Categories
वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रीय तारतम्य

सप्टेंबर - २०११

            माणसांचे, प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे पृथ्वीवर अस्तित्व निर्माण झाल्यापासूनच निवार्‍याची गरज निर्माण झाली. वास्तुची रचना आणि ती वास्तू बांधण्याचे तंत्रज्ञान त्या त्या प्रदेशातल्या हवामानाशी सुसंगत कालानुरूप बदलत गेलं. हे बदल घडतांना, घडवतांना आपल्या आसपास असणार्‍या घटकांचा वापर करून तो वापर माणसाने अधिकाधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सर्वप्रथम गुहेत रहाणार्‍या माणसाने हळूहळू चिखल मातीचा उपयोग केला. नंतर त्याच्याबरोबर झाडाच्या फांद्या, काटक्या, बांबू ह्यांचा उपयोग केला. नंतर चुना-माती-दगड-विटा यांचा वापर सुरू केला. ह्याच काळात लाकडाचा पण वापर करायला सुरवात झाली. मग नंतर सिमेंट, लोखंड, काचा, अ‍ॅल्युमिनियम, रबर अशा अनेक गोष्टींचा वापर सुरू झालेला दिसतो. ह्या सर्व गोष्टी माणूस निसर्गातून घेतो व निसर्गाचाच हिस्सा बनून रहातो. असं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे. ह्या तत्वानुसार कालानुरूप बदल घडत गेलेत.

            बदल घडत गेले ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ साधा आणि सरळ आहे. कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी तशीच्या तशी अचल, स्थिर रहात नाही. माणूस उत्क्रांत होत होता, सर्वसाधारण माकडासारख्या अवस्थेपासून ह्या आजच्या रूपापर्यंत येऊन पोहोचला.

            एका वास्तुतज्ञाने वास्तुशास्त्राचे समर्थन करताना ‘नवीन काहीही निर्माण होत नसते तर जे काही नवीन म्हणून निर्माण होते ते जुन्याचेच नवीन बदललेले रूप असते’ असे सांगितले. हे जरी खरे असले की, nothing can be created or nothing can be destroyed तरी पण कालानुरूप बदलांचे संदर्भ निश्चितच बदलत असतात. कारण मूळ तत्वं अथवा नियम सत्यच होते हे तरी कसं ठरणार? तीन हजार वर्षांपूर्वी पृथ्वी विश्वाचा मध्य मानली जात होती व सर्व तारे पृथ्वीभोवती फिरतात असे मानले जात होते. तसेच पृथ्वी गोल व सपाट आहे असेही समजले जात होते. पण मग आज सत्य काय आहे? तर त्या पूर्वीच्या समजुतीच्या बरोबर उलट आहे. मग त्या मूळ सत्यावर आधारीत नियम अर्थातच बदलायला नको का? त्यांच्यासाठी ‘पूर्वी कॉलम-बीम होते, आजही आहेत’ हे असे संदर्भाचा विपर्यास करणारे उदाहरण कशासाठी? पूर्वी चुली होत्या, आज नाहीत. पूर्वी सूर्यप्रकाशावर अवलंबून रहायला लागत होते, आज वीज आहे. पूर्वी नैसर्गिक वायूवीजनाशिवाय पर्याय नव्हता, आज आहे. पूर्वी काळ्या मातीत, पाण्यात बांधकामे शक्य नव्हती, आज शक्य आहेत.  पूर्वी विटा-दगडांना पर्याय नव्हता, आज आहे. हे वास्तुतज्ञ म्हणतात की, बदललाय तो फक्त Form आणि कोणत्याही शास्त्राचे हे वैशिष्ट्य आहे की, कालानुसार Form बदलतोच.  हो, Form बदलतो, पण तो निकृष्टतेकडून उत्कृष्टतेकडे, निरूपयोगाकडून उपयोगाकडे, अव्यावहारिकतेकडून (non-functional) व्यावहारिकतेकडे (functional) जाण्यासाठीच बदलतो हेही लक्षात घेतले पाहिजे नाहीतर पूर्वीच्या नग्नावस्थेतल्या मानवाने आज कपडे तरी का घातले असते? त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमानकाळात सजग राहून भविष्याकडे बघणे केव्हाही जास्त विवेकीपणाचे आहे. स्वत:शीच न्याय करण्यासारखे आहे.

