महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम राबविला जातो. ऑनलाईन ट्रेनिंग आणि संवादशाळा यांच्या माध्यमातून गेली 3 वर्षे महाराष्ट्रातील शेकडो लग्नाळू तरुण-तरुणी या उपक्रमाच्या माध्यमातून जोडले आहेत. या वर्षी 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात ‘जोडीदाराची निवड युवा संकल्प अभियान’ महाराष्ट्रभर राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत 55 संकल्प परिषदा घेण्यात आल्या. त्यातून राज्याच्या कानाकोपर्यात हा विषय तर पोचवता आला. जोडीदाराची विवेकी निवड करण्याची तयारी तरुण-तरुणींनी उत्साहाने दाखवली. ही आशादायी बाब होती; परंतु असा समविचारी जोडीदार मिळण्याचे माध्यम त्यांच्यासमोर नव्हते.
विचारांशी जुळणारा जोडीदार परिचयोत्तर पद्धतीने निवडण्याची संधी लग्नाळू तरुण-तरुणींना उपलब्ध करून दिली पाहिजे, असा विचार पुढे आला व एक वेगळा प्रयोग म्हणून ‘परिचय मेळावा’ घ्यायचे ठरले. हा परिचय मेळावा दिनांक 12 मे 2019 रोजी बी. टी. आर. भवन बेलापूर, नवी मुंबई येथे घेण्यात आला. मेळाव्याला महाराष्ट्रातून 60 लग्नाळू तरुण-तरुणी आणि 12 पालक उपस्थित होते.
महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी अनेक तरुण-तरुणी येण्यास इच्छुक होते; मात्र फक्त नाव नोंदणी महत्त्वाची नव्हती. मेळाव्याला येणारे तरुण-तरुणी निवडक होते. त्यांच्यासाठी मेळाव्याला येण्याआधीची एक निवड प्रक्रिया होती. मुला-मुलींशी आधी फोनवर बोलून त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेण्यात आली. लग्नाबाबत त्यांचे विचार काय? त्यांच्या प्राधान्याच्या बाबी कोणत्या? यातूनही ज्यांना कुंडली-पत्रिका वगैरे पाहून लग्न करायचे नाही, त्यांना सहभाग होता. जात-धर्माच्या पलिकडे व्यक्तीला महत्त्व देणारे, साध्या पद्धतीने लग्न करण्यास तयार असणारे, समविचारी जोडीदार शोधू पाहणारे, असेच परिचय मेळाव्यात असणार होते. असा वेगळा विचार करणार्यांचा या मेळाव्यात परिचय व्हावा, हा हेतू या मेळाव्याचा होता. शेकडो मुला- मुलींशी बोलून त्यातून 60 जणांची निवड करण्यात आली होती. या निवडलेल्या तरुण-तरुणींचा बायोडेटा आधी मागवला होता. हा बायोडेटाचा फॉरमॅट अर्थातच इतर बायोडेटापेक्षा वेगळा आहे आणि तो भरताना बर्याच बाबींचा विचार आम्ही पहिल्यांदा करतोय, असेही बर्याच जणांनी सांगितले; तसेच स्वतःची माहिती सांगणारा आणि जोडीदाराविषयी अपेक्षा सांगणारा व्हिडीओ देखील प्रत्येकाकडून मागवण्यात आला होता. स्वतःबद्दल केवळ 30 सेकंदात माहिती सांगणे, हे अवघड असले, तरी रंजक होते, अशाही प्रतिक्रिया आल्या. एकूणच फोनवरची मुलाखत, बायोडेटा आणि व्हिडीओ मेळाव्यात येणार्या तरुण-तरुणींची उत्सुकता वाढवून ठेवत होते; शिवाय हा मेळावा इतर पारंपरिक मेळाव्यासारखा नसेल, हे त्यांना लक्षात येत होते.
आकर्षक सजवलेल्या हॉलमध्ये मेळाव्याचे टिपिकल वातावरण कुठेच नव्हते. या संपूर्ण मेळाव्याचे निवेदन निशा फडतरे हिने केले, तर प्रास्ताविक आरती नाईक हिने केले. कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप याबाबत स्पष्टता दिली. लग्न, जोडीदार इत्यादी बाबत आपण कसा विचार करतो? आपल्या विचारांची दिशा काय? त्या अनुषंगाने आपण जोडीदार कसा निवडला पाहिजे आणि त्यासाठी निवडीचे निकष नेमके काय असावेत याचा विचार करत मेळाव्यातील सगळे सत्र आखण्यात आले. याची माहिती उपस्थित लोकांना मिळाली. यानंतर विविध उपक्रमांचे कार्यवाह अनिल करवीर यांनी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमावर अतिशय सुंदर, सुरेल गाणं संगीतबद्ध करून पाठवले होते. या गाण्याने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गाण्यातील शब्द एकूणच जोडीदार निवडीच्या प्रक्रियेविषयी अजून विचार करायला भाग पाडत होते. उपस्थितांनी या गाण्याचे विशेष कौतुक केले.
यानंतर जोडीदाराची विवेकी निवड का आणि कशी करावी? जोडीदार निवडीच्या पद्धती कोणत्या आणि आपण रुजवू पाहत असलेली परिचयोत्तर विवाह पद्धती आणि जोडीदाराची विवेकी निवड करण्यासाठीची आधुनिक कुंडली समजावत महेंद्र, दिक्षा आणि सचिनने हे सत्र थोडक्यात घेतले.
