Categories
पुरस्कार

फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन, अमेरिकेचा ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ महाराष्ट्र अंनिसला जाहीर

जून - २०१९

1978 साली स्थापन झालेल्या ‘फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन, अमेरिका’ या संस्थेचा ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ हा 5000 अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस जाहीर झाला असून या संस्थेच्या 52 व्या राष्ट्रीय अधिवेशनात 18 ते 20 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅडिसन, विस्कॉन्सीन येथे प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना आमंत्रित केले गेले आहे.

या फौंडेशनचा उद्देश चर्च म्हणजेच धर्मसत्ता आणि सरकारी यंत्रणा यांची सांगड दूर करणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणे होय. अंदाजे 32 हजार मुक्त विचारवंत, नास्तिक, अज्ञेयवादी, तर्कशील विवेकवादी व्यक्ती व संस्था या फौंडेशनच्या सभासद आहेत. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणारे हे फौंडेशन शैक्षणिक संस्था आहे. ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ हा पुरस्कार या फौंडेशनने 2018 पासून देण्यास सुरुवात केली. अविजीत रॉय यांच्या जीवन व कार्याचा सन्मान व्हावा आणि तशा प्रकारचे सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्ती/संस्था यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. खासकरून हा पुरस्कार विवेकवादी विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करणार्‍या सर्जनशील नेतृत्व करणार्‍या व्यक्ती/संस्था यांना दिला जातो. मागील वर्षी 2018 चा हा पुरस्कार बांगला देशातील ‘रूपवान’ मासिकाच्या वतीने रसेल अहमद यांनी स्वीकारला होता.

अविजीत रॉय यांचा जन्म 12 सप्टेंबर 1972 रोजी ढाका, बांगलादेश येथे झाला होता. टीकाकार, स्तंभलेखक आणि शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या रॉयनी बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली होती. नवीन नास्तिकवाद, विज्ञान, धर्मांध अराजकता या विषयांवर लिखाणाची त्यांची खास शैली होती. बांगलादेशी अमेरिकन नागरिकत्व असलेल्यं, अविजीतने बांगलादेशी आणि दक्षिण आशियातील मुक्त विचारवंत, विवेकवादी, तर्कशील, नास्तिक आणि मानवतावादी यांच्यासाठी ‘मुक्तो मोना’ नावाचा इंटरनेट प्लॅटफॉर्म सुरू केला होता.

अविजीत हा मुक्ती विचार स्वातंत्र्याचा प्रणेता असणार्‍या व्यक्तींना अटकेत ठेवल्याच्या निषेधार्थ, शासकीय बंदीविरोधात आणि नास्तिक ब्लॉग मंचाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयक होता. इस्लामिक आतंकवादी संघटना अन्सारुल्लाह बांगला या दहशतवादी संघटनेने त्याच्यावरील जीवघेण्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

दि. 26 फेबु्रवारी 2015 रोजी अविजीत आणि त्याची पत्नी रफिदा ढाका येथे पुस्तकाच्या कामासाठी गेलेल्या असताना त्यांच्यावर भर रस्त्यात, गर्दी असलेल्या पुस्तक मेळ्याच्या ठिकाणी कट्टर इस्लामिक पंथियांनी जीवघेणा हल्ला केला. हॉस्पिटलमध्ये नेत असताना अविजीतचे निधन झाले, तर त्याची पत्नी रफिदा गंभीर जखमी झाली. या हल्ल्यानंतर रफिदाने अमेरिकेतील तिच्या कार्यालयातून सुट्टी घेतली आणि युरोप, अमेरिकेतील मानवतावादी चळवळींसमवेत बांगलादेशात होत असलेल्या धर्मनिरपेक्ष बुद्धिवाद्यांवरील हल्ल्यांसंदर्भात कार्य सुरू केले. सध्या ती इस्लामिक मूलतत्त्ववादाबद्दल टेक्सास विद्यापीठ, ऑस्टीन येथे संशोधन करीत आहे. फ्रीडम फ्रॉम रिलिजन, ऑस्टीन येथे संशोधन करीत आहे. फ्रीडक फ्रॉम रिलिजन फौंडेशनचा ‘फॉरवर्ड अ‍ॅवॉर्ड 2016’ साली तिला मिळाला होता. रफिदा आणि फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन यांनी संयुक्तपणे ‘अविजीत राय धैर्य पुरस्कार’ सन 2018 पासून सुरू केला आहे.