Categories
आरोग्य विशेष

आरोग्याचं टेलिमार्केटिंग

जुलै - २०११

भांडवलवादी व्यवस्था सर्व माध्यमांचा उपयोग करून, प्रसंगी खोट्या गरजा निर्माण करून, आपल्या उत्पादनाचा खप वाढवते. एवढं लक्षात ठेवलं तर टेलिमार्केटिंगमुळे होणारी फसवणूक नक्की टळू शकेल, पण आरोग्य सुरक्षित ठेवायचं असेल तर पारंपारिक आणि पर्यायीउपचारांचं दळण दळणार्‍या कार्यक्रमांवर रिमोटच चालवायला हवा.

            टीव्ही आता घराघरात पोचलाय. त्यावर दिसू शकणार्‍या चॅनल्सचा तर सुळसुळाट झालाय. जमाना जागतिकीकरणाचा, उदारीकरणाचा, खाजगीकरणाचा आहे. आक्रमक मार्केटिंग करून आपल्या मनाचा ताबा घेण्याचा आहे. एकदा मनाचा ताबा घेतला की खिसा आलाच ताब्यात. तो लवकरात लवकर रिकामा कसा करता येईल एवढीच काय ती उत्पादकांची विवंचना. त्याला टीव्हीसारख्या ध्वनी-चित्र माध्यमाची जोड मिळते. मग काय? स्काय शॉपद्वारे वस्तू विकल्या जातात, सत्संगाद्वारे अध्यात्म विकलं जातं, जाहिरातींद्वारे स्वप्नं विकली जातात, फावल्या वेळात चघळायला ब्रेकिंग न्यूज विकल्या जातात. या ‘महाबाजारा’च्या मायाजालात फसवणूक होते पण ती ओढवून घेतलेली असते. पण याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे आरोग्यविषयक माहितीचे कार्यक्रम

            केवळ आरोग्यासाठी वाहिलेली मोजकी चॅनल्स असोत किंवा आरोग्यविषयक कार्यक्रम सादर करणारी बाकीची चॅनल्स असोत, कार्यक्रमातून माहितीचा ओघ सतत वहात असतो. आधुनिक वैद्यकातील ‘स्पेशॅलिस्ट’ सोडले तर या माहितीच्या दर्जाबद्दल कसलीही खात्री नसते, त्यावर कशाचंही नियंत्रण नसतं. यात आयुर्वेद, होमिओपथी, निसर्गोपचार आणि देशोदेशींच्या पर्यायी उपचारपद्धतींपर्यंत सगळं काही आलं. केस गळणं, कावीळ, डोळे येणं इथपासून कॅन्सरपर्यंत सगळ्या प्रकारच्या रोगांवर उपचार सांगितले जातात आणि लक्षावधी लोकांपर्यंत ते सहज पोचतात. भारतात सुमारे एक कोटी लोक हे कार्यक्रम बघतात. 2009 च्या एका आकडेवारीनुसार या ‘आरोग्यवाहिन्या’ दरवर्षी सरासरी 60 कोटी रूपयांचा धंदा करतात. यापैकी बहुतेक कार्यक्रमातील ‘तज्ञ’ डेन्ग्यू, स्वाईन फ्लू सारख्या जंतुसंसर्गांपासून डायबेटीस आणि ब्लडप्रेशरपर्यंत सगळेच आजार पर्यायी उपचारांद्वारे बरे करण्याचा दावा करतात. ‘गुरू’, ‘आचार्य’ किंवा तत्सम बिरूदं, ओघवती भाषा, ‘जगाच्या कल्याणा’ असे चेहर्‍यावरचे भाव हाच त्यांच्या ज्ञानाचा पुरावा गृहीत धरला जातो. ‘कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय आजारातून मुक्ती’ची खात्री देणार्‍या या उपचार पद्धतींवर लोक चटकन भुलतात. एक डॉक्टर म्हणून मला हे अनेकदा जाणवतं की अनेक लोक आजार गंभीर असतानाही आधुनिक वैद्यकाचे चालू असलेले उपचार अर्धवट टाकून असल्या ‘पर्यायी’ किंवा ‘नैसर्गिक’ उपचारांकडे वळतात. याचे दुष्परिणाम अर्थातच त्यांना भोगावे लागतात.

