Categories
अभिवादन

जर्मन संशोधकाला भावलेले डॉ. दाभोलकर

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

जॉन क्वॅक हे मॅकगिल विद्यापीठ, कॅनडा येथे रिसर्च फेलो म्हणून काम करत आहेत. 2007 साली संशोधनाच्या निमित्ताने ते भारतात आले होते. संस्थात्मक विवेकवाद व भारतातील धर्मचिकित्सा हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. या संदर्भात डॉ. दाभोलकर व इतर अनिंस कार्यकर्त्यांशी संवाद साधून व प्रत्यक्ष भेटीतून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. व प्रबंध सादर केला. या प्रबंधावर आधारित Disenchanting India हे पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केले. या संशोधनाच्या काळात त्यांचा डॉक्टरांशी संबंध आला व त्यांना हे व्यक्तिमत्व आवडले.

त्यांनी पुस्तकात केलेल्या डॉक्टरांच्याबद्दलच्या उल्लेखावर आधारित हा लेख.

डॉ. दाभोलकर हे अंनिसचे संस्थापक, अध्यक्ष होते. 1970 मध्ये मेडिकल पदवी घेतल्यानंतर काही वर्षे त्यानी वैद्यकीय व्यवसाय केला व 1980च्या सुमारास स्वतःला पूर्ण वेळ सामाजिक कार्यात वाहून घेतले. बाबा आढाव यांच्या एक गाव एक पाणवठा या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. अंनिस व्यतिरिक्त सातारा येथील परिवर्तन नावाच्या व्यसनमुक्ती केंद्राची धुरा त्यांच्याकडेच होती. कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थ्यांच्यासाठीच्या विवेकवाहिनी या कार्यात ते पूर्ण लक्ष घालत होते.

मी 2007 च्या सुमारास त्यांना पुण्यात पहिल्यांदा भेटलो. एक साधा खादी कुर्ता, डोक्यावर पांढरे केस, कालबाह्य वाटणारा चष्मा व थोडीशी बाक आलेली शरीरयष्टी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांना भेटल्यावर ती एवढी महान व्यक्ती आहे असे कधीच वाटले नसते. परंतु ते जेव्हा संवाद साधत तेव्हा मात्र ऐकताना त्यांचा एकही शब्द चुकता कामा नये इतके लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकावेसे वाटत होते. काही वेळा ते रिझर्वड आहेत की काय अशी शंका येत होती. परंतु जे काही सांगायचे ते ठामपणे सांगत होते. त्यांच्या बोलण्यात बुद्धीमत्तेची झाक व ऐकणार्‍याला विचार करण्यास प्रवृत्त करणारी आग्रहाची व तार्किक मांडणी होती.

एकाच वेळी अनेक कामात ते गुंतलेले असत. त्यांच्या बरोबरच्या माझ्या चर्चेच्या वेळी अनेक वेळा व्यत्यय येत असे. कायम फोन वा मोबाइल कानाला लावलेलाच असे. परंतु माझे प्रश्न ते लक्षपूर्वक ऐकत होते. व प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर देत होते. ते उत्तर अंनिसच्या ध्येयधोरणांशी सुसंगत, मात्र अगदी लेक्चरच्या स्वरूपात असे. बहुतेक वेळा ते माझ्याशी फार जवळीक न साधता बोलतात की काय अशी मला शंका येत होती. परंतु माझ्या प्रश्नांना कुठलीही पूर्वतयारी न करता ते उत्तर देत होते, शंकांचे निरसन करत होते. त्या उत्तरात स्पष्टता होती, तर्कसुसंगती होती. ते काही तरी लपवत आहेत वा सांगू इच्छित नाहीत असे कधीच मला वाटले नाही. त्यांना त्यांच्या कार्यावर भरपूर विश्वास होता.