            वास्तुशास्त्र हे केवळ निसर्ग आणि नैसर्गिक ऊर्जा ह्यांच्यवरच फक्त आधारीत राहिले नाही तर विकसित होण्याच्या प्रक्रियेत विविध आकार, आकारांची व्यावहारिकता, अशा व्यावहारीक आकारांचे उपयोगी पडेल असे एकत्रीकरण ह्या सर्व गोष्टी प्रकर्षाने अधोरेखित होत गेल्यात. ह्या सर्व गोष्टी सभोवतालच्या परिसराशी मिसळून कशा जातील हा पण विचार केला गेला व हा विचार परिपक्व होत गेला. ह्या परिपक्वतेचा आधार हा हवा उजेड ह्या नैसर्गिक घटकांचा पण राहिला आणि ह्या अर्थानेच जुने वास्तुशास्त्राचे नियम समकालीन वास्तुशास्त्राच्या संदर्भातच बघितले पाहिजेत. हे संदर्भ तपासतांना त्यावेळच्या रहाण्याच्या शैलीत आणि आजच्या राहणीमानाच्या शैलीत झालेला बदल पण लक्षात घेतला पाहिजे. हे सर्व लिहिण्याचा हेतू हाच की पूर्वीचे वास्तुशास्त्र म्हणजे सर्वच चूक किंवा सर्वच बरोबर असे न मानता आपण जुने नवे स्वीकारताना तारतम्य सुटत नाही ना हे बघावे. म्हणजेच आपले मन पूर्वग्रहदूषित राहणार नाही.

            काही नियम समाजाच्या मूळ अवस्थेत उपयोगी असले तरी नंतरच्या बदललेल्या परिस्थितीत जाचक झालेले असतात. अशा सर्व नियमांची कसोशीने पाहणी होऊन त्यात प्रत्येक वेळी सर्वांच्या हिताच्या दृष्टीने विवेकनिष्ठ कसोटी ठेऊन योग्य ते बदल आपण करीत राहीलो पाहिजे. ह्या मांडणीला तात्विक विरोध सहसा कोणी करत नाही. पण प्रत्यक्ष नियम बदलण्याची पाळी येते तेव्हा बर्‍याच जणांना धक्के बसतात. कोणाचे जुन्या नियमाप्रमाणे सुरक्षित असलेले हितसंबंध धोक्यात येतात, कोणाच्या मनावर जीर्ण संस्कृतीचा इतका पगडा असतो की, त्यातील परिवर्तन बुद्धीला पटले तरी भावनेने ते स्वीकारू शकत नाहीत. अशा विरोधाच्या परिस्थितीत मग नवविचारांना अनेक वेगवेगळ्या मार्गांनी शह देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. नवविचाराच्या मांडणीत किंवा आचारात एखादी जरी चूक सापडली तरी त्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी उपयोग केला जातो.

            निसर्गाच्या नियमांचा शोध घेणे व ते नियम आपल्या सोयीप्रमाणे कारणी लावणे हे सचेतन मानवाला शक्य आहे. निसर्गावर विजय म्हणजे निसर्गाच्या प्रक्रियेचे अधिकाधिक सम्यक ज्ञान व त्यानुसार योग्य तो आचार एवढाच त्याचा अर्थ आहे. ह्या सर्व विवेचनामागची भूमिका काय आहे? माणसाचे मन प्रत्येक गोष्टीमागे आधार शोधत असते. विज्ञान नसले की त्या जागी केवळ अज्ञान रहात नाही. तर विपरित ज्ञान ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करीत असते. अधिभौतिक कारणे सापडली नाहीत की, अधिदैविक कारणांकडे मनुष्याचे मन वळते. मग ब्रम्हा सृष्टीचा निर्माता होतो, इंद्र पर्जन्याची देवता निर्माण होते, कुबेर धनिकांचा देव बनतो, तर दक्षिण यमाची दिशा बनते. म्हणून वास्तुशास्त्रातल्या दिशांचे महत्व केवळ प्रतिकात्मक बनते.

