आहे. भारतात तथाकथित वास्तुशास्त्रापेक्षा फेंगशुई अधिक प्रिय होऊ लागली आहे. कारण ती वास्तुशास्त्रापेक्षा स्वस्त आहे. पूर्वी पटकीची साथ आल्यावर लोक पटकी हा मरीदेवीचा कोप आहे अशा अंधश्रद्धेतून या देवीची पूजा करून मिरवणुकीने देवीला आपल्या गावाच्या शिवेबाहेर शेजारच्या गावाच्या हद्दीवर सोडून द्यायचे. मरीआईने तिकडच्या गावात जाऊन माणसे मारावी असा हा मूर्खपणाचा मामला असायचा. धूर्त चिन्यानी आपले लोक फसू नयेत म्हणून फेंगशुईरूपी मरीआई भारतात आणून सोडली आहे व ती सध्या भारतात धुमाकूळ घालू लागली आहे.

फेंगशुईचे तथाकथित शास्त्र

            फेंगशुई शास्त्रानुसार कोणत्याही घराचे 9 विभाग कल्पिले आहेत. 1) संपत्ती किंवा भरभराट, 2)किर्ती, 3)विवाह संबंध, 4)वडीलधार्‍यांचे आशिर्वाद, 5)आरोग्य, 6)सर्जनशीलता व अपत्य, 7)ज्ञान आणि शिक्षण, 8)करीयर किंवा कारकिर्द व 9)मैत्री संबंध.

            फेंगशुईनुसार ही 9 घरे पा-कुआ नावाच्या चौकटीत बसविली आहेत. ती चौकट खालीलप्रमाणे-

            काही पुस्तकात आरोग्य हे घर दाखविले जात नाही. कारण? याला कारण नाही. जन्मवेळेबद्दल ज्योतिषी जसे वेगवेगळी मते मांडतात. तसाच हा प्रकार आहे. मग हे विज्ञान कसे? तुमचे विज्ञान वेगळे, माझे विज्ञान वेगळे याला अर्थ आहे का?

            दुसरे असे की, दक्षिण घर किर्तीचे तर वडीलधार्‍यांना पूर्वेला ठेवावे हे कसे ठरले? कोणी ठरविले? याला काही तार्कीक आधार आहे? असे प्रश्न उपस्थित केले तर फेंगशुईवाले मूग गिळून गप्प बसतात. उद्या कोणी नवा फेंगशुईवाला म्हणू लागला की, किर्तीचे घर उत्तरेला असावे तरी ते आपण खरे मानणार काय? तुझे कितीस्थान उत्तरेला का याचे उत्तर फेंगशुईवाला देईल की, मला रात्री तसे स्वप्न पडले. पूर्वीचे फेंग-शुई वाल्यांना ज्ञान नव्हते. मला साक्षात्कार झालाय. तो तुम्ही माना. असे हे अजब तर्कट, विज्ञान कसे होईल?

            फेंग-शुई नुसार आग्नेय ही संपत्तीची जागा. भारतीय वास्तुशास्त्रानुसार तेथे स्वयंपाकगृह असावे. कारण आग्नेय म्हणजे अग्नीची दिशा. म्हणजे जेथे फेंग-शुई वाल्यांची तिजोरी तेथे वास्तुशास्त्रावाल्यांचा स्वयंपाकाचा कट्टा. तात्पर्य. दोन्हीही शास्त्रे अर्थहीन आहेत.

            तुमचा मुलगा परीक्षेत नापास झाला तर कारण फेंगशुई नुसार घराची रचना नाही. तुमचा मैत्रीसंबंध कॉर्नर दुसरीकडे असेल तर तुम्ही मित्र गमावणार. किर्ती स्थान दक्षिणेला नसेल तर बदनामीची पाळी. हसू नका. फेंग-शुई वाले म्हणतात चुकीच्या स्थानाचा परिणाम म्हणून त्या स्थानात ऋण-उर्जेचा शिरकाव होतो. ती सगळे वातावरण बिघडवते. आता ही ऋण ऊर्जा म्हणजे काय? धन ऊर्जा म्हणजे काय? सगळ्या फसव्या विज्ञानात अशा काल्पनिक उर्जेला महत्व दिलं गेलंय. ‘रेकी’ वाले असंच काही तरी आपणाला सांगतात.

            आधुनिक विज्ञानानुसार उर्जेचे ध्वनी, उष्णता, प्रकाश, विद्युत रासायनिक, स्थितीज, गतीज, अणुऊर्जा असे प्रकार सांगितलेत. पण फसव्या विज्ञानाचे समर्थक ही धन किंवा ऋण ऊर्जा कोठून आणतात? हा सगळा अज्ञानमूलक कल्पनेचा मामला. चिन्यानी फेकून दिलेली फेंग-शुई आपल्याकडे आली. आपल्यातील चाणाक्षांनी त्याला फसव्या विज्ञानाची जोड दिली. जुने टॉनिक नवी बाटली असा हा प्रकार आहे.

