घाबरु नका!
घाबरु नका! जगाचा अंत यावर्षी नाही!
दै. सकाळमधील ही बातमी व त्या अनुशंगाने 3 जानेवारी 2012 रोजी आलेला अग्रलेख ‘बिनधास्त जगा लेको!’ वाचून काही जणांना हायसं वाटणं स्वाभाविकच आहे. वर्तनमानपत्रानं अतिरंजितता सोडून वस्तुस्थितीदर्शक चांगली बातमी दिली त्याबद्दल ‘सकाळ’ वृत्तपत्राचे मन:पूर्वक अभिनंदन. सदरची बातमी ‘माया कॅलेंडरनुसार जगाचा विनाश डिसेंबर 2012 रोजी होणार’ या चर्चेत असलेल्या विषयाशी निगडित आहे. या चर्चेला कारणीभूत ठरला तो कोलंबिया पिक्चर्स या अमेरिकन कंपनीचा, उत्पन्नाचे रेकॉर्ड ब्रेक करणारा नोव्हेंबर 2009 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा ‘2012’
माया कॅलेंडर हा काय प्रकार आहे हे पाहणं उचित ठरेल. भारतामध्ये हिंदु संस्कृतीचे जसे पंचांग आहे तसे मेक्सीको व ग्वाटेमालामधील माया संस्कृतीचे पंचांग म्हणजे ‘माया कॅलेंडर’. माया संस्कृतीचा कालखंड अधिकृतपणे इसवीसनपूर्व 250 ते 900 असा आहे. माया संस्कृतीचा अभ्यास करणं किंबहुना कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करणं कधीही उत्तमच परंतु त्या संस्कृतीतील सांकेतिक गोष्टींचा स्वत:च्या पद्धतीने विपर्यास करणं व आपल्यालाच कळालेलं आहे ही भूमिका मांडणं चुकीचं आहे. सांकेतिक लिपीचा, अथवा काहीतरी चिडबिड लिहिलेल्याचा स्वत:च्या पद्धतीने अर्थ लावणार्या तथाकथित विद्वानांची मांदियाळी सर्व ठिकाणी आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये कालमापनासाठी एकम, दहम, शतम, सहस्त्र, लक्ष, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंक, जलधी, अंत्य, मध्य, परार्ध असे शब्द वापरतात त्याच पद्धतीने माया कॅलेंडरमध्ये कालमापनासाठी युनल, तून, कातून, बक्तून आणि पिक्तून या शब्दांचा वापर केलेला आहे.
* 1 युनल म्हणजे 20 दिवस
* 1 तून म्हणजे 18 युनल(360 दिवस)
* 1 कातून म्हणजे 20 तून (7200 दिवस)
* 1 बक्तून म्हणजे 20 कातून(144000 दिवस म्हणजे जवळपास 394 वर्षे)
* 1 पिक्तून म्हणजे 20 बक्तून
आज तारीख सांगण्याची जी जकन्मान्य झालेली पद्धत आहे त्यानुसार दिवस-महिना-वर्ष अशी रचना आहे. माया संस्कृतीनुसार तारीख सांगण्याची पद्धत बक्तून-कातून-तून-युनल-दिवस अशी आहे. उदा. 8.3.2.10.15 याचा अर्थ 8 बक्तून 3 कातून 2 तून 10 युनल आणि 15 दिवस. माया संस्कृती समर्थकांच्या मतानुसार 21 डिसेंबर 2012 मध्ये हे कॅलेंडर दाखवणार 13.0.0.0.0. समर्थकांच्या मते 13 बक्तून (13 ु 394 वर्षे =5122 वर्षे) झाले की जगाचा विनाश होणार. कारण या कॅलेंडरमध्ये या दिवसानंतर आकडेच दिलेले नाहीत. परत शून्यापासून सुरवात म्हणजे 0.0.0.0. असं झाल्यामुळे पुन्हा कालचक्र सुरू. मोटारीने प्रवास करताना जसं एक किमी अंतर गेल्यानंतर मीटरवरील आकडे बदलत जातात व त्या मिटरची मर्यादा संपली