Categories
कव्हर स्टोरी

 नजर सुरक्षा कवचांचा लुटारू बाजार

जुलै - २०११

          आपली मानसिकता दैवीशक्ती, दैवी चमत्कार, मंत्रशक्ती, वैदिक परंपरा, आध्यात्मिक समाधान यातच गुरफटलेली असल्यामुळे असा गोष्टींचा धंदा करणार्‍यांचे फावते. दैवी चमत्कारातून आपली सुटका होईल याच आशेने आपण या कवच व्यवहाराला उत्तेजन देत असतो.

            तुम्ही मध्यरात्रीनंतर टी.व्ही.चॅनेल्सवर(चुकून!) सर्फिंग करत असाल तर जरा संभाळूनच सर्फिंग करा. कारण तुमच्या ‘सुरक्षितते’ची काळजी घेण्यासाठी कवच विकणार्‍यांच्या जाहिरातींच्या भाऊगर्दीत तुम्ही नक्कीच हरवून जाल.

            तुमच्यावर आदळणार्‍या संकटापासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी कवच विकणार्‍या आजी-माजी टी.व्ही.चित्रपट तारकांची फौज आपल्या दिमतीला येईल. अनेक सेलिब्रेटींचे चेहरे तुम्हाला दिसतील. गोड गोड लाडे लाडे बोलून या नटनट्या जाहिरात करत असलेले त्यांचे उत्पादन किती परिणामकारक आहे हे पटवून देण्यासाठी पुढे सरसावतील. आपल्या दुखण्यावर बोट ठेवतील. नको ते प्रश्न विचारतील.

“तुमच्या घरात कायम कुणीतरी आजारी पडत आहेत का?”

“तुमचं लाडकं बाळ रडत असते का?”

“तुमच्या सुंदर सुशिक्षित तरूण मुलीला योग्य नवरा मिळत नाही का?”

“तुम्हाला तुमच्या व्यवसायात खोट आली आहे का?”

“तुम्हाला वेळेवर पदोन्नती मिळत नाही का?”

“तुमच्या यशाबद्दल कुणाला तरी हेवा वाटतो का?”

“या वर्षी तुमच्या शेतात पीक आले नाही का?”

“तुमच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही का?”

“(अभ्यास न करता) तुम्हाला प्रथम श्रेणीस पास व्हायचे आहे का?”

            “तुम्हाला स्वाईन फ्लू, एड्स, सांधेदुखीचा त्रास होतो का?”(घुटनोंके दर्दसे चल नही सकती और पीठ के दर्दसे सो नही सकती। परेशान हो गयी हूं मै।)

            अशा प्रकारच्या हजारो समस्यांवर आमच्यापाशी अक्सीर इलाज आहे व त्यासाठी आम्ही सांगतो ते कवच(विकत) घेऊन गळ्यात लटकवा असे आवर्जून सांगणारे आपले लक्ष वेधून घेत असतात. पांढरे शुभ्र वा भगव्या रंगांचे कपडे घातलेल्या या एकेकाळच्या नट-नट्यांना टी.व्ही.वर दाखवून हे चॅनेलवाले आपण किती असुरक्षित जीवन जगत आहोत याची आठवण करून देत असतात. टी.व्ही.पडद्याच्या एका बाजूला अक्राळ विक्राळ अशा भूत राक्षसांच्या प्रतिमा, त्याला पूरक असा कर्कश आवाज व त्याच्या/तिच्या तळहातातून किरण बाहेर पडत असताना “ये शैतानी ताकत और ये इसकी काली कारनामे” असे ओरडत आपल्याला भीती दाखवत असतात. नंतर ती नटी आपल्यासमोर येऊन “यासाठीचे रामबाण उपाय आमच्या अमुक अमुक पदकात असून तुम्ही गळ्यात 12 महिने 24 तास लटकवून ठेवल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतील” असे म्हणत एखादे पदक पुढे करते व “त्याची किंमत 5000 रू.असून तुमच्यासठी फक्त 2375 रू. आताच फोन उचला किंवा ऑनलाईन खरेदी करा” असा तिचा आग्रह असतो.

