Categories
पुरस्कार

श्रीनिधी चॅरिटी, सांगली या संस्थेचा महाराष्ट्र अंनिसला पुरस्कार

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला श्रीनिधी संस्था, सांगलीचा रुपये 21 हजारांचा ‘समाजसेवा पुरस्कार’ नुकताच रोटरी क्लब, सांगलीच्या सहकार्याने दिला गेला. त्यानिमित्ताने श्रीनिधी या संस्थेने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचा थोडक्यात परिचय वाचकांना करून देत आहोत.

सन 2015 मध्ये जेव्हा लंडनला गेले, तेव्हा मुले नोकरीला बाहेर पडल्यावर दुपारचा वेळ आम्ही दोघे सर्व रस्त्यांवरून पायी फिरण्यात घालवत असू. मोठमोठे पार्क, उत्तम बसेस आणि मेट्रो यांचा उपयोग करीत संपूर्ण लंडन हिंडलो. आधीच्या दोन-तीन फेर्‍यांमध्ये म्युझियम्स, लंडन आय, मॅडम लूसाँ वॅक्स म्युझियम, सर्व-सर्व बघून झाले होते. त्यामुळे या व्हिजीटमध्ये रिचमंड, पटनी, ऑक्सफोर्ड स्ट्रीट निवांतपणे पालथे घातले. माझे खास लक्ष वेधून घेतले ते दोन-तीन सुसज्ज आणि गजबजलेल्या दुकानांनी!

‘चॅरिटी शॉप्स’ बाहेर पाटीवर “Stocks low on…” अशी पाटी बघितली. आत-बाहेर करणारे लोक बघितले आणि ही काय व्यवस्था आहे, ते बघण्यास आत प्रवेश केला. पुढले दोन-तीन दिवस दिसेल त्या चॅरिटी शॉपमध्ये घुसून त्यांना प्रश्न विचारून त्यांचे कौतुक करून काही वस्तू विकत घेऊन खूप आनंद घेतला. एक खूप महत्त्वाचे होते आणि वेगळेही… मिळालेला प्रत्येक बाऊंड ठराविक कारणांसाठी दान केला जात होता. उदाहरणार्थ कर्करोग संशोधन, सोमालियातील कुपोषणग्रस्त भागातील बालकांना पोषण, अन्न किंवा मरणोन्मुख, निराधार आजारी व्यक्तींसाठी निवासव्यवस्था औषध-पाणी… शेवटपर्यंत!

या दुकानांचे वैशिष्ट्य हे की, त्यातील सर्व साहित्य कुणीतरी दान केलेले होते, विधायक कार्यासाठी! वस्तू विकत घेणारा ग्राहक (मी सुद्धा) किमतीकडे न बघता, वस्तू घेताना हे पैसे कुणाला तरी उपयोगी पडणार आहेत, या भावनेतूनच खरेदी करीत होता, आनंदी होत होता. मी भारावून गेले. विकत घेतलेल्या वस्तू जपून सांगलीला परत आणल्या आणि आपण असे काहीतरी करू शकतो का, या विचारातून ‘श्रीनिधी फॉर चॅरिटी’ हा उपक्रम सुरू केला. स्वत:च्या घरातले छान सामान, मैत्रिणींच्या घरातले त्यांना नको असलेले; पण उत्तम स्थितीत असलेले ‘काहीही’ (पुस्तके, खेळणी, कपडे, शाली, भांडी, काचेच्या वस्तू, फोटोफ्रेम्स, पर्सेस, शोभेच्या वस्तू, हस्तकला वगैरे वगैरे…) एकत्रित केले. सगळ्यांनी वेड्यात काढले. पाच-सहा महिने घरातील खोल्या श्वास घेऊ शकल्या नाहीत, भीत-भीत शंभर फुटी रस्त्यावरील कर्णबधिर मुलांच्या शाळेत, रविवारी (व्यत्यय नको म्हणून) प्रदर्शन मांडले, सेल केला आणि त्या दिवासाची कमाई ‘रुपये 21 हजार’ संध्याकाळी मुख्याध्यापिकांकडे, तिथल्या तिथे बहाल केली. सगळेच खूप खूष झाले. दान करणारे, माफक म्हणजे विश्वासच बसणार नाही इतक्या कमी किमतीला मिळालेल्या वस्तू बघून खूष झालेले गिर्‍हाईक आणि या निधीतून ज्यांना ‘हिअरिंग एड’ किंवा इतर जरुरी सेवा मिळणारे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक सगळे-सगळे खूप खूष!