की, शेवटी सर्व ठिकाणी शून्य येतात. तसा प्रकार होणार आहे. याचा अर्थ विश्वाचा अंत माया संस्कृतीने फार पूर्वीच वर्तवलेला होता. ही दर्पोक्ती, भंपकपणा करणार्या तथाकथित विद्वानांची व स्वत:चा आर्थिक स्वार्थ पुस्तक लिहून ती खपवणार्यांंची आहे. या वक्तव्याला काही आधार? 13 आकड्याला काही आधार? कोणताही आधार नाही. माया कॅलेंडरची गणना 13 नंतर संपत नाही ही वस्तूस्थिती आहे. कारण पिक्तून हे पण एक मोजमाप आहे. परंतु सोईस्करपणे समर्थक मंडळी हा उल्लेख टाळतात. काहीतरी कांडी पिकवून द्यायची व दुनियेला आणि पर्यायाने वैज्ञानिकांना झुलवायचं हा ठेका घेतलेली मनोरूग्ण मंडळी जगात आहेत. आणि दुर्दैव हे की अशांच्या वक्तव्यावर बहुसंख्य मंडळी विश्वास ठेवतात. 5122 वर्ष कुठून मोजायची ही शंका या भंकस समर्थकांना विचारलं तर या तथाकथीत विद्वांनाच्या मतानुसार माया संस्कृतीच्या कालगणनेला इसवीसनपूर्व 21 ऑगस्ट 3114 पासून सुरवात झाली असा यांचा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा दाखला. सदर दिनांकापासून 21 डिसेंबर 2012 पर्यंत 5122 वर्षे पूर्ण होतात.
अर्थात हा आकडा गणिताप्रमाणे जुळत नाही हे ही तितकेच खरे. आकडेमोड जुळवण्यासाठी कोणत्याही अवैज्ञानिक मार्गाचा अवलंब करण्यात ही मंडळी तरबेज आहेत. पण असो! त्यांची आकडेमोड आहे असं ग्रहीत धरलं तरी एखाद्याचा नाश व्हायचा असेल तर तो आकडेवारीवर अवलंबून असतो की, त्याच्या स्वत:च्या जगण्यावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर. अर्थात असा विचार करायचा असेल तर वस्तुस्थिती समजावून घेणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अनुमान काढण्यासाठी वैज्ञानिक पद्धती असावी लागते. विज्ञान असं सांगतं की, आपली पृथ्वी सूर्यावर अवलंबून आहे. गेली पाच अब्ज वर्षे तो आपल्याला ऊर्जा पुरवतो आहे कारण त्यामध्ये हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होऊन ऊर्जा निर्माण होते. आता सूर्यावरील हायड्रोजनचा साठा कमी होत जाणार हे ही निश्चित. अजूनही पाच अब्ज वर्षे तो साठा शिल्लक राहू शकतो. म्हणजे आपल्या सूर्याचं आयुर्मान आणखी पाच अब्ज वर्षे म्हणजेच आपलंही. तत्पूर्वी एखादी त्सुनामी, पर्यावरणीय र्हास, एखादी उल्का पडणे असा प्रकार घडू शकतो. पण हे कोणी लिहून ठेवलेलं नाही अथवा कुणाच्या मर्जीनुसार चालत नाही. तर हे कसं आणि कधी घडू शकतं हे सांगणारं विज्ञान आणि वैज्ञानिक आहेत. परंतु समाजमन वैज्ञानिकांच्या विश्वासार्हतेपेक्षा तथाकथित विद्वानांच्या वक्तव्यावर हेलकावत असतं हे प्रकर्षानं जाणवतं. वैज्ञानिक स्वत:चा स्वार्थ न ठेवता, समाजाला न घाबरवता, वस्तुस्थितीदर्शक माहिती देऊन समाजाला विनाशापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात आणि तो अधिकार त्यांनी अबाधित ठेवलेला आहे.