इथून पुढे मेळाव्यासाठी आलेल्यांना वेगवेगळ्या रलींर्ळींळीूं होत्या, ज्या केवळ अॅक्टिव्हिटीसाठी नसून त्यात जोडीदाराची विवेकी निवड करण्यासाठीचे विविध मुद्दे होते. यालाच अनुसरून पहिली अॅक्टिव्हिटी काही बेसिक मुद्द्यांना घेण्यात आली, ‘रंग माझा वेगळा.’ एक-एक मुद्द्याचा विचार करत काही शक्यता देण्यात आल्या होत्या. त्या शक्यता विविध रंग म्हणून गट केले होते. त्यातून आपल्या शक्यतेचा (आपल्या विचाराच्या गटात) रंग असलेल्या गटात तरुण-तरुणी जात होते. 8 मुद्द्यांना धरून ही अॅक्टिव्हिटी होती. एका गटात येणारे आपल्या गटात अजून कोण-कोण आहे याचा अंदाज घेत समविचारी कोण, हे लक्षात घेऊ शकतात, हा या अॅक्टिव्हिटीचा उद्देश होता. आदर्श उत्तरे न देता आपण जसे आहोत, तसेच गट निवडणार, याबाबत आधी स्पष्ट केल्याने अगदी 1-2 मते जरी वेगळी असली, तरीही त्या व्यक्ती आपल्याच विचाराच्या गटात येत होत्या हे विशेष.
या धमाल अॅक्टिव्हिटीनंतर ‘असा मी – अशी मी’ ही अॅक्टिव्हिटी घेण्यात आली. यात आधी मागवून घेतलेले 30 सेकंदाचे व्हिडीओ उपस्थितांना दाखवण्यात आले. आपली माहिती सांगताना इतक्या सगळ्या लोकांसमोर काही लोक घाबरू शकतात; मात्र 30 सेकंदाच्या त्यांच्या या व्हिडीओने ती भीती घालावली. व्हिडीओ चालू असताना ती व्यक्ती समोर होतीच, त्यामुळे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघणे शक्य होतेच. आपली ओळख नेमकी देणे व्हिडीओमुळे सोपे झाले. व्हिडीओची कल्पना सगळ्यांनाच आवडली.
यानंतरच्या अॅक्टिव्हिटीमध्ये उपस्थित तरुण-तरुणींना पाच गटात विभागण्यात आले. जोडीदार निवडीच्या संदर्भात महत्त्वाच्या एकूण 5 मुद्द्यांवर चर्चा घेण्यासाठी ही अॅक्टिव्हिटी होती ‘गटचर्चा’. उपस्थित प्रत्येकाला प्रत्येकाचे चर्चेत असलेल्या मुद्द्यांविषयीचे मत ऐकण्याची आणि स्वतःचे मत देण्याची ही संधी होती. प्रत्येक मुलाला-मुलीला प्रत्येक मुलाचे-मुलीचे मत कळावे, हा हेतू या अॅक्टिव्हिटीचा होताच; त्यालाच अनुसरून या चर्चेची रचना केली गेली होती. एकूणच बोलण्याची आणि इतरांचेही मत ऐकण्याची संधी प्रत्येकाला मिळाल्याने सगळ्यांना या अॅक्टिव्हिटीचा चांगलाच उपयोग झाला.
एकूण झालेल्या तीनही सत्रांत एकमेकांची ओळख झाल्यानंतर कोणाला एकमेकांविषयी जाणून घ्यावेसे वाटत असेल तर आता ‘कॉफी आणि बरेच काही’ या शेवटच्या सत्रात शॉर्ट लिस्ट केलेल्यांशी बोलण्याची ही संधी देण्यात आली होती; शिवाय दिवसभर निरीक्षकाच्या भूमिकेत असणारे पालक देखील सहभागी होऊ शकले. या सत्रात अनेकांनी उत्साह दाखवला. पालकांनी बायोडेटा फाईल अजून निरखून बघितलीच; शिवाय आपल्या मुलीच्या-मुलाच्या विचार पद्धतीबाबत नव्याने माहिती घेतली. दिवसभर आपल्या मुला-मुलींच्या अॅक्टिव्हिटी बघत असलेले पालक आपल्या पाल्याशी नव्याने झालेल्या संवादाबाबत आशादायी होते. आम्ही आमच्या मुला-मुलींशी या दृष्टिकोनातून कधी संवादच केला नाही; पण हे सगळे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत, हे आमच्या आज लक्षात आले, असेही मत नोंदवले. पारंपरिक मेळाव्यात पालकांचा असलेला पुढाकार इथे नव्हता, याची कोणालाही मुळीच खंत वाटली नव्हती, हे विशेष.
अगदीच वेगळा आणि सध्याच्या तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारा हा मेळावा होता, असे उपस्थितांना वाटले; शिवाय आम्ही लग्नाच्या बाबत जो विचार करतो आहोत, तसाही विचार करणारे लोक आहेत हे बघून नक्कीच आनंद झाला, असेही मतही लग्नाळू तरुण-तरुणी नोंदवून गेली.