आतापर्यंत बारा प्रदर्शने झाली. रोख निधीबरोबर वस्तू, कपडे, इतर वह्या-पुस्तके, दप्तरे वाटप सातत्याने सुरू आहे.

गेली चार वर्षे प्रदर्शनपूर्व तयारी म्हणजे एखादे भंगार दुकान जिथे पाय ठेवायला जागा नसायची, मोठमोठी खोकी लेबल करून एकावर एक रचताना सर्व मैत्रिणींची तारांबळ उडायची. कुणाची कंबर, मान सांभाळता-सांभाळता बिचार्‍या थकून जायच्या. प्रदर्शनादिवशी टेंपोभरून नेणे, टेबल भाड्याने आणून, सुंदर रचना करणे, दिवसभर भिंगरीसारखे फिरणे, विस्कटलेल्या वस्तू जागच्या जागी मांडणे, बिल, सुटे, हिशोब-पैसे, घासाघीस असा दिवस संपल्यावर उरलेले सगळे परत बॉक्स भरून घरता आणून रचणे आणि मग दमून-भागून आपापल्या घरच्यांची ‘कुणी सांगितलं आहे, नको ते करायला’ कटकट ऐकायला रात्री उशिरा परत जाणे… सात-आठ दिवस पूर्वतयारी आणि मग प्रदर्शनाचा D-Day! असो

आता मात्र आम्हाला आमचा हॉल आहे. तिथेच वस्तू आणून द्यायच्या. प्रदर्शन विक्रीव्यवस्था तिथेच, खूप सोयीस्कर झाले आहे यावर्षी. थँक्स टू माय फॅमिली. सांगलीत ‘बालाजी मिल’ शेजारी हा हॉल आहे.

श्रीनिधी पुरस्कार देताना इतरांनी केलेले समाजकार्य जनतेपुढे कसे आणता येईल, हा प्रमुख विचार असतो. त्याचबरोबर हे उदात्त कार्य करणार्‍या लोकांचे थोडे कौतुक समाजाकडून, ही अपेक्षा असते. दान करणार्‍याचा प्रत्येक रुमाल, एक वही, एक पेन्सिल, किती कमाल करू शकते, हेही आम्हाला त्यांना दाखवून द्यायचे असते; दानाची व्याख्याच बदलायची ऊर्मी आम्ही बाळगतो इथे. देणेही दान आहे आणि घेणेही दानच! शिवाय थोडेसे पैसे (एक रुपया दिवसाला किंवा 10 रुपये महिन्याला) किती गरीब विद्यार्थ्यांना पुरतात, तेही खूप-खूप मोठे दान आहे, ही जाणीव रुजवणे आम्ही आमचे ‘मिशन’ समजतो.

या वेळचे पुरस्कार अंनिस महाराष्ट्र, मुक्तांगण पुणे आणि निर्धार संघटना सांगली यांना दिले. समाजात परंपरागत रुजलेल्या, अनिष्ट आणि घातक रुढी, समज आणि अंधविचार मोडून काढायचे अतिशय कठीण धाडसी काम अंनिसने अनेक वर्षे सातत्याने चालू ठेवले आहे. अंनिसच्या सर्व सभासदांचे आम्हाला खूप कौतुक वाटते. आपण आमची फुलाची पाकळी स्वीकारलीत, याबद्दल आभार! आपल्या संपर्कात येणार्‍या गरजूंसाठी आमच्या उपक्रमाची काही मदत झाली, तर आम्हास आनंदच होईल.