माया संस्कृतीच्या नावे चालवलेला हा सर्व उपद्व्याप हास्यास्पद आहे असा खुलासा ग्रीफीथ वेधशाळा, लॉस एंजेल्सचे संचालक क्रुप ई.सी.यांनी नासाच्या वेब साईटवर दि.9 नोव्हेंबर 2009 सालीच जाहीर केलेला आहे. सदर खुलासा इतका स्पष्ट आहे की, जगाचा नाश, उडत्या तबकड्या, बर्म्युडा ट्रँगल अशा प्रकारच्या वल्गना करणार्यांनी असला भंपकपणा करून आमचा वेळ वाया घालवू नये असा मतितार्थ सदर खुलाशातून स्पष्ट होतो. नासाला या विषयाच्या अनुषंगाने जवळजवळ 5000 प्रश्न विचारण्यात आलेले होते. काही जणांनी तर आम्ही आत्महत्या करू का? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. प्रश्नकर्त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का याची चिंता वाटते. या तथाकथित विद्वांनांनी जगाच्या नाशाच्या पुष्ट्यर्थ अनेक वैज्ञानिक दाखले अवैज्ञानिक पद्धतीने दिलेले आहेत.
* एक गूढ असा स्वत:भोवती वेगवान फिरणारा निबिरू ग्रह पृथ्वीवर येऊन आदळणार. (नासाने स्पष्ट केलेले आहे की, निबिरू असा कोणताही ग्रह अस्तित्वात नाही. वैज्ञानिक माहितीचा गैरवापर करणं, वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करून अवैज्ञानिक गोष्ट सर्वसामान्यांच्या माथी मारणं हा उद्योग करणारे हे विद्वान आपला भंपकपणा ज्यावेळेस थांबवतील तो सुदिनच म्हणावा लागेल. ‘हा सर्व उपद्व्याप असाध्य वेड जडलेल्या, जिवंतपणी मृत झालेल्या, मूर्ख लोकांचा अधारांतील खेळ आहे’ असा स्पष्ट उल्लेख नासाच्या वेबसाईटवर केलेला आहे. या वाक्याची दखल तथाकथीत विद्वान घेतील की नाही तो नंतरचा मुद्दा आहे. वाचकांनी तरी तो निश्चितच घेण्याची गरज आहे.)
* पृथ्वीची चुंबकीय शक्ती उलटी होणार आहे त्यामुळे प्रचंड मोठी सौर वादळे निर्माण होणार.
* सूर्य अत्यंत वेगाने आकाशगंगेच्या मध्याकडे कोसळत आहे. त्यामुळे तो डिसेंबर 2012 मध्ये पृथ्वीवर घेऊन कोसळणार आहे. यांना हे कोणी सुर्यानं सांगितलं का आकाशगंगेनं असा भाबडा प्रश्न यांना विचारून यांच्या बुद्धीची मापं न काढलेलीचं बरं.
* फ्रॅक वॉटर्स या रोमँटिक व तथाकथीत कादंबरीकारानं आपल्या ‘मेक्सिकोची गूढ शक्ती’ या पुस्तकामध्ये 1975 साली बक्तून 13 संदर्भात दर्पोक्ती केलेली आहे आणि दिनांक दिलेली आहे 24 डिसेंबर 2012. अचानक मोठे महासंकट विनाशाला कारणीभूत ठरणार. आणि माया संस्कृतीचं चक्र पूर्ण होणार आणि जगाचंही. पुन्हा नवीन निर्मिती होणार. परंतु संस्कृतीचे खर्या अभ्यासकांच्या मते माया संस्कृतीचं आणि जगाच्या विनाशाचा काहीही संबंध नाही. असणारच नाही हो. फक्त आपलं पुस्तक खपवण्यासाठी लेखकानं टाकलेला हा अतिरंजीत मसाला आहे.