            पण हे काहीच नाही. फेंग-शुईच्या समर्थकांना विचारले की, फेंग-शुईनुसार घराची रचना न केलेली कुटुंबे आनंदात व सुखात जगतात हे कसे काय? उत्तर मिळते त्यांचे पूर्वसंचित. फेंग-शुईनुसार ज्यांनी घराची रचना केली आहे ती मंडळी संकटग्रस्त व दु:खी आढळतात हे कसे? फेंग-शुईवाले म्हणतात त्यांचे पूर्वजन्मातील कुकर्म, म्हणजे चिनी फेंगशुईला जोड दिली जाते ती भारतीय कर्मविपाक सिद्धांताची. आचार्य अत्र्यांच्या मोरूच्या मावशी या नाटकात एक गाणं आहे मारूतीच्या बेंबीमध्ये शिरलाय भुंगा-आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा-टांग टिंग टिंगा.

            चिनी फेंगुशईच्या आंब्याच्या झाडाला भारतीय  कर्मविपाकाच्या शेवग्याच्या शेंगा – मारा बोंबा!

            फसव्या विज्ञानात कितीतरी हास्यास्पद युक्तीवाद केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार सटवीने तुमच्या कपाळावर तुमचे भविष्य कोरलंय. ते चुकत नाही. म्हणजे पुढे काय घडणार आहे ते अगोदरच निश्चित आहे. मग ज्योतिषी तोडगे कसे सांगतात? शांती करून हे भविष्य कसे बदलणार? मृत्यू जर ठरलेला असेल तर मृत्युंजय जप करून तो कसा टाळणार? घरातील सौख्य जर पूर्व संचितानुसर ठरत असेल तर फेंग-शुईचे उपाय त्यात बदल कसा करणार?

मूलतत्वांची भानगड

            फेंग-शुईनुसार निसर्गामध्ये पाच मूलतत्वे असतात काष्ठ(लाकूड), पृथ्वी, अग्नी, धातू आणि जल.

            हवेचे काय? आपल्याकडे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे मूलतत्वे मानली जातात. फेंग-शुईत वायू म्हणजे हवेला स्थान नाही. म्हणजे घराच्या रचनेत हवेला महत्व नाही. तुमच्या घरात हवा खेळती नसली तरी चालेल, हवा अशुद्ध असली तरी चालेल, काही कारणाने विषारी वायू एखाद्या खोलीत पसरला तरी चालेल. कारण हवा हे मूलतत्व फेंग-शुई मानत नाहीत. म्हणजे पूर्वीचे चिनी श्वासोच्छवासच करत नव्हते काय? किंवा ते निर्वात पोकळीत रहात होते काय? निसर्गातील मूलतत्वे आधुनिक विज्ञानात शंभरच्या वर आहेत. त्यांना मौले(Elements) म्हणतात. हायड्रोजन हा सर्वात हलका वायू ते अणुस्फोटासाठी वापरली जाणारी युरेनियम सारखी जड द्रव्ये अशी ही शिडी आहे. या मौलापासून निसर्गातील सर्व वस्तू बनतात. पाच मूलतत्वे किंवा मूलद्रव्ये इतिहास जमा झालीत.

            फेंग-शुईमध्ये मूलतत्वाची दोन चक्रे कल्पिली आहेत. एक उत्पादक चक्र आणि दुसरे विध्वंसक चक्र. ही चक्रे आधुनिक विज्ञानाच्या प्रकाशात असत्य ठरतात.

उत्पादक चक्र –

            काष्ठ(लाकूड) अग्नी उत्पन्न करतो. अग्नी हा पृथ्वी(माती) निर्माण करतो. कारण लाकूड जाळून राख बनते. मातीमध्ये धातू असतात. धातूपासून जल निर्माण होते कारण धातू वितळतो. व द्रव होते. जलापासून काष्ठ(वनस्पती) निर्माण होतात. हे झाले मूलतत्वाचे उत्पादक चक्र.

            धातू वितळतो म्हणून तो जल. कारण पातळपणा हा गुणधर्म. पण पातळपणा हा पाण्याचा एकमेव गुणधर्म नाही. वितळलेला धातू व वितळलेले बर्फ एक नव्हेत. त्यांच्या गुणात मोठी भिन्नता आहे. आणि केवळ पाण्यापासून वनस्पती बनतात काय? वनस्पतींना प्रकाशही लागतो.

विध्वंसक चक्र-

            काष्ठ(वृक्ष) जमिनीतील खनिजे शोषून घेतात. हे अर्धसत्य आहे. वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषतात. पृथ्वी पाण्याला नष्ट करते. कारण पाऊस पडला की, ते पाणी पृथ्वी शोषून घेते. पाणी नष्ट होत नाही. उलट जमीन ते साठवून धरते. हा विध्वंस नव्हे. जल अग्नीला नष्ट करते. धातू काष्ठ नष्ट करतात. कारण धातुची हत्यारे वृक्षांना कापतात. असे हे अजब तर्कट आहे.