            पुराणकालीन वास्तुशास्त्राविषयी जी काही माहिती वाचण्यात आली त्यावरून एवढेच लक्षात येते की, त्याला त्या काळच्या परिस्थितीच्या मर्यादा असाव्यात. त्यात भविष्यातल्या विकासासाठी कोणतीही तरतूद नसावी, कारण त्यासाठी लागणारी लवचिकता त्यात नाही. त्याच्या नियमांनुसार वास्तू बांधली आणि पुढे त्यात वाढ केली, बदल केले तर ती वास्तू निरूपयोगी ठरण्याचाच धोका जास्त संभवतो. (कदाचित ब्रम्हस्थान बदलत असावे). त्यावेळची नगररचना ही अत्यंत मोजक्या लोकसंख्येसच सामावणारी होती. कदाचित ह्या सर्व कारणांनी हे शास्त्र कित्येक शतके त्याचं अस्तितत्वच गमावून बसले असावे.

            हे शास्त्र काळाच्या ओघात कधीपासून लोप पावले हे सांगणे जरी कठीण असले तरी साधे सरळ निष्कर्ष काढणे कठीण नाही. अनेकांना विचारून बघा, तुम्हाला वास्तुशास्त्र कधीपासून कानावर यायला लागले? उत्तर मिळेल साधारण दहा-पंधरा वर्षांपासून. मग पुढे विचारा, तुमच्या वडिलांच्या-आजोबांच्या बोलण्यात कधी ह्याचे उल्लेख आले होते का? उत्तर मिळेल ‘नाही’. इतर अनेक विधी, कर्मकांडे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असतात. मग हे शास्त्र कसे संक्रमित झाले नाही? जर आजोबांना ह्याविषयी काही माहिती नाही तर म्हणजे त्यांच्या वाडवडिलांना पण त्याविषयी माहिती असणे शक्य नाही. मग आताच एकाएकी हे सर्व कसे उर्जितावस्थेत येऊ लागले? जर वडील, आजोबा त्यांचे वाडवडिल यांना वास्तुशास्त्राची अंमलबजावणी माहीत नव्हती, तरीपण त्यांनी प्रगती केली नाही का?

            वास्तुशास्त्राचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ही वास्तुशास्त्राची तत्वे काही काळ वापरली जात होती. परंतु जसजशा वास्तू नियोजनाच्या नवीन संकल्पनांचा प्रभाव वाढला, तसतसे हे जुन्या पद्धतीचे नियोजन भूतकाळात जमा होत गेले. केवळ इतिहासाच्या अभ्यासतला एक लहानसा धडा बनून राहीले. वास्तूशास्त्राला शास्त्र म्हणताना त्याची थिअरी शास्त्र म्हणून सिद्ध झाली पाहिजे. उदा. दक्षिणेकडे असणार्‍या बाल्कनीमुळे भांडणे-कटकटी होतात हे  कसे सिद्ध करणार? हे सिद्ध झाल्याशिवाय ते एक शास्त्रीय तत्व म्हणून प्रस्थापित कसे करणार?

            कोणीतरी वास्तुतज्ञ म्हणवणारा येतो आणि वास्तुत वापरलेले लोखंड  व आपल्या रक्तातले लोह यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते असे सांगतो. त्याचा समृद्धीशी, आरोग्याशी, कुटुंबकलहाशी संबंध कसा ते तो सांगू शकत नाही आणि आपण विचारत पण नाही. काही तरी असिद्ध गोष्टी सांगून पैसे उकळणं हा फसवणूक करण्याचा प्रकार आहे. जे वास्तूतज्ञ हे करतात त्यांनी ही त्यांच्या शाळा-कॉलेजातून घेतलेल्या शिक्षणाशी प्रतारणा आहे.

            खरं म्हणजे आपण कोणत्याही शाखेतले शिक्षण घेतलेले असो, आपला सर्वांचा थोडा तरी विज्ञानाच्या अभ्यासाशी संबंध आलेला असतो. खरे म्हणजे 24 ही तास आपण विज्ञानाच्या सहाय्याने जगत असतो. मग वास्तुशास्त्र आणि फेंगशुई ह्यातल्या असिद्ध गोष्टी स्वीकारून माथ्यावर तळपणार्‍या विज्ञानाच्या सूर्याकडे पाठ फिरवण्याचा करंटेपणा आपण करत आहोत असे मला वाटते.