* 1995 मध्ये जॉन मेजर जेन्किन्सने अनेक कल्पनांचा उहापोह केलेला आहे. दक्षिणायन बिंदू व आकाशगंगेची मध्य रेषा दि.21 डिसेंबर 2012 रोजी एकत्र येणार आहेत. त्यामुळे माया संस्कृतीने तो दिवस जगाच्या विनाशाचा ठरवलेला आहे. त्या दिवशी प्रचंड बदल होणार, एका जगातून दुसर्या जगात जाणार, आध्यात्मिक शक्ती वाढणार. यावर कडी म्हणजे जेन्किन्सने उल्लेख केलेला आहे की, त्याने स्वत: आकाशगंगेची शेवटची टोकं 11000 फुटावरून जाऊन पाहिलेली आहेत. या अंतरावर माया संस्कृती राहात होती असं त्याचं मत आहे.(जेन्किन्सनने हे वक्तव्य करण्यापूर्वी बहुतेक गोळी घ्यायची चुकली असावी कारण माणूस आतापर्यंत जवळपास 4 लाख किलोमीटर अंतरावरील चंद्रावर गेलेला आहे. या अंतरावरून आकाशगंगेची टोकं पाहण्याची कल्पना हास्यास्पदच आहे. तिथं 11000 फूट अंतराचं काय घेऊन बसलाय. अशा रेषा वगैरे कल्पना आहेत. असं खगोलवैज्ञानिकांचं मत आहे. आपण कोणत्या मताप्रमाणे वागायचं अथवा चालायचं हे मात्र आपणच ठरवायचं आहे. मुळात आजही आकाशगंगेची व्याप्ती खगोलाला तंतोतंत समजलेली नाही. त्याची मध्य रेषा काय आणि दक्षिणायन बिंदू काय यांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही.
माया संस्कृतीच्या वरील संदर्भीय उल्लेखाचे पुरातत्व खात्याने अत्यंत सुस्पष्टरित्या स्पष्टीकरण दिलेलं आहे. लॅटीन अमेरिकन कला व पुरातत्व विभागाच्या संचालक सुसान मिलब्राथ यांनी स्पष्ट केलेलं आहे की, ‘आमच्याकडे असा कोणताही पुरावा नाही की, या जगाचा विनाश 2012 साली होणार आहे’. ग्वाटेमालाच्या मानवी हक्क आयोगाचे प्रमुख मार्टीन सेक्सोलेट यांनी स्पष्ट केलेलं आहे की, माया कॅलेंडरचा शेवट आणि जगाचा 2012 ला होणारा शेवट याचा काहीही संबंध नाही.
माया संस्कृतीबद्दल द्वेष आहे म्हणून हा खुलासा नाही. तथाकथीत महाभाग पूर्वीचं कसं उत्तम होतं, पूर्वीचे लोक किती प्रगल्भ व हुशार होते हे ठसवण्यासाठी व आपण विद्वान आहोत हे भासवण्यासाठी अशा उचापती करतात. व सर्वसामान्यांना भूतकाळात रममाण व्हायला लावतात. मुळात आजची माहिती ही पूर्वी लोकांनी केलेल्या निरिक्षणावरच आधारीत होती. पूर्वीचे लोक त्यांच्या काळात हुशारच होते. ज्ञानाच्या कक्षा फक्त मर्यादित होत्या. काळ जसा पुढे जात राहिला तसं तसं नवीन माहिती मिळू लागली व जुन्या ज्ञानामध्ये भर पडत गेली व ज्ञान अद्ययावत होत गेलं. त्यामुळे आजची माहिती निश्चितच पूर्वीपेक्षा प्रगल्भ आहे यात शंकाच नाही. इतिहास, संस्कृतीचा विपर्यास करून विनाकारण वैज्ञानिकांचा व सर्वसामान्यांचा वेळ तसेच पैशाचा अपव्यय करण्याचा ध्यास ही मंडळी का घेतात हेच कळत नाही.
– डॉ. नितीन शिंदे