Categories
संपादकीय

गांधीबाबा आणि रामदेवबाबा

जुलै - २०११

सत्य आणि अहिंसा ह्या मूल्यांचा मार्ग अवलंबून महात्मा गांधीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या थोर महात्म्याला संपूर्ण जगाने स्विकारले आहे. नेल्सन मंडेला यांनी गांधीजींच्या मार्गानेच ब्रिटीशांच्या जोखडातून त्यांचे राष्ट्र मुक्त केले.

सत्याग्रहाचे सामर्थ्य लक्षात घेऊन गांधीजींच्या मार्गाने स्वतंत्र भारतातील सामाजिक समस्या सोडविण्याचे प्रयत्न सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती करीत असतात. पण त्यांच्या आंदोलनात कधी कधी सत्यच नसते तर ही मंडळी हिंसकही बनतात.  मग त्या आंदोलनाला सत्याग्रह कसे म्हणायचे?

भारतात अलीकडेच प्रसिद्धीस आलेले योगगुरु रामदेवबाबा यांनी दिल्ली येथे रामलीला मैदानावर जो सत्याग्रह केला त्यात गांधीवादी विचार व आचार नव्हताच. परिणामी त्यांचे हे आंदोलन हास्याचा विषय झाला.

वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमे यातील बातम्यांचा आधारे रामदेवबाबांच्या सत्याग्रहाचे मूल्यमापन करता येईल. बाबांनी रामलीला मैदानावर योगाचे शिबीर घेण्याची परवानगी मागितली. पण तेथे त्यांनी चालू केले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन. म्हणजे ही फसवणूक झाली. सत्याशी प्रतारणा झाली.

महात्मा गांधी निर्भय होते. अनेक वेळा ब्रिटीशांनी त्यांना तुरुंगात टाकले. पोलीस आले तेव्हा सत्याग्रहाच्या ठिकाणापासून ते पळून गेले नाहीत. अटकेला विरोध केला नाही. पण रामदेवबाबा पोलीस येताच व्यासपीठावरून उडी मारुन पळाले. तेही बायकांचा वेष घालून. हा तर भित्रेपणा व पळपुटेपणा झाला. गांधीजी कधीच असे वागले नाहीत. पोलीसांनी फार तर बाबांना अटक केली असती व नंतर सोडून दिले असते. स्त्री वेषातील रामदेवबाबांना पोलीसांनी पकडल्यानंतर हरीद्वार येथील त्यांच्या आश्रमात नेऊन सोडून दिले. तरीसुद्धा सरकार मला ठार मारणार होते असा कांगावा रामदेबाबांनी केला. हा खोटारडेपणा व भ्याडपणा अध्यात्मिकेतेचे लक्षण नव्हे.

रामदेवबाबा आयुर्वेदीक औषधांची निर्मिती व प्रसार करतात. त्यांच्या हरीद्वार येथील योगपीठात तयार झालेल्या औषधात मानवी हाडांचा अंश आढळला होता. त्यावर एकेकाळी मोठे वादंग माजले होते. रामदेवबाबांच्या अधिपत्याखाली 34 कंपन्या कार्यरत आहेत. 100 कोटी रुपये खर्चाचे पतंजली योगपीठ त्यांनी स्थापन केले आहे. पतंजली उत्पादनचा टर्न ओव्हर एक हजार कोटीचा आहे.  रामदेवबाबांचा योग हा असा ‘लक्ष्मी’ योग आहे. 1100 कोटीचे मालक रामदेवबाबा हे साधू नसून, उद्योगपती आहेत असाच याचा अर्थ होतो.

या औषधनिमिर्तीच्या उद्योगातील औषधांच्या खपासाठी हे बाबा अवास्तव दावे करतात. योगाने व त्यांच्या औषधाने कॅन्सर, मधुमेह, हार्टचे आजारही बरे होतात असा त्यांचा दावा शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झालेला नाही. हे सुद्धा एकप्रकारचे खोटारडेपणच आहे. महात्मा गांधी असे अवास्तव दावे कधीच करीत नव्हते.

भारत सरकारच्या मंत्री गटाने त्यांच्याशी सत्याग्रह सुरु करण्यापूर्वी वाटाघाटी केल्या. त्यात रामदेवबाबांचे बरेच मुद्दे मान्य केले. यावर बाबांनी मी उपोषण सोडतो असे मान्य केले. त्याचे लेखी पत्रही त्यांनी दिले, पण त्यांनी सत्याग्रह दुसरे दिवशीची चालूच राहणार असे जाहीर करुन उपोषण सोडण्यास नकार दिला. हा दुटप्पीपणा झाला. खर्‍या सत्याग्रहीला हे शोभत नाही. सरकार विरोधात जनमत निर्माण करणे हा या बाबांचा मूळ हेतू असावा, असा निष्कर्ष यामुळे काढता येतो. रामदेवबाबांच्या एकूण वर्तनाबद्दल व विचाराबाबत खेदाने असा निष्कर्ष काढावा लागतो की ते प्रामाणिक सत्याग्रही नाहीत. त्यांच्या सत्याग्रहाला राजकीय वास असल्याचे जाणवते. धड राजकारणही नव्हे, धड अध्यात्मिक नव्हे. भित्रेपणा, खोटेपणा, नाटकीपणा यामुळे रामदेवबाबांचे पितळ उघडे पडले आहे. कपालभातीचा अशातर्‍हेने कपालमोक्ष झाला.

लोकशाहीची थट्टा व लोकशाहीवर आक्रमण या गोष्टी भविष्यकाळातील संकटाची चाहूल आहे. रामदेवबाबानी 11000 तरुणांची सशस्त्र सेना निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्यांना भारतात तालीबानी निर्माण करुन खोमेनीच्या मार्गाने जायचे आहे काय? लोकशाहीप्रेमी भारतीयांनी याचा गंभीरपणे विचार करावा.