            काष्ठ न जाळता अग्नी तयार होतोच की! उलट जंगल संपत्ती नष्ट होऊ नये म्हणून विज्ञानाने इंधन वायू शोधला. आता घराघरात इंधन वायूच्या शेगड्या अग्नी तयार करतात. काष्ठ म्हणजे वनस्पती जमिनीतील खनिजे शोषून घेतात. व जमिनीला नापीक करतात हा मूर्खपणाचा युक्तीवाद आहे. वनस्पती जमिनीत मिसळली की कुजतात व जमीन उत्पादक बनते. अन्नासाठी वनस्पती सूर्य प्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. ती ऑक्सीजन बाहेर सोडतात व प्राण्यांचा आधार बनतात. फेंग-शुई वाल्यांचे उत्पादक व विध्वंसक चक्राची कल्पना अज्ञानमूलक असल्याचे आधुनिक विज्ञानात सिद्ध झाल्याने ती टाकाऊ ठरते.

फसवणुकीचे तंत्र

            माणसाला निसर्ग कधी मदतीला येतो तर कधी त्याला संकटात टाकतो. निसर्गाच्या नियमांचा शोध घेऊन माणूस सुखी होण्याची साधने निर्माण करतो व आनंद मिळवतो. पण कधी सुनामी सारखे भयानक रूप घेऊन निसर्ग माणसाला संकटात लोटतो. माणसाचे हे निसर्गाशी असलेले नाते त्याच्या सुख दु:खाचे एक कारण आहे.

            माणसांना एकटे रहाता येत नाही. तो कुटुंबात व समाजात रहातो. यातून काही तणाव व दु:खे निर्माण होतात तर आनंद व सुखपण निर्माण होते. अपत्याचा आनंद, शेजार्‍याचे प्रेम मिळू शकते. पण धर्म, जात, वर्ण याचा आधार घेऊन व त्याद्वारे काल्पनिक शत्रू निर्माण करून संकटग्रस्त होण्याचीही माणसांना जणू हौस असते. म्हणजे सामाजिक संकेत, रूढी, परंपरा यातून माणसाची परिस्थिती बनते. निसर्ग व सामाजिक परिस्थिती ही माणसाच्या नानाविध प्रश्नांची मूळ कारणे आहेत. पण याचा विचार न करता, तुमच्या दु:खाला हाताच्या रेषा, आकाशातील ग्रह किंवा घराची रचना कारणीभूत असते हा युक्तीवाद पोटभरू मंडळींचा फसवा युक्तीवाद आहे. फेंगशुई त्याला अपवाद नाही.

            वर वर्णन केलेल्या उत्पादक चक्र व विध्वंसक चक्राचे लॉजीक पुढे करून फेंगशुईवाले घर सुखी व उत्पादक होण्यासाठी आपणाला मार्ग सुचवितात. ते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घरामध्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट प्रकारे ठेवायला सांगतात. हसरा बुद्ध, तीन पायाचा बेडूक, फिनीक्स पक्षी, घोड्याचा नाल, माशाचा टँक इ.इ.

            घरात अमुक ठिकाणी अमुक प्रकारची फेंग-शुई वस्तू ठेवा म्हणजे तुम्ही सुखी व समाधानी व्हाल हा फसवा युक्तीवाद उदाहरणाने तपासू या. ज्याच्या तोंडात नाणे आहे असा तीन पायाचा बेडूक घराच्या मुख्य दरवाजाजवळ असा ठेवा की, तो आतमध्ये पहात आहे असे पहावे. त्याला पाहताना असे वाटले पाहिजे की, तो धन घेऊन आत येत आहे. उलट दिशेने त्याचे तोंड ठेवू नका कारण तो तुमचे धन बाहेर नेईल. बेडूक घरात ठेवून धनवृद्धी होईल हे हास्यास्पद नाही काय? इथे तुमच्या कर्तृत्वाला काय अर्थ राहिला? तुमच्या प्रयत्नांना, कष्टाला व बुद्धी कौशल्याला काही अर्थ नाही का?

            बेडूक धन घरात आणील. पवनघंटा सौख्य आणील,  बदकाची जोडी प्रेमवृद्धी करील इ.इ. गोष्टी हास्यास्पद आहेत. एक खोटे तत्वज्ञान सांगायचे मग त्यासाठी उपाय सुचवायचे व त्यातून आपला धंदा वाढवायचा हे तंत्र इतर फसव्या विज्ञानाप्रमाणेच फेंग-शुईमध्ये देखील चलाखीने वापरले जाते. कुठे काय वस्तू ठेवावी म्हणजे सुखवृद्धी, धनवृद्धी होईल व घराच्या चुकीच्या रचनेमुळे तुम्हाला त्रास कसा होईल असे सांगण्यासाठी व त्यावरील उपाय सुचविण्यासाठी फेंग-शुई तज्ञ 5000 पासून ते 30 हजार रूपयांपर्यंत फी आकारतात. शिवाय फेंग-शुईच्या वस्तू विकूनही ते धन कमावतात. ते सुखी व आनंदी होतात. तुम्ही मात्र खिसा मोकळा करून तसेच राहता. तेव्हा अशा फसव्या शास्त्रापासून सावध रहा!

प्रा. प. रा. आर्डे