अं.नि.वार्तापत्रामुळे डोळे उघडले.
मी गेल्यावर्षीपासून अं.नि.वा.वाचतो. वर्षभरात माझे चांगले प्रबोधन झाले. पूर्वी मी ज्योतिष, भूत, देवदेवता यांच्या अगदी अधीन झालो होतो. यामुळे माझा आत्मविश्वास पार ढासळला होता. परंतु माझ्या मित्राचा मुलगा अमरदीप पवार हा धुळे शाखेचा शाखा कार्यवाह आहे. त्याने माझ्या नकळत वर्गणी देऊन माझ्या नावाने अंक पाठवण्यास सुरवात केली. व हा वैज्ञानिक मनोवृत्तीचा एकमेव अंक वाचून माझे डोळे उघडले व मी पूर्णत: विज्ञानवादी झालो. मला अनेक ज्योतिषांनी फसवले होते. त्याचाही मला पश्चात्ताप झाला आहे. मी अं.नि.वा.चा व अमरदीपचा आभारी आहे.
–डॉ.कांतीलाल, बावधन, पुणे
कुठे गेले साईबाबा?
मी एक विद्यार्थिनी आहे. आपण आपल्या मार्च 2011 च्या अंकातील संपादकीयामध्ये अंधश्रद्धाबाबत महाराष्ट्रातील नव्हे तर देशपातळीवरच्या अति उच्चपदस्थ महाराजाचा खरपूस समाचार घेतलात ते आवडले. एका मुख्यमंत्र्यांनीच शासकीय निवासस्थानी मुंबई येथे साईबाबाचे चरणस्पर्श केले तरी पण मुख्यमंत्रीपद गेलेच. कुठे गेले साईबाबा? हा प्रश्न कदाचित त्यांना पडला असावा. कळावे जास्त काय लिहावे?
–कु.अनुजा मनाळे, हडपसर, पुणे
घबाड देवापाशी – जनता उपाशी
गेल्या अनेक दिवसांपासून पद्मनाभ मंदीर खजाना टी.व्ही. आणि पेपरवर पाहतोय. तिरूपती एक नंबर होतं आता पद्मनाभ एक नंबर झालं. कोण म्हणेल आपला देश कर्जबाजारी आहे, गरीब आहे? त्या सत्यसाईबाबाकडे कोट्यवधीची संपत्ती व सोने सापडलं. पद्मनाभ मंदिरात लाख कोटींचं घबाड सापडलं. भारत देशाला सोनेकी चिडीया म्हटलंय अगदी बरोबर आहे. पण सर्व घबाड देवापाशी, आणि गरीब जनता मेली उपाशी अशी तर्हा आहे. देवाला सोन्याचा हार, गरीब खातोय लाठीचा मार हे थांबवायचं असेल तर जनतेने अज्ञानाचा अंधार सोडून विज्ञानाच्या प्रकाशात यायला पाहिजे. तेव्हाच कुठे ही उच्चनिचतेची दरी कमी होईल.
–राजेंद्र कटीलकर, मोखाडा, जि.ठाणे.
तरूणांना पुरस्कार द्या
या वर्षीचा अं.नि.वा.शतकवीर हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहात हे वाचून खूप छान वाटले. पण ह्या पुरस्कारासाठी आपले सर्वच कार्यकर्ते तितकेच सक्षम आहेत. खरं पहाता मी नेहमी म्हणत असतो तसा आमच्या सारखा निवृत्त कर्मचार्यांचे समाजकार्य म्हणजे भरल्या पोटी शतपावली करतानाचे समाजकार्य आहे. आपल्या संघटनेत खूप तरूण-मध्यमवयीन कार्यकर्ते आहेत. ते आपल्या कौटुंबिक जबाबदार्या, व्यवसायाच्या जबाबदार्या पार पाडत पाडत त्यातूनही वेळ काढून वर्गणीदार जमवतात. त्यांचा खास करून विचार झाला पाहिजे असे वाटते. त्यांनी आणलेले 10 वर्गणीदार हे शतकाप्रमाणे आहेत. ह्यापुढे त्यांचा विचार व्हावा असं मला वाटतं. वेळच्या वेळी अंक कसे मिळतील याची आपण काळजी घेतच असता पण आपणाला सुद्धा वेळेअभावी मर्यादा पडतात. याची मला जाणीव आहे. म्हणून कधी कधी आमचे वर्गणीदारांना अंक मिळत नाहीत तरी त्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याचे आपल्या मनात असणारच त्याकामी सुद्धा आमची तुम्हाला जरूर असेल तर नि:संकोचपणे कळवा.
अंकाचे वर्गणीदार मिळवताना खूप काही अनुभव आले. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे असे लोक वर्गणी द्यायला टाळाटाळ करतात. खूप वेळा मागे लागावे तेव्हा त्यांच्या खिशातून दीडशे रूपये काढणे शक्य होते. खरं पहाता पुण्यासारख्या ठिकाणी कुठच्याही हॉटेलमध्ये गेले तर शंभर-दीडशे बिल सहज होते. पण काही लोकांना ह्या विचाराचे महत्व वाटत नाही. पण काहीजण आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी अगदी सहजपणे वर्गणी देतात. काही शाळासुद्धा ठराविक मॅनेजमेंट असेल तर वर्गणीदार होत नाहीत. अगदी ऐपत असून सुद्धा! पण काही ठिकाणी मुख्याध्यापक मंजुरीची वाट न बघता आपल्या खिशातून पैसे काढून वर्गणीदार होतात.
आणखी एक कल्पक योजना वर्गणीदार मिळवण्यासाठी आमच्या चिंचवड शाखेने राबवली. मुरूडकर, महाजन दांपत्य, क्रांती, मिलिंद ह्यांच्या सहाय्याने रेल्वेमध्ये प्रवास करताना (आम्ही मुंबईला आझाद मैदानावर जात असताना) छोटासा सर्व्हे केला त्यासाठी एक प्रश्नावली तयार केली होती. आश्चर्य म्हणजे रेल्वेप्रवासांत सुद्धा चार वर्गणीदार मिळाले. काहींनी त्यांचे गावी शाखा उघडण्यासाठी प्रपोजल दिले. खूप खूप अनुभव साठत आहेत. आम्ही सर्व चिंचवडचे कार्यकर्ते आपण दिलेल्या पुरस्काराने उत्साहीत झालो आहोत. हे नक्कीच! पुढील वर्षी आणखी नवा उच्चांक तुम्हाला बघावयास मिळेल.
-विश्वास पेंडसे, पुणे.