इतर अनेक सामाजिक सेवा संस्थाप्रमाणे अंनिसची चळवळ केवळ नेतृत्वावर विसंबून नव्हती. वा एक खांबी तंबू आहे असे कधीच वाटले नाही. उदाहरणार्थ एम एन रॉय नंतर त्यांची चळवळ थांबली. किंवा इंडियन रॅशनॅलिस्ट असेशिएशन म्हणजे सनत एडमारुकु असे अंनिसचे नाही. अंनिस संघटना नोकरशाही प्रमाणे शिडीसारखी श्रेणीबद्ध पद्धतीने न चालता एकाच समान पातळीवर परंतु वेगवेगळ्या कार्यक्रमावर काम करणार्‍या कार्यकर्त्यांची संघटना आहे हे जाणवत होते. अविनाश पाटील, एन डी पाडील, जळगावचे डॉ प्रदीप जोशी, नागपूरचे विजय सालनकर, लातूरचे अनिरुद्ध जाधव, ठाण्याचे सुशीला मुंडे, व पुण्याचे मिलिंद देशमुख इ. हे सहकारी डॉक्टरांना मदत करत असतात. अंनिस डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यासाठी डॉक्टरांनी भरपूर प्रमाणात लिखित साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.

मी जेव्हा जेव्हा या संघटनेतील कार्यकर्त्यांच्या बरोबर संवाद साधत होतो तेव्हा तेव्हा मला ते कार्यकर्ते बिचकून वा यथातथा वृत्तीने बोलत आहेत असे कधीच वाटले नाही. एकाच पातळीवर कार्य करणारे व त्याच्यांत श्रेष्ठ – कनिष्ठ – वरिष्ठ असा कुठलाही भेदभाव नसल्यामुळे हा एकसंधपणा त्यांच्यात जाणवत असावा. याचे संपूर्ण श्रेय डॉक्टरांना द्यायला हवे. सर्वजण कुठेही आढेवेढे न घेता स्ट्रेट फॉर्वर्डपणे संवाद साधण्यास उत्सुक असत. टीकेला न घाबरणारे व वेळ पडल्यास अनिष्ट प्रथावर घणाघाती हल्ला चढविणारे हे कार्यकर्ते होते. या प्रकारच्या खुलेपणासाठी डॉक्टरांची ध्येय धोरणं कारणीभूत ठरत असावीत. ही संघटना वन मॅन शो असे अजिबात वाटले नाही. डॉक्टर केंद्रस्थानी असून त्यांच्या भोवतीच कार्यकर्त्यांचे जाळे, त्यांचे कार्य, कार्यक्रम, संवादप्रक्रिया, निर्णय इत्यादी घडत होत्या. नागपूरच्या एका कार्यक्रमात वरिष्ठ कार्यकर्त्यांना पत्रकार परिषदेसाठी जावे लागले. तरीसुद्धा तरुण कार्यकर्त्यांनी कार्यक्रम तसाच चालू ठेवला. वरिष्ठ कार्यकर्ते परत आल्यानंतर मागे बसून राहिले. व कार्यक्रमाची सांगता झाली. डॉक्टरांची कार्यपद्धती अगदी शिस्तीची, नेमकी व कालबद्ध अशी होती. फापटपसारा अजिबात नसे.

विवेकवादाची चळवळ नेहमीच कोरडी, गंभीर, हास्य विनोदांना वाव नसणारी, भावनाशून्य अशीच समजूत आहे. मी इतर अनेक ठिकाणी याचा पुरेपूर अनुभवही घेतला आहे. परंतु अंनिसच्या कार्यकर्त्यांमधील खेळीमेळीचे वातावरण बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. यांच्या व डॉक्टरांच्या कार्यक्रमात गाणी, नाट्यछटा, भावना, कला यांना स्थान होते. डॉक्टर स्वतः हरहुन्नरी, कलेची जाण असलेले होते. कविता तोंडपाठ होत्या. चित्रपट, नाटक, साहित्य इत्यादींचे संदर्भ त्यांच्या भाषणात व चर्चेत असत.

त्यांच्या इतर कार्याबद्दल भरपूर माहिती माझ्या पुस्तकात आहे. मात्र दाभोलकरांचे हे दर्शन अगदीच भावणारे होते.

–जॉन क्वॅक

–शब्दांकन – प्रभाकर नानावटी