            एके काळी रस्त्यावर गर्दी जमविण्यासाठी जादू वा गारूड्याचे खेळ करून पोट भरणारे व खेळ बघणार्‍यांना गंडे दोरे विकून गंडविणारे आता हायटेक् होत आहेत. अशा वस्तूंच्या विक्रीसाठी टी.व्ही.वर जाहिराती झळकू लागल्या आहेत. जाहिरातीत चित्रपटाप्रमाणे ट्रिक सीन्स वापरून भोळ्या भाबड्या टी.व्ही.प्रेक्षकांना आश्चर्यचकित(की भयभीत) केले जात आहे. लेसर सदृश प्रकाश किरण वापरून दैवीशक्तीची चुणूक दाखविली जात आहे. प्रत्यक्ष परमेश्वराच्या डोळ्यातून बाहेर पडणारे किरण ताईतात प्रवेश करून दुष्टशक्तींना नष्ट केल्यामुळे संशयाला जागाच नाही, असेच बघणार्‍यांना वाटत असावे. दिव्यर्षी, टेलिमार्ट, होमशॉप 18, AAA, GTM  टेक्नॉलॉजी इत्यादी अनेक कंपन्या बिनदिक्कतपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या अशा वस्तूंच्या विक्रीसाठी पुढे सरसावल्या असून त्यांचा धंदा नक्कीच तेजीत असला पाहिजे. अनेक चॅनेल्सवर या कंपन्यांची मक्तेदारी असावी. काही काळ टी.व्ही.वर सर्फिंग करून या चॅनेल्सवर जाहिरात होत असलेल्या उत्पादनांचा आढावा घेतल्यास त्याची यादी किती लांबलचक आहे याची कल्पना येईल.

            भैरव रक्षा कवच, सर्व कार्य सिद्धी कवच, नारायण कवच, रक्षा यंत्र कवच, माता का कवच, धनलक्ष्मी कवच, साई कवच….

            कदाचित पुढील काही महिन्यात 33 कोटी देव-देवतांचे कवच आपल्या संकटविमोचनासाठी सज्ज होतील. फक्त तुम्ही तुमचा खिसा रिकामा करून घेण्याच्या तयारीत रहा. “ही कवच-कुंडले संकटापासून मुक्त करतील व सर्व काही ठीकठाक होईल” अशी हमी कंपन्या देत आहेत.

            जाहिरात करणारी प्रत्येक कंपनी स्वत:च्या उत्पादनाची शंभर टक्के खात्री देत असते. इतर कंपन्यांच्या कवचापेक्षा आमच्या कंपनीचे कवच कसे सर्वश्रेष्ठ आहे हेही सांगण्यास कंपनी विसरत नाही. कंपनीच्या दाव्यानुसार त्याची सर्व उत्पादनं ऋषी-मुनींच्या मंत्रशक्तीतून तयार झालेली असतात. त्यांच्यात विशेष ‘ऊर्जा’ भरलेली असते. त्यामुळे त्या इष्ट परिणाम देतात. एका कुठल्या तरी कंपनीने त्यांनी बनविलेले निळे चप्पल घातल्यानंतर “आपोआपच उंची वाढत जाते; उंची वाढविण्यासाठी हार्मोन्स इंजेक्शन वा हाडं लांब करणार्‍या खर्चिक ऑपरेशनची गरज नाही”, अशी जाहिरात करत होती. आम्ही शिफारस केलेल्या विशिष्ट रंगाची, खड्याची अंगठी घातल्यानंतर स्वाईन फ्लूला घाबरण्याचे काही कारण नाही व डॉक्टरी इलाज करण्याचीसुद्धा गरज नाही, असे पुण्यातील एक फलज्योतिषी ऐन फ्लूच्या साथीच्या वेळी बिनदिक्कतपणे फेकत होता. त्यानी केलेले हे पोरकट विधान कुणीही गंभीरपणे घेतले नाही ही गोष्टी वेगळी.

            श्री.सिद्ध साई कवच म्हणून तयार केलेल्या सुरक्षा कवचावर 24 कॅरेट सोन्याचा लेप दिला आहे म्हणे. या कवचाच्या एका बाजूला साईबाबांचे चित्र व दुसर्‍या बाजूला अगम्य व दुर्बोध लिपीत लिहिलेली अक्षरं व आकडे. यालाच यंत्र म्हणतात. कंपनीच्या जाहिरातीनुसार या यंत्राला प्रत्यक्ष साईबाबांचे आशिर्वाद लाभलेले असून या आशिर्वादाची प्राण प्रतिष्ठा त्यात केलेली आहे. “वेदोक्तपणे ओम् श्री सद्गुरू साई नाथाय नम: हे मंत्र म्हटले असून हे लॉकेट गळ्यात घातल्यास आपल्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील; शनीची पीडा टळेल, उद्योगात यश प्राप्त होत जाईल; धनसंपत्तीची लयलूट होईल; जादू टोण्यापासून, वैरीच्या अघोरी कृतीपासून संरक्षण मिळेल; लॉटरी, रेस(व मटका) यात जिंकण्याच्या शक्यतेत भरघोस वाढ होईल…..” असे दावे केले जातात. कंपनी कुठलीही असू दे वा उत्पादन कुठलेही असू दे वा कवचाचे नाव कुठलेही असू दे, दाव्यांचा मतितार्थ नेहमीच वर उल्लेख केल्याप्रमाणेच असतो.

