ऑफिसमध्ये माझ्या आसपासच्या कर्मचार्यांमध्ये अंधश्रद्धेला पूरक असं वातावरण होतं. विशेष करून दैवीशक्ती, अंगात येणं ह्यावर विश्वास असणारे बरेच होते. काहीतरी शक्ती असते असं ते म्हणत. मी तसं काही नसतं म्हणाल्यावर आमच्यात वाद होत असत. हे लोक नुसतं बोलून त्यांचे विचार बदलणार नाहीत एवढंच काय आपल्या शिबिराला तर नक्कीच येणार नाहीत ह्याची मला खात्री होती.
मग एक दिवस ऑफिसमध्ये जाताना चमत्कार सादरीकरण करण्याचे थोडे साहित्य सोबत घेऊन गेले. माझ्या विभागातल्या कर्मचार्यांना जेवणाच्या सुट्टीत अमूक कोपर्यात मी काही चमत्कार करून दाखविणार आहे असं सांगून जमायला सांगितले. चमत्कार म्हणाल्यावर काही लोक जमले. नंतर इथे काहीतरी चाललंय हे बघून आणि लोक जमले. मग मी कापूर खाणे, दृष्ट उतरविणे, मंत्राने अग्नी पेटविणे, उदबत्तीचा प्रयोग असे चमत्कार सादरीकरणाचे प्रयोग करून त्यामागची कारणे सांगितली. त्याचा चांगला प्रयोग झाल्याची त्यांच्या बोलण्यातून जाणीव झाली. त्यानंतर त्यावर चर्चा झाली असावी. कारण काही कर्मचार्यांनी येऊन आम्हाला बघायला नाही मिळाला, परत एकदा कर असा आग्रह धरला. मग परत एकदा हाच प्रयोग केला. आपल्या कार्यक्रमाला येण्याचे कष्ट घेणार नाहीत अशांचे प्रबोधन जेथे संधी मिळेल तेथे करणे शक्य असल्याचा प्रत्ययही मला आला.
–विजया दिवेकर, गोरेगाव, मुंबई