            माझ्या परिचितांपैकी एक केस. चाळीशीच्या त्या व्यक्तीच्या बरगडीला गाठ आल्यासारखी झाली. त्या गाठीची बायॉप्सी केली तेव्हा हाडाचा कॅन्सर निघाला. अशा वेळी वाटेल तो सल्ला देणारे असतातच. त्यातल्याच एकानं मुंबईच्या एका ‘पर्यायी उपचार’ देणार्‍या तज्ञाचं (?) नाव सुचवलं. टीव्हीवर आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून ते कायम झळकत असतात. त्यामुळे घरच्यांचाही पटकन विश्वास बसला. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिने उपचार झाले. फरक काहीच पडला नाही उलट कॅन्सर शरीरभर पसरला. वेळेवर ऑपरेशन केलं असतं आणि केमोथेरपी घेतली असती तर कदाचित आणखी वीस-पंचवीस वर्षं जगता आलं असतं. आता मात्र काहीच सांगता येत नाही अशी परिस्थिती आली.

टीव्हीवरील या तथाकथित ‘तज्ञ’ लोकांची मांडणी मोठी आकर्षक असते. वेगवेगळ्या आकृत्या किंवा अ‍ॅनिमेशन्स वापरून एखादा रस किंवा चूर्ण कसा परिणाम करतं आणि आजार बरा होतो हे ते प्रभावीपणे सांगतात. पण ही माहिती अनेकदा अर्धवट असते. ‘नैसर्गिक’ औषधांचा वाटेल तसा वापर केल्यामुळे होऊ शकणार्‍या अपायाबद्दल क्वचितच काही सांगितलं जातं. याला भरीस भर म्हणून ‘धार्मिक’ गुरूही आता वैद्यक क्षेत्रात शिरले आहेत.

            टीव्हीवरील हे ‘गुरू’ जे काही बरळतात त्याचं अनुकरण त्यांचे भक्त अक्षरशः आंधळेपणानं करतात. उदाहरण द्यायचं झालं तर लोकप्रिय ‘उपोषण फेम’ योगगुरू बाबा रामदेव डायबेटीस बरा होण्यासाठी दुधी भोपळ्याचा आणि कारल्याचा रस घ्या असं सांगतात. पण काही विशिष्ट परिस्थितीत असे रस विषारीही ठरू शकतात. दिल्लीतील ‘कौन्सिल फॉर सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ या संस्थेत डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम करणारे 59 वर्षीय सुशीलकुमार सक्सेना गेल्या वर्षी 23जूनला मृत्यूमुखी पडले तर त्यांची पत्नी नीरज यांना रूग्णालयात दाखल करावं लागलं. कारण? जरा जास्तच कडू लागणारा दुधी भोपळा आणि कारल्याचा मिश्र रस! रामदेवबाबांच्या प्रेरणेनं उद्युक्त होऊन गेली चार वर्षं डायबेटीससाठी सक्सेना पती-पत्नी हा रस नेमानं घेत होते. दुधी भोपळा, साधा भोपळा, काकडी, खरबूज, टरबूज, अशी काकडी-भोपळा(ककुरबिटेसी) वर्गातील फळं ही चवीला नेहमीसारखी असतील तरच खायला योग्य असतात. ती जरा जरी कडूसर लागली (आणि कारलं जरा जास्तच कडू लागलं) तर त्याचा अर्थ त्यात ‘टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनॉईड ककुरबिटॅसिन’ हे विषारी रसायन तयार झालेलं असतं. वाढतं तापमान, अपुरं पाणी, जमिन फारशी सुपिक नसणं आणि अयोग्य साठवण या कारणांमुळे हे विषारी रसायन तयार होऊ शकतं, पण फळ प्रत्यक्ष चाखल्याशिवाय विषारीपणाचं कोणतंही लक्षण बाहेरून दिसत नाही. हे रसायन रक्तात मिसळलं की त्याचा परिणाम म्हणून यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांना सूज येते, प्रमाण जास्त असेल तर मृत्यूही ओढवतो. सुशीलकुमार यांना रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला तो या विषाच्या परिणामामुळेच.

            कोणतीही वनस्पतीजन्य औषधं किंवा जडीबुटी ही माणसासाठी सुरक्षित असतात, आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नसतात या समजुतींचा पायाच या प्रसंगामुळे डळमळीत झाला. निसर्गोपचार किंवा आयुर्वेद तज्ञ यांच्या सल्ल्यावरून नियमितपणे कारल्याचा रस घेणार्‍यांमध्ये असे विषबाधेसारखे प्रकार वारंवार होत असतात, असं डेहराडूनच्या ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’नं (रामदेवबाबांना उपोषणानंतर इथंच नेलं होतं. काय हा ‘दैवदुर्विलास’!)केलेल्या एका संशोधनात आढळून आलंय. अशी ‘विषबाधा’ झाली तरी त्याचं कारण रस नसून वेगळंच असेल अशा (अंध)श्रद्धेनं बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करत असणार. ज्या प्रमाणात आपल्याकडे ‘हर्बल’ औषधं वापरली जातात त्यावरून या औषधांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक मृत्यूही होत असणार.