            या जाहिरातींना फसणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नसावी. गोवर्धन पवार काही आर्थिक अडचणीत होता. महालक्ष्मी कवचाची टी.व्ही.वरील जाहिरात बघितल्यानंतर आपल्या आर्थिक अडचणी लवकर दूर होतील या आशेने 3400 रू. भरून त्याने कवच विकत घेतले. कवच गळ्यात घातल्यानंतरही त्याच्या अडचणीत काही फरक पडला नाही. उलट तो आणखी कर्ज बाजारी झाला. हे लोक आपल्याला फसवतात हे विधान त्याला उशिरा सुचलेले शहाणपण ठरले.

            अशा प्रकारच्या जाहिरातीत नेहमीच आमचे दावे खोटे ठरल्यास सर्व पैसे परत अशी एक पुष्टी जोडलेली असते.  पसंतीस न उतरलेली वस्तू 15 दिवसांच्या आत परत पाठविल्यास पैसे मिळतील हे वाक्य वाचून धोका पत्करणारे अनेक असतात. वस्तू परत पाठविण्यासाठीचा पत्ता (पो.बॉ.नं….) फोन, मोबाईल क्रमांक इत्यादींचा उल्लेखही जाहिरातीत असतो. परंतु जेव्हा आपण वस्तू परत करण्यासाठी फोनवर विचारपूस करतो तेव्हा तेथील मंडळी दुसरा एखाद्या फोनवर संपर्क साधण्यासाठी क्रमांक देतात, त्या क्रमांकावर फोन केल्यास आणखी तिसरीकडे… अशी टोलवा टोलवी केली जाते. यामळे ग्राहक हैराण होऊन पैसे परत मिळण्याची आशा सोडतो व ते अक्कलखाती जमा करतो. कदाचित आपण त्या कंपनीच्या संस्थास्थळावर गेल्यावर वळीलश्ररळाशी या कलमाखाली वकीली भाषेतील टिप्पणी दिसेल. त्यामुळे त्यांना न्यायालयात खेचले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिवाय आपण मागितलेली वस्तूच आपल्याला मिळेल वा व्यवस्थितपणे ती आपल्यापर्यंत पोचेल याचीसुद्धा खात्री देता येत नाही. उमेश पाटीलला आपल्या आईसाठी हनुमानरक्षा कवच हवे होते. त्यांनी ऑनलाईन 3600 रू.भरल्यावर पुढील 24 तासांत कंपनीकडून पार्सल पाठवण्यात आले. पार्सल उघडल्यावर हनुमान रक्षा कवचाऐवजी शिव कवच आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यांनी कंपनीला तक्रार केल्यावर फोन उचललेली एक हुशार बाई याने काय फरक पडतो, दोन्ही देवच आहेत की म्हणत तिने फोन खाली आपटला. यात देव कुठला का असेना, कंपनीला धंदा करायचा असतो, व ग्राहकाला लुबाडायचे असते.

            या कवच उत्पादनातील काही कवचे केवळ स्तोत्र वा मंत्राच्या सीडीज् आहेत. जाहिरातदारांच्या मते त्यातील मंत्रशक्तीमुळे सर्व संकटे दूर होऊन इच्छापूर्ती होईल. यापूर्वी गायत्री मंत्राचे असेच एक फॅड पसरले होते. सात-आठ शब्दांच्या या मंत्राचे तेच तेच वाक्य दोन दोन तास ऐकणे एका प्रकारची शिक्षाच ठरत होती. आता कवचवाल्यांचे हे फॅड जनमानसात रूजत आहे. 20-30 रूपयांची सी.डी. वा काचेच्या तुकड्याला नजर सुरक्षा कवच म्हणून 4-5 हजाराला गंडा घालणार्‍यापेक्षा अशा वस्तू विकत घेणार्‍या महाभागांच्या मूर्खपणावर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे.

