नांदेड जिल्ह्यातील बिलोली या तालुक्याच्या ठिकाणापासून 4 कि.मी.अंतरावर राज्य महामार्गावर बाभळी हे गाव वसलेले आहे. 550 लोकसंख्येच्या या गावात सूर्यग्रहणाच्या दिवशी माधव गणपत लोणकारे यांच्या घरी एक बालक जन्मास आले. यामुळे घरची मंडळी अस्वस्थ झाली. एके दिवशी याच कुटुंबातील एका महिलेने शेजारच्या महिलेला याची माहिती दिली. त्यामुळे ही बातमी गावभर पसरली. गावातल्या सर्व अशिक्षित बायकांनी मुलाचे पंचांग पाहण्याचा सल्ला कुटुंबियांना दिला. लगेचच कुटुंबियांनी परगावी महाराजाकडे पंचांग पाहिले असता त्या महाराजाने एक काळी गाय, एक काळी मांजर दान करावे लागेल. पूजा करतेवेळी आईवडिलांव्यतिरिक्त गावात कोणीही राहायचे नाही. अन्यथा गावावर संकट येईल असे सांगितले. वार्यासारखी ही बातमी गावभर पसरली व दि.10 जुलैपासून गावातील महिला, तरूण मुले, बालके परगावी स्थलांतरीत होण्यास सुरवात झाली. गावात शाळाच भरली नाही व पूजा होईपर्यंत गावात कोणीच आले नाही. अशी माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यावर दि. 15 जुलै रोजी समितीच्या वतीने गावात सूर्यग्रहणाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, अंनिसचे जिल्हासचिव एन.जी.वाघमोडे यांनी बिलोली अध्यक्ष अॅड.धोंडीबा पवार, कार्याध्यक्ष अशोक वाघमारे यांनी गावकर्यांना चमत्काराच्या प्रयोगासह मार्गदर्शन केले. गावकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. लोणकारे कुटुंबियांशी भेट घेतली. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सांगण्यात आला. यामुळे गावातील लोकांच्या मनातील अपशकुनाची भीती कमी झाल्याचे जाणवले होते. यात समितीने यश मिळविले तरीही भोंदू महाराजाचा शोध चालू आहे.
–कुलदीप नंदूरकर, बिलोली, जि.नांदेड