            जी गोष्ट अशा रसांची तशीच काहीशी इतरही उपायांची. एका मराठी माध्यमसमूहाच्या वृत्तपत्राची पुरवणी चालवणारे आणि त्याच्याच चॅनलवरून गीता ते आयुर्वेद यापैकी कशावरही हुकमी बोलणारे एक तुपाळ आयुर्वेदाचार्य. ‘डोळ्याचा नंबर’ जाण्यासाठी बाजारातून किंवा जंगलातून हिरडा आणावा, रात्रभर भिजत घालावा आणि सकाळी त्या पाण्यानं डोळे धुवावेत असं सांगतात. डोळ्याच्या आत असलेल्या भिंगाच्या आकारातील बदलामुळे दृष्टीदोष उद्भवतो. बाहेरून पाण्यानं डोळा धुऊन तो कसा जाणार? शिवाय हिरडा भिजवल्यानंतर त्यावर जंतुसंसर्ग झाला किंवा बुरशी आली तर हा उपाय केवढ्याला पडणार? टीव्हीवरील ‘गुरूं’नी सांगितलेले असले घरगुती उपाय ऐकायला कितीही छान वाटले तरी त्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली जात नसल्यामुळे त्यापासून अपाय होण्याची शक्यता नजरेआड करून चालणार नाही.

            घरात करून बघायच्या अशा उपचारांच्या जोडीला पारंपारिक औषधांची अतिरेकी भलावण करण्याचा, जाहिरातबाजीचा प्रकारही जोरात चालू आहे. च्यवनप्राशमध्ये स्टिरॉईड्स सापडल्यानंतर त्याचा जोर आता जरा कमी झाला आहे. सध्या अ‍ॅलू व्हेरा (कोरफड) जोमात आहे. कोरफड लावल्या जागी दाह कमी होतो, पोटात घेतली तर खोकला बरा होतो, शरीराची प्रतिकारयंत्रणा सशक्त होते हे परिणाम अनुभवसिद्ध आहेत. पण म्हणून त्यानं काहीही बरं होऊ शकतं असं म्हणणं चुकीचं आहे.  त्वचेच्या कोणत्याही आजारासाठी, आरोग्यदायक जीवनशैलीसाठी, ‘सर्वरोगहारी संजीवनी’ म्हणून सध्या अ‍ॅलू व्हेराचं मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. बहुतेक सौंदर्यप्रसाधनांचं उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी क्रीम किंवा लोशन स्वरूपात ते बाजारात आणलं आहे. त्यात प्रत्यक्षात किती कोरफड असते हा भाग अलाहिदा! वेगवेगळ्या ब्रॅन्ड नावांखाली बाटल्या आणि कॅनमधून तिचा रस उपलब्ध आहे. पण गर्भवती स्त्रीनं किंवा बाळाला पाजणार्‍या आईनं ते घेऊ नये, हा महत्वाचा इशारा बाटल्यांवरच्या लेबलवर लिहिलेला नसतो. शिवाय त्यातल्या घटकांच्या दर्जाबाबत शंका बाळगायला जागा आहे. रस किती प्रमाणात घ्यावा याचं कोणतंही प्रमाणीकरण झालेलं नाही. तरीही वेगवेगळ्या ब्रॅन्डवर वेगवेगळा डोस दिलेला असतो. चुकीच्या प्रमाणात घेतला तर त्याचा अपायच होणार.

            वनस्पतीजन्य औषध उद्योगाला औषधविषयक कायदा लागू असला तरी तो उत्पादनाच्या ठिकाणची स्वच्छता आणि कच्च्या मालाची कडक तपासणी यापुरताच मर्यादित आहे. कच्चा माल कुठून आला, लागवडीच्या क्षेत्रातली परिस्थिती आणि निर्मितीचं तंत्रज्ञान या गोष्टी या कायद्याच्या कक्षेत येत नसल्यामुळे दुर्लक्षित रहातात. ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायरनमेंट’ यासारख्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार तयार औषधांमधल्या घटकांचं प्रमाण हे लेबलवर निर्देश केलेल्या प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त, कसंही आढळतं. शिवाय कोणत्या परिस्थितीत ते औषध घेऊ नये याचा अजिबात उल्लेख नसतो. त्यामुळे अशा औषधांचं सेवन प्रसंगी घातक ठरू शकतं.

            सध्याच्या बैठ्या जीवनशैलीचा एक दुष्परिणाम म्हणजे मलावरोध किंवा बद्धकोष्ठता. यावर इलाज म्हणून आयुर्वेदिक काढे आणि चूर्णं यांची भरपूर जाहिरात केली जाते. एकदा ती घ्यायला लागलं की त्यांची सवय लागते हे तर खरंच, पण दीर्घकाळ वापरल्यामुळे त्याचाही मूत्रपिंडावर विपरित परिणाम होतो हे कोणीच सांगत नाही.