            खडे, गंडे, दोरे, ताईत, लॉकेट, पदक, तावीज, तालस्मान इत्यादीबरोबरच आजकाल नर्मदेतील दगड-गोट्यांना वनलिंग म्हणून विकण्याचा धंदा तेजीत चालला आहे. ज्याप्रकारे विष्णूच्या उपासकांना शाळिग्रामात अद्भुत शक्तीचा प्रत्यय येत असतो त्याचप्रमाणे शंकराच्या भक्तांना या वनलिंगामध्ये प्रत्यय येतो म्हणे. नर्मदेतील विविध प्रकारच्या व विविध आकारात सापडणार्‍या रंगीत दगड गोट्यांचे पुनर्नामकरण करून हा धंदा चालतो. शंखमस्तकमल पद्म, शिरोयुग्म, ध्वज, स्वयंभू, मृत्यूंजय, नीलकंठ, त्रिलोचना, कालाग्नीमुद्रा, त्रिपुरारी, अर्धनारीश्वर, महाकाल इ.इ.नावाने भरमसाठ पैसे घेऊन व्यवहार केला जातो. या सगळ्या प्रकारच्या वनलिंगात अद्भुत दैवी शक्ती असते; त्या जवळ बाळगल्यास सर्व दु:ख व पीडा नाहिशा होतात; त्यातील दिव्यशक्तीमुळे इच्छापूर्ती होते…. अशा प्रकारचे दावे यासंबंधी केले जातात. या दाव्यावर विश्वास(श्रद्धा) ठेवून या दगडांना विकत घेणार्‍यांची संख्या कमी नसावी.

            याचप्रमाणे रूद्राक्षमाळा गळ्यात घालून मिरवणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नसावी. हिमालयाच्या पायथ्यापाशी असलेल्या राज्यात वाढणार्‍या एका प्रकारच्या झाडाच्या वाळलेल्या फळात कुणालातरी शंकराचा तिसरा डोळा दिसल्याचा भास झाल्यामुळे रूद्राक्ष(रूद्र+अक्ष) हे नाव त्याला पडले. शंकराने त्रिपुरासुर या राक्षसाला आपला तिसरा डोळा उघडून जाळल्यानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रूंचे रूपांतर रूद्राक्षात झाले अशी एक आख्यायिका आहे. अशाच कुठल्यातरी पुराण कथामध्ये ब्राह्मणाने पांढरे, क्षत्रियाने तांबडे, वैश्याने पिवळे व शूद्राने काळे रूद्राक्ष घालावे असे लिहून ठेवून वर्णव्यवस्था बळकट करण्यासाठी हातभार लावला आहे. रूद्राक्षांचे वर्गीकरण रंगाप्रमाणेच नव्हे तर त्यावरील डोळ्याप्रमाणेसुद्धा केले जाते. एक मुखी, द्विमुखी व चौदहमुखीपर्यंत रूद्राक्षाचे प्रकार असून प्रत्येक प्रकाराचे परिणामही वेगवेगळे असतात म्हणे. रूद्राक्ष या ईश्वरी नावामुळे त्याच्याभोवती आध्यात्मिकतेचे व दैवीशक्तीचे वलय उभे करण्यात धंदेवाईक यशस्वी झाले. म्हणूनच या रूद्राक्षांची सुद्धा टी.व्ही.वर जाहिरात होत असते व त्यांच्या विक्रीसाठी गावोगावी प्रदर्शन भरवली जातात.

            अशा प्रकारचा खुळचटपणा फक्त आपल्याच देशात नसून अतीविकसित देशातही रूढ होत आहे. तंत्र, मंत्र, दैवीशक्ती, चमत्कार इत्यादीवर आपल्याएवढी नसली तरी क्वांटमपासून सुरू झालेल्या गोष्टींचे तेथे वेड आहे. उदा.दीपक चोप्राच्या क्वांटम हिलींगचा तेथे भरपूर गवगवा होतो. म्हणूनच क्वांटम सोलार एनर्जी पेंडंटस् या लांब लचक नाव असलेल्या ताईताला त्यांच्या देशात भरपूर मागणी आहे व आपल्या देशातही त्याचा चंचू प्रवेश होत आहे. “आपल्या भोवती विद्युत चुंबकीय किरणांचे जाळे पसरले असून त्यामुळे आपल्या शरीर-स्वास्थ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. सोलार(?) ऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या या पेंडेंटमध्ये विद्युत चुंबकीय किरणांना भेदून टाकणारी शक्ती आहे. व त्याचा वापर करत राहिल्यास सुख, शांती, एकाग्रता, समाधान मिळण्याची शक्यता वाढते. नकारात्मक ऊर्जा नाहिशी होते. वैश्विक उर्जेमुळे तरतरी येते. आळस व कंटाळा दूर होतात. यातील किरणांच्या कंपनामुळे चक्र व र्रीीर यांचे  संतुलन साधता येते.” अशा प्रकारच्या दाव्यांना व त्यातील क्वांटम वा नॅनो तंत्रज्ञान यांना कुठलाही अर्थ नाही. तरीसुद्धा याची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी होते व धंदा जोरात चालतो.