            वास्तूदोषाने सांगितलेले परिणाम कोणत्याही सत्याचा शोध घेण्यासाठी प्रमाणित होऊ शकत नाहीत. कोणत्याही तर्कशास्त्राच्या चौकटीत बसत नाहीत. तरीपण ते नाकारण्याचे धैर्य आपल्यात नाही. एका विचारवंतांच्या विधानात त्याचे कारण सापडते, ते असे, ‘तर्कशास्त्र वापरून माणूस फार तर निरूत्तर होऊ शकतो, पण तो बदलेलच ही खात्री देता येत नाही. कारण त्याला मनातून पराभूत होण्याची भीती वाटत असते.

            अनेक आर्किटेक्टस्, बिल्डर्स वास्तुशास्त्र मनाला पटत नसलेतरी धंदा बुडू नये म्हणून त्याविषयी स्पष्ट बोलण्याचे किंवा स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळतात. मला असे वाटते की, हा सर्वस्वी बेजबाबदारपणा आहे. अशाने आपण हा भ्रम जास्तीत जास्त पसरवण्यास हातभार लावत आहोत ह्याचे भान हरवून बसतो. खरे तर आपली ही समाजाच्या प्रती जबाबदारी आहे असे मला वाटते. मी, माझे कुटुंबीय, माझा धंदा, पैसा, घर ह्याच्या परिघापलिकडे मी ह्या समाजाचा घटक आहे आणि माझ्या आयुष्याची नाळ माझ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे ह्या समाजाशी जोडलेली आहे आणि म्हणूनच हा भ्रम पसरू नये असे मला वाटते.

            कधी कधी मूळ वास्तुशास्त्राचा गाभा पण विपरीत व विकृत स्वरूपात लोकांपुढे आणला जातो. मानवाला मुळातच ह्या विश्वाच्या गुढाचे आकर्षण आहे. हे विश्व कसे निर्माण झाले असेल, ह्याचा निर्माता कोण व कसा असेल, तो किती शक्तीमान असेल, तो कसे ह्या विश्वावर नियंत्रण ठेवत असेल, असे एक ना अनेक प्रश्न त्याला पडत आले आहेत. ह्या आकर्षणातूनच स्वत:च्या अस्तित्वाला तो सभोवतालच्या विश्वाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत असावा. म्हणूनच कदाचित वास्तुशास्त्र लिहिणार्‍यांनी वास्तूच्या रचनेचा विश्वाच्या रचनेशी साधर्म्य ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याकाळी पृथ्वीला विश्वाचा केंद्रबिंदू मानले गेले होते. म्हणूनच कदाचित वास्तूपुरूषाची किंवा वास्तूमंडलाची कल्पना करताना आधी इंद्राला, मग विष्णूला व त्यानंतर ब्रम्हाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असावे. कारण कोणतेही वर्तुळ त्याच्या मध्यबिंदूशिवाय काढणे शक्य नसते. वर्तुळाचे अस्तित्व हे त्या मध्यबिंदूशिवाय शक्य नाही. म्हणूनच कदाचित पूर्वीच्या अनेक घरांमध्ये मध्यभागी मोकळी जागा असायची आणि ह्या मोकळ्या जागेभोवती इतर खोल्या असायच्या. त्यामुळे हे मध्यवर्ती आवार संपूर्ण घराला एकप्रकारे स्वत:शी तसेच एकमेकांशी बांधून घेत होते. ह्या रचनेतील व्यावहारीक बाजू समजून घेताना जुन्या वास्तुशास्त्राविषयीचा आदर दुणावतो.

            खरं म्हणजे जुनं वास्तुशास्त्र आणि आजचे आधुनिक वास्तुशास्त्र ह्यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे, हे सहज बघता येईल. जुन्या वास्तुशास्त्रातले फलज्योतिष, कर्मकांडे, चिन्हांची प्रतिकात्मकता काढून बघा. काय राहील? तर आजच्या आधुनिक वास्तुशास्त्राचा पाया किंवा त्याची सुरवात.

अरविंद पाखले