            टीव्हीवरच्या ‘आरोग्यवाहिन्यां’वरून काय दाखवलं जावं याबद्दल कोणताही कायदा नसल्यामुळे, ज्यांच्याबद्दल कसलाही अभ्यास किंवा प्रयोग झालेले नाहीत अशा आरोग्यविषयक उत्पादनांची जाहिरात चालते आणि लाखो लोक त्याला भुलतात. तांत्रिक दृष्ट्या ही उत्पादनं ‘पोषण-पूरक’ (न्यूट्रिशनल सप्लिमेंट) किंवा ‘आरोग्य-काळजी’ (हेल्थ केअर) उत्पादनं या सदराखाली येत असल्यामुळे एका अर्थी ती औषधं ठरत नाहीत, त्यामुळे त्यांना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही. पण जाहिरात पहाणार्‍याला या खाचाखोचा माहित नसतात आणि जाहिरातीत तर आजारातून पूर्णपणे बरं होण्याचे दावे केलेले असतात. साहजिकच ती औषधंच आहेत असं वाटून घेतली जातात.

            टीव्हीवर दाखवले जाणारे व्यायाम, योगासनं आणि इतर कसरतींचे प्रकार यामुळेसुद्धा दुखापत होऊ शकते किंवा

आरोग्यविषयक नव्या तक्रारी उद्भवू शकतात. टीव्हीसमोर बसून स्वतःच्या शरीराकडे लक्ष कमी आणि टीव्हीच्या पडद्याकडे जास्त अशा पद्धतीनं, समोर चालू असलेल्या व्यायाम प्रकाराचं अनुकरण करणार्‍या लोकांमधलं पाठीचा कणा, खांदे आणि कंबर यावरच्या स्नायूंच्या दुखापतींचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढत्या व्यायामाबरोबर वेदनाशामक औषधांच्या खपाचं प्रमाणही वाढतंय. वजन कमी करण्यासाठी करायच्या ‘एरोबिक’ व्यायाम प्रकाराआधी शरीर ‘वॉर्म-अप’ होण्यासाठी (शरीराची पुरेशी तयारी होण्यासाठी) काही सोपे व्यायाम प्रकार करायची गरज असते, त्यामुळे स्नायूंच्या दुखापतीची शक्यताही काही प्रमाणात कमी होते. काही व्यायाममालिकांच्या सुरवातीच्या एखाद्या एपिसोडमध्ये हे प्रकार दाखवले जातात. पण प्रत्येक एपिसोडमध्ये ते पुन्हा दाखवले जात नाहीत. ते आधी केले आहेत अशी मार्गदर्शकांची अपेक्षा असेलही, पण तसं वारंवार सांगितलं जात नाही. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाला की लगेच अनुकरण सुरू होतं, आधीची तयारी झालेली नसते. शिवाय प्रत्यक्ष व्यायामप्रकार करण्यातले बारकावे निव्वळ अनुकरणात (प्रत्यक्ष देखरेख नसल्यामुळे) पाळले जात नाहीत. समोर प्रात्यक्षिकं दाखवणारी व्यक्ती जितकी ‘फिट’ असते, तेवढे पहाणारे नसतात. साहजिकच जुनाट स्नायूदुखी, गुडघे सुजणं, प्रसंगी ‘स्लिप डिस्क’ सारख्या दुखापती होतात. योगासनंसुद्धा बघायला सोपी वाटली तरी ती व्यवस्थित शिकल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष देखरेख नसताना केली तर त्यांनी उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो. रामदेवबाबा कपालभातीबद्दल काहीही सांगो, पण हृदयविकार असलेल्या लोकांनी असले प्रकार न करणं चांगलं. प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार हे तर श्वासाचे खेळ आहेत. त्यातला खोलवर श्वासोच्छ्वास एवढाच भाग खरा असतो, बाकीची निव्वळ सजावट असते, हे लक्षात घ्यायला हवं.

            कोणतीही गोष्ट प्रभावी ठरत असेल, मग भले तो एखादा खेळाडू असो वा कलाकार, तंत्रज्ञान असो वा माध्यम, भांडवलवादी व्यवस्था या सगळ्याचा उपयोग करून, प्रसंगी खोट्या गरजा निर्माण करून, आपल्या उत्पादनाचा खप वाढवते. एवढं लक्षात ठेवलं तर टेलिमार्केटिंगमुळे होणारी फसवणूक नक्की टळू शकेल, पण आरोग्य सुरक्षित ठेवायचं असेल तर ‘पारंपारिक आणि पर्यायी’ उपचारांचं दळण दळणार्‍या कार्यक्रमांवर रिमोटच चालवायला हवा.

डॉ. आशुतोष मुळ्ये