            यावरून ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ याचा तंतोतंत प्रत्यय येतो. उघड उघड अंधश्रद्धेचा पुरस्कार करणार्‍या अशा जाहिरातीवर बंदी आणण्यास उपलब्ध असलेला केबल व नेटवर्क कायदा, 1994 वा खोट्या व दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवरील बंदीचा कायदा पुरेसे ठरत नाहीत. कारण जाहिरात करणार्‍या एजन्सी निष्णात कायदे सल्लागारांकडून सल्ला घेऊनच disclaimer चा उल्लेख करतात. This is paid advertisement. Viewer discreation i.s advised. त्यामुळे आपल्या तक्रारीतील हवाच निघून जाते. मुळात आपला विरोध कवचांना आहे की, त्यांच्या जाहिरातींना, हे आपल्याला ठरवावे लागेल.

            याविषयी अनेकांकडून सातत्याने तक्रारी आल्यानंतर अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी काही ठोस उपाय योजण्याचे ठरविले आहे. या प्रकारच्या दिशाभूल करणार्‍या टी.व्ही.वरील जाहिरातींच्या विरोधात सह्यांची मोहीम उघडली आहे. अंनिसचे सक्रीय कार्यकर्ते निर्मलकुमार सूर्यवंशी याविषयी खोलात जाऊन अभ्यास करत असून केंद्रशासनाच्या अखत्यारीतील प्रसारभारतीबरोबर चर्चा करण्यासाठी तयारी करत आहेत. जरूर पडल्यास कायद्यात दुरूस्ती करून या जाहिरातदारांना कोर्टात खेचून खटला भरण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु कायद्याची लढाई नेहमीच वेळखाऊ व खर्चिक असते, हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवे.

            एकेकाळचा प्रसिद्ध क्रिकेटपटू दादा सौरव गांगुलीला आपण खेळताना पाहिले असेलही. त्याच्या मनगटावर व गळ्यात (व दंडावर) मोठ्या प्रमाणात मंतरलेले रंगीत दोरे, ताईत असूनसुद्धा क्रिकेटविश्वामधून त्याची गच्छंती झाली. त्यामुळे अशा प्रकारचे गंडे-दोरे, ताईत, कवच इत्यादी प्रकारच्या spiritual market commodities मुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडू शकतो हा विचारसुद्धा मूर्खपणाचा कळस ठरू शकेल. परंतु काही अती बुद्धिवंत “त्यातून मानसिक समाधान मिळत असल्यास त्याचा विरोध करण्यात हशील नाही” असा बुद्धिभेदही करतील. मानसिक समाधान व वैयक्तिक अनुभव याच निकषावरून निष्कर्ष काढत असल्यास बुद्धी, तर्क, विवेक, विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना गुंडाळून ठेवावे लागेल.

            मुळातच आपली मानसिकता दैवीशक्ती, दैवी चमत्कार, मंत्रशक्ती, वैदिक परंपरा, आध्यात्मिक समाधान यातच गुरफटलेली असल्यामुळे असा गोष्टींचा धंदा करणार्‍यांचे फावते. दैवी चमत्कारातून आपली सुटका होईल याच आशेने आपण या कवच व्यवहाराला उत्तेजन देत असतो. मुळात आपल्यावर कोसळलेल्या संकटाचे मूळ आणखी कुठेतरी असते. व आपण तेथे न शोधता भलतीकडेच त्याचा शोध घेतो. त्यामुळे कवचसारख्या वस्तूंची मलमपट्टी वापरून काही तरी करत असल्याचा आव आणतो. कदाचित 3-4 हजार रूपये आपल्यासारख्यांना फार मोठी रक्कम वाटणार नाही. परंतु अशा प्रकारे हजारो लोक अशा फालतू गोष्टीवर खर्च करत राहिल्यास समाजात वेगळा-विज्ञानविरोधी व अंधश्रद्धा पसरविणारा संदेश पोचतो व हे समाजहितास विघातक ठरू शकते. म्हणूनच आपण आपला तर्क व विवेक वापरून अशा गोष्टींपासून चार हात दूर राहणेच केव्हाही हितावह ठरू शकेल!

प्रभाकर नानावटी